अजय गाडगीळ हे महाराष्ट्राच्या गिर्यारोहण क्षेत्रातील बहुपरिचित नाव आहे. त्यांची गड-किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन, निसर्गरक्षण; तसेच, आपत्कालीन बचावकार्य या तिन्ही क्षेत्रांतील कामगिरी मोठी आहे.
अजय गाडगीळ यांचा जन्म १९७९ सालचा. ते गिर्यारोहण क्षेत्रात १९९३ पासून कार्यरत आहेत. पनवेलच्या ‘दुर्गमित्र’ या गिर्यारोहण संस्थेची सूत्रे त्यांच्या हाती आली आणि त्यांनी गिर्यारोहण या छंदाला व साहसाला निसर्गसंरक्षण आणि बचावकार्य ही दोन नवी अंगे जोडली. त्यामुळे कार्यक्षेत्र वाढले व संस्था नावारूपाला आली ! स्वत: गाडगीळ यांची गिर्यारोहण कामगिरी मोठी आहे. त्यांनी सुमारे चाळीस टक्के सह्याद्री पालथा घातला आहे. त्यांची अडीचशेहून अधिक किल्ल्यांवर भ्रमंती झाली आहे. ते आणि त्यांचे सहकारी व्हॅली क्रॉसिंग, प्रस्तरारोहण, गडावर अडकलेल्या माणसांची-प्राण्यांची सुटका, महिलांना; तसेच, अंध-अपंगांना सोबत घेऊन साहसी गिरिभ्रमण, गडाची साफसफाई करण्यासाठी श्रमदान, विद्यार्थ्यांवर गिर्यारोहणाचे संस्कार व्हावेत म्हणून शिबिरांचे आयोजन यांसारखे विविध उपक्रम हिरिरीने पार पाडत असतात. रमेश म्हात्रे, विवेक पाटील, विश्वेश महाजन, राहुल खोत, किरण गायकवाड, निलेश भोपी हे ‘दुर्गमित्र’चे त्यांचे बिनीचे शिलेदार आहेत ! गाडगीळ हे दुर्गमित्र बरोबरच, ट्रेक क्षितिज, निसर्गमित्र आणि धूमकेतू ट्रेकर्स या संस्थांशी जोडले गेले असून या सार्या संस्था अनेकदा एकत्र काम करत असतात.
गाडगीळ यांनी प्रचलित शिक्षणव्यवस्थेला नववीत असताना रामराम ठोकला, तोही नाट्यमय रीत्या. त्यांनी त्यांचे शाळेचे दप्तर करवंदीच्या जाळीत लपवून ठेवले आणि त्यांनी गिर्यारोहण, निसर्गसंवर्धन, बचावकार्य हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय मानून त्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्या ध्येयातूनच त्यांचा व्यवसाय निर्माण झाला आहे. ते म्हणतात, “मी शाळा सोडली तो दिवस १५ ऑगस्ट. तो माझा शाळेचा शेवटचा दिवस. बाबा म्हणाले, “त्याला हवं ते करू दे.” आई उत्तरली, “अजय मोठा होतोय, जबाबदारीची जाणीव आहे त्याला.” अजय पुढे सांगतात, “शाळा सोडून मी पनवेलला आलो तो माझा व्यवसायाचा पहिला दिवस. साठ रुपये कमाई झाली. कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही हा मंत्र घेऊन मी पुढे चालत राहिलो. तेव्हा आम्ही पनवेलपासून पाच किलोमीटर दूर कोप्रोली या गावी राहत होतो.” रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या डोंगरावरून मोठमोठे शिलाखंड खाली कोसळून अपघात होण्याची शक्यता अनेकदा असते. ते होऊ नयेत यासाठी गाडगीळ यांनी ते शिलाखंड जाळ्यांनी बांधून ठेवण्याचे (रॉक-फॉल प्रोटेक्शन) अनोखे कार्य पोटापाण्याचा उद्योग म्हणून स्वीकारले आहे ! त्या कार्यात त्यांचा गुरू स्वतःचा अनुभव हाच होता. त्यात त्यांना इतके यश मिळाले आहे, की देश-विदेशांतील नामांकित संस्था अशा प्रकारच्या कामगिरीत त्यांचा सल्ला आणि मदत घेऊन काम करू लागल्या आहेत.
