अचलपूरच्या नाट्यकलेला दीडशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. अचलपूरच्या बावनएक्का आणि बावीशी या दोन नाट्यगृहांतून नाट्यचळवळीतील विविध आयामांना बळ देण्याचे काम होत असे. मात्र, आता दोन्ही ठिकाणी वैभवाच्या शिखरावर असलेल्या नाट्यपरंपरा खंडित झाल्या आहेत…
बावनएक्क्याची वास्तू आमच्या घराच्या मागील बाजूलाच होती, पण मला स्वत:ला काही तेथे नाटक बघता आले नाही. मला समजू लागले तोपर्यंत त्याच्या रंगमंचाची मागील भिंत जमीनदोस्त झाली होती! पण उर्वरित वास्तू बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत बराच काळ होती. त्यामुळे तेथील गणेशोत्सवातील दशमीला होणाऱ्या विसर्जनाच्या खिचडीचा आस्वाद आम्हास खूप वर्षे घेता आला! बावनएक्का नाट्यगृहाच्या सुवर्णकाळात मात्र तेथे नाटकांची मेजवानी असे. महाराष्ट्रातील नाट्यपरंपरेला ज्यावेळी उतरती कळा लागली, त्यावेळी अचलपूरच्या याच बावनएक्क्याने त्या परंपरेला नवी चेतना, नवी उभारी दिली.
अचलपूर गावची नाट्यकला दीडशे वर्षांपूर्वी रुजली. अचलपूरला व एकूणच विदर्भभूमीला लाभलेली ऐतिहासिक नाट्यपरंपरा महत्त्वाची आहे. भारवी हा नाटककार अचलपूरचा आणि अन्य काही नाटककार विदर्भाच्या भूमीत होऊन गेले आहेत. रामटेकला कालिदास, भंडारा जिल्ह्यात भवभूती, वाशीमला राजशेखर, अंभोऱ्याला मुकुंदराज, रिद्धपूरला चक्रधर स्वामी या साऱ्यांनी मराठी नाट्यपरंपरेला बळ दिले. वीर वामनराव जोशी, वि.रा. हंबर्डे, ग.त्र्यं. माडखोलकर, विश्राम बेडेकर, मधुकर आष्टीकर या विदर्भातील मंडळींनी मराठी रंगभूमीला जुन्या काळात दर्जेदार नाटके दिली. वामनराव जोशी यांची ‘परवशता पाश दैवे’ यांसारखी पदे आणि त्यांचे ‘रणदुंदुभी’ हे नाटक महाराष्ट्रभर गाजले.
श्रीमंत अण्णासाहेब देशपांडे हे अचलपूरच्या नाट्य चळवळीचे नेते. मला त्यांची ऐंशी वर्षांची नात मालू देशपांडे यांच्याकडून स्थानिक कलाकारांची नावे कळली, ती मंडळी अशी- मैयासाहेब जोशी, कुरुमकर, रघुनाथराव भुजबळ, भाऊसाहेब जहागीरदार, केशवराव मुनशी वगैरे. पण ते हौशी कलाकार होते.
