तत्त्वज्ञानातील सरस्वती शुभदा जोशी (Shubhada Joshi – Professor do Philosophy)

5
911

शुभदा जोशी यांचे नाव एकविसाव्या शतकातील बुद्धिमान विदुषी महिलांमध्ये प्राधान्याने घ्यावे लागेल. त्यांनी ‘लोकायत-चिकित्सक’ अभ्यास या विषयात पीएच डी मिळवली. त्यांचे पन्नास शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. तत्त्वज्ञानाचा अर्क प्यायलेल्या शुभदा गेली चाळीस वर्षे अध्ययन-अध्यापनात अखंड कार्यरत होत्या! परदेशातही भारतीय तत्त्वज्ञानाचे बीज पेरणाऱ्या शुभदा जोशी यांची कारकीर्द संस्मरणीय आहे…

शुभदा जोशी ह्यांना, रुईया कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघातर्फे रुईया रत्न ‘ज्वेल ऑफ रुईया 2022’ हा किताब देण्यात आला. महाराष्ट्रात विसाव्या शतकाच्या अखेरीस आणि एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ज्या काही बुद्धिमान विदुषी महिला झाल्या आहेत, त्यांच्यामध्ये शुभदा यांचे नाव मुख्यत्वे घेण्यास हवे. त्या हुद्याने प्रोफेसर होत्याच, ज्ञानसाधनेने पीएच डी (डॉक्टर) आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात समंजसपणा, निर्णय घेण्याची शक्ती, खंबीर नेतृत्व, आकलन शक्ती आणि तरीही स्त्रीचा सोशिकपणा हे सगळे गुण असून, एक बौद्धिक दराराही आहे.

मी त्यांना प्रथम पाहिले ते मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागात. एम ए साठी तत्त्वज्ञान विभागात शनिवार-रविवारची बॅच सुरू झाली होती. योग-तत्त्वज्ञान घेऊन एम ए होता येणार होते! ‘वीक एंड बॅच’ असल्यामुळे नोकरी करून शिकणारे, हौशी प्रौढ विद्यार्थी, योग शिकवणारे शिक्षक असे सहाध्यायी होते. शुभदा मॅडम तत्त्वज्ञान विभागप्रमुख होत्या. ‘वीक एंड कोर्स’ची कल्पना त्यांचीच. त्यांचे पहिले लेक्चर होते गुरुदेव रानडे यांच्या तत्त्वज्ञानावर. शुभदा जोशी यांची पहिली छाप घरातील वडिलधाऱ्या व्यक्तीप्रमाणे आदरयुक्त, पण पाहताच आपुलकी मनात उत्पन्न करणारी अशी होती- गौर वर्ण, भव्य कपाळ, हसतमुख आणि घाऱ्या डोळ्यांत बुद्धीचे तेज; तरीही दृष्टी स्नेहार्द्र. त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्न, प्रेमळ भाव समोरच्याला नेहमीच आश्वस्त करतो. ‘कोर्स’च्या दोन वर्षांच्या काळात विद्यार्थिनी म्हणून शुभदा मॅडम यांच्याबद्दल आदराची भावना अधिकाधिक वाढत गेली. तोच भाव सर्व विद्यार्थी, त्यांचे सहकारी प्रोफेसर आणि त्यांच्या हाताखालील कर्मचारी यांच्या बोलण्यातून व्यक्त होई.

त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानातील उपनिषदांचा भाग शिकवला होता. त्या विषयावरील त्यांची पकड जबरदस्त आहे आणि त्यांचा सखोल अभ्यास मनाला भिडणारा होता. स्वाभाविक आहे, त्या तत्त्वज्ञान विषयात चाळीस वर्षे अध्ययन आणि अध्यापन यात अखंड कार्यरत होत्या! त्यांना विशेष रस भारतीय तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अधिनीतिशास्त्र, संतांचे तत्त्वज्ञान, भक्ती, आंतर-सांस्कृतिक व आंतरधर्मीय तत्त्वज्ञान, महाराष्ट्रातील एकोणिसाव्या शतकातील तत्त्वज्ञान या विषयांच्या संशोधनात आहे. त्यांनी प्राध्यापक आणि त्यानंतर विभागप्रमुख म्हणून 2016 पर्यंत काम केले.

