कालभैरवाची मंदिरे महाराष्ट्रात ठिकठिकाणी आहेत. त्यांची नावे ज्योतिबा, भैरोबा, खंडोबा आणि रवळनाथ अशी आहेत. कालभैरवाचे मंदिर नेपाळची राजधानी काठमांडू येथेसुद्धा आहे. काही ठिकाणी मानवाकृती मूर्ती असते तर इतर काही ठिकाणी एकाद्या दगडाला शेंदूर थापून ती ‘मूर्ती’ पूजतात. त्याचे स्मरण दररोज रात्री झोपताना ‘अस्तिक अस्तिक कालभैरव’ असे करतात.
रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील बेणीखुर्द येथील कालभैरव- योगेश्वरीचे देवस्थान ही त्या आसमंतातील लोकांची ग्रामदेवता आहे, मात्र ते कुलदैवत शेरे, दळी, कुष्टे आणि बाहेरून कोकणात येऊन स्थायिक झालेले खेर व हर्डीकर ह्या घराण्यांचे आहे.
खेरांचे मूळ गाव अंबाजोगाई. ते अंबाजोगाईकडून कोकणात आले, म्हणून तेथील देवता जोगेश्वरी-कालभैरव ही त्यांची कुलदेवता झाली. हर्डीकर हे स्वतःला मूळ खेर घराण्याचे समजतात. ते राजापूर तालुक्यात हर्डी गावी स्थायिक झाले म्हणून त्यांनी हर्डीकर हे उपनाम धारण केले.
लांजा तालुक्याचा पूर्व भाग सह्याद्री पट्टीत येतो. त्या भागात जंगल पुष्कळ आहे. त्या प्रदेशाची जमीन खडकाळ व उंचसखल आहे. लांजा तालुक्याचा पश्चिम भाग त्या वलाटीत म्हणजे मधल्या भागात येतो. त्या प्रदेशात काही ठिकाणी जांभ्या दगडाचे माळच्या माळ पसरले आहेत. जमीन तांबडी आहे. ती काही ठिकाणी काळी कसदारही आढळते. काळे खडक मधून मधून दिसतात. शेते त्या भागात डोंगराच्या उतारावर पायऱ्या पायऱ्यांसारखी आणि पुष्कळ दिसतात. लांजा तालुक्यातील हवामान समुद्रसपाटीपेक्षा दिवसा जास्त उष्ण व रात्री अतिथंड असते. तसेच, ते उन्हाळ्यात अधिक उष्ण व हिवाळ्यात अधिक थंड असते, हवेत ओलसरपणाही कमी असतो.
बेणीखुर्द खेडे लांजा गावापासून दक्षिण दिशेस सुमारे दोन किलोमीटर दूर आहे. तेथील कालभैरव-योगेश्वरीचे देवस्थान पुरातन आहे. ते सुमारे चारशे वर्षांपूर्वी बांधले असावे. त्याची पडझड काळाच्या ओघात होऊन ते मोडकळीस आले होते. मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची लांबी त्रेचाळीस फूट नऊ इंच व रुंदी अठ्ठावीस फूट नऊ इंच आहे. मंदिराची एकंदर उंची चौतीस फूट सहा इंच असून त्यापैकी चौथरा चार फूट सहा इंच, भिंती सोळा फूट सहा इंच, शिखर व कळस अठरा फूट आहेत.
मंदिरात बारा फूट लांब व चौदा फूट रुंद असा गाभारा आहे. त्यात लिंग व शाळुंका आहेत. कालभैरव-योगेश्वरी हे शिव-पार्वतीचेच रूप होय. त्यामुळे शाळुंका आणि लिंग मिळून शंकराची पिंडी होते. पिंडीची लांबी दोन फूट सहा इंच असून, रुंदी एक फूट नऊ इंच आहे. गाभाऱ्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी पाच फूट सहा इंच इतक्या लांबीचा गोलाकार मार्ग आहे. गाभाऱ्याच्या बाहेर अठ्ठावीस फूट लांबीचा व अठ्ठावीस फूट रुंदीचा सभामंडप आहे. सभामंडपात डाव्या बाजूला श्री गणेशाची एक फूट तीन इंच नागेश्वरीची एक फूट चार इंच उंचीची मूर्ती आहे. उजव्या बाजूला एका चौथऱ्यावर कालभैरव व योगेश्वरी यांच्या मूर्ती आहेत. कालभैरव मूर्तीची उंची दोन फूट तीन इंच व रुंदी एक फूट चार इंच आहे तर योगेश्वरी मूर्तीची उंची एक फूट नऊ इंच व रुंदी एक फूट एक इंच आहे.
देवालयाबाहेर एकशेचौदा फूट सहा इंच लांबीचे आणि एकशेदोन फूट सहा इंच रुंदीचे आवार आहे. त्या भोवती तट आहे. समोर तळे आहे. तळ्याच्या पायथ्याशी स्वच्छ पाण्याच्या ओढ्याच्या प्रवाहाची खळखळ बारा महिने अखंड चालू असते. तटीच्या प्रवेशद्वारात उजव्या कोनाड्यात विठ्ठलाईची एक फूट नऊ इंच उंचीची व एक फूट एक इंच रुंदीची मूर्ती आहे. विठ्ठलाई ही एक रक्षणकर्ती ग्रामदेवता आहे.
श्री भैरी जोगेश्वरी जीर्णोद्धार समिती मुंबईत 1955 साली स्थापन झाली. त्या समितीतील काही भक्तांनी 1972 च्या जूनमध्ये एकत्र येऊन ‘श्री कालभैरव योगेश्वरी देवस्थान जीर्णोद्धार समिती’ स्थापन केली. समितीचे ट्रस्टमध्ये रूपांतर झाले. बांधकाम, पूजाअर्चा, उत्सव व धर्मादाय कार्य या सर्व कामाकरता कायम निधी स्थापन (1973) झाला. श्री कालभैरव योगेश्वरी टेंपल ट्रस्टची नोंदणी 23 डिसेंबर 1974 रोजी (रजिस्ट्रेशन नंबर ए 3072) करण्यात आली. मंदिराचा जीर्णोद्धार 14 नोव्हेंबर 1976 रोजी पार पडला. मंदिरातील पिंडी व मूर्ती यांचा वज्रलेप करून त्यांना सुबक स्वरूप देण्यात आले.
कालभैरव जयंती कार्तिक वद्य अष्टमीला साजरी करण्यात येते. महाशिवरात्रीस लघुरूद्राभिषेक करून महादेवाच्या पिंडीची महापूजा होते.
नवीन भक्तनिवास मंदिराच्या शेजारी 2006-07 (साली) बांधण्यात आले. स्थानिक पुजारी व गुरव आणि मंदिराचे व्यवस्थापक ह्यांच्या निवासासाठी मंदिराच्या मागील बाजूस निवासाची सोय करण्यात आली आहे.
मंदिर ट्रस्टतर्फे जवळच्या शाळेतील गरीब व हुशार विद्यार्थ्यांना उत्तेजन म्हणून आर्थिक मदत दरवर्षी दिली जाते. तसेच, ट्रस्टतर्फे आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन केले जाते.
मंदिराचे नुतनीकरण, कळसारोहण समारंभ व नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व इतर धार्मिक कार्यक्रम 5- 6 मार्च 2016 रोजी करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून परमहंस परिव्राजक श्री वामनानंद सरस्वती औदुंबर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
संकलन- विनय हर्डीकर 9324811755 vina_hardi@yahoo.co.in
———————————————————————————————-
आमचं पण कुलदैवत. पण एवढी सविस्तर माहिती पहिल्यांदाच मिळाली.