Home गावगाथा सीताफळांचे वैभव – खेमजई

सीताफळांचे वैभव – खेमजई

चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील खेमजई गावामध्ये निराळाच प्रयोग राबवण्यात येत आहे. खेमजई हे गाव सीताफळांसाठी प्रसिद्ध होते. त्या गावातील सीताफळाच्या झाडाचे जे फळ असे त्याची चव लोकांना फार आवडायची. त्यामुळे गावोगावचे लोक सीताफळ खरेदीसाठी म्हणून खेमजईला येत.

खेमजईच्या परिसरातच दगड मोठ्या प्रमाणात सापडत असत. त्यामुळे बांधकामासाठी म्हणून ह्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणांत खोदाई झाली, दगड काढून नेले गेले. परिणामी पूर्वी जे सीताफळांचे ‘बन’ होते ते कमी झाले. गावातील लोकांना ह्याची खंत वाटे. पण त्यांना तो काळाचा महिमा वाटे. ‘विकास ग्रूप’च्या माध्यमातून आणि गावातील इतर सुधारणावादी लोकांनी गावासाठी पुन्हा एकदा सीताफळ ह्या पिकाच्या बाबतीत काही करण्याचा संकल्प केला आणि त्यातूनच पुन्हा एकदा सीताफळ ह्या फळाची झाडे पडिक जागेमध्ये लावण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्यासाठी ग्रामपंचायतीचा सुद्धा भरघोस पाठिंबा मिळाला.

सीताफळाची रोपे आणली गेली, रोपवाटिका निर्माण केली गेली. रोपवाटिकेचे नाव ‘संत तुकोबा रोपवाटिका’ असे ठेवले. सरकारची सुद्धा ‘मनरेगा’च्या योजनेतून मदत होत आहे. त्यामुळे गावातील पन्नास कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. गावाचे गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे म्हणून नागरिक प्रयत्न करत आहेत. तरुण मंडळी गाव पुन्हा ‘सीताफळाचे’ म्हणून प्रसिद्ध व्हावे ह्या ध्येयाने पछाडली आहेत.

योजना अशी आहे, की ग्रामपंचायतीतर्फे सीताफळाचे पीक लिलावाद्वारे गावातील कोणातरी व्यक्तीला किंवा बचत गटाला विकावे. त्यामुळे फायदा ग्रामपंचायतीला मिळेल आणि गावातील विकासाची कामे अधिक जोमाने करता येतील.

खेमजई गाव आहे दोन हजार वस्तीचे, शेतीमध्ये रमलेले. मात्र गावकरी आहेत जागृत- स्वत:च्या गावचा विकास स्वत:च केला पाहिजे ही त्यांची धारणा. त्याच विचाराने गावातून नोकरी/व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी गेलेले लोकही भारलेले आहेत. त्यांचेही लक्ष गावात काय चालले आहे याकडे असते. त्यातूनच ‘विकास ग्रूप’ची निर्मिती झाली. या ‘व्हॉट्स ॲप ग्रूप’च्या माध्यमातून गावातील रस्तेदुरुस्ती, वाचनालय, स्वच्छता अशी कामे केली जातातच, पण आता सीताफळ लागवडीचे विशेष काम हाती घेतले आहे. लोकसहभाग आणि ‘मनरेगा’सारख्या सरकारी योजना यांची सांगड त्यात घातली गेली आहे. म्हणजे रोपट्यांची निर्मिती ग्रूपच्या माध्यमातून होते, परंतु वृक्षलागवड व संवर्धन ‘मनरेगा’निधीमधून होते. त्यामुळे गावाच्या महिलांना तेथे काम मिळते.

खेमजई गावाची विभागणी वॉर्डांमध्ये झाली आहे. गावात माना समाज सर्वात जास्त (चाळीस-पन्नास टक्के) आहे. मग बौद्ध, कुणबी, भोई लोक येतात. त्याखेरीज लोहार, सुतार, वंजारी असे व्यावसायिक आहेत, पण सारे एकोप्याने राहतात. जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि आठवी ते दहावी राजीव गांधी हायस्कूल अशी शिक्षणाची सोय आहे. मुलांना पुढील शिक्षणासाठी दहा किलोमीटरवरील शेगाव(बुद्रूक) अथवा वीस किलोमीटरवरील वरोरा येथे जावे लागते.