शुभदा जोशी जेव्हा मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागामध्ये रुजू झाल्या, त्यावेळी डिपार्टमेंट फक्त दोन माणसांचे होते – त्या आणि प्रा. शि. स. अंतरकर. त्या पुढे, 1991 मध्ये तर फक्त एकट्या डिपार्टमेंटमध्ये स्टाफ मेंबर म्हणून होत्या. त्यांनी जैन अॅकॅडमीची स्थापना केली, सांताक्रूझ योग इन्स्टिट्यूटच्या मदतीने योग कोर्सेस सुरू केले; सर्वसाधारण लोकांची आसन-प्राणायाम यांबरोबरच पातंजल योगदर्शनाचे, हठयोगाचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याची इच्छा त्या कोर्सेसमुळे पूर्ण झाली. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना तत्त्वज्ञानाचा रोजच्या जीवनात उपयोग काय आहे, उपयोग कसा करता येईल याची जाणीव झाली. त्यांनी विपश्यना आणि बुद्ध फिलॉसॉफी यांचे सर्टिफिकेट, डिप्लोमा व ॲडव्हान्स डिप्लोमा हे कोर्सेस तत्त्वज्ञान विभागात चालू केले. वेदांत, विशेषत: वल्लभ वेदांत यातील कोर्सेस सुरू केले. त्यामुळे लोकांना तत्त्वज्ञानात रूची निर्माण झाली. अधिकाधिक विद्यार्थी तत्त्वज्ञान विषय घेऊन एम ए च्या कोर्ससाठी प्रवेश घेऊ लागले. दक्षिण आशियाई देशांमधूनसुद्धा काही विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठात तत्त्वज्ञान विभागात प्रवेश घेतले. त्यांनी एकूण एकोणीस कोर्सेसना चालना दिली.

त्यांच्या अध्यापकीय कारकिर्दीची सुरुवात रुईया कॉलेजमध्ये झाली. त्या मुंबई विद्यापीठात लेक्चरर म्हणून 1991 साली गेल्या. मग प्राध्यापक आणि नंतर तत्त्वज्ञान विभागाच्या प्रमुख झाल्या. त्यांची ज्ञानजिज्ञासा विद्यार्थिदशेपासून दिसत गेली. त्यांनी रुईया कॉलेजचा विद्याभूषण (Best student) पुरस्कार; तसेच, बीए आणि एम ए परीक्षांत तत्त्वज्ञान या विषयात सर्वाधिक मार्क्स मिळवून पुरस्कार, शिष्यवृत्ती व सुवर्णपदक मिळवले (1975); त्यांनी ‘लोकायत-चिकित्सक’ अभ्यास या विषयात पीएच डी मिळवली (1985); त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाला नाव मिळवून दिले. त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली.

शुभदा जोशी यांचे शालेय शिक्षण टिळक नगर विद्यामंदिर (डोंबिवली) येथे झाले. त्या माहेर आणि सासर अशा दोन्ही घरी एकत्र कुटुंब पद्धतीत राहिल्या. आदर्श एकत्र कुटुंब पद्धत म्हणून त्यांच्या कुटुंबीयांचा डोंबिवलीमध्ये सत्कार झाला होता. शुभदा जोशी यांना ‘डोंबिवली भूषण’ हा पुरस्कार मिळाला आहे.

