ज्ञानकमळ नावाची एक रांगोळी प्रसिध्द आहे. त्या रांगोळीच्या मागे अंधश्रध्दा अशी होती, की ग्रहणाच्या काळात ज्ञानकमळ काढण्यास शिकले, की बुध्दी वाढते ! मी एका ग्रहणकाळातच ज्ञानकमळ रेखाटण्यास शिकले. या रांगोळीसाठी गणिती तत्त्व (मॅथेमॅटिकल फॉर्म्युला) वापरला जातो.
तो फॉर्म्युला असा
1.आधी अशी फुली मारा (आकृती 1)

2. त्यावर गुणाकारासारखी फुली मारा (आकृती 2)

3. या दोन दोन फुल्यांच्या आठ टोकांच्या दिशांना प्रत्येक टोकापुढे 4, 4 टिपके काढा.

4. फुलीच्या रेषेचे टोक म्हणजे क्रमांक 1 चा बिंदू मानला तर प्रत्येक रेषेपुढे 5 बिंदू तुम्हाला मिळाले असे समजा (आकृती 3)

5. आता 1,3,5,2,4 व पुन्हा 1,3…. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा.
6. कोणत्याही टोकापासून सुरुवात करून व पुढच्या रेषेकडे जात या फॉर्म्युल्यानुसार बिंदू जोडा. (आकृती 4)
7. असे आठ वेळा केल्यावर तुम्ही पुन्हा मूळ बिंदूपाशी पोचाल व ज्ञानकमळ पूर्ण होईल. ठिपक्यावर आकडे नाहीत. त्यामुळे योग्य क्रमांकाचे आकडे जोडण्याची काळजी घ्या, अन्यथा ज्ञानकमळ चुकेल. (त्या योग्य क्रमांकांचा एक दबदबा आमच्या मनात निर्माण केला जात असे)
8. पूर्ण झालेले ज्ञानकमळ असे दिसेल. (आकृती 5)

मी माझे बालपण संपल्यानंतर कित्येक वर्षांत ते ज्ञानकमळ काढले नाही, पण तरी संख्यांचा तो क्रम पक्का डोक्यात बसला.
शेकडो वर्षांपूर्वी कोणातरी पणजी वा खापरपणजीने हा क्रम ठरवून ज्ञानकमळाची रचना केली असणार, तिला संख्याज्ञान असेल का? की फक्त 1 ते 10 आकडे मोजता येत असतील? असे प्रश्न माझ्या मनात अनेकदा उठले.
काही वर्षांनंतर, माझ्या मनात सहज आले, की 1 3 5 2 4 अशा क्रमवारी ऐवजी 1 4 2 5 3 अशी क्रमवारी ठेवली तर काय होईल? पुन्हा कागदावर ज्ञानकमळ काढून पाहिले. नवीन क्रमवारी न चुकता व्यवस्थित आठ वेळा रिपीट केली, तर पुन्हा मूळ बिंदूपर्यंत पोचतो व ज्ञानकमळ पूर्ण होते असे माझ्या लक्षात आले. पण नवीन क्रमवारीचे ज्ञानकमळ सुबक दिसत नाही. हे मात्र खरे. त्याचा अर्थ अनामिक खापरपणजीने 1 ते 5 आकड्यांची विविध क्रमवारी जोखून पाहिलेली असणार व मग तिने 1 3 5 2 4 (व पुन्हा 135…) याच क्रमवारीमुळे ज्ञानकमळ रेखाटण्याचे ठरवले असणार, लहानपणी वाटत होते तसा मॅथेमॅटिकल फॉर्म्युला त्यात काहीही नाही. तरीही अंकांची क्रमवारी ठरवण्यात व त्या आधारे अशी रचना आखण्यात दिसून येणारी बौध्दिक क्षमता उच्च दर्जाची आहे.
मला अशा हजारो अनामिक खापर पणज्यांबद्दल नेहमीच अचंबा वाटत आलेला आहे. आळूच्या भाजीला चिंच घातल्यास ती खाजत नाही हा महान शोध कोणी लावला असेल? कडू कारल्याची तळून किंवा भरली भाजी करावी असे सर्वप्रथम कोणाला वाटले असेल? पोळी बनवताना तव्यावरील पोळीला पाणी लागत नाही, पण भाकरीला तसे पाणी लावावे लागते हे कोणाला प्रथम सुचले असेल?
असले हजारो प्रश्न मला पडतात. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, चाकाचा शोध स्त्रियांनी लावला, अन्न टिकवण्याच्या विविध पध्दती स्त्रियांनी शोधल्या असे मानववंशशास्त्रज्ञ सांगतात. मानववंशाच्या विकासाचे ते विविध टप्पे होते व ती काळाची गरज होती, मात्र अळुवडी, बाकरवडी, सुरळीची वडी असले पदार्थ करण्याच्या पध्दती ज्या स्त्रियांनी शोधून काढल्या, अनरसा किंवा त्यासारखे क्लिष्ट, किचकट पदार्थ ज्या स्त्रीने सर्वप्रथम बनवले, स्वेटरचे उलटसुलट टाके- सुंदर डिझाइन्स जिने प्रथम विणले, मण्यांची व पोतीची तोरणे, भरतकामाचे टाके जिच्या डोक्यातून आले अशा हजारो स्त्रियांच्या बुध्दिमत्तेची मला कमाल वाटते. ही फक्त वानगीपुरती उदाहरणे झाली. त्या अनंत अनामिक खापरपणज्यांचे ऋण विसरता कामा नये. त्यांच्या बौध्दिक क्षमतेचा वारसा मुख्यत: स्त्रियांनी विविध क्षेत्रात पुढे चालवायचा आहे.
– कै. मीना देवल atul_deval@yahoo.com
अनपेक्षित माहिती मिळते जी वाचनिय व उत्सुकता वाढविणारी असते. छान
खूप सुरेख लेख ! सामाजिक इतिहासात सर्वसाधारण पातळीवर जगणा-या समाजगटांविषयी नोंदी करण्याचे महत्व फारसे जाणवले नाही.
या लेखामुळे असे तपशील लिहिले जावेत असे वाटते.