Home मोगरा फुलला मेघदूत: आषाढस्य प्रथम दिवसे… (Meghdut- First day of the month of Ashadh)

मेघदूत: आषाढस्य प्रथम दिवसे… (Meghdut- First day of the month of Ashadh)

1

आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाला सुजाण भारतीयांच्या मनात एक विशेष स्थान आहे. आश्चर्य म्हणजे हे स्थान कोणत्या एखाद्या सणामुळे किंवा घटनेमुळे नाही तर एका खंडकाव्यातील ओळीमुळे आहे. कविकुलगुरू कालिदास यांच्या ‘मेघदूत’ या खंडकाव्याच्या दुसऱ्या श्लोकात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा शब्दसमूह येतो.

‘मेघदूत’ या काव्याने अनेकांना भुरळ घातली आहे. बहुतेक सर्व भारतीय भाषांमध्ये आणि इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या युरोपिय भाषांमध्ये त्याची भाषांतरे झाली आहेत. मराठीतच किमान सहा भाषांतरे उपलब्ध आहेत. यातली काही समश्लोकी, समवृत्तामध्ये असलेली आहेत. अनेक चित्रकार, नर्तक, नाटककार यांनी मेघदूतावरून स्फूर्ती घेऊन त्यांच्या त्यांच्या कलाकृतींना आकार दिला आहे.

अशा या अद्वितीय खंडकाव्याचा परिचय गीता जोशी रसिकतेने आणि मर्मग्राही दृष्टीने करून देत आहेत.

‘मोगरा फुलला’ या सदरातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

– सुनंदा भोसेकर

मेघदूतआषाढस्य प्रथम दिवसे…

कवी कालिदास ! महाकवी कालिदास ! संस्कृत साहित्यात नाटककार भास, भवभूती, कालिदास अशा सगळ्यांचा उल्लेख कवी म्हणूनच येतो. कालिदासाची ‘रघुवंश’, ‘कुमारसंभव’ ही महाकाव्ये, ‘ऋतुसंहार’, ‘मेघदूत’ ही खंडकाव्ये आणि तीन नाटके अशी सप्तरंगी साहित्यसंपदा उपलब्ध आहे. संस्कृत इतिहासात एक संदर्भ आहे, की रामायणात मारुती दूत बनून गेला, त्यावरून कालिदासाला मेघाला दूत बनवण्याची कल्पना सुचली. कालिदास एके ठिकाणी म्हणतात…’हे वदता, ती बघेल वरती आतुर उत्कंठिता/ अशोकवनिकेमधे जानकी जशी अंजनीसुता…’ (कुसुमाग्रज-38)

मेघदूत हे पहिले दूतकाव्य. नंतर अनेक दूतकाव्ये आली. पण मेघदूताइतकी रसिकांची दाद दुसऱ्या कुठल्याच काव्याला मिळाली नाही. कुबेराचा सेवक असणाऱ्या यक्षाने त्याच्या कामात कुचराई केल्यामुळे त्याला शाप मिळाला आणि त्याला यक्षनगरी अलकेतून थेट रामगिरी पर्वतावर वर्षभरासाठी येऊन राहवे लागले. त्यावेळी प्रियेच्या विरहाने व्याकूळ झालेल्या यक्षाला ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ आकाशात मेघाचे दर्शन घडले आणि मेघालाच दूत बनवून प्रियेचे क्षेमकुशल विचारण्यास पाठवावे ही एकूण कथाकल्पना त्याला सुचली ! ही अलकानगरी म्हणजे कविकल्पना. कालिदास वाचकाला वेगळ्याच तरल, काव्यमय विश्वात घेऊन जातो.

‘गिरीवरी त्या महिने काही, कंठित राही तो विरही जन
सखिविरहे कृश असा जाहला, गळे करांतुनि सुवर्णकंकण
आषाढाच्या पहिल्या दिवशी, बघतो शिखरी मेघ वाकला
टक्कर देण्या तटभिंतीवर, क्रीडातुर गज जणू ठाकला!’  (शांता शेळके – 2)

‘मेघदूत’ हे महाकवी कालिदासाने मंदाक्रांता वृत्तात लिहिलेले विरहगीत आहे. मंद+अक्रांता- हळुवार व्यथा. विप्रलंभ म्हणजे विरह. विप्रलंभ शृंगारकाव्य. एकूण 120 श्लोकांच्या या खंडकाव्यात पूर्वमेघ 65 श्लोकांचा आहे. पूर्वमेघ म्हणजे म्हणजे पहिला भाग आणि उत्तरमेघ हा दुसरा. यक्षाला वर्षभर काळ ज्या ठिकाणी कंठायचा होता तो रामटेकपर्वत, म्हणजे नागपूरच्या पूर्वेकडील पेंच अभयारण्याच्या जवळचा भाग अशी ओळख पटवली जाते. तिथे कालिदासाचे स्मारक व कालिदास विद्यापीठ स्थापण्यात आले आहे.

