कालिदासाचा मेघ (Kalidas’s cloud – How real was it?)

0
131

शिक्षा भोगत असलेला, विरहव्याकूळ यक्ष, कसेही करून त्याची खुशाली त्याच्या प्रिय पत्नीपर्यंत पोचवण्यासाठी दूत म्हणून मेघाची योजना करतो. हा मेघ ‘पुष्करावर्तकां’च्या प्रख्यात कुळात जन्मला असल्याचा उल्लेख ‘मेघदूता’च्या सहाव्या श्लोकात आला आहे. मेघांविषयी अधिक आणि महत्त्वाची; तसेच, रंजक माहिती ‘बोरवणकर- किंजवडेकर’ यांनी त्यांच्या पुस्तकात दिली आहे. मल्लिनाथाने ‘पुष्कर’ आणि ‘आवर्तक’ अशी मेघांची दोन निरनिराळी कुळे मानली आहेत, पण काही पंडितांनी ‘पुष्करं जलम् आवर्तयन्ति भ्रामयन्ति इति पुष्करावर्तकाः ।’ उपपत्ती दिली आहे. तीनुसार पुष्करावर्तक हे एकच कूळ ठरते. ब्रह्मांडपुराणात मेघांची उत्पत्ती तीन प्रकारची वर्णली आहे- १. अग्नीपासून, २. ब्रह्मदेवाच्या श्वासोच्छ्वासापासून आणि ३. इंद्राने पर्वताचे जे पंख तोडले त्यापासून. तिसऱ्या प्रकारापासून उत्पन्न झालेल्या ढगांना पुष्करावर्तक असे म्हणतात.

‘बोरवणकर-किंजवडेकर’ यांनी ‘वातावरण’नामक पुस्तकातील माहिती उद्धृत केली आहे. ती पुढीलप्रमाणे- ढगांचे मुख्य प्रकार तीन मानले जातात. त्यांच्या एकमेकांत मिसळण्याने आणखी अनेक प्रकार उत्पन्न होतात. पहिल्या प्रकारच्या ढगांना ‘आवर्तक’ असे म्हटले जाते. ते ढग पातळ व पांढरे असतात. ते पिंजलेल्या लोकरीप्रमाणे दिसतात. ते तीस हजार फूट किंवा त्याहूनही पुष्कळ उंच असतात. त्यांच्या उंचीच्या उष्णतामानाचा विचार केला असता, त्या ढगांतील पाण्याचे कण गोठलेले असले पाहिजेत. चंद्र-सूर्य यांना खळी पडतात ती या ढगांमुळे होत. त्या ढगांतील बर्फाच्या कणांवर किरणांचे वक्रीभवन होते, म्हणून खळी पडतात.

दुसऱ्या प्रकारचे ढग वाटोळे, गोलाकार असतात. ते पर्वतासारखे, एकावर एक ढीग रचल्यासारखे दिसतात. त्यांना ‘कुंजर’ असे म्हटले जाते. त्यांची उंची सहा हजार फूट किंवा त्याहून जास्त असते. तिसऱ्या प्रकारच्या ढगांना ‘पुष्कर’ असे म्हटले आहे. ते ढग म्हणजे लांबच लांब, क्षितिजाशी समांतर असे पट्टे असतात. त्यांची उंची तीन हजार फूट किंवा त्याहून अधिक असते. ते सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ती क्षितिजाशी दिसतात. पावसाळी ढगांना ‘जीमूत’ असे म्हणतात. ते ढगांच्या सर्व प्रकारांचे मिश्रण असते. त्यांचा रंग काळसर असतो; आकार अमुकच असतो असे सांगता येत नाही. त्यांची उंची सात  हजार फूट किंवा त्याहून जास्त असते. ढगांची गती लक्षपूर्वक पाहण्यासारखी असते. आवर्तक ढग फार उंचीवरून फिरत असतात. त्यांची गती मंद असते. ती खालच्या पातळीवरील ढगांच्या उलट असते. त्यावरून उंच प्रदेशातील वातावरणातील हवेची गती समजते.

या उताऱ्यावरून पुष्कर आणि आवर्तक ही मेघांची दोन निराळी कुळे आहेत हे मल्लिनाथाचे म्हणणेच बरोबर असल्याचे दिसून येते. इंद्र मेघांकरवी भूतलावर पाऊस पाठवतो अशी कल्पना केलेली आहे. त्यामुळे मेघाला ‘मघोनः प्रकृतिपुरुष:’ म्हणजे इंद्राचा प्रकृतिपुरुष म्हणजेच त्याच्या मंत्रिमंडळातील अधिकारी असेही म्हटले आहे.

(मेघदूत (पूर्वमेघ) …’ या पुस्तकातील परिशिष्टातून)
———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here