श्रीरामवरदायिनी – श्री क्षेत्र पार्वतीपूर

श्री क्षेत्र पार्वतीपूर (पार) हे गाव प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे. ते महाबळेश्वर-पार या रस्त्याने महाबळेश्वरपासून वीस मैलांवर लागते. ते महाबळेश्वराच्या पश्चिमेस रडतुंडीच्या घाटापासून सहा मैल अंतरावर आहे. ते सातारा जिल्ह्यात येते. तो परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे, पण गावाला महात्म्य श्रीरामवरदायिनी देवीच्या सुंदर, पुरातन अशा मंदिराने लाभले आहे. त्या परिसरात नवरात्रीचा उत्सव साजरा होत असताना जाणे हे आनंदनिधानच ठरते !

पार गाव हे दंडकारण्याचा भाग होते. राम म्हणे तेथे सीतेचा शोध घेत गेले होते. त्यावेळी गिरीशिखरावरून शंकर-पार्वती विहार करत आले. पार्वतीने रामाची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने सीतेचे रूप घेतले. तीच पार्वती भवानी आदिशक्ती माता म्हणजे श्रीरामवरदायिनी होय ! देवी महाराष्ट्रातील हिंदू – मराठा सरदार, कुलवंत मराठा घराणी आणि समस्त वीरशैव समाज अशांची कुलदेवता आहे.

श्रीरामवरदायिनीचे देऊळ हेमाडपंती पद्धतीने बांधण्यात आले आहे. मंदिराचे कळसासहित सुशोभीकरण केले असल्याने मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे. मंदिराचा परिसर भव्य आणि देखणा आहे. तेथे तटासारखी भिंत आहे. त्यातील दरवाज्याने मंदिराच्या परिसरात प्रवेश करता येतो. भाविक तेथे ललिता पंचमीला (अश्विन शुद्ध पाच/पंचमी) जमा होतात. मूळ गाभाऱ्यात थोड्या पायऱ्या चढून जावे लागते. तेथे जाण्याआधी डाव्या हाताला काचेच्या मोठ्या कपाटात देवीची पूर्वीची मूर्ती पाहण्यास मिळते. प्रत्यक्ष मूर्ती आकर्षक आणि सुंदर आहे. मंदिराचा सभामंडप स्वच्छ असून बऱ्यापैकी मोठा आणि प्रशस्त आहे. मन देवीच्या समोर उभे राहून हात जोडताना प्रसन्न होते.

मंदिराच्या गाभाऱ्यात सिंहासनावर दोन मूर्ती आहेत. डाव्या बाजूस अडीच फूट उंचीची मूर्ती ‘श्री वरदायिनी’ या नावाने आणि उजव्या बाजूची तीन फूट उंचीची मूर्ती ‘श्रीरामवरदायिनी’ या नावाने ओळखली जाते. तिची श्रीरामांना वर देणारी देवता अशी आख्यायिका सांगितली जाते. एकनाथ महाराजांनी त्यांच्या ‘भावार्थ रामायणा’तील ‘अरण्यकांड’ या भागात आणि पुढे, श्रीधरस्वामींनी त्यांच्या ‘रामविजय’ या ग्रंथात श्रीरामवरदायिनीची स्थापना श्रीरामांनी केली अशी आख्यायिका कथन केली आहे. पुरातन काळामध्ये खुद्द ब्रह्मा‚ विष्णू आणि महेश यांनी त्या वरदायिनी देवीची स्थापना केली आहे अशीही एक आख्यायिका सांगितली जाते.

सध्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शिवाजी महाराजांनी केली आहे. देवीची जत्रा वर्षातून दोन वेळा भरते. वार्षिक यात्रोत्सव चैत्र वद्य त्रयोदशीपासून सुरू होऊन तो वैशाख शुद्ध षष्ठीपर्यंत असा नऊ दिवस चालू असतो. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र अमावस्येला, आसपासच्या गावांमधून त्या त्या गावचे गावकरी त्यांची ग्रामदैवते गुढीच्या काठीच्या रूपात घेऊन येतात. मुख्य सभामंडपासमोर असलेल्या पटांगणात प्राचीन झाड आहे, तेथे बगाड लागते. यात्रेचा शेवटचा दिवस असतो, त्याला छबिना म्हणतात. त्या दिवशी मंदिरात लघुरूद्राभिषेक, होमहवन; तसेच, विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देवीची मूर्ती पहाटे पाच वाजता पालखीत ठेवून पालखीची मिरवणूक गावातून वाजतगाजत काढण्यात येते. आश्विन महिन्यातील देवीचा उत्सव देवीच्या मंदिरात घटस्थापना करून नवरात्रीमध्ये नऊ दिवस उत्साहात व थाटामाटात केला जातो.

