स्मिता पाटील या अभिनेत्रीने तिच्या केवळ एकतीस वर्षांच्या आयुष्यातील, दहा वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत पार फ्रान्स या देशाच्या नभांगणापर्यंत तिच्या उत्तुंग अभिनयाचे चांदणे नेले, हे लोकविलक्षण कर्तृत्व होय ! रॉशेला या फ्रान्समधील शहरात- ‘चक्र’, ‘बाजार’, आणंदच्या दूध चळवळीवर आधारित ‘मंथन’ आणि हंसा वाडकर हिच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित ‘भूमिका’ ह्या चित्रपटांचा महोत्सव पाहून पाश्चिमात्य प्रेक्षक भारावून गेले होते.
बोलके डोळे आणि तेही भूमिकेनुसार भाषा बोलण्यात वाकबगार असलेले. तिची भूमिका समजून घेण्याची कुशाग्रता आणि भूमिकेची अभिनय कुशल बुद्धिवान मांडणी ही बलस्थाने होती. ‘अर्धसत्य’मधील ज्योत्स्ना गोखले आणि ‘चक्र’मधील अम्मा या प्रेक्षकांना स्मिता पाटील ही एक व्यक्ती वाटल्या नाहीत तर अगदी भिन्न भिन्न व्यक्ती भासल्या हे तिच्या अभिनय वैविध्याचे गमक ठरले. ‘निशांत’ आणि ‘चरणदास चोर’ या चित्रपटांतून श्याम बेनेगल यांनी तिचे कर्तृत्व जगासमोर ठेवले. स्मिताचा सहजसुंदर अभिनय हे त्या चित्रपटांचे सामर्थ्य ठरले. ‘सितम’ या चित्रपटातील तिची मीनाक्षीही लक्षवेधी ठरली. स्मिताने ‘जैत रे जैत’ आणि ‘उंबरठा’ या दोन, अगदी स्वतंत्र क्षमतेची मागणी करणाऱ्या मराठी कलाकृतींतील तिच्या भूमिका कमालीच्या तयारीने साकार केल्या. तिने मुख्य हिंदी प्रवाहातील सिनेमांमध्येही त्यांतील व्यक्तिरेखांना न्याय दिला. ‘नमक हलाल’, ‘शक्ती’, ‘आखिर क्यो’ या चित्रपटांतील तिचे असणे महत्त्वाचे ठरले. तिच्या नावावर दहा वर्षांच्या कालखंडात ऐंशी चित्रपट नोंदवले गेले. तिच्या खात्यात पद्मश्री पुरस्कार मिळवून लोकमान्यतेबरोबर राजमान्यताही जमा झाली.
दूरदर्शनचे गोविंद गुंठे यांनी त्यांच्या पुस्तकात तिची एक आठवण लिहिली आहे. ती वृत्तनिवेदक आणि निवेदक यांच्या आवाज चाचणीसाठी आली होती. तिने आधी अर्ज केला नव्हता. पण तिची चाचणी घेतली गेली. ती उत्तीर्ण झाली नाही. तेव्हा ती थेट संचालकांच्या म्हणजे पी.व्ही.के.(कृष्णमूर्ती) यांच्या केबिनमध्ये गेली. तिची तक्रार ती उजळ नाही म्हणून तिला नापास केले का? अशी होती. तेव्हा, तिला संधी देण्याचे ठरले. ती मराठी बातम्या वाचू लागली. तिने हिंदी बातम्याही वाचल्या. अर्थात तिची झेप मोठी असल्यामुळे ती तेथे फार काळ रमली नाही.
भारतीय चित्रपटसृष्टीला एक आश्वासक अभिनेत्री तिच्या रूपात लाभली. तिचा अकाली मृत्यू झाला (तिचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 चा !). ती मूळची खानदेशची कन्या. हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश करती झाली आणि तिच्या अंगभूत गुणांमुळे अभिनय सम्राज्ञी झाली.
– केशव साठये 9822108314 keshavsathaye@gmail.com
————————————————————————————————————
जर लेखकाची वाचकांचा फोन स्वीकार करायची मानसिकता नसेल किंवा कॉल बॅक शिष्टाचार पालन करता येत नसेल तर मोबाईल नंबर लेखात देऊ नये.