यक्ष कैलासावर राहणाऱ्या त्याच्या प्रियेच्या आठवणीने सैरभैर झाला. विरहार्त प्रियेकडे निरोप पोचवावा यासाठी मेघाला मार्ग दाखवणारे पहिले पासष्ट श्लोक म्हणजे हा पूर्वमेघ, मेघदूताचा पहिला भाग. हा पूर्वमेघ म्हणजे जणू ‘गुगल मॅप’च. पण हा ‘मॅप’ म्हणजे ‘कालिदास देही आणि कालिदास डोळा’! कालिदासाच्या डोळ्यांना जे जे दिसले, जसे दिसले त्याचे वर्णन करत कालिदास मेघाला कसे जायचे, वाटेत तुला काय काय दिसेल, कुठे विश्रांती घे, असे सारे सारे सांगत आहे. कल्पनाविलास, सूक्ष्म निरीक्षण, वर्णन करताना येणारी अलंकारिक भाषा आणि यक्षाची विरहभावना… हे सर्व वाचताना त्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ कालिदासाला भेटलेल्या मेघाचा हेवा वाटू लागतो. संवेदना, भावना, कल्पना आणि भाषा यांचे मनाच्या मुशीत जे रसायन बनते त्यातून निर्माण होणारा दागिना म्हणजे कालिदासाचे ‘मेघदूत’ हे खंडकाव्य.

निर् + ईक्ष म्हणजे बारकाईने पाहणे. पण कलावंतांचे पाहणे हे केवळ निरीक्षण नसते. ते अबोध जाणिवेच्या पातळीवर संवेदनांनी अनुभवणे असते. एकदा ते बघितले की अनेक भावतरंगांना जागवीतच ते दृश्य आत शिरते. मग ते दर्शन एक अनुभव बनून अंतरात जागत राहते. पुढे केव्हाही मग नुसते डोळे मिटले की चित्रपट चालू होतो. गात्रांनी, पंचेंद्रियांनी पाहणे.. अनुभूत होणे असते. ते पाहवे लागत नाही. ते इंद्रियगोचर होते- पंचेंद्रियांनाच दिसते. तिथे गोंदण होऊन असते. फक्त इतक्या तीक्ष्ण नजरेने असा सौंदर्यानुभव घेता आला पाहिजे. तीच कलावंतांना मिळालेली दैवी देणगी असते, सनद असते. केशवसुत म्हणतात तसे ‘व्यर्थातुन त्या अर्थ दिसे/तो त्यास दिसे ज्या म्हणती पिसे/त्या अर्थाचे बोल कसे?/झपुर्झा गडे झपुर्झा’ …हिमालयाचे वेड-पिसे लागले त्या कालिदासाचे झपुर्झा अवस्थेतील हे मेघदूत !

सुरुवातच होते ती रामगिरीजवळच्या जलाशयापासून;

‘सुभग जलाशय- यात नाहली वनवासी मैथिली
घन वृक्षावळ वितरी शीतल तीरावर सावली
रामगिरीवर यक्ष वसे त्या शापांकित होउनी
वर्षाचा निर्वास ललाटी-विव्हल विरहानली!’ ( कुसुमाग्रज-1)

