अंगण (Courtyard)

एखाद्या शब्दासरशी आपल्या मनात रूप, रंग, गंध, नाद अशा अनेक संवेदना जाग्या होतात. ओल्या फुलाचे परागकण हाताला चिकटून यावेत तशा आठवणी जाग्या होतात. ‘मातीचा वास आला!’ या गद्य शब्दात किती सुगंध, उल्हास साठला आहे. आपण सध्याच्या दिवसात किती असोशीने त्या वासाची वाट पहात आहोत.

अशाच संवेदना वेगवेगळ्या जागांशी, घरांशी संबधित असतात. आजच्या लेखात मंजूषा देशपांडे यांनी त्यांनी पाहिलेल्या आणि त्यांच्या मनातल्या अंगणांविषयी लिहिले आहे.

शहरांमध्ये उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना अंगण माहीत नाही असे म्हटले जाते पण ते खरे नाही. कवी ‘बी’ यांनी त्यांच्या ‘चाफा’ या कवितेत म्हटल्याप्रमाणे हे विश्वाचे अंगण आपल्याला आंदण मिळालेले आहे आणि शुद्ध रसपान आपण करूच शकतो.

‘मोगरा फुलला’ या सदरातले इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

– सुनंदा भोसेकर

मला अंगण हा शब्द आवडतो; आणि खरेखुरे अंगणही ! बाहेरच्या खुल्या विश्वाला आणि घरातील उबदार जगाला सांधणारे अंगण… घरातील माणसांच्यात मन गुंतवणारे अंगण… गाणारे, नादावलेले, नाचणारे, हसणारे, खिदळणारे आणि रूसणारेही. अंगण… अनोळखी घरी जावे आणि तेथील अंगणावरून त्या घरातील लोकांची एकंदर मनस्थिती जाणण्याचा तर्क करावा… बहुतेक वेळेला तो बरोबर येतो.. पण काही म्हणा कोणतेही अंगण नव्या नवऱ्यांचे आणि नव्या लेकरांचे स्वागत मोठ्या आनंदाने आणि उत्साहात करते.‌

काही अंगणे रंगरसिली असतात, तर काही अंगणांमध्ये गंध घमघमतो.‌ काही दोन्ही प्रकारांची असतात. अजूनही मला एखाद्या ओलसर संध्याकाळी गुलबाक्षीचा सुगंध आला की हिंगणघाटच्या घरातील अंगण डोळ्यांसमोर दिसू लागते.

अंगण म्हणजे फक्त काही घरासमोरील मोकळी जागा असे नाही तर त्यातील बाग आणि त्या बागेला सौंदर्य प्रदान करणारे तिचे कोंदण. म्हणजेच त्या अंगणात लावलेल्या झाडांमुळे, त्यात रेखलेल्या रांगोळ्यांमुळे, आश्विन आणि कार्तिक महिन्यांत तेथे लागलेल्या सांजवातीमुळे आणि हस्त नक्षत्रात तेथे धरलेल्या हदग्याच्या फेरामुळेही… माझ्या मनात काही अंगणे अगदी रूतून बसलेली आहेत ! त्यांत सुंदर म्हणावीत अशी छोटीमोठी अंगणे बरीच आहेत. मी डेहराडूनला झोपडीवजा घरासमोरील जागेत दूधाच्या पिशव्यांत फुललेल्या बागा आणि फुललेले अंगण पाहिले आहे.‌ ऊसतोडणी कामगारांच्या तात्पुरत्या झोपड्यांसमोरच्या इवल्याशा जागेत पाचसहा औषधी वनस्पती आणि काही पालेभाज्या/रानभाज्या असलेले अंगणही काही कमी सुंदर नसते.‌ कराडच्या दीक्षितसरांच्या अमलताशचे कोकणातील घरांसमोर असते तसे अतिशय देखणे अंगण… उत्तर प्रदेशातल्या कर्वीच्या राजाच्या घरचे परदेशी फुलांनी बहरलेले भले मोठ्ठे अंगण, मुडशिंगीकरांच्या अकराव्या गल्लीतील घरात तर सायलीच्या फुलांचा मोठ्ठा वेल पसरलेली कमान, इडलिंबाचे एक झाड आणि पेरूचे एक झाड एवढेच त्यांचे अंगण होते. बाकी त्यांची बाग गच्चीवर…पण प्रथमदर्शनी असणारे अंगण म्हणजे तेथील बाग नेमकी… पण तेथील मातीचा कण आणि कण हसरा असे. दारी आलेल्या माणसांना सामावून घेई.‌