असे म्हणतात, की समर्थ रामदासस्वामी यांनी आदिशक्तीची विविध रूपे या मंदिरात देवीच्या समोर अनुभवली. गावाला पौराणिक, ऐतिहासिक संदर्भ आहेत. भक्त दूरदूरच्या गावांहून देवीच्या मंदिराकडे येतात. मंदिरात प्रवेश केल्यावर जाणवते ती स्वच्छता. मंदिर आणि परिसर यांची स्वच्छता आधुनिक पद्धतीने ठेवली जाते. भक्तांना प्रसाद मिळावा म्हणून सभामंडपाच्या उजव्या बाजूला त्याचे आयोजन करतात. जागा मोठी असल्याने तेथे गोंधळगडबड होत नाही. मंदिराची स्वच्छ जागा आणि आसपासचा निसर्ग पाहत असताना तेथील शांत आणि निसर्गरम्य वातावरणात देवाचे अस्तित्व जाणवते !

निजामाच्या काळात पार्वतीपूर (पार) ही बाजारपेठ होती. ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आली, त्यावेळी पार हे छोटे गाव होते. तेथील बाजारपेठेत सातारा-वाई – मेढा; त्याचप्रमाणे, रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर इत्यादी ठिकाणांहून व्यापारी लोक येऊन मोठा बाजार भरवत असत. त्या व्यापारी पेठेचे विभाजन करून पारपार, पेठपार व सोंडपार अशी तीन गावे निर्माण केली. त्यासाठी वेगवेगळी मुलकी व पोलिस पाटील यांची व्यवस्था केली गेली. त्या काळी ग्राहक-खरेदीदार हे बाजार मुख्यत: घोड्यावरून करत. त्यामुळे पेठेत दोन्ही बाजूंला व्यापारी-विक्रेत्यांसाठी उंच असे दगडी बांधकामातील चौथरे उभे केलेले आहेत. तसे अवशेष तेथे पाहण्यास मिळतात.

अफझल खानाचा तळ त्या गावात दोन महिने होता असे सांगतात.

सह्याद्रीच्या कुशीतील घनदाट वनराईने त्या गावपरिसराला अनोखे असे सॄष्टिसौंदर्य बहाल केले आहे. कोयना नदी ही पार गावाजवळून वाहते. तिच्यावर शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेला पूल आहे. शिवाजी महाराज त्यांच्या सर्व लवाजम्यासह देवीच्या यात्रेच्या प्रसंगी तेथे येत असत.

श्रीरामवरदायिनी या देवीचे मूळ स्थान हे मौजे पारसोंड (तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा) येथे आहे. देवीची इतर स्थाने पुढीलप्रमाणे –

  • जय रघुवीर रामवरदायिनी देवी, शिरगाव (तालुका खेड, जिल्हा रत्‍नागिरी)
  • श्री रामवरदायिनी, (दसपटी) दादर, (तालुका चिपळूण, जिल्हा रत्‍नागिरी)
  • वर्धनीदेवी, वर्धन गड, (तालुका खटाव, जिल्हा सातारा)
  • श्री रामवरदायिनी कालगाव, चिंचणी, (तालुका कऱ्हाड, जिल्हा सातारा)
  • रामवरदायिनी, खर्शी, (तालुका जावळी, जिल्हा सातारा)
  • वर्धनीदेवी, चिंचणी, (तालुका जावळी, जिल्हा सातारा)
  • भवानी माता, प्रतापगड, (तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा)
  • वरदायिनी (कोळदुर्ग किल्ला – मेट) पारघाट, (तालुका महाबळेश्वर. जिल्हा सातारा)
  • श्री रामवरदायिनी, कापडे, (तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड)

– प्रल्हाद कुलकर्णी 8830072503 drpakulk@yahoo.com
———————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here