Home उद्योग हॉटेल ‘करी लिव्हज’ची गोष्ट ( Story of Hotel Curry Lives)

हॉटेल ‘करी लिव्हज’ची गोष्ट ( Story of Hotel Curry Lives)

‘अंडा रोल’, ‘चिकन रोल’ यांच्या हातगाड्या नासिक शहरात ठिकठिकाणी उभ्या असतात. तशी पहिली गाडी सोळा वर्षांपूर्वी कॉलेज रोडला सुरू झाली. हातगाडीवर ‘अंडा रोल’ विकण्यास सुरुवात करणाऱ्या तरुणाचे नाव आहे विक्रम छबुराव उगले. त्याने त्या रोलला नाव दिले ‘विकीज रोल’. तो त्याच्या रंजन सरकार नावाच्या मित्रासोबत विशाखापट्टणला गेला होता. तेथे त्याने तशा गाड्या पाहिल्या. त्याने तेथील चार दिवसांच्या मुक्कामात त्या पदार्थाची रेसिपी समजून घेतली. त्याने नासिकमध्ये येऊन तो उद्योग सुरू केला. नासिककरांनी त्या नव्या मेनूचे स्वागत करण्यास लाईन लावली!  

विक्रम उगले याचा जन्म निफाड तालुक्यातील चापड गावात शेतात खळ्यावर झाला आहे! विक्रम तशा नर्सिंग होमशिवाय जन्मलेल्या समाजातील मुलांचा प्रतिनिधी आहे. चापड हे विक्रमचे मामाचे गाव (आजोळ). त्याचे मूळ गाव मांजरगाव. ती दोन्ही गावे एकमेकांना लागून आहेत. चापड आणि मांजरगाव ज्या निफाड तालुक्यात आहे तेथे ओल्या दुष्काळाचे संकट जास्त असते. कारण ती गावे गंगा नदीच्या किनाऱ्यावर आहेत. सततच्या पुरामुळे तेथील जनजीवन नित्य विस्कळीत होत असते. तशा गरिबीच्या परिस्थितीत विक्रम उगले याच्या वडिलांनी मांजरगाव सोडले आणि ते नासिक शहरामध्ये आले. सोबत पोरांचे लेंढार होते. त्यांनी स्वतःच्या दोन पोरांसह भावाबहिणींची मुलेही शिकण्यास सोबत आणली होती. त्यांनी दहा बाय दहाच्या पत्र्याच्या खोलीत संसार मांडला. त्यांनी वॉचमनची नोकरी केली.

विक्रमची आजी सखुबाई भिमाजी उगले आणि आई कमल छबुराव उगले. त्या सासू-सुना मेस चालवत. त्यांच्यात उद्योजकीय कौशल्य होते. त्या जेवणाचे डबे पुरवत. उन्हाळ्यात कुरडई-पापडसुद्धा बनवून देत. त्यांनी ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’च्या मेसमध्ये जेवण पुरवले. त्यासोबत त्या धुणी-भांडी, झाडू-फरशी अशी कामेही करत. त्या अन्नपूर्णेचा वारसा विक्रमकडे आला. विक्रम नगरपालिकेच्या शाळेत, नवरचना विद्यालयात परीक्षेत पास होत राहिला. तो शालेय वयातील एक सवय सांगतो- तो शाळेत जाताना एका दगडाच्या तुकड्याची ठिकरी करून शाळेपर्यंत नेत असे. त्यात कधी चूक होत नसे. एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा सतत करण्याची सवय त्याच्या अंगात बालवयात भिनली. दहावी झाल्यावर, त्याने एच पी टी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या वेळी त्याची ‘कमावा व शिका’ योजना चालू होती. त्याने एका डॉक्टरकडे क्लिनिक बॉयचे काम केले. त्याने महात्मा गांधी रोडवर वडापावची गाडी सुरू केली. पुढे, तो ‘साहेबा हॉटेल’मध्ये काम करू लागला. दिवसा काही वेळ कॉलेज आणि अन्य वेळात त्याचा जगण्याचा संघर्ष सुरू असे. तो ‘साहेबा’, ‘चंद्रलोक’ अशा हॉटेलांत काम करता करता दिंडोरी रोडवरील ‘स्काय पार्क’ हॉटेलचे बार काऊण्टर सांभाळू लागला. बारचे काऊण्टर बंद होण्याला मध्यरात्रीचे एक-दोन वाजून जायचे. विक्रम तेथेच आडवा होई. विक्रमने औषधांची डिलिव्हरी करण्याचे काम केले, वाहनाचे स्पेअर पार्टच्या दुकानात काम केले. विक्रम याने विशाल या त्याच्या भावासह पेस्ट कंट्रोल क्षेत्रातही नशीब अजमावून पाहिले.