माझ्या हृदयाची ठेव असलेली, माझ्या अंतरातील अजून काही अंगणे आहेत… त्यातले पहिले म्हणजे माझ्या आईच्या माहेरच्या हिंगणघाटचे. हिंगणघाटच्या कडक उन्हातही त्या अंगणाला खूप गारवा होता.‌ आजी रोज भल्या पहाटे तेथे सडा शिंपून रांगोळ्या घालायची. त्यावेळी अंगण अजून झोपलेले असते अशी माझी समजूत असे. आजी सडा-रांगोळी घालताना हलक्या आवाजात रामरक्षा नाहीतर व्यंकटेश स्तोत्र म्हणत असे, त्यामुळे बिचाऱ्या अंगणाची झोप अवेळीच मोडत असणार, म्हणून मला वाईटही वाटे. पण, खरे तर, आजीच्या अगोदरच तेथील सगळी फुलझाडे, फुललेली फुले अंगावर मिरवत उगवत्या सूर्याचे स्वागत करण्यास सज्ज झालेली असत. फिकट गुलाबी रंगाच्या गावठी गुलाबाचे एक झुडूप तर अखंड फुललेले असायचे. एक पाकळी, दोन‌ पाकळी, चार पाकळी. मोगरे तर… काही विचारू नका- एवढ्या एवढ्याशा छोट्या झाडांना टोपल्या भरभरून फुले येत. एका बाजूला आवळ्याजावळ्या लेकरांसारखी दिसणारी चक्रीची झाडे, चांदण्यांसारख्या शुभ्र फुलांच्या भाराने बिचारी वाकून जायची. चक्री म्हणजे तगर. आमची आजी हाडाची वैद्य होती. नाना प्रकारच्या औषधी वनस्पती तिच्या अंगणात विराजमान असत. त्यामध्ये अतिशय गोड असलेले पेरूचे झाड.. त्या झाडाखाली आजीचे तुळशी वृंदावन. तेथे महादेवाची पिंडी, गणपती बाप्पा आणि बहुधा शाळिग्राम असे. उन्हाळ्याच्या दिवसांत त्या अंगणात घरातील; आणि पाहुणे मंडळींसाठीही खाटा घालत. निळ्या आकाशातील लख्ख चांदण्या मोजत कधी झोप लागे ते कळायचेसुद्धा नाही. उन जमले की पापड-सांडग्यांच्या वाळवणांनी अंगण भरून जायचे…

संध्याकाळच्या वेळी उंच झोपाळा घेत. आमच्या मावशा आणि मावस बहिणी गाणी गात. त्यावेळी अंगणही ताल धरी, त्यांच्या सूरात सूर मिसळे. माझ्या एका मावशीच्या लग्नाच्या वेळी, अंगणात मांडव घातलेला होता. मावशीच्या पाठवणीच्या वेळी सगळ्या बायांबरोबर अंगणानेही अश्रू ढाळले होते. खरे तर, तिचे लग्न झाले होते बारा जूनला. तेव्हा पाऊस मृग नक्षत्राच्या सुमारास नियमितपणे पडायचा. त्यामुळे पावसात ओलेचिंब झालेले अंगण रडत आहे असे मला वाटत असणार… पहाटे, सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि प्रत्येक ऋतूमध्ये ते अंगण नाना कळांनी बहरून जाई आणि अतिशय आनंदात नाचे….आजोबा असताना पुरणपानग्यांची पंगत अंगणातच बसे. आजी गेल्यानंतर मात्र त्या अंगणाने स्वतःचे अस्तित्व निमूटपणे आवरून घेतले.‌ त्यानंतर त्या अंगणालाही जणू उतरती कळा लागली….