रामायणात वनवासी सीता आणि इथे मेघदूतात वनवासी यक्ष. मेघदूतात जसा रामायणाचा संदर्भ येतो तसा भासाच्या ‘स्वप्नवासवदत्तम्’सारख्या नाटकाचाही उल्लेख येतो. कालिदासाचा पूर्वसुरींचा अभ्यास, मेघदूत काव्यात येणारे अनेक पौराणिक कथा-कल्पनांचे संदर्भ, मध्यभारतापासून कैलासापर्यंतचा भूभाग- त्याची निसर्गवर्णने… या काव्यात कालिदासाची बहुश्रुतता ठायी ठायी दिसून येते. कालिदास हा उज्जयिनीच्या विक्रमादित्याच्या पदरी असणाऱ्या रत्नसभेतील अलौकिक रत्न असा त्याचा उल्लेख येतो. इसवी सनपूर्व पहिले शतक हा त्यांचा कालखंड आहे असे अभ्यासक मानतात. कालिदास नाटककार म्हणून ख्यातकीर्त आहे- ‘मालविकाग्निमित्रम्’, ‘विक्रमोर्वशीयम्’ आणि ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ ही त्याची नाटके. ‘मेघदूत’ या काव्यातही नाट्य उभे राहते, पण ते आहे एकपात्री नाटक. सर्व काही भाषेच्या आणि कल्पनाशक्तीच्या, प्रतिभेच्या ऊर्जेने उजळून जाणारे.

‘तप्तांची तू कणव जलदा! प्रीतिसंदेश नेई
स्वामीक्रोधे सखिविलग मी पोळतो येथ पाही
यक्षेशाच्या नगर अलके जा जिथे हर्म्यकेंद्रे
बाह्योद्यानी हर उजळुनी क्षालितो भालचंद्रे (बा. भ. बोरकर -7)

हर्म्य म्हणजे हवेली, प्रासाद. कुबेराच्या अलकानगरीत जा… तिच्या वेशीवर धवलांकित ऐश्वर्यसंपन्न प्रासाद आहेत. त्यावर शंकराच्या माथ्यावरील चंद्रिकेचे चांदणे सांडते आहे. रामगिरी ते अलकानगरी म्हणजे कैलास – मानसरोवरापर्यंतचा हा सगळा प्रवास. हिमालय बघितला आणि त्याची भूल पडली नाही असे होऊच शकत नाही. ज्यांनी हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे याचि देही याचि डोळा बघितली नाहीत, त्या गूढ सौंदर्याने जो घायाळ झाला नाही त्याला कालिदास शाब्दिक पातळीवर भेटेल; आनंदही देईल, पण अनुभूती येणे मात्र कठीण.

काही अभ्यासकांच्या मते, कालिदासाचा कालखंड गुप्तकालीन आहे. इसवी सनाचे चौथे-पाचवे शतक. कर्नाटकातील ऐहोळे येथील जैन मंदिरात सापडलेल्या शिलालेखात कालिदासाचा उल्लेख आहे. तो शिलालेख पाचव्या शतकातील आहे. म्हणजे इसवी सनपूर्व पहिले ते पाचवे शतक यामधील कालखंड कालिदासाचा असणार. त्याच्या साहित्यात हिमालयातील कैलासापासून ते मध्य भारतापर्यंतचे संदर्भ सापडतात.

‘मिरवी देही दाशरथाची पदचिन्हे मंगल
रामगिरी हा तुला पाहुनी होई स्नेहाकुल
तुझी प्रतीक्षा करून शिणला, त्याला आलिंगुनी
हिमालयाच्या मार्गावरती पडो तुझे पाउल !’ ( कुसुमाग्रज-12)

मेघाला मार्ग दाखवणाऱ्या वाटाड्याने …यक्षाने  सुरुवात तर केली. पण हा गाईड नुसती वाट दाखवत नाही, तर वेळोवेळी असे काही सल्ले देतो, की जणु स्वतःच प्रवासाला निघाला आहे आणि त्याच्या पायाखालचा, नेहमीचाच रस्ता असावा तसा डोळ्यांसमोर सर्व मार्ग जणूकाही त्याला स्वच्छ दिसत आहे…

‘जिथे भिल्लिणी रमल्या कुंजी तिथे विसावा घेई घडिभर
सरी वर्षुनी हलक्या होउन जरा मोकळा वेगे जा तर
बघशिल खडकांमध्ये फाटुनी रेवा वाहे विंध्यतळाशी
काळ्या देहांवर हत्तींच्या शुभ्र रेखिली जणु की नक्षी (शांता शेळके-19)

रेवा म्हणजे नर्मदा. ती पर्वतीय भागातून, विंध्यतळातून वाहते, तेव्हा खडक फोडून जाणाऱ्या या नदीचे हे वर्णन. विंध्यपर्वत, नर्मदा नदी ओलांडून मेघ वेगाने निघाला. सुफल सावळ्या पहा जांभळी दशार्णदेशांतरी… पुढे विदिशा नगरी, वेत्रवती नदी. नीचैर्नामा गिरिवर; जरा टेक विश्रांतीसाठी… नीचै नामक पर्वत, त्यावर फुललेले कदंब वृक्ष. कालिदासाच्या कॅमेऱ्यातून काही म्हणता काही सुटत नाही.

