आमच्या निफाडच्या अकोलखास गल्लीतील मारुती मंदिर माझ्या मनात गच्च रुतून बसलेले आहे. ते मंदिर म्हणजे गल्लीच्या मधोमध दुमजली माडी असलेली पवित्र वास्तू. दगडी जोत्यांवर आणि लाकडी खांबांवर वीटबांधकाम केलेली. मला ते मंदिर चांगले मोठे वाटायचे. मारुती मंदिरात दर्शनासाठी वगैरे भल्या पहाटेपासून लगबग सुरू होई. मंदिर तसे चोवीस तास उघडेच असे. आम्हा मुलांच्या शाळा-कॉलेजच्या परीक्षा असल्या की मुलांचे मंदिरात येणे हे व्हायचेच. “देवा, मला पास कर, चांगले मार्क्स मिळू देत” म्हणून मनोभावे पाया पडणारी मुले हमखास दिसत असत किंवा कोणाशी छोटेमोठे भांडणतंडण झाले किंवा एखादी खुन्नस झाली तर, आम्ही ‘जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली !’ असे काही तरी द्वाडपणे म्हणायचो. आम्ही मारुतीदेवावर कोठलाही भार टाकून निर्धास्त होत असू...