नाशिकमधील सप्तशृंगी गडावरील शिलाखंड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यासाठी जाळ्या बसवण्याची कामगिरी तातडीने हाती घेण्याची होती. त्या कामासाठी कोणी पुढे येईना. शेवटी, एका इटालियन कंपनीने ती कामगिरी हाती घेतली. त्यासाठी आधी त्या जागेचे मोजमाप करावे लागणार होते, पण ते काम इतके अवघड होते, की त्यासाठीही कोणी पुढे येईना. तशा दुस्तर जागेचे मोजमाप घेणे ही अतिशय खडतर कामगिरी होती… अखेरीस, ते काम इटालियन कंपनीने अजय गाडगीळ यांच्यावर सोपवले ! एक स्थानिक माणूस दरवर्षी सप्तशृंगी गडावर सर्वोच्च ठिकाणी जाऊन झेंडा रोवत असे. गाडगीळ यांनी त्याची माहिती काढली, त्याची मदत घेऊन कामाचे नियोजन केले आणि ते केवळ दोन दिवसांत पूर्णही केले. त्यानंतर, इटालियन कंपनीने पुढील काम सुरू केले, पण ती कामगिरी इतकी अवघड होती, की त्यांना त्याकरता हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. तरीही काम नीट होईना. परदेशातून त्यासाठी मागवलेली यंत्रसामग्रीही कुचकामी ठरली. कंपनीने गाडगीळ यांनाच पुढील कामातही सहभागी होण्याची पुन्हा एकदा विनंती केली. गाडगीळ यांनी त्यांचे डोके अशा पद्धतीने चालवले, की जाळ्या बसवण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले ! गाडगीळ यांच्या त्या अचाट, अफाट अशा कामगिरीमुळे कंपनीने त्यांना त्यांच्याकडे येऊन काम करावे अशी ‘ऑफर’ दिली. अर्थात, गाडगीळ यांनी ती नाकारली. त्याचे कारण म्हणजे त्यांचे सह्याद्रीवर असणारे प्रेम! गाडगीळ ‘मी माझ्या छंदालाच माझा धंदा बनवला’ असे हसत, पण अभिमानाने सांगतात. गाडगीळ त्यांना दोन वडील असल्याचेही सांगतात. एक, ज्याने जन्म दिला तो राजाराम आणि दुसरा, ज्याने जगण्याचा भरभरून अनुभव दिला तो, सह्याद्री !
सद्यस्थितीत इन्फ्रास्ट्रक्चरची कामे सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यात रस्ते, रेल्वेमार्ग, गड-किल्ले, जलदुर्ग, भुयारी मार्ग, सागरीमार्ग, धक्के, नद्यांची पात्रे वळवणे अशा प्रकारच्या कामांचा समावेश आहे. भविष्यात अशी कामे वाढत जाणार आहेत. त्यासाठी जाळ्या बांधताना त्या कामाची गुणवत्ता संबंधितांना नेहमीच उच्च प्रतीची राखावी लागणार आहे. तसेच, तेथील सुरक्षा व्यवस्था आणि तपासणी यंत्रणाही सक्षम करावी लागणार आहे. ती काळाची गरज आहे असे गाडगीळ स्पष्टपणे मांडतात आणि तशी जाणीवही ते सर्वांना वेळोवेळी करून देत असतात.
‘रॉक-फॉल प्रोटेक्शन’ प्रकल्पांच्या कामातील भ्रष्टाचार हा गाडगीळ यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. इंजिनियर आणि डिझायनर ‘प्रतिरोधक खांब किंवा जाळ्या’ लावण्यासाठी खडकात किती फूट ड्रील करावे, कोणते मटेरियल वापरावे इत्यादी कामाचे मापदंड ठरवत असतात. गाडगीळ युरोप-अमेरिकेत तशा कामांमध्ये तडजोडी केल्या जात नाहीत हे आवर्जून सांगतात. त्या कामासाठी लागणारे दर्जेदार मटेरियल हे फिलिपाईन्स आणि मलेशिया या दोन देशांत तयार होते आणि ते तेथूनच बऱ्याचदा आयात करावे लागते अशी माहितीही गाडगीळ यांनी दिली. ‘आडोशी बोगद्या’जवळ भूस्खलन झाले होते तेव्हाची गोष्ट. ती बातमी कळली तेव्हा गाडगीळ यांना आश्चर्य वाटले. कारण तेथे ‘रॉक-फॉल बॅरियर’चे काम पूर्ण झालेले होते, मग भूस्खलन झालेच कसे? गाडगीळ स्वतः तेथे तपासणीसाठी गेले. तपासणीअंती, त्यांच्या निदर्शनास बाहेरून धातूच्या तारा आणि आतून नायलॉनचा दोर वापरल्याची गंभीर बाब आली. तो प्रवाशांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे हे लक्षात घेऊन त्यांनी त्याची जाणीव संबंधित वरिष्ठांना करून दिली. तो गाडगीळ यांच्या बाणेदार आणि करारी स्वभावाचा भाग होय. गिर्यारोहण आणि तत्सम कामाच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या परवानग्या देताना माथेरान येथील एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांच्याकडे लाच मागितली; त्यावर गाडगीळ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करून त्या अधिकाऱ्याला चतुर्भुज करवले होते.