विक्रमला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्याच्यात जिद्द होती, प्रामाणिकपणा होता. तो सतत धडपड करत राहिला. तो म्हणाला, “स्वतःचे भांडवल नव्हते. जागा भाड्याने घेत होतो. धंदा वाढला, की मालक भाडे वाढवून घेई. कधी कधी जाचक अटी लादत. ‘अंडा रोल’ची मागणी वाढल्यावर मालकाने अट घातली – अंड्याचे पदार्थ विकायचे नाहीत! एकदा तर माझेच पदार्थ विकणाऱ्याने मालकाला भाडे अव्वाच्या सव्वा वाढवून दिले, माझ्याशी स्पर्धा सुरू केली आणि माझा व्यवसाय बंद पाडला.” त्या संघर्षात विक्रमचे महाविद्यालयीन शिक्षण अपुरे राहिले. मात्र शिक्षण त्याला अनुभवाच्या शाळेत मिळाले.

vikij_rollडॉ. सुधीर संकलेचा हे विक्रमची धडपड पाहत होते. त्यांनी त्यांची कॉलेज रोडवरची जागा त्याला व्यवसायासाठी उपलब्ध करून दिली आणि विक्रमचे हेलकावे खाणारे जहाज धक्क्याला स्थिरावले. ते वर्ष होते 2008. तेथे त्याचे ‘पंचम’ नावाचे हॉटेल सुरू झाले. ते नावारूपाला येत असतानाच, त्याचे  ‘करी लिव्हज’ या साखळी मालिकेतील पहिले हॉटेल गंगापूर रोडला जेहान सर्कलजवळ उभे राहिले. त्यासाठी त्याने एक पक्के डिझाइन विकसित केले. रिकाम्या जागेवर सुरुवातीला लाकडी बल्ल्या (बांबू), चटया ठोकून शेड उभारायची. ती शेड उभी करताना सौंदर्यदृष्टी ठेवायची. जागा ग्राहकाला प्रशस्त वाटली पाहिजे आणि सेवा तत्पर असावी. शिवाय, हॉटेल व्यवसायात सुरूचीला महत्त्व, त्याकडे विक्रमचे लक्ष असते. आमच्या गप्पांत तो म्हणाला, “मी माझ्याकडील बडीशेप खाणाऱ्या ग्राहकाच्या चेहऱ्यावर हास्य असले पाहिजे याकडे लक्ष देतो.” विक्रम उगले याने ‘करी लिव्हज’ असे विचित्र नाव का ठेवले असेल? उत्तमराव शिंदे हे उद्योजक मित्र म्हणाले,  ‘करी लिव्हज’ म्हणजे कढीपत्ता. विक्रम उगले याने योजलेले ब्रँडनेम कसे अन्वर्थक आहे हे लक्षात येते. 

विक्रमने हॉटेलसाठी मोठी गुंतवणूक करावी लागते; मोठे बांधकाम, गाळा असावा लागतो या कल्पना मोडीत काढल्या. तो म्हणतो, “हॉटेल व्यवसाय जुन्या पडक्या जागेत, गाळ्यात, रिकाम्या ठिकाणी सुरू करता येऊ शकतो.” त्याने ‘करी लिव्हज’चे पेटंट घेतले आहे आणि साखळी हॉटेलची उभारणी चालू आहे. नासकात ‘करी लिव्हज’ हॉटेलात खाणे हा स्टेटस सिंबॉल झाला आहे. ‘करी लिव्हज’ची शाखा Crust- Bistro या नावाने सिंगापुरात सुरू झाली आहे. ‘अंडा रोल’च्या ‘विकीज रोल’ या हातगाडीचा विस्तार ‘रोड साईड रॅप’ या हॉटेलमध्ये झाला आहे. पुणे, नासिक येथील महामार्गावर ‘करी लिव्हज’ हॉटेलच्या शाखा दिसू लागल्या आहेत.

विक्रम त्याच्या यशाचे श्रेय आईला देतो. त्याने आईला तिच्या वाढदिवशी कार भेट दिली. घरात समृद्धीचा सुगंध दरवळत आहे. त्यापाठीमागे इच्छाशक्ती आणि जागेपणी पाहिलेली स्वप्ने, त्या स्वप्नांचा पाठलाग, त्यासाठी दिवसरात्र केलेले श्रम आहेत. विक्रमने त्याच्या जादुई यशाचे सूत्र सांगितले; ते म्हणजे व्यवसायाची निवड, कामात सातत्य, त्यातून येणाऱ्या धनाची गुंतवणूक, पुन्हा काम, सातत्य, नाविन्यपूर्ण कल्पनांचा पाठलाग. त्यातून नवनिर्माण. विक्रम नाविन्यपूर्ण कल्पनांच्या शोधात असतो. त्याचे प्रयत्न ग्राहकाला काही नवीन द्यावे असे असतात.