‘जरी वाकडी वाट, तरीही उत्तरेस तू जलदा जाई ..
उज्जयिनीचे सौध मनोहर सखया विन्मुख तया न होई
पौरजनांच्या ललना सुंदर, नयन विजेचे त्यांचे दिपता
कटाक्ष चंचल जरी न बघशिल, व्यर्थ जिणे हे समज तत्त्वतः (शांता शेळके -27)

वाटेत उज्जयनी लागत नाही. पण तो वाट वाकडी करून उज्जयनीला जायला सांगतो आहे. कारण उज्जयनी या स्वतःच्या नगरीवर त्याचे फार प्रेम….’ जरी वाकडी वाट तरीही-उत्तरेस तू जलदा जाई…नदीचे वर्णन करताना तर;

‘सिंधुनदीचे जळ ओसरता वेणीसम ती बारिक झाली
तटतरु गाळिती शीर्ण पालवी पांडुरता त्यायोगे आली
विरहावस्था तिची सुचविते, प्रिय मित्रा रे, आहोभाग्य तव
कृशता सखिची जाईल ऐसा उपाय काही योजावा नव!’ (शांता शेळके-29)

इथे निसर्गालाही मानवी भावभावनांचे अंकुर फुटलेत. त्याला कृश झालेल्या नदीकडे बघतानाही यक्षाच्या मनात त्याची प्रिया तळ ठोकून आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी या विरहावस्थेचीच रूपे दिसतात. विरहावस्था तिची सुचविते, प्रिय मित्रा रे अहो भाग्य तव, एवढं सांगून तो थांबत नाही, तर नदीची कृशता नाहीशी होईल असा उपायही करायला मेघाला सांगतो. मेघाला नुसते दूताचे काम करायचे नाही, तर वाटोवाट असे बरेच काही चालत राहते.

कालिदास मेघदूतात ‘स्वप्नवासवदत्तम्’ ह्या नाटकाचा उल्लेख करून म्हणतो, जिथे वृद्ध अजूनही उदयन आणि वासवदत्ता यांच्या प्रणयकथा सांगतात… त्यापुढे अवंतीनगरी लागेल, तिथे आधी जा. कालिदासपूर्व त्रेतायुगात अवंती म्हणजेच माळवा क्षेत्रातील प्रमुख नगरी उज्जयिनी होती असे संदर्भ आहेत. कालिदासाच्या पूर्वमेघात त्याची प्रतिभा पासष्टपैकी जवळपास दहा श्लोक स्वतःच्या उज्जयिनी नगरीची वर्णने करण्यात गुंग आहे. कालिदासाच्या काव्यप्रतिभेला तिथले विलासी नागरी जीवन, ऐश्वर्यसंपन्न प्रासाद याची सुरस वर्णने करताना बहरच येतो. वाणी थकत नाही. ‘स्वर्गशलाका अशी… विशाला नगरी – उज्जयिनी गाठ. क्षिप्रेवरचा पहाटवारा, सारसपक्ष्यांचे  कूजन, कुटज … म्हणजे कुड्याची फुले पर्वतांवर फुलली आहेत; त्याचा सुगंध, मधुरकषायित असा कमळांचा आस्वाद घेत जा, हे असे नयनरम्य प्रवासवर्णन एकमेव असेल ! तो वाचकालाही जसे काही काव्यरथात बसवून घेऊन चालला आहे. उज्जयिनीचे महाकाल मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिरात संध्याकाळी सूर्यकिरणं सरळ शिवापर्यंत येतात. तो त्या महाकाल मंदिराचे वर्णन करतो;

‘महाकाल मंदिरास येता, अवेळ तरिही थांब जरासा
दृष्टिआड होईल सूर्य जो समयाची त्या करी प्रतीक्षा
सांजपुजेला शिवास प्रिय त्या डमरूचे त्वा कार्य करावे
मेघमंद्रस्वर गभीर गर्जित, सखया त्याचे फळ सेवावे’ (शांता शेळके -36)

तो सायंकाळी शिवावर सूर्यकिरणे आली, की त्या वेळचे वर्णन करताना म्हणतो;   