जोशी विविध देशांमध्ये गेल्या आहेत. त्यांना हिंदू आणि ख्रिश्चन यांमधील आंतरधर्मीय संवाद साधण्याची संधी लाभली आहे. त्यांच्या परिषदा फुकोलारे या चळवळीमध्ये सहभागी होते अशा इटालीमधील ख्रिश्चन लोकांबरोबर झाल्या. त्या चळवळीमधील लोकांची येशूच्या दोन तत्त्वांवर विशेष श्रद्धा होती, ती म्हणजे प्रेम आणि वेदना (दुःख). ते दोन्ही दैवी असते आणि त्यांना असे वाटत असते, की भारतीय तत्त्वज्ञानातील अद्वैत तत्त्वज्ञान हे येशूच्या त्या विचारांशी जवळिकीचे आहे. जोशी यांना त्याचा शोध घ्यायचा होता. तशा तऱ्हेची आंतरराष्ट्रीय, आंतरधर्मीय परिषद इटालीमध्ये पहिल्यांदा झाली. त्यांना दुःखाला प्रेमाचा उतारा आहे असे वाटत असे. पुढे, दर वर्षी त्या विचारातून परिषदा भरू लागल्या. तेथे जोशी यांची पोप जॉन पॉल यांच्याशी भेट झाली. त्यानंतर पुढे तो फक्त दोन धर्मांतील संवाद उरला नाही तर हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिम असे सर्वधर्मीय त्या परिषदांमध्ये सामावले गेले. त्यांनी तशाच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा, अभ्यासवर्ग यांचे आयोजन यशस्वी रीत्या केले आहे.

जोशी यांनी पंचवीसपेक्षा अधिक पीएच डी व दोन एम् फिल च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. शुभदा यांचे पन्नास शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी एकूण चार ग्रंथ लिहिले, ते पुढीलप्रमाणे :

 1. ‘Lokayata – A Critical Study’ – India Book Centre – Garibdas Oriental Series no. 180 in May 1995
 2. ‘Sri Aurobindo and Vedic interpretations’ Edited along with co-editor, Somaiya Publication February, 1996
 1. ‘Buddhism in India and Abroad’ Edited alongwith two other co –

editors Somaiya Publications August, 2006.

 1. J. Krishnamurti and Early Buddhism – Compiled the proceedings of

the Seminar, Published by Dutta Lakshmi Trust November, 1996

याशिवाय दोन संपादित ग्रंथ

History of Science Philosophy and Culture in Indian civilization.

जनरल संपादन- डी.पी. चट्टोपाध्याय (सहभागी संपादन)

Perspective on Maharashtra’s Culture and Intellectual Contribution edited by shubhada Joshi published in 2013.

त्या बॉम्बे फिलॉसॉफिकल सोसायटीच्या ‘प्रेसिडेंट’ होत्या; हिंदुस्तान लिव्हर कंपनीच्या रिसर्च एथिक कमिटीच्या चेअर पर्सन 1996 सालापासून होत्या.

त्या संशोधन क्षेत्राकडे वळणाऱ्यांना भावी पिढ्यांचा विचार करण्यास सांगतात. कोणतेही संशोधन भावी पिढ्यांस मार्गदर्शक ठरते, सकस समृद्ध जीवन जगण्याची रीत शिकवते आणि पुढील संशोधनाची दिशा दर्शवते, हा त्यांचा विचार त्या विशेषत: त्यांच्या पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मांडत असतात.

पुढील पिढीने आयुष्याकडे कसे पाहवे यासंबंधात मार्गदर्शन करताना जोशी म्हणतात, की जगावे कसे? आनंदी असे आयुष्य, की ज्याला प्रेयस् (प्रिय) म्हणता येईल किंवा जे उपयोगी होणार आहे असे श्रेयस् आयुष्य? प्रिय व श्रेय यांत फरक आहे. पण त्याचा विसर पडू लागला आहे. कष्टाचा कठीण मार्ग अंतिमतः श्रेयस् कडे नेणारा आहे, अशी त्यांची धारणा आहे. त्या म्हणतात, की हे उपनिषदांच्या अभ्यासातून समजते. उपनिषदे फक्त मोक्षाचा मार्ग सांगत नाहीत, तर तो कसा मिळवावा त्याचे मार्गदर्शन करतात. उपनिषदे या पृथ्वीतलावर दर्जेदार जीवन कसे जगावे तेही सांगतात. तत्त्वज्ञान सुखोपभोगापेक्षा काहीतरी उच्च शिकवते आणि ते असते दर्जेदार जीवन. म्हणून मनुष्याने स्वतःला कष्टमय जीवनासाठी तयार केले पाहिजे. त्यासाठी खरा मूळ (ओरिजनल) विचार करण्यास शिकले पाहिजे. तेव्हाच मनुष्य स्वतंत्र विद्यार्थी आणि विचारी माणूस होऊ शकेल.

