Home छंद निरीक्षण भीतीचे/धास्तीचे ग्रहण सुटत आहे !

भीतीचे/धास्तीचे ग्रहण सुटत आहे !

0

सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हा पृथ्वी-चंद्र-सूर्य यांच्या अवकाशातील स्थानांमुळे होणारा वैश्विक खेळ आहे. निसर्गनिर्मित असलेला हा खेळ मनुष्यवस्ती पृथ्वीवर येण्याआधीपासून अव्याहत सुरू आहे. सूर्यग्रहणाने ‘दृष्टी’ वैज्ञानिक केली आणि समाजातही वैज्ञानिक जाणिवा मंदगतीने का होईना पण जागृत होत जातील असा विश्वास वाटतो…

खग्रास सूर्यग्रहण भारतात तब्बल ब्याऐंशी वर्षांनी, 16 फेब्रुवारी 1980 रोजी दिसणार होते. म्हणजे, ते पाहण्याचा योग माझ्या आधीच्या किमान दोन पिढ्यांना आलेला नव्हता. तेव्हा खग्रास सूर्य दिसतो कसा? त्याचे प्रभामंडळ असते कसे? वगैरे सांगणारे प्रत्यक्षदर्शी कोणी नव्हते. पत्रकारितेत असल्याने, टेलिप्रिंटरवरून ग्रहणाबाबतच्या जगभरच्या बातम्या वाचनात येत. भारतातून दिसणाऱ्या ‘ग्रहण’ विषयाची माहिती त्यामधून जसजशी समजू लागली तसतसे त्या बाबतचे औत्सुक्य वाढत गेले आणि ते जेथून दिसणार होते तेथे जाण्याचा माझा निर्धार पक्का होत गेला. मला ग्रहणाचे वृत्तांकन ‘श्री’ साप्ताहिकासाठी करायचे होते. सोबत एक छायाचित्रकार आणि माझ्याइतकीच ग्रहण दर्शनाची उत्सुकता असलेले माझे मित्र येणार होते. आम्ही जाण्यासाठी, कर्नाटक-आंध्रच्या सीमेवरील रायचूर हे ठिकाण ग्रहण पट्टयाच्या मधोमध येत असल्याने निवडले. शिवाय, तेथून मी पुढे दक्षिण भारताचा दौरादेखील आखला होता.

आम्ही 16 फेब्रुवारीच्याच दिवशी सकाळी साडेसहा वाजता रायचूर स्टेशनवर उतरलो. महाराष्ट्रातून आणखी काही जण आले होते आणि बरीचशी मंडळी विदेशी होती. त्यांना त्यांच्याकडे त्यावेळी या गोष्टींची चर्चा जास्त होत असल्याने औत्सुक्य कमालीचे अधिक होते. जपान, फिलिपिन्स, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया … कोठून कोठून आलेले सारे त्या छोट्या गावात एकवटले होते. गावातील लोकांना गोरे फिरंगी आले आहेत याचेच अप्रूप होते. त्यांना ग्रहण वगैरे बघण्यात रस नव्हता. शिवाय, त्यांच्या मनावर रुढींचा पगडा होता.

ग्रहणाविषयी भारतीय मनात भय, शंका अधिक. ग्रहणाशी संबंधित कर्मकांड अनेक प्रकारचे. मुख्य म्हणजे कोठे स्पर्श करायचा नाही, एकटे – एकांतात बसायचे – जपजाप्य करायचे. ग्रहणाचे वेध लागणे हा मोठा दरारा असे. मग सारे काही निषिद्ध. ग्रहण सुटण्याची वाट पाहायची. ग्रहण सुटले की अंघोळ करायची, मग फराळ-जेवण. ग्रहण सुटले की तळचे लोक ‘दे दान सुटे गिरान’ असे ओरडत यायचे. त्यांना जुने कपडे, पैसे वगैरे भिक्षा द्यायची… त्यास धार्मिक वळण होते. गावकऱ्यांकडे सूर्यग्रहण पाहण्यासाठी लागणारे विशेष चश्मे नव्हते. त्यामुळे नुसत्या उघड्या डोळ्यांनी त्यांना ग्रहण बघण्यास सांगणे धोकादायक होते. ही त्या खेड्यातील गोष्ट, पण देशातील महानगरांमध्येही ‘ग्रहणपर्वा’त सन्नाटा होता हे दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांवरून समजले.

