दिलासा – रुग्णांच्या चेहऱ्यावरील हसू (Smiles on the faces of patients at Dilasa)

व्याधिग्रस्त वृद्ध लोकांना सांभाळणे, त्यांचे औषधपाणी करणे, त्यांना त्यांचा शारीरिक त्रास, वेदना कमी होण्यासाठी मदत करणे, विकलांग, मतिमंद मुलांना आयुष्य चांगले जगण्याकरता मदत करणे अशी कामे करणारी ‘दिलासा’ ही नाशिकमधील अठरा वर्षे जुनी संस्था आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले सतीश जगताप आणि राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उज्ज्वला जगताप या दाम्पत्याने नेहमीच्या वाटा बदलून स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण केली.

‘दिलासा’मध्ये आलेल्या आजारग्रस्त लोकांच्या शारीरिक आरोग्याबरोबर मन प्रसन्न राहण्यासाठी तेथे विविधांगी विचार केला जातो, त्याप्रमाणे कृतीही केली जाते. ती दोघे पती-पत्नी नवीन आव्हानांची वाट बघत दररोजचा दिवस अंगावर घेऊन, तेथील सगळ्यांचा तो दिवस चांगला जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात.

काम करणाऱ्या, त्यातील आव्हाने-अडचणी अनुभवलेल्या व्यक्तींच्या बोलण्यात असलेला आत्मविश्वास आणि निर्धार मला उज्ज्वला जगताप यांच्याशी बोलताना जाणवला. त्यामुळे आपलेपणा निर्माण झाला. त्यांच्या संस्थेत मिळणाऱ्या ‘दिलाशा’बद्दल जाणून घेऊया. ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ या सदरातील लेख वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करावे.

अपर्णा महाजन

———————————————————————————————-

नाशिकचा दिलासा – रुग्णांच्या चेहऱ्यावरील हसू

नलिनी आजींविषयी बोलण्याआधी ‘दिलासा’विषयी समजून घ्यावे लागेल. ‘दिलासा’चा जन्म कोणत्या विचारातून झाला, हे समजून घ्यावे लागेल. हे जग खूप सुंदर आहे, चांगल्या लोकांनी सजलेले. येथे प्रत्येकाला सुखी व्हायचे आहे. मात्र, त्याच प्रत्येकाला ते सुख मिळवण्याच्या शर्यतीत इतर कोणी दुःखी होत नाही ना, याचा विचार करण्यासाठीही वेळ नाही. माणसाची शर्यत घड्याळाशी सुरू आहे, त्यामुळे दोन चाकांचा संसारगाडा सुरळीत चालवण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य उंबरठ्याबाहेर पडला आहे. लहान बाळाला गरजेनुसार पाळणाघरात ठेवले जाते, पण उतारवयाकडे वाटचाल करणारे माता-पिता, आप्तेष्ट यांचे काय? त्यांचे जेवण, औषध, कपडे, त्यांच्या इच्छा हे सर्व प्रश्न घराबाहेर पडलेल्यांच्या काळजाला अखंड टोचत असतात. संसाराची आर्थिक घडी बसवण्याच्या खटाटोपात औषधाची साधी गोळीही महाग वाटू लागते आणि सुरू होते, त्यांच्या आयुष्यातील उत्तरार्धाची फरफट…

या उत्तरायुष्याच्या वेदनांची चर्चा होतेही; पण कृतीच्या समयी माणसांचे हात अडखळतात… मात्र, समाजातील एका तरुणाने ती वेदना हृदयाने टिपली. त्याने ती परिस्थिती कोठेतरी बदलण्यास हवी, हे जाणले. मग हा बदल स्वतःपासूनच का करू नये…? त्याने कॉम्प्युटर इंजिनीयरिंगमधील लाख रुपये पगाराच्या नोकरीवर पाणी सोडले आणि जन्म झाला, ‘एकाकी, वृद्ध, व्याधिग्रस्तांना फुलासारखे जपणाऱ्या ‘दिलासा’चा.’

‘दिलासा’ ही संस्था गेल्या अठरा वर्षांपासून नाशिक शहरात अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना सांभाळण्याचे कार्य करत आहे. बेडसोर्स, कोमा, फ्रॅक्चर, पॅरालेसिस, विविध मानसिक आजार, मतिमंद, गतिमंद… अशा सर्व प्रकारच्या रुग्णांना ‘दिलासा’ सांभाळते. तेथे रुग्णांच्या सर्व सुविधांचा विचार केला जातो- त्यांना राहण्यास हवेशीर-प्रसन्न खोल्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारव्यवस्था, डॉक्टरांची रोज फेरी, काळजी घेणारे केअर-टेकर्स, नर्सिंग स्टाफ, गरजेनुसार तज्ज्ञ-डॉक्टर, वेळेवर औषधोपचार आणि इतरही वैद्यकीय सुविधांची सोय इत्यादी.