शुभदा जोशी 98195 24573 jshubhada17@gmail.com

संध्या जोशी 9833852379 ssjmumbai@yahoo.com

———————————————————————————————-

About Post Author

5 COMMENTS

 1. श्रीमती संध्या ताई जोशी यांनी भारतीय तत्वज्ञानातील आधुनिक सरस्वती म्हणून गौरवाने उल्लेख केल्या त्या शुभदा जोशी मॅडम यांचा परिचयात्मक लेख खूप आवडला. थिंक महाराष्ट्र या लोकप्रिय वेबसाईटवर तत्वज्ञान सारख्या विषयावर असे व्यक्ती विशेष दाखवणारे लेख आल्याने माझ्या सारख्या अनेक लोकांना या थोर विद्वान लोकांचा परिचय होतो आहे . त्यासाठी या वेबसाईटचे मनपूर्वक आभार. संध्या जोशी यांनी या छोट्याश्या लेखात खूप माहितीत दिली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

  अनिल चुबे
  ठाणे

 2. 🔥
  ॥ हरि ॐ ॥
  सुजन हो !
  या सुरम्य समयीं प्रेमळ प्रणाम
  🌹🙏🌹
  परिवर्तन हा अखिल सृष्टीचा नियम आहे. मानवी जीवन दिन प्रतिदिन वेगाने विकसीत होत आहे. बदलत्या कालक्रमान्वये जागतिक पातळीवर मराठी भाषा आणि संस्कृती यांचं जतन करताना त्यांचं संवर्धन देखील व्हावं असं भव्य ध्येय समोर ठेवून *व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशनची* निर्मिती झाली आणि याच उदात्त प्रेरणादायी संकल्पनेतून विविध क्षेत्रात आपले अनेक उच्च विद्याविभुषित प्रज्ञावंत, विचारवंत, सुसंस्कृत मराठी समाजबांधव कार्यरत असून जगभरात विखुरलेयत. तिथे स्थायिक देखील झालेयत. अशा स्वदेशी-विदेशी स्थित मराठी समाजबांधवांच्या अंतर्यामी वसत असलेली प्रज्ञा-प्रतिभा अन् चांगुलपणा इत्यादीना व्यक्त करण्यासाठी *थिंक महाराष्ट्र डाॅट काॅम* या नामाभिधानाने विश्वव्यापी व्यासपीठ आकाराला आलं. याच व्यासपीठावर तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक आदरणीय संध्याताई जोशी यांनी

  *तत्त्वज्ञानातील सरस्वती शुभदा जोशी*
  *( Shubhada Josi — Professor do Philosophy )*

  हा त्यांचा भावपूर्ण लेख *” थिंक महाराष्ट्र डाॅट काॅम “* वर सादर केलाय. त्या लेखा संबंधीचा हा 👇 अभिप्राय साक्षीभावाने व्यक्त करताना मला आनंद होतोय.

  एकविसाव्या शतकातील बुद्धिमान विदुषी, तत्त्वज्ञानातील सरस्वती आदरणीय शुभदा जोशी या अनेकानेक प्रतिष्ठित मान-सन्मान पुरस्कारांनी मंडित झालेलं एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहेत. या सगळ्यांचं हृद्य उद्बोधक गुणगान प्रस्तुतच्या लेखात मान्यवर लेखिका संध्याताई जोशींनी अतिशय सुरेख पद्धतीने केलंय.