आम्ही दुपारी पावणेतीनच्या सुमारास, रायचूर स्टेशनबाहेरच्या खडकाळ टेकडीवरून ‘अॅल्युमिनियम फॉइल’चे खास गॉगल्स वापरून साधारण पावणेतीन मिनिटांचा ‘खग्रास’ सूर्य न्याहाळला आणि स्तिमित झालो ! आता, मायलर फिल्मचे चांगले ग्रहणचश्मे मिळतात. त्या पावणेतीन मिनिटांत पृथ्वी आणि सूर्य यांच्या बरोबर मध्ये आलेल्या चंद्राने सूर्यबिंब पूर्णपणे झाकले होते. त्याआधी जमिनीवर चांद्रसावलीचा नयनरम्य खेळ काही क्षण दिसला. सूर्य पूर्णपणे झाकला गेल्यावर डोळ्यांपुढे केवळ अंधार दाटला आणि अभावितपणे, गॉगल्स बाजूला केल्यावर सूर्याचे तेजस्वी प्रभामंडल (करोना); तसेच सूर्याजवळचे बुध, शुक्र यांसारखे ग्रह आणि चमचमते दूरस्थ तारे दिसले. ग्रहण लागताना आणि सुटताना सूर्याची डायमण्ड रिंग दिसली आणि पक्षी संध्याकाळ झाल्याच्या कल्पनेने घरट्याकडे परतत आहेत असेही जाणवले. ते सारे अद्भुत होते. ‘क्वचित मिळे पर्वणी पाहण्या पुन्हा नरा’ असा तो दुर्मीळ योग होता.

आम्ही भारावलेल्या अवस्थेत रायचूर स्टेशनवर परतलो. तेथे शेकडो लोकांच्या दाटीत, फलाटावरच बैठक मारली… आणि माझ्या ग्रहण-वृत्तांताचे पहिले वाक्य लिहिले… ‘काही क्षण विलक्षण असतात…’ तो लेख आणि कॅमेऱ्यात कैद झालेले फोटो घेऊन फोटोग्राफर मुंबईच्या दिशेने निघून गेला. मी आणि आमच्यासारखी दक्षिण भारत पाहण्यास आलेली विदेशी मंडळी त्या दौऱ्यात पुढे, पंधरा दिवस दर दोनचार दिवसांच्या अंतराने पुन:पुन्हा भेटत राहिलो. ग्रहण क्षणांची उजळणी करत राहिलो. त्यांतील काहीजणांच्या मुलाखतीही मी ‘श्री’ साप्ताहिकातील लेखासाठी घेतल्या होत्या.

त्या दुपारी कवाडे बंद केलेल्या रायचूरमध्ये पुन्हा लगबग सुरू झाली ती ग्रहणकाल संपून शुचिर्भूत झाल्यावरच ! उलट, आम्हाला त्या ‘खग्रास’ सूर्यानेच वैज्ञानिक जाणिवेचे तेज दिले होते. … मग आठवले, की लहानपणी, म्हणजे मी तिसरी-चौथीत असताना दुपारच्या वेळी सूर्यग्रहणाची चर्चा घरात चालली होती. 1890 मध्ये जन्मलेल्या माझ्या आजीची सक्त ताकीद होती, की या काळात खाणे-पिणे नाही. घरात भरलेल्या पाण्याच्या घागरी-हंड्यांवरही तुळशीपत्र ठेवायचे…

