निंबळक गाव नाईक-निंबाळकरांचे (Nimbalak Village ‘Belongs to’ Naik-Nimbalkars)

          निंबळक हे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यात वसलेले गाव. ते पुणे-पंढरपूर महामार्गापासून तीन किलोमीटर आणि फलटणपासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या चार हजारांच्या आसपास. निंबाळकर हे निंबळक गावातील प्रसिद्ध घराणे. गावात नाईक-निंबाळकर घराण्याची गढी आहे. गढीचे भव्य प्रवेशद्वार, चांगल्या स्थितीत असलेले भक्कम बुरुज इतिहासाच्या खाणाखुणा अंगाखांद्यावर खेळवत उन्हापावसात उभे आहेत. तेथील मूळ बांधकाम दगडातील असून त्यात चुन्याचा वापर केलेला नाही. गढीच्या आतील भाग ढासळला आहे. ती गढी शंभुसिंग पृथ्वीराज नाईक-निंबाळकर यांच्या ताब्यात आहे.

          निंबळक गावाचा ज्ञात इतिहास तेराव्या शतकापर्यंत जाऊन पोचतो. दिल्लीच्या सुलतानांनी त्या काळात धारच्या परमार राज्यावर अनेक आक्रमणे केली. त्या रणधुमाळीत निंबराज परमार (पवार) नावाचे एक सेनानी दक्षिणेत फलटणनजीक शंभुमहादेवाच्या रानात 1244 च्या सुमारास येऊन राहिले. त्या रानात कडुनिंबाची झाडे मोठ्या प्रमाणावर होती. त्याच रानात त्यांनी शंभुमहादेवाच्या पायथ्याशी वसाहत केली. तेच निंबळक. त्यांनी तेथे निमजाईदेवीच्या मूर्तीची स्थापना केली. निमजाईदेवी ही निंबाळकर यांची कुलस्वामिनी आहे. त्यामुळे ती निंबळकचे ग्रामदैवत झाली. त्या गावाला निंबराज परमार यांच्या नावावरून निंबळक हे नाव मिळाले. त्यावरूनच त्यांच्या वंशाला निंबाळकर असे म्हटले जाऊ लागले. निंबराज यांच्या वंशजांनी पुढे फलटण हे गाव वसवले. तेथे ते वतनदार म्हणून राहू लागले. त्यांना महंमद तुघलकाच्या काळात नाईकहा किताब मिळाला; फलटणची देशमुखीदेखील मिळाली. सर्व निंबाळकरांची तेव्हापासून कडुनिंबाप्रती अतीव श्रद्धा आहे, कारण वृक्ष त्यांच्या कुलदेवतेशी (निमजाई) संबंधित आहे. त्यामुळे निबंळक येथे कडुनिंबाची झाडे तोडली जात नाहीत आणि त्याचे लाकूडही जळण वगैरेसाठी वापरले जात नाही. छत्रपती संभाजीराजांना कैदेदरम्यान निंबळक गावातील वाड्यात रात्री मुक्कामी ठेवले होते असे गावकरी सांगतात.

निमजाई देवीची पालखी

 

निमजाईदेवीची यात्रा हे गावचे मुख्य आकर्षण आहे. दरवर्षी चैत्र पौणिमेनंतर पाच दिवसांनी गावाची जत्रा असते. ती यात्रा दोन दिवस चालते. पहिल्या दिवशी गावातील सुवासिनींना पुरणपोळीचे जेवण असते. यात्रेसाठी जावळी येथून सिद्धनाथाची काठी येते. तिची गावात पूजा केली जाते. त्यावेळी देवीच्या हळदीचा कार्यक्रम असतो. दुसऱ्या दिवशी पहाटे गावातून देवीच्या पालखीची मिरवणूक निघते. त्याला देवीचा छबिनाम्हणतात. निंबराजांच्या वंशजांकडे पूजेचा मान असतो. त्या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. गावात लक्ष्मीआई, खंडोबा, महादेव, हनुमान, बिरोबा अशी इतर मंदिरे आहेत.