  सुविद्य बुद्धीमान विदुषी प्रोफेसर शुभदा जोशी आणि मान्यवर लेखिका संध्याताई जोशी यांचं नातं हे गुरु-शिष्याचं. परिणाम स्वरूप लेखिका संध्याताई जोशी यांच्या अंतरंगीं त्यांच्या गुरु – प्रोफेसर शुभदा जोशी यांच्या प्रती अशी आत्मियता, प्रेमभाव, संतोष, कृतज्ञता आणि आदर आदी सद्भावना उदित होणं स्वाभाविकच आहे.

  प्रोफेसर शुभदा जोशी आणि लेखिका संध्याताई जोशी यांची पहिली भेट झाली ती मुंबई विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागात. खरं म्हणजे लेखिका संध्याताई जोशी विज्ञान शाखेच्या पदवीधर. मात्र तत्त्वज्ञान विषयाकडे मनाचा कल अधिक, अति प्रीती म्हणून की काय एम् ए साठी तत्वज्ञान या विषयाची निवड त्यांनी केली. विज्ञान शाखेला दूर सारलं आणि पूर्ण मनानिशी तत्वज्ञानाशी गट्टी केली. मानवी मनाच्या नाना कळा आकळती का हो कुणा….
  असो.

  मुंबई विद्यापीठाच्या एम् ए तत्वज्ञान विभागात शनिवार-रविवारची बॅच सुरू झाली होती. योग-तत्त्वज्ञान विषय घेऊन एम् ए होता येणार होतं याचा अधिक आनंद लेखिका संध्याताई जोशींना होता. योगायोग असा जुळून आला होता की प्रोफेसर शुभदा जोशी मॅडम तत्वज्ञान विभागाच्या प्रमुख होत्या. या *विक एंड कोर्स* ची नाविन्यपूर्ण कल्पना देखील त्यांचीच. ” विक एंड बॅच ” असल्या कारणाने नोकरी सांभाळून शिकणारे, हौशी प्रौढ विद्यार्थी, योग शिकवणारे शिक्षक असे विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सहाध्यायी होते.

  प्रस्तुतच्या लेखात मान्यवर लेखिका संध्याताई जोशी यांनी प्रोफेसर शुभदा जोशी मॅडम यांचं विलोभनीय व्यक्तिचित्र शब्दांकित केलंय. त्याचं वैशिष्ट्य असं की ते शब्दांकन वाचताना वाचकाच्या अंतःचक्षूंसमोर शुभदा जोशी मॅडम साक्षात साकार होतात. अर्थात याचं संपूर्ण श्रेय निःसंशयपणे मान्यवर लेखिका संध्याताईंच्या शब्दकौशल्यात सामावलय.

  वर्ग सुरू झाला. शुभदा जोशी मॅडम यांचं पहिलं लेक्चर – विषय होता
  ” गुरुदेव रानडे यांचं तत्त्वज्ञान.”

  शुभदा जोशी मॅडम तत्त्वज्ञान विषयात चाळीस वर्षें अध्ययन आणि अध्यापन यात अखंडपणे कार्यरत आहेत. भारतीय तत्त्वज्ञानामधला उपनिषदांचा अभ्यास सखोल आहे. त्या विषयावरील त्याचं प्रभुत्व लक्षणीय आहे. सहाजिकच या सगळ्याचा ठसा त्यांच्या अमोघ शिकवणीतून विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या अंतःकरणात सखोल उमटला असेल तर त्यात नवल ते काय ?