काळ हळूहळू बदलत होता. 1930 च्या दशकात जन्मलेल्या माझ्या आईवडिलांच्या पिढीला वैज्ञानिक भान आले होते. त्यांच्या वेळपर्यंत सूर्यग्रहणाचे प्रतिबिंब परातीत पाणी ठेवून बघता येते याचे ज्ञान झाले होते. शेजारपाजारची मंडळीही उत्सुक होती. आम्ही परातीतील पाण्यात ‘ग्रासलेला’ सूर्य डहुळताना पाहिला होता. वर नजर करून सूर्याकडे पाहणे डोळ्यांसाठी योग्य नव्हतेच, रुढीपरंपरेने तसे करण्यात ‘पाप’ असल्याची भीतीही मनात रुजवलेली होती. पाण्यातील सूर्य मात्र छान दिसला होता !

तीच गोष्ट 1973 च्या सुमाराला आलेल्या कौहुटेक धूमकेतूच्या वेळची. धूमकेतू मुंबईतून काही दिवस पहाटेच्या वेळी दिसत राहिला होता. आजीचा तो पाहण्यास विरोध होता, पण आईने मला आणि भावाला ‘उगाच बोभाटा करू नका’ असे बजावून पहाटे उठवले. अंगणात गेलो तर आसपासची ‘धीरा’ची काही मंडळीही गोळा झाली होती. झाडूसारखा पिसारा किंवा शेपूट असलेले शेंडेनक्षत्र ठळकपणे दिसत होते. चर्चा मात्र ‘यामुळे आता काय अरिष्ट येणार कुणास ठाऊक?’ अशा चालीची होती !

आमचा ग्रहणांबद्दलचा ‘ज्ञानोदय’ ऐन पंचविशीत झाला असावा. लेख लिहिण्याची पूर्वतयारी म्हणून मी त्यावेळी विविध वाचनालयांतील जुनी पुस्तके मिळवून आगामी ग्रहगणिताचा गृहपाठ केला होता. पुढील खग्रास सूर्यग्रहण 24 ऑक्टोबर 1995 या दिवशी असल्याचे 1980 मध्येच लक्षात आले होते. त्या ग्रहणाने डोक्यात खगोल कुतूहल निर्माण केले ते मात्र पुढे कायम टिकले आहे. मुंबईतील लोकविज्ञान संस्थेने, 1986 मध्ये येणाऱ्या ‘हॅले’च्या प्रसिद्ध धूमकेतूच्या निमित्ताने खगोलशास्त्राच्या प्राथमिक अभ्यासक्रमाचा आठवडाभराचा कार्यक्रम ठरवला. मी एक कार्यकर्ता म्हणून त्यात भाग घेतला होता.

सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हा पृथ्वी-चंद्र-सूर्य यांच्या अवकाशातील स्थानांमुळे होणारा वैश्विक खेळ आहे आणि तो निसर्गनिर्मित असून माणूस पृथ्वीवर येण्याआधीपासून अव्याहत सुरू आहे. हे आर्यभट्ट यांच्यापासून भास्कराचार्य यांच्यापर्यंतच्या अनेक देशी पंडितांनी जाणले होते; तसेच, ते इतर देशांतील खगोलविद्वानांनाही माहीत होते. मात्र त्यांचे म्हणणे योग्य असल्याचे पटलेले लोकही रुढीची बंधने किंचितही शिथिल करू शकत नव्हते. गॅलिलिओला तर ‘प्रगत’ युरोपीय देशांतही विदारक अनुभव आला होता, तो त्याने 1609 मध्ये अवकाशाकडे दुर्बीण रोखली होती म्हणून ! जगातील सर्व संस्कृतींमधील सूज्ञ वैज्ञानिकांनी प्राचीन काळात दाखवलेली प्रगल्भता एकूण मानव जातीने स्वीकारण्यास एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध उजेडावा लागला. खगोलीय घटनांचा गणिती मागोवा घेऊन सूर्य-चंद्राच्या ग्रहणाचे भाकित अचूक केले जाई खरे, पण त्यानंतर तो दिवस भीतीचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कर्मकांडाचा ठरत असे (प्रगत जगात ‘फ्लॅट अर्थ सोसायटी’ आजही आहे आणि माणूस चंद्र-मंगळापर्यंत पोचला तरी ते खरे आकाशात नाहीतच असे म्हणणारेही आहेत).