‘उभारलेल्या भुजा शिवाच्या, त्यावर हो कंकण
जास्वंदीसम नव संध्येचे तेज करी धारण
तूच आर्द्र हो चर्म गजाचे प्रभु करिता तांडव
अभय होउनी करिल उमा मग स्नेहाने प्रेक्षण!’ (कुसुमाग्रज -38)

ती किरणे म्हणजे शिवाच्या भुजा आहेत आणि त्या संध्याकाळच्या वेळी ढगांमधून लाल रंगाची उधळण होते हे जाणून कल्पना करतात की जास्वंदीसम नवसंध्येचे तेज करी धारण…कालिदासाचा पाय त्याच्या प्रिय उज्जयिनीतून बाहेर पडता पडत नाही. शेवटी तो मेघाला सांगतो;

‘पण मित्रहिताचा हेतू मनी ठेवून …
सूर्य उगवता पुन्हा पहाटे प्रवास आपला सुरू करी तू.’…

असे सांगितल्यावर मेघाचा प्रवास एकदाचा पुढे सरकतो. पाठवणारा आणि जाणारा, दोघंही मोठे रसिक! हिमालयाचे नितांतसुंदर दर्शन आणि प्रीतीभावनेचे नवनवोन्मेष. कालिदास लिहितो; गंभीरा नदीच्या पाण्याने प्रसन्न होउन जा… ही गंभीरा नदी पुढे क्षिप्रेला राजस्थान सीमेवर जाऊन मिळणारी मध्यप्रदेशातील नदी. रानउंबरांच्या फळांना परिपक्व करत देवगिरीला पोचशील. कालिदासाची रसिकता, यक्षाची कामोत्सुकता, निसर्गाची मोहकता आणि प्रणयरंगात रंगताना विरही प्रियेशी एकरूपता असा हा पुढे येणारा श्लोक. नदी आणि मेघ यांच्यामधला प्रणय रंगवणारा कालिदास… त्याच्या कल्पनाविलासाबद्दल, प्रतिभेबद्दल काय बोलावे?

‘लवले वेळू -त्याच करांनी धरिल जरी ती स्वये सावरुन
नीलजलाचे वसन तियेचे कटिवरुनी तू घेई खेचुन
कामोत्सुक तू झुकता तीवर प्रयाण तुजला सुचेल कुठुनी?
प्रणयरसाचा ज्ञाता कुणि का विमुक्तवसना सोडिल सजणी.’ (शांता शेळके-43)

या शृंगारकाव्यातील मुक्त कल्पनाविलास बघता, ठायी ठायी येणारे गणिकांच्या, ललनांच्या कधी मोहक तर कधी उत्तान सौंदर्याचे, त्यांच्या मादक अदांचे वर्णन बघता कामभावनेचा संकोच त्या काळात नसावा. नीतीच्या, पापपुण्याच्या बासनात शृंगार, कामभावना, संभोग हे विषय बंदिवान झाले नसावेत. कारण मेघाचा प्रवास अशा प्रकारे सौंदर्याचा, संभोगाचा, स्वानंदाचा, सुरस निसर्गसान्निध्याचा आहे. याच श्लोकाचे कुसुमाग्रजांनी केलेले रूपांतर बघा..

‘तिच्या जळाचा सुनील शालू कटीतटाहुन सरे
सावरीत गर्दीत कराने, वेतलतांवर चिरे
वस्त्र ओढुनी तिथे थांबता, प्रयाण व्हावे कसे?
अंक अनावृत सोडुनि जाइल रसिक कोणता बरे!’

मेघाचा मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश असा नदीकिनाऱ्याने होणारा प्रवास आरेखित करताना त्रेतायुगातील अनेक पौराणिक संदर्भ त्यात येतात. ते एके ठिकाणी ‘कार्तिकेय तो जन्म तयाचा हो शिवतेजातुन’… चंबळ नदी आणि तिच्या काठी रंतिनृपाने केलेल्या यज्ञांची कीर्ती… गोयज्ञांतुन जन्मा आल्या चर्मण्वतिवर होई तू नत’… असे म्हणतात. ‘रंतिनृपाच्या गोयज्ञांची कीर्तिच ती वाहते.’ अशी चर्मण्वती नदी आणि त्या प्रदेशांची वर्णनं करताना तिथल्या ललना, त्यांचे मादक विभ्रम, उपमा अलंकारांनी सजून येतात.