तेथे फक्त रुग्णांच्या शारीरिक स्वास्थ्याचीच काळजी घेतली जात नाही, तर त्यांचे मानसिक आरोग्यही उत्तम राहण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. जसे, सर्व सणवार साजरे केले जातात, सर्वांचे वाढदिवसही उत्साहात होतात, विविध प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम आणि खेळ घेतले जातात. फक्त बाहेरील कलाकार तेथे येऊन त्यांची कला सादर करत नाहीत, तर ‘दिलासा’तील कलाकारांनाही त्यांच्या कलेचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्याचा उद्देश एवढाच असतो, की तेथील आजारी लोकांची जगण्याची ऊर्मी कायम राहवी, सतत एक चेतना तेवत राहवी. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य कोमेजू नये, यासाठी अट्टहास असतो.

असाच एक प्रयत्न होता, ‘नलिनी नाईक आजींचे चित्रप्रदर्शन !’ नलिनी आजी 2021 मध्ये ‘दिलासा’त दाखल झाल्या. आजींची उजवी बाजू पॅरालेसिस झाल्याने काम करत नव्हती, त्यांना स्वतःच्या हाताने जेवता येत नव्हते. त्यामुळे त्या अबोल झाल्या होत्या, त्या कामाव्यतिरिक्त कोणाशी बोलण्यास उत्सुक नसत, शांत-शांत असत. स्वयंसेवक त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न करत असत, परंतु त्या फारसा प्रतिसाद देत नव्हत्या.

एक दिवस अचानक नाशिकचे प्रसिद्ध शिल्पकार प्रसन्न तांबट ‘दिलासा’ला भेट देण्यास आले होते, तेव्हा त्यांच्याशी बोलताना नलिनी आजींनी सांगितले, की त्यांनी जे.जे. स्कूल (मुंबई) येथून ‘जीडी फाईनआर्ट’चे शिक्षण घेतले आहे. त्यांनी ‘कलाशिक्षिका’ म्हणून त्यांची सेवा चाळीस वर्षे इतकी झाली आहे. त्यांनी विविध शाळांना आणि महाविद्यालयांना भेट दिली आहे. मुंबई महानगरपालिकेने त्या कामासाठी त्यांचा सत्कारही केला आहे. त्या फक्त पेंटिंग्ज नाही, तर रांगोळी, विणकाम, भरतकाम, भजने, पाककला अशा नानाविध कलांमध्ये पारंगत होत्या. त्यांचा ओढा हा संन्यस्त जीवनाकडे होता, म्हणून त्या अविवाहित राहिल्या. त्यांनी त्यांच्या आई-वडिलांसोबत इतरही नातलगांची सेवा केली; तसेच, मुंबई व नाशिक येथे ‘बालसंस्कार वर्ग’ही चालवले. ती सर्व माहिती आम्हाला त्यांच्या नातलगांकडून मिळाली.

मग ‘दिलासा’तील सर्वांनी आजींना बोलते करण्याचे ठरवले. त्यासाठी नाशिकमधील आर्ट थेरपिस्ट सोनाली जोशी यांनी पेंटिंग्जचे सर्व सामान आणून दिले. त्यांची मानसिकता तयार केली आणि आजींनी वीस वर्षांनंतर ब्रश हातात घेतला ! आजींची चित्रे जसजशी आकार घेऊ लागली, तसतशी थक्क होण्याची वेळ आमच्यावर येत होती. आजींचा उत्साहही प्रत्येक चित्राबरोबर वाढत होता. मग कमर्शिअल आर्टिस्ट मनोज भावसार यांच्या संकल्पनेतून आजींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याचे ठरले. आजींची तीस व इतर कलाकारांची पन्नास अशा जवळपास ऐंशी चित्रांचे प्रदर्शन ‘दिलासा’त दोन दिवसांकरता भरले. सोनाली जोशी यांची मंडला आर्ट थेरपीवरील कार्यशाळा त्यात एक दिवस होती. त्यात ‘दिलासा’तील बावीस ते पंचवीस आजी-आजोबांनी सहभाग नोंदला. रुग्ण अंकित शर्मा यांनी एक छानसे चित्र सर्वांसमोर काढून दाखवले !