…पण समाजमन असेच असते. गतानुगतिक म्हणजे आधीचे रीतिरिवाज (मग ते विपरीत असले तरी) सोडण्याचे धाडस जनसामान्यांना होत नाही. कारण त्यांना त्या गोष्टींचा विचार साकल्याने करण्याची धास्ती वाटते, त्यांना तशी गरजही नसते. शिवाय, अज्ञानाची/अंधत्वाची अशी भूमिका सोपी असते. विज्ञानाचा ‘वापर’ प्रत्येक काळातील समाज गरजेपोटी सहजतेने करतो. पण त्याचा ‘विचार’ करण्याइतके त्याला महत्त्व देत नाही. अगदी शिकलीसवरलेली माणसेसुद्धा ‘तुम्ही म्हणता ते पटते हो… पण…’ (म्हणजे रूढींमध्ये थोडे गुंतले तर कोठे बिघडले?) असा बचावात्मक पवित्रा घेतात. टोकाची वैचारिक मांडणी करून त्यांना ‘अडाणी’ ठरवून मोकळे होता येईलही, पण त्यामुळे त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थाने अज्ञान दूर करणारा विज्ञानविचार पोचणार नाही. त्यासाठी सौम्य पण रचनात्मक ठामपणा हवा.

… आम्हाला 1980 चे खग्रास सूर्यग्रहण आणि 1986 चा हॅलेचा धूमकेतू यांनी हेच शिकवले. मी आर्ट्सचा विद्यार्थी असूनही आपण विज्ञान प्रसाराचे काम करावे असे वाटले आणि 1985 मध्ये ‘खगोल मंडळ’ या, खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संस्थेचा सहसंस्थापक झालो. त्यामुळे गेल्या चाळीस वर्षांत विराट विश्वाचा वैज्ञानिक मागोवा घेताना प्रत्येक क्षणी एक अविस्मरणीय अनुभूती मिळत गेली. पुढे, आम्ही ‘खगोल वाचनालय’ सुरू केले. त्यानंतर तर अनेक लोक भेटून जिज्ञासेने शंका-समाधान करून घेऊ लागले.

रात्र रात्र जागून (तेही बऱ्याचदा अमावास्येला) आकाशदर्शन करणारे शेकडो अभ्यासक-प्रेक्षक, धुमकेतू पाहण्यासाठी सहपरिवार येणारी मंडळी, खग्रास सूर्यग्रहण पाहण्यास आमच्याबरोबर 1995 मध्ये हमीदपूर (उत्तर प्रदेश), 1999 मध्ये भूज आणि कंकणाकृती सूर्यग्रहण न्याहाळण्यासाठी 2010 मध्ये कन्याकुमारी येथे आलेले शेकडो आबालवृद्ध, सहल-सभासद यांनी प्रचंड उत्साह दिला. काळ बदलत चालल्याची लक्षणे प्रत्येक वेळी जाणवली. एका टीव्ही मुलाखतीत मला विचारण्यात आले होते, की तुमचा कार्यक्रम पाहिल्यावर लोकांचा अंधविश्वास नष्ट होतो का? माझे उत्तर होते – “ते इतके सोपे नाही. आम्ही शेकडो वर्षांचा पगडा एका कार्यक्रमात दूर करणारा ‘चमत्कार’ करू शकत नाही… आम्ही फक्त खगोलीय सत्य सांगतो. त्यातील घटनांचा वैज्ञानिक कार्यकारणभाव समजावून देतो.” लोकांना ‘तुम्ही असे वागा, तसे वागा’ असे विचारांचे ‘पॅकेज’ देऊन त्यांच्या मनात वैज्ञानिक जाणिवेचे ‘रोपण’ करता येत नाही. अर्थात अंधविश्वास दूर करण्याचा हा एक मार्ग असू शकेल.

