आंबोळगड – प्रतिगोवा !

आंबोळगड हे आमचे गाव कोकणाच्या राजापूर तालुक्यात रत्नागिरीपासून पन्नास किलोमीटर आणि राजापूरपासून बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. ते तीन बाजूंनी समुद्राच्या कुशीत वसले आहे. एकीकडे डोंगरकड्याशी कठोर झुंजणाऱ्या सागरलाटा आणि दुसरीकडे वाळूशी पदन्यास करणाऱ्या सागरलाटा… दोन्ही विभ्रम एकाच ठिकाणाहून दिसतात. निसर्गराजाची अशी नानाविध रूपे तासन् तास न्याहाळत बसावे, असे आहे हे आंबोळगड गाव.

गावाचे क्षेत्रफळ दोनशे एकर आहे. गावात शिवकालीन इतिहासाची शौर्य परंपरा, गौरवशाली संस्कृती यांची यशोगाथा सांगणारा पुरातन किल्ला आहे. किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर व तोफा आहेत. तटबंदी छोटी असली तरी मजबूत आहे. त्या किल्ल्यामुळेच गावाला आंबोळगड असे नाव पडले. ब्रिटिश कर्नल इमलॉक याने तो किल्ला 1818 मध्ये जिंकला. दुर्गावर असलेली वस्ती 1862 च्या सुमारास उठली. आंबोळगड किल्ल्यावर वस्ती नाही. गड पुरातत्त्व खात्याकडे आहे.

गावात प्रवेश करताच वेत्याच्या समुद्रकिनाऱ्याला जाऊन भिडणारा आठ किलोमीटरचा, शुभ्र पांढऱ्या वाळूचा उपरच्या बंदराचा समुद्रकिनारा आहे. उपर हे त्या किनाऱ्याला गावकऱ्यांनी दिलेले नाव. त्या किनाऱ्यावर सामाजिक वनीकरण प्रकल्पातून वाढवलेले, गार हवा देणारे सुरूच्या झाडांचे बन आहे. त्याच किनाऱ्यावर नवलादेवीचे मंदिर आहे. त्याकरता एक किलोमीटर अंतरावर डोंगर पोखरला आहे. त्या जागेचे मालक व देवीचे मानकरी आम्ही नार्वेकर; आम्हीच गाभाऱ्यापर्यत जाण्यासाठी चिऱ्यांची घाटी बांधली आहे. गाभाऱ्याच्या पायथ्याशी गर्द झाडी आहे. तेथे थंड पाण्याचे झरे आहेत. ते बाराही महिने वाहत असतात.

आंबोळगड गाव तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेले असले तरी प्रत्येक वाडीसाठी गोड्या पाण्याची स्वतंत्र विहीर आहे. गावात बारा वाड्या आहेत. त्या आडनावानुसार आहेत. तशीच घरांची वस्ती आहे. आजुबाजूच्या गावांत पाण्याचे दुर्भीक्ष्य आहे. मात्र आंबोळगड उन्हाळ्यातही पाण्याने समृद्ध असते. गावात विश्वास गणपत करंगुटकर यांनी स्वत:ची तीन गुंठे जमीन देऊन तेथे तलाव बांधला आहे. तो खोदताना वीस फूट खोलीवर पाणी लागले. त्या तलावातून करंगुटकर यांनी गावात पाण्याची नळयोजना करून घरोघरी नळाचे पाणी पोचवले आहे. त्यामुळे गावातील वस्ती वाढली तरी पाणीटंचाई जाणवत नाही. आता गावात रस्ते झाले आहेत, रेशनिंग ऑफिस व दुकानही आहे.

गणपतीचे मंदिर समुद्रकिनारी आहे. त्या मंदिराला लागून मोठा पिंपळवृक्ष आहे. तेथे महापुरुषाचे मंदिर आहे. ही कोकणातील पद्धत आहे, की गाव प्रवेशाच्या ठिकाणी महापुरुषाचे मंदिर असते. काही ठिकाणी तर त्या महापुरुषास देवाचे नाव असते. ती दोन्ही मंदिरे ग्रामस्थांना त्यांच्या गावची देवस्थाने वाटतात. त्याच किनारपट्टीवर साईबाबांचे मंदिर आहे. गावात विठ्ठल-रखुमाईचे मंदिर असून आषाढी एकादशीला तेथे मोठा उत्सव असतो. त्यावेळी रात्री नामवंत भजनीबुवांच्या गायनाच्या भेंड्या असतात.