त्या प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘दिलासा’त कलाकारांची मांदियाळी जमा झाली होती, नाशिकमधील बरेच कलाकार आजींना भेटण्यास म्हणून आले. सातशे ते आठशे लोक प्रदर्शन बघण्यास येऊन गेले. प्रदर्शनाच्या त्या दोन दिवसांत ‘दिलासा’त सतत लगबग सुरू होती, प्रदर्शनाला महोत्सवाचे स्वरूप आले होते. विविध संस्थांनी आजींचा सत्कार केला. आजी सेलेब्रिटी बनल्या. आजी अर्धा तास खुर्चीत बसण्यास कंटाळा करत, त्या खाली येऊन दिवसभर येणाऱ्या सर्वांना भेटण्यास, प्रत्येकाशी बोलण्यास उत्सुक झाल्या. ते दोन दिवस त्या अगदी भरभरून बोलत होत्या, दिलखुलास हसत होत्या. त्यांच्या भाचरांनी येऊन सांगितले, “आज खूप वर्षांनंतर आम्हाला आमची नलुमावशी परत मिळाली, उत्साहाने भरलेली अशी मनमोकळी हसणारी, मिश्कील अशी.” त्या एका वाक्याने आम्ही ‘दिलासा’वासी भरून पावलो ! आजींनी त्यांच्या कलेचा वसा पुन्हा जोपासण्याचे ठरवले आहे.

‘दिलासा’ फक्त कलागुणांना वाव देत नाही, तर एखाद्याच्या हाताला काम मिळावे म्हणूनही प्रयत्न करते. ‘दिलासा’त शासकीय रुग्णालयातून सतरा-अठरा वर्षांचा, तारुण्यात नुकतेच पदार्पण करत असलेला एक तरुण ‘अज्ञात इसम’ म्हणून 2010 साली दाखल झाला. तो कोण, कोठला, त्याचे नाव-गाव… कशाचीच माहिती नव्हती. तो रेल्वेमधून फेकला गेला आणि समोरून येणारी दुसरी रेल्वे त्याच्या पायावरून गेल्याने त्याला त्याचे दोन्ही पाय गमावावे लागले. त्याला वाचा नव्हती आणि तो ऐकूही शकत नव्हता. त्याने त्याच्या लाघवी स्वभावाने सर्वांची मने जिंकून घेतली व त्याचे नामकरण होऊन तो सर्वांचा लाडका ‘बापू’ बनला.

बापू छोट्या-छोट्या कामांत रस दाखवू लागला. त्याचा उत्साह बघून त्याला दाढी करण्यास व केस कापण्यास शिकवले. तो सर्व पुरुष-रुग्णांचे दाढी व केस कापण्याचे; तसेच, नखे कापण्याचे काम आवडीने करू लागला. त्याला आवड छोट्या-छोट्या कलाकुसरीच्या कामांचीही आहे. तसेच, तो स्वयंपाकघरातही चिरणे-सोलणे अशा प्रकारची मदत करत असतो. ‘दिलासा’त घडणाऱ्या सर्व बारीकसारीक घटनांची त्याला माहिती असते. बापू म्हणजे ‘दिलासा’चा सीसीटीव्ही आहे. गमतीत आम्ही त्याला ‘शान’ पिक्चरमधील अब्दुल्ल म्हणतो, ‘आते-जाते हुए मै सबपे नजर रखता हूँ, नाम अब्दुल्ल है मेरा, सबकी खबर रखता हूँ.’ तर असा हा बापू ‘दिलासा’च्या सदस्यांचाच नाही, तर तेथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

‘दिलासा’त जसे नातेवाइकांच्या असमर्थतेमुळे रुग्ण सांभाळले जातात, तसेच बापूसारखेही काही रुग्ण आहेत. त्यांना कोणीच नाही, ते पूर्ण निराधार आहेत. ‘दिलासा’ला त्यांच्या कामामुळे आतापर्यंत काही पुरस्कार मिळाले आहेत, वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनीही ‘दिलासा’च्या कामाची दखलही घेतली आहे, अनेक लोक ‘दिलासा’ला जोडले गेले आहेत. तरीही ‘दिलासा’ला मिळणारा मोठा सन्मान म्हणजे, ‘दिलासा’तील रुग्णांच्या चेहऱ्यावरील हास्य !