अजय गाडगीळ यांच्याकडे महाराष्ट्राच्या गिर्यारोहणातील एक उगवता तारा म्हणून पाहिले जाते. आयत्या वेळच्या बचावकार्यासाठी जेव्हा ते आणि त्यांचा चमू पुढे येतो, तेव्हा त्यात त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन नसतो. व्ही.जे.टी.आय.मधील सुशील शेलार नावाचा एक विद्यार्थी कर्नाळा किल्ल्यावर गिर्यारोहण करत असताना शंभर फूट खोल दरीत कोसळला. त्याचे पुढचे दात तर पडलेच, पण जीभही तुटली होती. त्याला सुरक्षित रीत्या उचलून वर आणण्याची कामगिरी गाडगीळ यांच्याकडे आली. सुशीलमधील आत्मविश्वास नष्ट होऊ नये म्हणून ज्या मार्गाने तो खाली कोसळला, त्याच मार्गाने गाडगीळ यांनी त्याला वर नेले ! त्याच्या कुटुंबाचे गाडगीळ यांच्याशी ऋणानुबंध निर्माण झाले. सुशीलचे वडील त्यांच्या मुलाचा पुनर्जन्म झाला म्हणून खास गाडगीळ यांच्यासाठी दिवाळीचा फराळ घेऊन आले होते. सुशील एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे.
एकदा कर्नाळ्याला एक सरदारजी वरून खाली कोसळला. त्याचे दोन्ही पाय मोडले होते. अवघड परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्याची कामगिरी ‘दुर्गमित्र’ला पार पाडावी लागली. गाडगीळ आणि त्यांच्या मित्रांनी जंगलातील अवघड जागेतून मार्ग काढत त्या सरदारजीला खांद्यावर घेऊन चार-साडेचार किलोमीटर इतके अंतर कापत त्याचा जीव वाचवला. पनवेलजवळच्या इर्शाळगडावर एका अवघड ठिकाणी सहा बकऱ्या अडकल्या होत्या. त्यांना खाली उतरता येत नव्हते. त्यावेळी ‘दुर्गमित्र’ला तेथे पाचारण करण्यात आले. गाडगीळ आणि त्यांच्या मित्रांनी दोरीच्या सहाय्याने त्या बकऱ्यांना सुरक्षितपणे खाली उतरवले होते. तेव्हा वाडीवर गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला हे गाडगीळ आठवणीने सांगतात.
गाडगीळ यांनी पक्ष्यांना उन्हाळ्यातही नियमितपणे पाणी मिळावे म्हणून कर्नाळा येथील वनखात्याच्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी सुमारे पाचशे किलो वजनाच्या आणि शंभर लिटर पाणी मावेल अशा आकाराच्या काँक्रिटच्या बश्या तयार करून दिल्या आहेत. तो प्रयोग इतका उपयुक्त ठरला, की नंतर अनेक अभयारण्यांत तशा बश्या लावल्या गेल्या. त्या पाण्याचा लाभ पक्ष्यांबरोबर साप, सरडे आणि तत्सम छोट्या-मोठ्या प्राण्यांनाही होत आहे.