तसा व्यावहारिक परिणाम गेल्या चार दशकांत जाणवत गेला आहे. तरुणाई मोठ्या संख्येने ग्रहण व अन्य नैसर्गिक घटनांमागील वैज्ञानिक तथ्याबद्दल सजग झाली आहे. त्यांचे पालकही विचाराने बदलले आहेत. आमच्या खगोल मंडळात पंधरा जणांनी देश-विदेशांतून खगोलीय विषयांवर पीएच डी प्राप्त केली आहे आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खगोल प्रकल्पांत स्थान मिळवले आहे.

विज्ञानाचे केवळ पठडीतील पुस्तकी शिक्षण नव्हे तर त्याबद्दलचा विचार करण्यास लावण्याचे ‘शिक्षण’ कदाचित शालाबाह्य अभ्यासातून दिले गेले असेल म्हणून हे साध्य झाले… आणि हे केवळ महाराष्ट्रापुरते नाही, तर आम्ही 1995 च्या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी उत्तर प्रदेशातील हमीदपूर या तुलनेने मागास भागात शेकडो लोकांना ग्रहण दाखवले, एका गरोदर महिलेने धीराने सहलीसाठी नाव नोंदवले होते. तिची मुलगी खूप हुशार निपजली आहे. अर्थात तो ग्रहणाचा परिणाम नव्हे. ग्रहणाने असे परिणाम घडत नाहीत; एवढेच. आम्हाला ग्रहण काळात खाणे भाग होते. कारण ग्रहण काळ संपताच लगेच ट्रेन पकडण्यास कानपूरला जायचे होते. त्यासाठी ‘ग्रहणा’चे वैज्ञानिक महत्त्व पटलेले, उत्तर प्रदेश परिवहनचे ड्रायव्हर-कंडक्टर तयार झाले आणि आम्ही वेगाने वेळेवर कानपूरला पोचलो.

युरोप-अमेरिकेत गेलेल्या खगोल मंडळाच्या सभासदांनी तेथील खगोल संस्थांमध्ये भाग घेतला. आकाशदर्शनाचे कार्यक्रम केले. आमच्या भूगोलावरचा ‘खगोल’संपर्क वाढत गेला. जग जुन्या अंधश्रद्धा जाऊन नव्या तयार होतानाही अनुभवत असते. आम्ही वैज्ञानिक जाणिवेचा विकास आणि त्यासाठी त्याचा साकल्याने (होलिस्टिक) विचार ही गोष्ट जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न करत असतो. ती सततची प्रक्रिया असते. आम्ही त्यासाठी कधी वैज्ञानिक पथनाट्ये केली. प्रादेशिक भाषांत ‘ग्रहणगीते’ लिहिली, स्पर्धा भरवल्या, विभाग सुरू केले. खेडोपाड्यांपर्यंत-आदिवासी वस्तींपर्यंत पोचलो. विज्ञान लोकभाषेत समजावून देण्यास हवे. तो मोठा प्रकल्प मनात आहे. सूर्यग्रहणाने ‘दृष्टी’ वैज्ञानिक केली एवढे खरे… आणि समाजातही वैज्ञानिक जाणिवा मंदगतीने का होईना पण जागृत होत जातील असा विश्वास वाटतो, हेही खरे. एक व्यक्तिगत अनुभव सांगायचा तर, आम्ही माझ्या रूढीप्रिय वडिलांचा ‘सहस्रचंद्रदर्शन’ कार्यक्रम त्यांना दुर्बिणीतून पौर्णिमेचा चंद्र दाखवून केला आणि त्यासाठी ते आनंदाने तयारही झाले !

दिलीप जोशी 8291677588 khagoldilip@gmail.com

सहसंस्थापक, खगोल मंडळ

खगोल अभ्यासात रस असल्यास… संपर्क – डॉ. अभय देशपांडे 9029029076 abhay@khagolmandal.com

सचिव, खगोल मंडळ

—————————————————————————————————————————

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version