हे ही लेख वाचा – 
शरद तांदळे – वंजारवाडी ते लंडन, व्हाया पुणे (Sharad Tandle – Vanjarwadi to London via Pune)
डीएसके विश्वाची पडझड: ग्लोबल सेतूचा दिलासा

नासिक ‘मिसळ हब’ झाले आहे. विविध प्रकारच्या शंभराहून अधिक मिसळ नासिकमध्ये मिळतात. तेथील चुलीवरची मिसळ प्रसिद्ध आहे. तेथे सकाळी सकाळी हॉटेलमध्ये, रस्त्यावरील गाड्यांवर मिळणाऱ्या मिसळवर ताव मारणारे सापडतात. कालची पंचवीस-तीस रुपयांची मिसळ आज सत्तर-ऐंशी रुपयांपर्यंत पोचली आहे. त्यावर एक्स्ट्रा पाव, स्वीट डिश, चहा कॉफी मागवली, की शंभराची नोट खर्च होते. हॉटेल करी लिव्हजमध्ये ब्रेकफास्टमध्ये मिसळपाव तर असतोच, त्याचबरोबर इडली-सांबार, वडा-सांबार, उपमा, पकोडे, जिलेबी असे वेगवेगळे पदार्थही पदार्थ असतात. विक्रम त्याच्या हॉटेलात कॅश काऊण्टरवर सापडत नाही. तो ग्राहकांचा फीडबॅक सतत घेत असतो. त्यातून त्याला ग्राहकाची डिमांड लक्षात येते. त्याने ‘करी लिव्हज’नंतर ग्राहकांची डिमांड पाहून ‘राजभोग’ या नावाने थाळी सुरू केली. त्याच्या ‘वेदिका केटरिंग’चा शुभारंभ झाला आहे. त्याचा संकल्प रिसॉर्ट उभारण्यासाठी आहे. त्याचे संकल्पचित्रही तयार आहे. 

नासिक सायक्लिस्टची उभारणी झाली, त्यात विक्रमचा भाऊ विशाल उगले आघाडीवर होता. विक्रमनेही ते वेड उचलले आहे. त्याने मनाली, लेह हे समुद्रसपाटीपासून अठरा हजार फूट उंचावर असलेल्या ठिकाणी सहाशे किलोमीटर अंतर सायकल चालवली आहे. तो हॉटेलचा मोठा व्याप सांभाळून सकाळी ग्राऊंडवर असतो. शारीरिक, मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणारी माणसे यशाला भिडतात असेच जणू तो म्हणतो. विक्रम युथ आयकॉन झाला आहे. तो यशस्वी जीवनाचा मंत्र सांगण्यासाठी आता शाळा-कॉलेजच्या मंचावर जात आहे. त्या प्रवासात त्याला अनेक मित्र मिळाले. उज्वल निकम यांच्यासारखे विधिज्ञ नासिकमध्ये आल्यावर विक्रमबरोबर बसतात.

विक्रम आठशे लोकांचे (कर्मचाऱ्यांचे) पालकत्व करतो. त्याचा मुलगा ‘मीत’ वयाच्या तेराव्या वर्षी स्वतंत्र हॉटेल सुरू करण्याची स्वप्ने पाहत आहे. विकम त्यासाठी मीत आठ वर्षांचा असल्यापासून त्याचे किचनमध्ये ट्रेनिंग घेत असतो.

विक्रम उगले – 7722015994
hotelcurryleavesnsk@gmail.com

– शंकर बोऱ्हाडे 9226573791
shankarborhade@gmail.com

About Post Author

Previous articleशिदोबाचे नायगाव (Naigaon of Shidoba)
Next articleविष्णूचे उपासक – वैष्णव संप्रदाय (Vishnu Worshiper – Vaishnava sect)
शंकर बो-हाडे हे पिंपळगाव, नाशिक येथील 'कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालया'त मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गावात 'साहित्य रसास्वाद' हे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे 'राष्ट्र सेवा दला'चे सैनिक. बो-हाडे नामांतर चळवळीत सत्याग्रह करून शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून जेलमध्ये गेले. ते परिवर्तनवादी, दलित चळवळ व साहित्य याचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार 'जागृति'कार पाळेकर यांच्या साहित्याच्या संशोधनानिमित्ताने मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास केला. ते गेली तीन दशके नाशिकच्या वृत्तपत्रातून लेखन करतात. त्यांनी लिहिलेला, 'ठाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षीय भाषणाची चिकित्सा करणारा लेख विशेष गाजला होता. त्यांची चार स्वतंत्र व दोन संपादित पुस्तके प्रसिध्द आहेत. त्यांची कार्यकर्ता लेखक अशी ओळख आहे. लेखकाचा दूरध्वनी 9226573791

1 COMMENT

  1. विक्रम जी खरंच तुमच्या…
    विक्रम जी खरंच तुमच्या जिद्दीला तोड नाही.. ग्रेट भेट विक्रमजी…

Comments are closed.

Exit mobile version