माझ्या मनातील दुसरे अंगण म्हणजे तळेगावचे. खरे तर, ते अंगण मी अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच वेळा पाहिले आहे. मला त्या अंगणातील पहाट आणि रात्रही माहीत नाही, पण त्या अंगणाशी माझे नाते जन्मोजन्मीचे असल्याने मला त्या अंगणाच्या विविध रूपांची कल्पना करता येत असे. आमच्या काकांनी तेथे लावलेले वांग्याचे एक झाड होते. त्या एवढ्याशा झाडाला जांभळी काटेरी वांगी लागत. तेथे एक पेरूचेही झाड होते. बाकी अंगण स्वच्छ सारवलेले आणि झाडलेले असे. त्या घरातील परदेशी असलेली पोरेबाळे आली, किंवा सासरी नांदत असलेल्या पोरीबाळी आल्या की अंगण समाधानाने तृप्त हसत असे. वर्धेच्या काकांच्या अंगणात नाना तऱ्हेचे गुलाब, मोगरे, शेवंती, कण्हेर आणि बरीच फुले असत. आमच्या काका-काकूंची बोटे हिरवी होती. त्यामुळे तेही अंगण सदैव बहरलेले असायचे, पण का कोण जाणे ते अंगण तसे अलिप्त होते. त्यानी कधी कोणाला आपलेसे केले नाही. नाही म्हणावे तर कोजागिरीसारख्या रात्री वेटाळ्यातल्या सगळ्या लोकांकडून वर्गणी काढून, अंगणात भल्यामोठ्या चुल्हाण्यावर दस्तुरखुद्द काका बटाटेवडे तळत आणि दुसऱ्या बाजूला दूध आटवत. कितीही लोक आले तरी बटाटेवडे खाऊन आणि दूध पिऊन तृप्त होऊन जात.

वर्धेच्या मावशीकडील अंगण… म्हणजे म्हटले तर थोडे अस्ताव्यस्त असलेले अंगण… पण किती किती फुले… शेवंती, गुलाब, चिनी गुलाब, सुपारी, कोरांटी, मोगरा, चक्री…. त्यांच्या घरच्या धबडग्यात कोणाला त्या अंगणाकडे पाहण्यास वेळही नसणार पण अंगणात विहीर होती. त्या विहिरीच्या ओलाव्यात अंगण छान फुललेले असे आणि आपल्याच नादात बागडे.

माझ्या एका मैत्रिणीच्या घरापुढील अंगणही मला फार आवडे. ते लोक गोव्याचे. किती रंगांच्या अबोली, गलाटा, सुपारी, जाईजुई-चमेली, सायली, कुंदा अशा फुलांचे वेल, पारिजातक आणि किती प्रकारच्या जास्वंदी… ते अंगण अगदी निगुतीने राखलेले होते. त्या अंगणालाही त्या घरातल्यासारखीच नीटनेटकेपणाची आवड होती. पहाटेच्या वेळी रिक्षातून त्यांच्या घरी कोणी सगेसोयरे आले की त्या पाहुण्याच्या स्वागत करण्यास पारिजातक पुढे असे. त्याच्या फुलांचा टपटप सडा पाहुण्याच्या डोक्यावर पडला की पाहुणा आनंदून जाई. संध्याकाळी अंगावर हलकेच ठिबकणाऱ्या बकुळीच्या फुलांची झाडेही त्यांच्या अंगणात होती.

त्यांच्या अंगणासारखेच अंगण आमच्या कारवार-हल्याळकडील स्नेह्यांच्या घराचे होते. त्यांच्याकडे तर माझी हळद आणि सोनटक्का, सोनचाफा या दोन्ही फुलांची ओळख झाली होती.‌

किती प्रकारची अंगणे आठवत आहेत ! आखीव रेखीव लॉन, शोभेची झाडे, कधी एखादे चिमुकले तळे- त्यात फुललेल्या वॉटरलीली… बहुतेक घरांच्या मागच्या अंगणात भाज्या आणि उपयुक्त फळझाडे असायची. समोरचे अंगण मात्र केस विंचरून बसवलेल्या पोरांसारखे…