  याविषयी मान्यवर लेखिका लिहितात.
  ” शुभदा जोशी यांची पहिली छाप घरातील वडीलधार्या व्यक्तीप्रमाणे आदरयुक्त, पण पाहताच मनात आपुलकी उत्पन्न करणारी अशी होती — गौर वर्ण, भव्य कपाळ, हसतमुख आणि घार्या डोळ्यात बुद्धीचे तेज, तरीही दृष्टी स्नेहार्द्र. त्यांच्या चेहर्यावरील प्रसन्न, प्रेमळ भाव समोरच्याला नेहमीच आश्वस्त करतो. ” कोर्स ” च्या दोन वर्षांच्या काळात विद्यार्थिनी म्हणून शुभदा मॅडम यांच्याबद्दल आदराची भावना अधिकाधिक वाढत गेली. ”

  प्रोफेसर शुभदा जोशी मॅडम यांच्या
  सलग दोन वर्षांच्या निकट सानिध्यात आलेल्या मान्यवर लेखिका संध्याताई जोशी यांनी व्यक्त केलेल्या या 👆 वरील भाव-भावना त्यांच्या स्फटिकवत निर्मल, शुद्ध सात्त्विक अंतःकरणाचं द्योतक आहेत.

  मान्यवर लेखिका संध्याताई जोशी लिहितात.
  शुभदा जोशी मॅडम यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं ते डोंबिवलीच्या ” टिळक विद्यामंदीर ” या शाळेत. माहेरी आणि सासरी एकत्र कुटुंब पद्धति आहे. अशा एकत्र कौटुंबिक वातावरणात त्या वावरल्या अन् रमल्या. *आदर्श एकत्र कुटुंब पद्धत* म्हणून
  शुभदा जोशी मॅडम यांच्या कुटुंबीयांचा डोंबिवलीत सत्कार करण्यात आला आणि शुभदा जोशी मॅडमना *डोंबिवली भूषण* हा पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आलं.

  शुभदा जोशी मॅडम यांच्या अध्ययन, अध्यापन आणि अध्यापकीय कारकिर्द विषयीची समग्र माहिती, आजवर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ग्रथ संपदे विषयीची माहिती, आंतरराष्ट्रीय, आंतरधर्मीय परिषदांच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या विदेश गमनागमना विषयीची माहिती, त्यांचे प्रसिद्ध झालेले शोध निबंध, पंचवीसपेक्षा अधिक Ph D
  ( Doctor of Philosophy )
  च्या विद्यार्थ्यांना
  आणि
  दोन M Phil
  ( Master of Philosophy )
  च्या विद्यार्थ्यांना केलेलं अनमोल मार्गदर्शन या सगळ्याचा उल्लेख अतिशय सुरेख पद्धतीने प्रस्तुतच्या लेखात मान्यवर लेखिका संध्याताईंनी क्रमशः केलेला आहे. यावरून एक गोष्ट प्रकर्षाने मला स्पष्टपणे जाणवते की खरोखरच एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेल्या त्त्वज्ञानातील सरस्वती शुभदा जोशी मॅडम यांना जन्मतःच दैवी प्रज्ञेचं वरदान भक्तवत्सल भगवंताने प्रदान केलंय.

  आजवरच्या जीवनात अनुभवलेल्या अनुभवातून काढलेल्या निष्कर्षाच्या आधारे भावी पिढीने जीवनाकडे कसं पाहावं याविषयी मार्गदर्शन करताना शुभदा जोशी मॅडमनी मांडलेला एक अप्रतिम सिद्धांत वाचकाला अंतर्मुख होऊन सद्सद्विवेक बुद्धीने विवेक साधावा असं प्रतिपादन करणारा आहे. किंबहुना शेवटचा संपूर्ण परिच्छेद तेवढाच लक्षवेधी वाटतो पाहा.