‘ओलांडुन तिज जाई पुढती दशपुर नगरी गाठ घना, तू
ललना सुंदर तिथल्या त्यांच्या नयनकौतुका होई हेतू
उचलुनिया पापणी पाहता असे झळकतिल कटाक्ष त्यांचे
कुंदफुलांवर धवल गुंजती पुंज काय ते कृष्ण अलींचे(भुंगे)’  (शांता शेळके-49)

कुंदफुलांवर धवल गुंजती पुंज काय ते कृष्ण अलींचे…धवल…पांढरी कुंदाची फुलं आणि त्याभोवती गुंजन करत फिरणारे काळे अली म्हणजे भुंगे… भामिनीची दशपुर नगरी… ब्रह्मावर्त म्हणजे पानिपत… तिथून पुढे जाता पार्थाचे कुरुक्षेत्र… ‘कनखलतीर्था गाठुनिया मग जह्नुसुतेच्या सन्निध जाई/ निजतनुचा सोपान करुनिया सगरसुता जी स्वर्गी नेई’ असे म्हणत कनखलतीर्थ म्हणजे आजच्या हरिद्वारच्या पुढे प्रयाण होते. त्यासवे शिव, गंगा, चंद्रकला आणि गौरी यांची सुभग कथानके सहजतेने येतात. तिथून पुढे सुरू होते ती इशान्येची सफर- सध्याचे उत्तरांचल.

‘तिरपा किंचित होउन जाई देवगजासम तू गगनातुन
स्फटिकधवलसे पय गंगेचे आतुरतेने करशिल प्राशन
तुझी सावळी पडेल छाया शुभ्र जान्हवीजळात जेव्हा
गंगायमुना संगम झाला भलत्या ठायी- गमेल तेव्हा’ (शांता शेळके-53)

धवलशुभ्र गंगेवर काळ्या मेघाची सावली म्हणजे भलत्या ठिकाणी गंगायमुनेचा संगम वाटेल ही कल्पना…तुझी सावळी पडेल छाया शुभ्र जान्हवी जळात जेव्हा.. गंगा हिमशुभ्र तर यमुना सावळी! मेघही सावळा. कालिदासाची कविकल्पना अशी राजस सुकुमार !

त्यानंतर गंगेचा उगमस्थळ… हिमशैल… कस्तुरीमृग, तिथल्या शिळांना येणारा कस्तुरीचा मादक परिमल, तिथे देवदारांना लागणारे वणवे… कालिदास सगळा हिमालय यक्षाच्या डोळ्यांनी जगतो आहे.  

‘झंझावाता कर घसटुनी पेटता देवदार
गोपुच्छानी जळत वणवा वाढता दुर्निवार
सारा अद्री शमव झणि तू लोटुनी लक्ष धारा
थोरांचे रे धन बरसते देत आर्ता निवारा’ (बोरकर- 55) 

ते मेघाला वाटेत जाता जाता लक्षधारा लोटून पर्वतावरील वणवा विझवायचे कामही सांगतात…थोरांचे रे धन बरसते असे म्हणत; जाता जाता, मेघाला थोरपणही बहाल करतात. हिमालयातील वर्णनं करता करता ‘हिमालयाचे तट ओलांडून क्रौंचरंध्र मग करि तू जवळी… असे म्हणताना परशुरामांनी हीच वाट धरल्याचीही आठवण निघते. 

मेघाची तनु अजून उत्तरेकडे सरकताना कशी मनोहर दिसेल ते सांगणारे कालिदासाचे शब्द मोठे लोभस आहेत. कारण प्रवास आता पर्वतीय चिंचोळ्या भागातून मार्ग काढतो.

‘उत्तरेस तू निघता तिरपी दीर्घतनू तव दिसेल शोभुन
जणु ‘चरण सावळा विष्णूचा की उचले बळिचे करण्या नियमन’ (शांता शेळके-59)

कैलासाचा अतिथी हो अशी सूचना देताना कैलासाची दोन वैशिष्ट्येही इथे येतात. दशमुख रावणाने ज्याला गदगदा हलवण्याचा प्रयत्न केला तो कैलास पर्वत… ‘सुरवनितांच्या प्रसाधनास्तव स्वये होत जो निर्मळ दर्पण’ सुरवनिता… त्या देवलोकातील स्त्रियांसाठी जो निर्मल दर्पण… आरसा बनला आहे असा बर्फाच्छादित कैलास पर्वत… अशा कैलासाचा अतिथी हो असे सांगत त्याच्या अद्भुत सौंदर्याची वर्णने करताना ‘उपमा कालिदासस्य’चा नितांत सुंदर अनुभव येतो.