अरे, हे सर्व सांगताना मी आमचे अंगण कसे विसरले? आमचे अंगण… म्हणजे आजचे आमचे अंगण नाही तर‌ ज्यावेळी आम्ही आताचे घर‌ विकत घेतले तेव्हाचे अंगण. त्यावेळी तेथे कलेचे हृदय असलेल्या घरमालकीणबाई होत्या. त्यामुळे खरोखरच आमचे अंगण अस्ताव्यस्त असले तरी शेकडो वनस्पतींनी समृद्ध होते. मधुमालती, पॅशनफ्रूट, कृष्णकमळे, विविध प्रकारचे डेलिया, चारपाच प्रकारच्या गोकर्णी, कैरी गुलाब, गलाटा, शेवंती, मोगरा; आणि गुलाबाचे तर किती प्रकार होते त्याला गणतीच नाही ! त्याशिवाय तेथे एक कॅक्टस गार्डन होते. बाटल्या आणि दगड यांवर केलेल्या कॅक्टस गार्डनमध्ये जांभळी आणि पिवळी आफ्रिकन शेवंती अशी काही खुबीने लावलेली होती की त्या फुलली की ते दुपारच्या वेळी त्या गार्डनवर लावलेले छोटे छोटे पिवळे-जांभळे दिवेच वाटत. एका बाजूच्या भिंतीवर जुईचा वेल चढवलेला होता. पावसाळ्याच्या सुरुवातीला टोपल्या भरभरून फुले निघत. दुसऱ्या बाजूला जाईचा आणि सायलीचा वेल… मध्ये पॅशनफ्रूटला लागलेली हिरव्या रंगाची गोल फळे वाऱ्याबरोबर डुलत. त्या अंगणातील झाडे सशक्त होती, पण जागा मिळेल तेथे लावलेली. एखाद्या छोट्या घरातही एखादे भलेमोठे कुटुंब आनंदात राहवे अशी ती आमची बाग दिसे. हळूहळू आम्ही मोठे झालो. बागेतली झाडे कमी झाली. प्रत्येक बांधकामाच्या वेळी पहिला घाला झाडांवरच पडायचा. हळुहळू पूर्वीची सुंदर बाग पार लयाला गेली. पण आमचे अंगण रूसले नाही.‌ त्या अंगणाने कालानुरूप झालेले बदल निमूटपणे स्वीकारले आहेत. अजूनही सुगंधी गुलाबवेल भरभरून फुलतो. पण कधी कधी पूर्वीचे कढ त्यालाही येतात.‌ एखादे जुने झाड नव्याने उगवून येते.‌ क्षणात अंगण हसते. आम्हीही हसतो. पण तेवढ्यापुरतेच. हवा तेवढाएवढा मुरूम-पाणी यांची कमतरता, घरातील माणसांची वये वाढल्याने कामाची कमी झालेली क्षमता…आमचे अंगणही आमच्यासारखेच म्हातारे दिसू लागले आहे. ‘बाबांची नातवंडे घरी येणे’ हाच काय तो आमच्या अंगणाचा विरंगुळा उरला आहे. आमच्या अंगणाने बाबांना नातवंडांना आजोबांची माया देईन, असे आश्वासन अखेरचा निरोप देताना दिले असणार, अशी मला खात्री आहे.

पण अंगणाचे काहीतरीच… आता ती चिमणी मुले मोठी झालेली आहेत. त्यांची क्षितिजे विस्तारलेली आहेत. त्यांना मागे पाहण्यास कोठला वेळ… ! अंगण आपले उसासे टाकते…त्याच्या म्हाताऱ्या डोळ्यांत आशा दिसते… अशा वेळी मीच अंगणात पाणी शिंपते. मन भरून गाणी गाते आणि अंगण भरून गिरक्या घेते….

– मंजूषा देशपांडे 9158990530 dmanjusha65@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. इतकी अंगणं अनुभवायला  मिळणं  भाग्यवान लोकांच्याच नशिबात येतं. लेख आवडला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here