उज्ज्वला जगताप 9422704934 ujjwalajagtap158@gmail.com

———————————————————————————————-

About Post Author

11 COMMENTS

 1. दिलासाची माहिती वाचून खरच दिलासा मिळाला. उज्ज्वला व सतीश यांचे खूप कौतुक वाटते. खरोखरच स्वतःपासून सुरुवात करणे किती महत्वाचे आहे! अपर्णा, तुझ्यामुळे ही जगावेगळी माणसे कळत राहतात. तुझे synopsis चांगले असते. इतक्या कमी शब्दात इतक्या उद्यमशील व्यक्तींची करून देणे हे कौशल्याचे काम आहे. उपक्रम फार चांगला आहे. दिलासा व तुझ्या उपक्रमास शुभेच्छा!
  नीलिमा म्हैसूर.

 2. इतक्या आपलेपणाने कामाची, लेखाची दखल घेतली यामुळे मनापासून छान वाटलं.

 3. जगताप दांपत्याला कितीतरी लोकांचे आशीर्वाद मिळत आहेत. थोडक्यात पण महत्वाची माहिती दिली आहे. आगळ्यावेगळ्या माणसांची माहिती करून देणारा हा वेगळाच उपक्रम आहे. खूप खूप शुभेच्छा.

 4. Ujwala ani Satish yanchi Dilasa Sanstha Shikshan ani samajik bandhilkichi sangad kashi ghalta yete yache uttam udaharan ahe. Vizlelya akanshyana punah ujalawanyache kam prashansaneey ahe. Tyanchya karsevela manapasoon shubhechya.

 5. अतिशय मोठं काम आहे हे. संवेदनशील असणं , इतरांची वेदना , समस्या समजून घेणं हा एक भाग असतो. पण त्यावर आपल्या हिंमतीने तोडगा काढणं आणि नेटाने ते काम सुरु ठेवणं हे खूप ग्रेट आहे. नाशिकमध्ये असले असते तर या संस्थेशी जोडून घ्यायला आवडलं असतं. तरीही इथून नागपूरहून काही करता आलं तर आवडेल.
  धन्यवाद अपर्णा ! ‘जगाकडे बघताना आपण काय फोकस करतोय ते महत्वाचं ‘ हे पटवून देणारा आजचा लेख आहे.

 6. जगताप दांपत्याचं मनापासून कौतुक.
  आजींच्या चित्रांच प्रदर्शन भरवण्याची कल्पना भन्नाट!
  कितीतरी लोकांना प्रेरणा देणा-या या कामाला खूप खूप शुभेच्छा👍👍

 7. खूप चांगला उपक्रम.अनेक चांगल्या कामांची ,माणसांची माहिती होते .
  सद्भावना जागृत आहे ह्याचा खरोख़रच दिलासा वाटतो . यथामती यथाशक्ती काहीतरी काम करत रहावे अशी प्रेरणा मिळते . अभिनंदन आणि शुभेच्छा .

 8. उज्वला व सतीश जगताप यांना शुभेच्छा आणि आभार 🙏🏻चाकोरीबाहेर पडून काहीतरी वेगळं कार्य करावं वाटणं आणि ते नेटाने करताना प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी, छंद जोपासणं, जगण्याची उमेद वाढवणं कठीण काम आहे. नावाप्रमाणे खरंच इथे प्रत्येकाला नक्कीच दिलासा मिळत असेल.
  अपर्णा महाजन यांनी मोजक्या शब्दात दिलासाविषयी छान माहिती लिहिली आहे.

 9. ‘दिलासा’ बद्दल वाचून खूपच छान वाटलं. खरंच, जगताप दांपत्याला त्रिवार नमन. आपले सुखी जीवन सोडून एका वेगळ्या वाटेवर जाणे आणि त्या वाटेवर चालताना कितीही कष्ट असले तरी सतत चालत राहून आपलं ध्येय पूर्ण करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यांच्या या वेगळ्या वाटेमुळे कितीतरी जणांना दिलासा मिळाला . त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं, ते समाधानांनी आणि स्वाभिमानाने जगायला लागले याचे सर्व श्रेय या दांपत्यालाच आहे. या आपल्या उपक्रमाला अनेक अनेक शुभेच्छा. !!
  आणि अपर्णाताई , “सद्भावनेचे व्यासपीठ” या उपक्रमांतर्गत तू अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा परिचय आम्हा सर्वांना करून देतेस त्यामुळे तुझ्या या उपक्रमालाही खूप खूप शुभेच्छा .आणि आम्हाला त्यात सामावून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here