गाडगीळ यांच्याकडे किस्से आणि कहाण्या यांचा खजिना आहे, माणसांच्या नमुन्यांचे भांडार आहे. त्यांचा स्वभाव गप्पिष्ट आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर फिरताना मजा येते. अफलातून माहिती मिळते. त्यांनी कोंबडीचे पिल्लू पळवण्यास आलेल्या घारीला हाकलून लावताना, आंब्याच्या झाडाएवढी उंच उडी मारणाऱ्या कोंबडीची गोष्ट इर्शाळगडावर सांगितली होती, ती कायम लक्षात राहील अशी आहे. त्या क्षेत्रातील त्यांचे वाचन आणि जनसंपर्क हेही दांडगे आहे. त्या आधारे, त्यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व जाणीवपूर्वक घडवले आहे. त्यांच्या बरोबर गिरिभ्रमणाला गेले तर ते गोड बोलत बोलत, धीर देत देत पार अगदी बालेकिल्ल्यापर्यंत घेऊन जातात. त्यांच्या सहवासात गिर्यारोहणाचा अर्थ आणि तेथे वावरताना लागणारी शिस्त यांचे प्रशिक्षण मिळते.
गडावरील प्लास्टिक साफ करणे, कचरा काढणे, टाक्यातील गाळ काढणे अशा प्रकारची कामे गाडगीळ आणि त्यांचा ग्रूप स्वयंस्फूर्तीने करत असतो. त्यांना ते काम प्रायोजकत्व मिळवून किंवा अनेकदा खिशातील पैसा खर्च करून करावे लागते. जेव्हा जेव्हा ते एखाद्या गडावर जातात, तेव्हा तेव्हा तेथे कोणते काम करण्याची तातडीने गरज आहे याचे ते नियोजन करतात. ते काम पुढील आठ-पंधरा दिवसांत पूर्णही करून टाकतात. आम्ही त्यांच्यासोबत इर्शाळगडावर गेलो तेव्हा तेथील प्लास्टिक साफ करण्याची गरज त्यांच्या नजरेने हेरली आणि परतताच त्यासाठी आवश्यक ती कार्यवाहीसुद्धा सुरू केली ! गाडगीळ गिर्यारोहण, गिरिभ्रमण या अनुषंगाने शासनस्तरावरील एकूणच उदासीनतेबाबतही खंत व्यक्त करतात. त्यासंबंधीचे सर्वसमावेशक धोरण किंवा स्वयंस्पष्ट स्वरूपाचा एखादा शासन निर्णय का असू नये हे खरोखरच एक कोडे म्हणण्यास हवे !
अवचितगडाखाली काही कारणांनी कोसळून खाली आलेली दोन हजार किलो वजनाची एक तोफ अनेक वर्षे पडून होती. गाडगीळ यांच्या मनात ती गडावर पूर्ववत स्थापित करावी असा विचार आला आणि मग ते ‘ऑपरेशन’ही त्यांनी त्यांच्या तीस सहकाऱ्यांच्या (त्यांच्या भाषेत मावळ्यांच्या) मदतीने यशस्वी रीत्या पार पाडले. त्यांनी तोफ वर चढवताना, झाडाला दोर बांधला होता त्या झाडाचे नुकसान होऊ नये याचीही काळजी घेतली. त्या धातूच्या दोराचे वजनच पंचेचाळीस किलो इतके होते. त्यांना तोफ वर नेताना गडाचे काहीही नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.
गाडगीळ यांच्या कर्नाळ्याच्या पायथ्याशी हॉटेलांची अतिक्रमणे वाढत आहेत हे लक्षात आल्यावर, त्यांनी सरकार व मीडिया यांच्या ती गोष्ट ध्यानात यावी म्हणून कर्नाळ्याचा सुळका एका दिवसात एकावन्न वेळा सर केला होता. अर्थातच, खालची दोन हॉटेले काही काळानंतर बंद झाली. गाडगीळ यांच्या नावावर बाण सुळक्यावर आठ तासांत चढाई करण्याचा विक्रमही आहे. एखादा जातिवंत दुर्गप्रेमी त्यापेक्षा वेगळा काय असू शकतो !
अजयची पत्नी सरिता व मुलगी आदिती असे त्यांचे कुटुंब आहे. सरिता यांनी त्यांना प्रपंचात खंबीर साथ दिली आहे आणि त्यामुळे अजय त्यांचा छंद उत्तम पद्धतीने जोपासू शकतात.
अजय गाडगीळ 919321165211gadgil.panvel@gmail.com
– प्रल्हाद जाधव 9920077626 pralhadjadhav.one@gmail.com
—————————————————————————————————————————————