Home संगीत गायन भैरवाचे विस्तीर्ण अंगण !

भैरवाचे विस्तीर्ण अंगण !

महादेवाचे नाव असलेला भैरव हा राग महादेवासारखाच अनादी अनंत आहे. त्याला आदिरागही म्हटले जाते; कारण मूळ सहा रागांपैकी सर्वात आधी भैरव निर्माण झाला, असेही म्हणतात. त्यामुळेच की काय, गाणे शिकणाऱ्यांकडून सुरुवातीला गळ्याच्या तयारीचा रियाज हा भैरव रागाचे तान, पलटे व अलंकार घोटून घेऊन करवला जातो. अनेक गुरु-शिष्य परंपरांमध्ये पहिला राग किंवा पहिली शिकवलेली बंदिश ही भैरव रागात असते. जयपूर घराण्याच्या सुरश्री केसरबाई केरकर यांना अल्लादिया खां यांनी भैरव रागापासूनच तालीम द्यायला सुरुवात केली, असे केसरबाईंनी एका मुलाखतीत सांगितले आहे. किशोरी आमोणकरांच्या ज्येष्ठ शिष्या मालती कामत यांच्याकडून किशोरीताईंनी भैरवाचा रियाज सतत सहा महिने करायला लावून गळा कसा तयार करून घेतला, हे मी स्वतः ऐकले आहे. कर्नाटक संगीतातही त्याच रागापासून शिकवायला सुरुवात केली जाते. भैरवाला तेथे ‘मायामालवगौडा’ या नावाने ओळखतात.

इतका प्रचलित, सर्वश्रुत राग असूनदेखील मैफलीतील सादरीकरणात भैरवाचे प्रमाण इतर रागांच्या मानाने कमी आढळते. मुख्यतः रियाजाचा मानला गेलेला राग म्हणून असेल किंवा एकंदरीत सकाळच्या मैफलींचे कमी होणारे प्रमाण म्हणूनही असेल कदाचित; पण या आदिराग भैरवाचे मैफलीच्या मंचावर अवतरण विरळाच !

असे जरी असले तरी ज्या कलाकारांनी हा राग गायला, वाजवला आहे; त्यात भैरवाचे अनेक नितांत सुंदर आविष्कार पाहण्यास मिळतात. माझा आणि भैरवाचा संबंध आला तो ‘जागो ब्रिजराज कुंवर नंदके दुलारे’ या बंदिशीद्वारे ! तेव्हा भैरवाचा विस्तृत-व्यापक असा कॅनवास समजण्याचे वय अजिबात नव्हते; पण सर्वसाधारणपणे यमन, भूप रागांच्या चिजा शिकल्यानंतर जेव्हा भैरवाचे कोमल रिषभ व कोमल धैवत समोर आले; तेव्हा हे सूर एक वेगळा ‘फील’ निर्माण करतात, हे नक्कीच जाणवले होते. पुढे पुढे अभ्यास केला; तेव्हा, कोमल रिषभ व कोमल धैवत हे सूर आंदोलित लावले जातात, हे लक्षात आले. ‘ग म रेs_ रेs’_हा ही स्वराकृती प्रामुख्याने वापरली जाते. भैरव पहाटे गाण्याचा राग आहे इत्यादी तांत्रिक बाबी समजल्या आणि हा राग अजून ऐकावा असे वाटू लागले. पहिल्यांदा ऐकला तो प्रभा अत्रे यांच्या ‘निरंजनी’ या अल्बममधला भैरव. त्या भैरवाने माझ्यासाठी भैरवांगणाची दारे उघडली. मी प्रभाताईंच्या आसयुक्त गंभीर सुरातून साकारलेला ‘मन रे तू कर ध्यान’ हा विलंबित खयाल व त्याला जोडून गायलेली ‘हे आदिदेव शिवशंकर’ ही द्रुत या दोन्हींची पारायणे केली आहेत. ही द्रुत चीज मला इतकी आवडायची की सुलभा पिशवीकर यांच्याकडे भैरवाचा रियाज करताना त्यांनी मला हीच बंदिश सर्वप्रथम शिकवली.