‘हस्तिदंत नुकताच कापिला धवलवर्ण तो ऐसा गिरिवर
स्निग्ध काजळासमान काळा उतरशील तू जेव्हा त्यावर
तव संपर्के मिरविल गिरि तो ऐसा नयनाभिराम तोरा
कांबळ काळी खांदी टाकुन उभा जणू बलरामच गोरा!’ (शांता शेळके-61)

कालिदासांची गर्भश्रीमंत, ऐश्वर्यसंपन्न भाषा उपमा, उत्प्रेक्षा अलंकारांचे पायी पैंजण घालून निघाली आणि मेघाला घेऊन अलकानगरीत  पोचलीदेखील …

अलका नगरी कशी? तर बघा…

‘कैलासाच्या अंकावरती विसावलेली जशी प्रणयिनी
पाहशील तू अलका -ढळले दुकूल गंगेचे कटिवरुनी –
कांचनकमळे ज्यात विकसती मानसजल ते सुखे सेवुनी
ऐरावत विहरती तयांची मुखे, घना, तू टाक झाकुनी. (शांता शेळके -65/64)

केसावर मोत्यांची जाळी लेवून नटलेली प्रणयिनी; कैलासाच्या मांडीवर विसावलेली असावी अशा त्या अलकानगरीत कुबेराचा दास असणाऱ्या, वर्षभरासाठी एकांतवासाची शिक्षा भोगणाऱ्या यक्षाची पत्नी विरहव्यथा सोसत आहे. यक्षाने मेघाला दूत बनवून तिथे तिचे क्षेमकुशल विचारायला धाडले आहे.

अलकानगरीतील खाणाखुणांना सुरुवात होते ती कालिदासांच्या ‘उत्तरमेघा’त… मेघदूताच्या दुसऱ्या पर्वात. 

‘शृंगारक्षणांची स्मरणे त्याची
शब्दातुनी साकारत लेणी
यक्ष चालला उत्तरमेघी
मेघाची करुनिया ओढणी’

कालिदासांचा ‘उत्तरमेघ’ म्हणजे नुसती स्वप्ननगरी! तिथल्या सौंदर्यवती, उत्तररात्री रतिलीलेने क्लान्त जाहलेल्या कामिनी, चिरतारुण्य, कालिदासांच्या शब्दांत सांगायचे तर ‘मदनशराविण नसे व्यथाही’ अशी एकंदर अवस्था!… मदिरा, मदिराक्षी, प्रणयचतुर अभिसारिका, उपवने… अशा अलकानगरीतील स्वतःच्या घराच्या खाणाखुणा यक्ष मेघाला सांगतोय.

‘कुबेरसदनाजवळी आहे उत्तरेस ते भवन आमुचे
दुरून भरते नयनी कारण तोरण दारी इंद्रधनूचे.
वापी सन्निध पाचुमण्यांच्या तिच्या पायऱ्या आत उतरती
सुवर्णकमळे तिथे लहरती वैदुर्याच्या देठावरती’ (शांता शेळके -15/16)

वैदूर्य हे किमती रत्न जे नवरत्नात एक म्हणतात. ते हलक्या पिवळ्या, धूमील रंगाचे असते. थोडे मांजराच्या डोळ्यांसारखे दिसते. अलकानगरीत सगळे काही रत्नमाणकांनी खचाखच भरलेले, सुवर्णकमळांनी लगडलेले आहे… त्या स्वप्ननगरीत काय नाही? जशी प्रियदर्शन नगरी तशीच प्रिया! 

तनु सडपातळ, दात रेखिले, ओठ सरस जणु पिके तोंडले
बारिक कंबर, सखोल नाभी, भ्याल्या हरिणीसमान डोळे,
पृथुलनितंबा मंदगामिनी, स्तनभाराने किंचित लवली,
स्त्रीरूपाची पहिलि प्रतिमा काय विधीने गमे घडविली!’ (शांता शेळके-22)

पत्नीचे असे वर्णन करणारा यक्ष बघताना, संस्कृत नाटके वाचताना, नृत्यशाळा-देवळांतून नृत्यांगनांच्या कलांचा आस्वाद घेणारे अभिजन, असे दोन हजार वर्षांपूर्वीचे संदर्भ बघताना वाटते, की श्लील-अश्लील, चारित्र्य, शील या विषयीच्या त्या वेळच्या आणि आजच्या कल्पना, तसेच अध्यात्म, पापपुण्याबाबतच्या कल्पना यांत काहीच साम्य नाही. प्राचीन साहित्याचा, सौंदर्याचा आस्वाद घेताना तटस्थपणे ‘साहित्य आणि समाज’ असा विषय अभ्यासण्यासारखे असे अनेक पैलू नजरेत येतात. 