अचलपूरची बावनएक्का व बावीशी या दोन्ही संस्थांचे सूत विळ्याभोपळ्याचे होते. बावनएक्का अण्णासाहेब देशपांडे यांच्या मालकीचे होते आणि बावीशी नानासाहेब पांगारकर यांच्या मालकीचे. ते वितुष्ट त्यांच्यात नाटकांमुळे आले असावे. बावनएक्क्याच्या पार्थिव गणपतीवर बावीशीतील नाटकाची सावलीसुद्धा पडू नये म्हणून बावनएक्क्यातील गणपतीचे विसर्जन दशमीला सायंकाळी केले जात होते. ती परंपरा कायम आहे. तो वैरभाव कालांतराने संपला. बावनएक्का परिसरातील मंडळी व बावीशी परिसरातील मंडळी एकत्र येऊन बावीशीमध्ये नाट्यप्रयोग सादर करू लागली. ती परंपराही 1963 पर्यंत चालली, पण ती 1964 या वर्षी मोडली. मात्र लगेच रमेश बाळापुरे, रत्नाकर हंतोडकर आणि इतर यांनी जोर धरला व त्यांनी बावीशीच्या रंगमंचावर ‘अजब कारस्थान’ हे स्त्रीपात्रविरहित दीर्घांकी नाटक 1965 च्या गणेशोत्सवात दशमीला सादर केले. त्यावेळी बावीशी संस्थेचे व्यवस्थापक होते कॅ. रामभाऊ खंडाळे. नव्या दमाचे तरुण स्थानिक कलाकार म्हणून रमेश बाळापुरे, रत्नाकर हंतोडकर, अशोक बोंडे, अशोक भारतीय, प्रकाश मुनशी, भय्या पांडे यांची गणना होई. कायमस्वरूपी काम करणाऱ्यांमध्ये पिंपळखरे व बाळासाहेब चौधरी हे कुशल प्रॉम्टर म्हणून सर्वांच्या माहितीचे होते.
बावीशीतील नाट्यपरंपरा पी.डी. बहादुरे या ज्येष्ठ रंगकर्मींच्या आशीर्वादाने पुनरुज्जीवित झाली. बावीशी संस्थानच्या रंगमंचावर ‘अजब कारस्थान’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘आसावरी’, ‘कथा कुणाची व्यथा कुणा’, ‘कवडी चुंबक’, ‘लेक लाडकी या घरची’, ‘माझा कुणा म्हणू मी’, ‘विच्छा माझी पुरी करा, ‘अक्षांश-रेखांश’, ‘वऱ्हाडी माणसं’, ‘एखाद्याचे नशीब’ अशी नाटके 1965 पासून 1975 पर्यंत हौशी रंगकर्मींकडून सादर झाली. त्यांतील बहुतेक नाटकांमध्ये स्त्रीपात्रांच्या भूमिकांसाठी व्यावसायिक नट्यांना आमंत्रित करावे लागत असे. त्या सर्व नागपूरहून येत; त्या प्रयोगाआधी फक्त तीन दिवस येत! त्यांना नाटकाचे पुस्तक द्यावे लागे. नाटकाची रंगीत तालीम त्या आल्यावर नाटकाच्या दोन दिवस आधी होई. दिग्दर्शक त्यात त्याला हवे ते परिणाम करून घेत. नटराज पूजन व रंगमंचाची पूजा याखेरीज देवीची पूजा हे बावीशी रंगमंचाचे वेगळेपण होते. ती पूजा नाटकात काम करणाऱ्या नटीच्या हस्ते केली जात असे. नंतर प्रत्येक नटाला रंगमंचावर काम करताना आलेला घाम पुसण्यासाठी बावीशीचे व्यवस्थापक पांढरा तलम रुमाल देत आणि तिसरी घंटा देण्यास सांगत.
बावीशी संस्थेचे नाट्यगृह मंगल कार्यालय झाले आहे. श्री गणपतीची मंदिरे यथास्थित असून, दैनंदिन होणारी पूजा अखंड चालू आहे. गणेशोत्सवसुद्धा नियमानुसार साजरा केला जातो. तसेच, गणपती विसर्जनाची खिचडीही सुरू आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी वैभवाच्या शिखरावर असलेल्या नाट्यपरंपरा खंडित झाल्या आहेत! कालाय तस्मै नम:! बावीशीमध्ये नाटकांच्या तालमी संपल्यावर ‘मंगलमूर्ती मोरया’, ‘मार्कोनाथ स्वामी महाराज की जय’ असा जयजयकार होई. तो रसिकांच्या कानात घुमत आहे.
– प्रकाश मुनशी 8149779149
(कै. श्रीमंत अण्णासाहेब देशपांडे यांच पणतू विराज देशपांडे (अचलपूर) यांच्या सौजन्याने)
————————————————————————————————————-
खुप छान माहिती मिळाली