बाणूरगड हा किल्ला सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यात आहे. तो सांगली शहराच्या उत्तरेला साधारण साठ किलोमीटर अंतरावर येतो. तो भाग माळरानाचा आहे. किल्ला सांगली जिल्ह्यातील खानापूर व आटपाडी तालुके आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अशा तीन तालुक्यांच्या सीमारेषेवर आहे. किल्ला बाणूर गावाजवळच्या थोड्याअधिक मोठ्या डोंगरमाथ्यावर वसलेला आहे. त्याला ‘भूपालगड’ असेही संबोधले जाते. त्यामुळे त्या भागाला ऐतिहासिक महत्त्व लाभलेले आहे. भारतीय लोक ऐतिहासिक वास्तूंबद्दल उदासच असल्याचे प्रत्यंतर त्या गडावर फेरफटका मारताना जाणवते. तो गड काळाच्या ओघात उरले सुरलेले अवशेष वागवत उभा आहे. त्या किल्ल्यावर फिरताना प्रकर्षाने आठवण होते ती शिवाजी महाराजांचा विश्वासू गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची. बहिर्जी नाईक यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील सिंघवे नाईक या खेडेगावात झाला. त्यांची समाधी बाणूरगडावर आहे. तो गड आकाराने व विस्ताराने प्रचंड क्षेत्रफळाचा आहे. त्याच्या तळाला एका कोपऱ्यावर छोटे बाणूरगड गाव वसलेले आहे. तेथून पायवाटेने तळ्याजवळून पायऱ्यांनी गडावर जाता येते.
या गडाला ‘भूपालगड’ असेही संबोधले जाते. ‘बुसातिन-उस-सलातिन’ या साधनग्रंथानुसार शिवरायांनी मांजऱ्याजवळच्या पर्वतावर मजबूत असा किल्ला बांधला व त्यास भूपालगड हे नाव दिले; तर एका लोककथेनुसार भूपालसिंह राजाने तो गड बांधला म्हणून त्या गडाचे नाव भूपालगड असे पडले.
किल्ल्याच्या आवारात बाणलिंगाचे म्हणजेच महादेवाचे मंदिर आहे. त्यातील शिवलिंगाला बाणूर्लिंग म्हणून ओळखले जाते. समाधी मंदिराच्या एका बाजूस बहिर्जी नाईक यांची आहे. ती वृंदावन समाधी आहे असे मानले जाते. ती मराठे आणि मुघल यांच्यात झालेल्या लढाईची साक्षीदार होय. दिलेरखान या मुघल सेनापतीने 1679 साली त्या गडावर हल्ला केला. त्यावेळी गडावर फिरंगोजी नरसाळा हा शूरवीर किल्लेदार होता. त्याने जवळील संग्रामदुर्ग येथे शाहिस्तेखान आणि त्याच्या सैन्याबरोबर यशस्वी लढा देऊन मुघलांना हटवले होते. त्याने शिवरायांना अनेक संकटमय प्रसंगात मदत केली होती. मात्र तो बाणूरगडाच्या लढाईत धर्मसंकटात सापडला होता. शेवटी, त्याने गड दिलेरखानाच्या स्वाधीन केला. मराठ्यांचे फार मोठे नुकसान झाले. शिवाजी महाराज अस्वस्थ झाले आणि साऱ्या किल्लेदारांना, गडकऱ्यांना आदेश जारी करून कोणत्याही परिस्थितीत गड सोडायचे नाहीत असे फर्मावले. किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजूस पाण्याचा मोठा साठा आहे. किल्ल्याच्या तटात गुप्तपणे जाण्यासाठी दोन-तीन दरवाजे असल्याचे दिसते. किल्ल्यावर जाण्यासाठी फार मोठी चढण नाही. त्यामुळे सहजपणे किल्ल्यात प्रवेश करता येतो.
त्या किल्ल्याकडे जाण्यासाठी सांगली तासगावमार्गे जाता येते.
– प्रल्हाद कुलकर्णी 8830072503 drpakulk@yahoo.com
————————————————————————————————