द्रुत चिजांची भैरव रागात रेलचेल आहे. पंडित जसराज यांची ‘मेरो अल्ला मेहरबान’, पंडित भीमसेन जोशी आणि पंडित बालमुरली कृष्ण यांच्या जुगलबंदी मधली ‘हमसे करत तुम रार बालम‘, राशीद खान यांनी गायलेली ‘जग करतार तोरे’ ही चीज; या मी खूप ऐकायचो. पुढे पुढे आणखी वेगवेगळ्या ढंगाच्या चिजा ऐकण्यास मिळाल्या, जसे ‘शुकर कीता अल्लाह’, ‘अल्ला हो अल्ला’, धन धन मूरत कृष्ण मुरारी’, ‘जागो मोहन प्यारे’ इत्यादी. शाहीद परवेझ आणि अमजद अली खान यांनी वाजवलेले भैरवही श्रवणीय आहेत.

वर उल्लेखलेल्या या चीजांचा नीट अभ्यास केला; तर काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात येतात. त्या अशा, की एक तर भैरवाला घराण्याचे, धर्माचे, प्रांताचे – कशाचेच बंधन नाही. शेकडो वर्षांपासून या बंदिशी विविध घराण्यांच्या, धर्मांच्या गायक-वादकांनी तितक्याच आपुलकीने गायल्या व वाजवल्या आहेत आणि पुढील पिढ्यांकडे सुपूर्दही केल्या आहेत. दुसरे म्हणजे भैरवामध्ये शक्यतो भक्ती, साधना, समर्पण अशा भावार्थाच्या बंदिशी जास्त आहेत. इतर विषय भैरवाच्या बंदिशीत नाहीत, असे मुळीच नाही. पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांनी गायलेली ‘मोहे पिया मिलन की बारी’, ‘बालमुवा मोरे सैंया’ हा पारंपरिक खयाल, ही त्याची काही उदाहरणे; परंतु प्रामुख्याने प्रार्थना करणाऱ्या, देवाला हाक घालणाऱ्या आशयाच्या बंदिशी यात बऱ्याच आहेत, हे निश्चित !

भैरवाचा गंभीर, अंतर्मुख करणारा भाव हे याचे कारण असू शकते. भाव हा अमूर्त असतो आणि त्याला ओळखण्यास किंवा पकडून ठेवण्यास त्या भावाचे ‘पिक्चरायझेशन’ कामी येते, असे किशोरी आमोणकर म्हणायच्या, हे मला माझ्या गुरुजींकडून कळले. किशोरीताईंनी आयुष्यात भैरव मैफलीत एकदाच गायला, 2014 साली गेटवे ऑफ इंडियावर ! त्याचे ध्वनिमुद्रण ऐकल्यावर मी अनेक दिवस चोवीस तास धुंदीत असल्यासारखा भैरवमय होऊन गेलो होतो. भैरवात विष्णुस्तुतीपर रचना क्वचित आढळतात. ताई गायल्या तो झपताल ही त्यांतील एक !

भज लछमी को लाल सब मिटत जंजाल
जा के गले माला बैजयंती शोभे
पटपितांबर सोहत भुजा चार राजस कौस्तुभ मृगमद तिलक भाल

या भारदस्त झपतालाला जोडून ताईंनी ‘कमलनयन नील बरन’ अशी स्वरचित द्रुत एकतालातील चीज म्हटली आहे. तो भैरव ऐकून माझ्या मनात उंच डोंगरातील गुहेत तपस्या करणाऱ्या योग्याचे चित्र उभे राहिले. युगानुयुगे साधनेत लीन असलेला तो योगी आणि त्याच्या सर्वांगातून झळकणारी निळसर तेजाची आभा ! तोच हा आदियोगी महादेव, तोच हा अथांग क्षीरसागरात शेषशय्येवर योगनिद्रेत लीन असलेला विष्णू, तोच परमसूर आणि तोच अनाहत आदिनाद ! ताईंच्या भैरवाने जो अमूर्त भाव सर्वांच्या मनात उत्पन्न केला त्याला तोड नाही. प्रत्येकाने त्याच्या त्याच्या परीने त्याचे चित्रण करावे आणि त्याच्याशी जास्तीत जास्त जवळीक साधावी.