निमजाईच्या देवळामागे एक तळे आहे. त्याची खोली पाच फूट एवढी आहे. त्या तळ्यातही देवीची मूर्ती आहे. त्या देवीमुळेच या तळ्याचे पाणी दुष्काळातही आटत नाही अशी तेथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे. अगदी 1972-73 च्या दुष्काळातही लोकांना त्या तळ्याचे गोडे पाणी उपलब्ध झाले होते असे गावातील जुने लोक सांगतात.

निमजाई मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

 

          निमजाई मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच करण्यात आला. मंदिराचे मुख्य विश्‍वस्त राम निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थ व भक्त मंडळींच्या सहकार्याने ते काम पूर्ण केले. त्यावेळी मंदिराच्या मुख्य इमारतीसह परिसराचेही सुशोभीकरण करण्यात आले आहे. निमजाई देवीच्या मुख्य गाभार्‍यात देवीच्या मूर्तीच्या बाजूने सुमारे दोन किलो चांदीची मखर (महिरप) तयार करून बसवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मंदिराच्या कामाच्या ओघात सोलापूर-विजापूर मार्गाच्या पंचवीस किलोमीटर रस्त्याचे बांधकाम चोवीस तासांत पूर्ण करण्याचा विक्रमही निंबाळकर यांच्या नावावर आहे.

          गावातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्या खालोखाल दुग्धव्यवसाय केला जातो. तेथे जवळपास प्रत्येक घरी गायीम्हशी पाळलेल्या आहेत. बरेच लोक शेतमजुरी करतात. कुक्कटपालन, शेळीपालन असे जोडव्यवसायही आहेत.

          गावात दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. बाजारात अवतीभोवतीच्या गावातील माणसे येतात. गावात प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नावाचे हायस्कूल आहे. शिक्षणाची सोय दहावीपर्यंत आहे. विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या फलटण तालुक्याला, तसेच बारामतीला जातात. गावातील काही विद्यार्थी गुणवरे, वाजेगाव या जवळपासच्या ठिकाणी असलेल्या इंग्लिश मिडियमच्या शाळांत शिकत आहेत.

          निंबळक गावात, एकूणच फलटण तालुक्यात पाऊस कमी पडतो. मात्र कालव्यांमुळे सिंचनाची सोय झाली आहे. गावातील बहुतांश जमीन बागायती आणि थोडी जमीन जिरायती आहे. ऊस हे तेथील मुख्य पीक आहे. त्याशिवाय गहू, ज्वारी यांचेही उत्पादन घेतले जाते. फळांमध्ये डाळिंबे, केळी पिकवली जातात. गावाला वीर-भाटघर धरणाच्या नीरा उजव्या कालव्याचे पाणी मिळते. ते पाणी गावाची पिण्याच्या पाण्याची व शेतीची गरज भागवते. त्या कालव्याला अनेक उपकालवे आहेत. त्यांपैकी 29 ते 31 क्रमांकाच्या उपकालव्याचे पाणी गावाला देण्यात येते. गावात उत्पादित होणारा ऊस श्रीराम, साखरवाडी, शरयू, ऍग्रो, माळेगाव या साखर कारखान्यांना पुरवला जातो.

          निंबळक गावात येण्याजाण्यासाठी फलटणहून एसटी आहे. बारामती येथूनही एसटी आहेत. त्या शिवाय फलटणहून सहा आसनी डुगडूगी रिक्षादेखील आहेत. बारामती हे जवळचे रेल्वे स्थानक आहे. फलटण, बारामती, म्हसवड, दौंड ही तुलनेने शहरीकरण झालेली ठिकाणे जवळपास आहेत. निंबळकमध्ये मात्र साधेपणा, श्रद्धा, इतिहासाविषयी आदर, संस्कृतीचा अभिमान आणि त्याचबरोबर रोजच्या गरजा भागवण्यापुरती स्वयंपूर्णता यांचा छानसा मिलाफ आहे. गावाच्या जवळपास गुणवरे, वाजेगाव, मठाचीवाडी, बरड, पिप्रद, टाकळवाडे ही गावे आहेत.

माधवी सुरेंद्र पवार
8698257249 pwr.madhavi@gmail.com
—————————————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here