गावाचे सामाजिक जीवन आणि ग्रामपंचायत यांची छान एकवाक्यता आहे. गाव एकदिलाने काम करतो, ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून येतात. रमेश चौधरी, विलास चौधरी, चंद्रहास मोरे आणि त्यांचे साथीदार गावात नवनव्या कल्पना राबवत असतात. प्रत्येकाचा कल वेगळा आहे. त्याप्रमाणे गोष्टी घडतात. विलास चौधरी यांचा कलामंच आहे. त्यामार्फत पथनाट्य, मनोरंजनाचे व प्रबोधनाचे कार्यक्रम सातत्याने होत असतात. गावामध्ये अभिनवता जपली जाते. राष्ट्रीय दिनी गावात मुलांच्या हस्ते झेंडावंदन केले जाते. त्यामुळे समाजकार्यात मुलांचा सहभाग वाढतो.

गावात कापूस, सोयाबिन, तांदूळ आणि गहू व हरभरा ही पिके प्राधान्याने घेतली जातात. ह्या गावाच्या बाहेर खूप मोठा मोकळा ओसाड भाग आहे; तसेच, झुडपी जंगल आहे. ह्या ठिकाणी गावकरी मंडळीनी निर्णय घेतला, की ह्या वर्षी वृक्ष संवर्धनासाठी काही करावे. गावातील मंडळी एकत्र आली. गावातील पशू वैद्यकीय डॉक्टरने पुढाकार घेतला. त्यांनी ‘सीड बॉल’ची कल्पना मांडली.

चिंच, बोरे, कवठ तसेच इतर मोठ्या झाडाच्या बिया जमा करून ठेवायच्या. त्यानंतर माती आणि शेण ह्याचे पाण्याने मिश्रण करून त्यामध्ये त्या बिया टाकायच्या व गोळे करायचे. त्यालाच ‘सीड बॉल’ असे म्हणतात. असे बी जमीनीत टाकल्याने ते बी रुजले जाते. नंतर पाऊस सुरू झाला, की सीडबॉल मोकळ्या रानात फेकून द्यायचे. त्यामुळे बी जमिनीमध्ये लवकर रुजते आणि झाड वेगाने वाढते. ही नैसर्गिक वृक्षारोपण पद्धत अवलंबण्याचा प्रयत्न गावातील लोक करत आहेत. ह्या मोहिमेमध्ये गावातील शिक्षक, विद्यार्थी, स्त्रिया, पुरुष, सर्व आनंदाने सहभागी होत आहेत. भविष्यात ह्याचा चांगला परिणाम दिसून येईल. गावाभोवती चांगली वृक्षराजी तयार होईल. एकोप्याने उभे राहिले तर गावाचा कसा कायापालट होऊ शकतो हे खेमजई गाव दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे.

किशोर पेटकर, नागपूर 8806247686 kishorpetkar73@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. विकास ग्रुपचे जाळे वाढत आहे. मुलांचा सहभाग कौतुकास्पद आहे.
    गावकरीही उत्सुर्फत भाग घेतात.. 👍🏿

  2. विकास ग्रुप ची संकल्पना गावाला नवी दिशा देणारी आहे. गावातील संपलेला लोकसहभाग विकास ग्रुपच्या माध्यमातून पूर्ववत होताना दिसत आहे. गरजा नुसार कामाला प्राधान्य देऊन विकास ग्रुपच्या माध्यमातून विकास कामे होत आहे. खेमजई तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथेही विकास कामे झालेली आहे. ॲडव्होकेट किशोरजी पेटकर व डॉक्टर संदीप भेले यांच्या मार्गदर्शनात विकास कामे चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version