अश्विनी भिडे-देशपांडे यांचा भैरवही मला विशेष प्रिय आहे. खरे तर, भैरवाचा मनापासून रियाज करण्याची ऊर्जा मला अश्विनीताईंच्या भैरवातून मिळाली. ‘अरे मन रामनाम’ हा ललतचा खयाल ताई भैरवात वळवून गातात. त्याला जोडून ‘जय महाकाल’ ही रूपक तालातील रचना किंवा स्वरचित तराणा ! त्यांनी गायलेली ‘जागो मोहन प्यारे’ ही चीज मला विशेष प्रिय आहे. ताईंची नेमकी मांडणी, पेचदार ताना आणि बोलताना यातून उभा राहणारा भैरव अल्पावधीतच मनाचा ताबा घेतो. अश्विनीताईंनी त्यांच्या ‘बतिया दौरावत’ या शृंखलेतून भैरवाचे शब्दचित्रण केले आहे. त्यांना तो पहाटे शुचिर्भूत होऊन पवित्र मनाने साधनेस बसलेल्या योग्यासमान भासतो.

असेच काहीसे चित्रण कुमार गंधर्वांच्या ‘शोभे जटा तेरो है‘ या झपतालाच्या सादरीकरणातून जाणवते. महादेवाला ते ‘भैरूजी’ म्हणून साद घालतात. तालाचा डौल आणि मालवी शब्दांचा बाज यानेही रचना खूपच खुलून येते. सध्या माझ्या ऐकण्यात ‘शोभे जटा’ नेहमी असतो. ‘कोयल बोले मो ढींग लाल के वासपे’ हा ग्वाल्हेर घराण्याचा खयालही अप्रतिम आहे. थोडक्यात काय; की या विस्तीर्ण भैरवाच्या समुद्रात कितीही पोहावे; तरी त्याचा तळ लागत नाही आणि त्यात डुंबत राहण्याचा मोहही सुटत नाही.

भैरवाची आप्त मंडळी बरीच आहेत आणि काही अंशी भैरवापेक्षा या भाऊबंदांचा वावर मैफलीत जास्त आहे. अहिर भैरव, नटभैरव आणि बैरागीभैरव हे त्यातील मुख्य. सोबत रामकली, गुणकली, जोगिया, कालिंगडा इत्यादी मंडळी आहेतच !

भैरवातील प्रसिद्ध गाणी म्हणजे ‘जागो मोहन प्यारे’ हे ‘जागते रहो’ चित्रपटातील गाणे, ‘मोहे भूल गये सावरिया’ हे ‘बैजू बावरा’ चित्रपटातील गाणेदेखील भैरव आणि कालिंगडाच्या छायेत आहे. ‘मुसाफिर’ चित्रपटातील ‘मान रे हरी के गुण’ हे गाणेही भैरवात आहे. आशा भोसले यांचे ‘देखो बिजली डोले बिन बादल के’ हे प्रसिद्ध गाणेही भैरवात बांधलेले आहे. भैरवाच्या तुलनेत भैरवाच्या इतर प्रकारांमध्ये अधिक गाणी सापडतात. अरेबिक संगीताचा बाज आणि भैरवाच्या छटा असलेली काही गाणी आहेत, जसे ‘डाकिया डाक लाया’, ‘सुनता है मेरा खुदा’ हे ‘पुकार’ चित्रपटातील गाणे; तर अगदी अलीकडचे ‘माशाल्ला माशाल्ला’ आणि ‘अल्ला दुहाई है’ ही गाणीही भैरवाच्या छायेतीलच आहेत. गंमत म्हणजे शाहरुख खानचे प्रसिद्ध ‘दर्द ए डिस्को’ हे गाणेही भैरवाच्या अरेबिक बाजाने जाते.

असे हे भैरवाचे विस्तीर्ण अंगण ! आयुष्यभर बागडण्यास पुरून; तरीही उरेल असे ! 

विविध कलाकारांच्या त्या त्या रागाच्या यूट्युब लिंक्स लेखात जोडल्या आहेत. मीही एक छोटी बंदिश गाऊन आपल्यासमोर ठेवली आहे. भैरव रागामध्ये मी ‘जागो मोहन प्यारे’ ही पारंपरिक रचना म्हणायचा प्रयत्न केला आहे.

– डॉ. सौमित्र कुलकर्णी 9833318384 saumitrapk94@gmail.com

About Post Author

6 COMMENTS

  1. डॉ सौमित्र,
    तुमचे हे अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळणं, ही एक पर्वणीच आहे माझ्यासारख्या, शास्त्रीय संगीताची श्रवणभक्ति करणाऱ्या श्रोत्या व्यक्तिवादी…
    फारच सुरेख, मुद्देसूद आणि माहितीपूर्ण सुघड लेख..
    असेच लिहीत राहा आणि आमच्या ज्ञानात मोलाची भर घालत राहा…
    सरोज भट्टू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version