‘गणिकांसंगे जिथे शिळांवर संभोगातुर रमले पुरजन / गंध दरवळे रतिलीलेचा सुचवित त्यांचे प्रमत्त यौवन!’ किंवा ‘कटिवरी किणकिणति मेखला गणिका ऐशा नर्तन करिती / रत्नकांचनी मुठी धरोनी शिवावरी चामरे वारिती (शांता शेळके -37)

आजच्या समाजधारणांना सोडून निर्विषपणे याकडे बघायला नितळ सौंदर्यदृष्टीची देणगी मिळालेली असावी लागते. केशवसुत म्हणतात तसं… ‘सनदी तेथे कोण वदा/ हजारातुनी एखादा’. ही सनद, दैवी देणगी मिळालेले अगदी विष्णुशास्त्री चिपळूणकर, चिंतामणराव देशमुख यांच्यापासून ते कुसुमाग्रज, शांता शेळके, बा.भ. बोरकर; असे अनेकजण मेघदूताकडे आकर्षित झाले. काहींनी मराठीतून समश्लोकी, समवृत्ती अनुवाद केले. शांताबाईंना अनुवादासाठी आशयानुकुल पादाकुलक वृत्त जवळचे वाटले. माधव जूलियन यांनीही ‘मंदाक्रांता ललित कविता कालिदासी विलासी’ असे म्हणत दाद दिली. मेघदूताचे अनुवाद मराठीप्रमाणे सर्व भारतीय भाषांत झाले. त्याचे पद्यानुवाद इंग्रजी, जर्मन, फ्रेंच भाषांतूनही झाले आहेत.

यक्ष मेघाला अलकानगरीतील प्रियेबरोबरील शृंगाराच्या आठवणी जागवीत, तिचे कुशल वर्तमान  घेऊन येण्याविषयी परोपरीने विनंती करतोय….

‘विरहे पहिल्या व्याकुळ सखि मम, यास्तव देऊनि तिज आश्वासन
हिमालयाच्या शिखरांवरुनी वेगे, सखया, येई परतुन
कुशलवचन ऐकता प्रियेचे संकेताच्या खुणा जाणवुन
पहाटवेळी कुंदफुलासम मिळेल मजला नवसंजीवन! (शांता शेळके-53)

स्वभावरमणीय अशी ही अलौकिक कलाकृती, मंदाक्रांतासारखे रसोचित वृत्त, प्रत्ययकारी निसर्गवर्णने, वेधक स्थलचित्रणे, विरहाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त झालेला उत्कट प्रणयभाव… हे सारे सारे समर्थपणे शब्दांकित करणारी कालिदासाची सुश्लिष्ट शैली यामुळे मेघदूताला मुक्त, अम्लान, टवटवीत लावण्य लाभले आहे. मेघाला विनवणी करणारा कालिदासांचा यक्ष शेवटी म्हणतो;

मीच जाणतो अनुचित माझी मित्रा, ही प्रार्थना
परी मनाला देत दिलासा स्नेहाची भावना
वर्षावैभव मिळवुनी नंतर चपलेसह हो रत
तुझ्या ललाटी कधी नसो ही विरहाची वेदना!  (कुसुमाग्रज-54)

मेघाला दूत म्हणून पाठवणे ही कल्पना किती अवास्तव आहे असा विचार करणाऱ्यांना, कालिदासाने मेघदूतात अगदी सुरुवातीलाच उत्तर देऊन ठेवले आहे.

‘धूर, वीज अन् पाणि, वारा यांनी बनला मेघ कुठे तो?
संदेशाते वाहुन नेइल सजीव मानव आणि कुठे तो?
अवगणुनी हे आतुरतेने यक्ष घनाते करी याचना
सजीव निर्जिव विवेक यातिल कुठुन रहावा प्रणयार्ताना?’ (शांता शेळके-5)

– डॉ. गीता जोशी 9423590013 drgeetajoshi59@gmail.com

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version