होळीचा सण साजरा करण्याची गावात वेगळी पद्धत आहे. त्यासाठी मुंबईहून चाकरमानी आवर्जून गावात येतात; ढोल-घुमटाच्या तालावर पौराणिक वग, देवतांची गाणी गाऊन नाचतात. होळीपासून पाडव्यापर्यंत शेजारच्या गावातील देवदेवतांचे खेळे गावोगावी फिरतात. दुसऱ्या दिवशी होलिकादेवीचे पूजन करतात.

गावाच्या पश्चिमेला सपाट डोंगरावर श्री गगनगिरी महाराज यांचा आश्रम व दत्तमंदिर आहे. गगनगिरी महाराजांची जन्म शताब्दी 2006 साली झाली. गगनगिरी महाराजांच्या आश्रमाची स्थापना 1979 साली झाली. त्यानंतर आंबोळगड येथे गगनगिरी महाराजांनी शंभर दिवसांची सिद्धसाधनेची तपस्या केली. त्यांनी नाशिकला कुंभमेळा 1991 साली चालू असताना आश्रमाच्या मागील बाजूस असलेल्या समुद्रातील पाण्याच्या कुंडात चाळीस दिवस ध्यानसाधना केली. जेव्हा जेव्हा गगनगिरी महाराज आंबोळगड आश्रमाला भेट देत, तेव्हा तेव्हा महाराज तेथील गुहेमध्ये तासन् तास ध्यानसाधना करून झाल्यावर भाविकांना दर्शन देत असत. महाराजांचे भक्त व शिष्यगण यांनी गेल्या चाळीस वर्षांमध्ये मोठ्या पराकाष्ठेने तेथे वृक्षलागवड करून शांततामय असे नंदनवन फुलवले आहे. दत्तजयंती व गुरुपौर्णिमेनिमित्त तेथे मोठा उत्सव असतो. आश्रम परिसरातून सूर्यास्त पाहणे म्हणजे स्वर्गीय सुखाचा आनंद आहे. पश्चिमेकडे सागरात बुडी मारण्यासाठी आतुरलेला सूर्य पाहताना आकाशातील व पाण्यातील रंगछटा क्षणाक्षणाला बदलत जातात. पाहणारा मंत्रमुग्ध होतो.

गावातील बहुतांश वस्ती शिवाजी महाराजांचे आरमार गाजवणाऱ्या मायनाक भंडारी यांच्या वंशातील आहे. गावकरी दिवसातून दोन वेळा समुद्रात सोडलेली जाळी पालवून ताजी फडफडीत मासळी आणतात (जाळी पालवणे म्हणजे समुद्रात मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेले मासे गोळा करणे). त्यामध्ये चार ते पाच फूट लांबीच्या घोळ माशापासून लुसलुशीत कालवांपर्यत अनेक प्रकारचे मासे असतात – मच्छिमारी हा गावातील तरुणांचा प्रमुख व्यवसाय आहे. माशांची विक्री आजुबाजूच्या गावांमध्ये होते.

मासेमारीशिवाय येणाऱ्या पर्यटकांसाठी सोयीसुविधा हाही पोटापाण्याचा एक व्यवसाय आहे. तरुणवर्ग गावात कामधंदा करण्यास तयार नसतो. तरुण मुंबईला जाणे पसंत करतात. गावात अकरावीपर्यंत शाळा आहे, पण बारावीपासूनचे पुढील शिक्षण घेण्यास मुंबईलाच जावे लागते. मालवण-तारकर्लीप्रमाणे पर्यटकांसाठी सोयीसुविधा हा पोटापाण्याचा उत्तम व्यवसाय होऊ शकेल. पडिक जमिनीत आधुनिक पद्धतीने सामायिक शेती केल्यास तोही तरुणांना चांगला रोजगार होईल.

– जगदीश नार्वेकर 9833993284

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here