  विशेषतः शेवटची दोन वाक्ये. ती 👇 अशी आहेत.
  ” त्यासाठी खरा मूळ ( ओरिजिनल् ) विचार करण्यास शिकले पाहिजे. तेव्हाच मनुष्य स्वतंत्र विद्यार्थी आणि विचारी माणूस होऊ शकेल. ”

  हे 👆 सत्य कथन आहे. खरा मूळ ( ओरिजिनल ) विचार म्हणजे स्वतःची वास्तविक ओळख ( Self realisation ) —
  ” मी कोण आहे ” या प्रश्नाचं उत्तर सर्वांगानी जाणून घेणं आवश्यक आहे आणि याकरिता अध्यात्मज्ञानाचा सदुपदेश करण्यासाठी आत्मसाक्षात्कारी सिद्ध पुरुषाची म्हणजे सद्गुरुची नितांत आवश्यकता आहे.
  गुरुबिन कौन बताए बात ?
  परम पूज्य श्रीसद्गुरु निसर्गदत्तमहाराज
  *” अध्यात्म “*
  या शब्दाचं विश्लेषण करताना त्यांच्या नैसर्गिक शैलीत म्हणतात —
  “अध्यात्म म्हणजे आधी आत्म, आधी आपण. केंद्र म्हणजे आपण असल्याचा मध्यबिंदू. तो ओळखा.”
  स्वरूपज्ञानाची प्राप्ती, मूळ विचार की वास्तविक अर्थाने जो ” मी कोण आहे ” या प्रश्नाचं यथार्थ ज्ञान होऊन तसा अनुभव स्वतः अनुभवण्यात आहे. तेव्हाच मनुष्य म्हणजे साधक एक विवेकी पुरुष बनेल, आत्मज्ञानी बनेल आणि तत्क्षणी स्वतंत्र म्हणजे जीवन्मुक्त होऊ शकेल. याची देही याची डोळा जीवन्मुक्तीचा आनंद सोहळा अनुभवू शकेल.
  🌹
  आदरणीय संध्याताईंनी सादर केलेल्या या लेखातून तत्त्वज्ञानातील सरस्वती शुभदा जोशी मॅडम ( Shubhada Joshi — Professor do Philosophy )
  यांचा सर्वांगांनी परिचय करून दिलाय. याकरिता त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना आदरणीय बुद्धिमान विदुषी प्रोफेसर शुभदा जोशी मॅडम यांना सविनय प्रणाम प्रेमळ. 💐👏

  ॥ जय श्रीसद्गुरु प्रणाम ॥
  💐👏💐👏💐

  शांतिदास.
  9969004204
  bbsawant1944@gmail.com

 3. शुभदा जोशी यांच्याबद्दल लेखातून खूप छान माहिती मिळाली तत्वज्ञानातील पंडिता असलेल्या शुभदा जोशी यांचे कार्य जाणून त्यांच्याविषयी खूप आदर वाटला. संध्याताई जोशी यांनी अशाप्रकारे लेखातून शुभदा जोशी यांचा परिचय करून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन
  ललिता वैद्य

 4. शुभदा जोशी ह्याच्यावरील लेख वाचला !खरोखरच त्या सरस्वती आहेत त्यांचा विद्वत्तेचा आलेख वाचून खूपच चकित झाले !एक व्यक्ती जीवनात इतक्या प्रकारचे नैपुण्य मिळवू शकते ह्याचच फार कौतुक वाटले !एवढ्या उंचीवर नावलौकिक असून सुध्दा त्याअत्यंत साध्या आहेत !त्या डोंबिवलीच्या असल्याचा आम्हाला अभिमान आहे !समाजात अशा व्यक्ती जेव्हा वावरतात तेव्हा त्या आपल्या सुसंस्कृत वागण्याने समाजाचे Role model होऊन जातात !त्याच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा !

 5. तत्वज्ञानातील पंडिता शुभदा जोशी ह्यांच्यावरचा लेख वाचून खूप माहिती मिळाली .अशा व्यक्तिंचे कार्यकतृत्व किती महत्वाचे आहे हे समजले.
  खरतर आशा व्यक्तिंचा परिचय समाजाला होणे गरजेचे आहे कारण अशी माणस पुढच्या पिढीसाठी दिपस्तंभ आसतात.
  संध्या जोशी ह्यांचे शब्दांकन छानच .व्यक्तिमत्व छान उलगडून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here