माझी आजी बिहागमधील ‘बालम रे मोरे मनकी’ ही बंदिश गुणगुणत असे. आजी मूलतः ग्वाल्हेरची आणि गाणे शिकलेली ! त्यामुळे ती अनेक पारंपरिक चिजा गात असे. अकरावी-बारावीमध्ये असताना अश्विनी भिडे-देशपांडे यांनी गायलेली ‘लट उलझी सुलझा जा बालम’ ही चीज ऐकली आणि मी बिहागशी पुन्हा जोडला गेलो. त्या चिजेतील नाजूक शृंगार विविध स्वरावली आणि बोल यांच्याशी खेळत फुलवला आहे. साहजिकच, त्याचा परिणाम ऐकणाऱ्यावर होतो; ती अश्विनी भिडे-देशपांडे, किशोरी आमोणकर आणि मोगूबाई कुर्डीकर या सगळ्यांनी त्यांच्या परीने ‘बाजे री मोरी पायल झनन’ हा ख्याल मांडला आहे आणि बिहागचा सुरेख आविष्कार उभा केला आहे. मी ती बंदिश माया उपाध्ये यांच्याकडून शिकलो; तेव्हा लक्षात आले की रचना सुंदर आहे आणि सुरांचे नक्षीकामही बारीक आहे ! सुलभा पिशवीकर यांनाही ती बंदिश खुद्द मोगूबाईंकडून मिळाली होती. त्यांनी ती मला शिकवली. खरे तर बंदिश म्हणजे बांधलेली; पण यांसारख्या चिजांमधील बंदिस्ती ही कल्पनाविलासाला आकाश मोकळे करून देते. मोगुबाईंना तर हैदरखान यांनी ही अस्ताई सलग नऊ महिने शिकवली होती. गायकी व्यवस्थित विद्यार्थ्यांच्या गळ्यात बसावी हा त्यामागे उद्देश होता. पण बिहागसारख्या विस्तृत रागात गायकीची वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि शक्यता पडताळून पाहणे हेही शक्य आहे.
बिहागचे प्रसिद्ध आणि वारंवार ऐकण्यास मिळणारे ख्याल म्हणजे ‘कैसे सुख सोवे’ आणि ‘धन धन री माई मोरा लाडला’ किंवा कवन ढंग तोरा. प्रामुख्याने ग्वाल्हेर, पण इतरही घराण्यांत ते ख्याल गायले जातात. बिहागातील शुद्ध स्वर, अल्प धैवत आणि ऋषभ, मध्येच येणारा तीव्र मध्यम आणि मींडेने येणारे स्वरलगाव हे काहीसे शीत, लडिवाळ भाव दर्शवतात; पण त्यात आनंद आणि शृंगार यांनाही वाव आहे आणि तसा भाव व्यक्त करणाऱ्या बंदिशी आढळतात. प्रत्येक कलाकार त्याच्या त्याच्या कल्पनेने त्याला रंग देतो. बिहागमध्ये मींडेला हळुवार लागणाऱ्या सुरांना शुभा मुद्गल यांनी एका मुलाखतीत तरंग किंवा अलगद येणारी लाट अशी उपमा दिली; तर अश्विनी भिडे-देशपांडे यांना त्यात बाळाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून त्याला निजवणारी आई दिसली. सिद्ध रागांची खासीयत हीच असते. प्रत्येक कलाकाराची दृष्टी वेगळी, विचार वेगळा; पण वर्षानुवर्षे गायला-वाजवला जाऊनही राग आहे तसाच राहतो.
मध्यलयीच्या आणि द्रुत बंदिशीही त्यात खूप आहेत. फक्त माझीच काय; ‘लट उलझी सुलझा जा बालम’ किंवा ‘अब हु लालन मैका’ या बंदिशी आणि लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केला ती ‘बालम रे’ ही चीज जवळपास प्रत्येकाने गायल्या आहेत. बडे गुलाम अली खाँ ‘गोरी तेरो राज’ हा खयाल व त्याला जोडून स्वरचित ‘अब तो रट लागी’ ही बंदिश गायचे. ती कौशिकी चक्रवर्ती यांनी बरीच लोकप्रिय अलिकडे केली आहे. जुन्या बंदिशींपैकी ‘राजन के राजा’ ही चीज मला विशेष आवडली, ती श्रुती सडोलीकर यांनी गायलेली.
नवीन रचनांमध्ये सी आर व्यास यांची ‘लेजा रे पथिकवा’ ही रचना आणि ‘सुरतिया हूं देखी’ ही चीज अनेक कलाकार गातात. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्याही ‘पालना झुलाऊॅं’ किंवा ‘सांवरी सुरतिया लालन की’ या चिजा आणि लयीला काहीसा अवघड असा तराणाही आहे. वीणा सहस्रबुद्धे गातात तो तराणाही लाजवाब आहे. बलवंतराय भट्ट यांची ती रचना आहे. मला विशेष आवडते, ती अरुण कशाळकर यांची ‘पनघट की गैल’ ही रचना ! मी ती ऐकवतो; म्हणजे तुम्हालाही त्याचा आनंद घेता येईल. त्याची खासीयत अशी की बहुधा बिहागमध्ये पSग मगSS रेसा असे अवरोही चलन येते; पण कशाळकर यांनी म ग रे असे सरळ चलन वापरून चीज केली आहे आणि त्याला एक वेगळा रंग प्राप्त झाला आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण चिजा बिहागमध्ये अनेक आहेत. ‘मोरा रे’, ‘आली री अलबेली’, प्रभा अत्रे यांची ‘नंद कुंवर की छब न्यारी’ ही चीज या सुंदर आहेतच; तशाच नृत्याच्या अंगाची ‘देखो सखी कन्हैया रोके ठाडो है गैली’ आणि जवळजवळ प्रत्येक शब्द दोनदा वापरून रचलेली ‘बनी बनी ठनी ठनी’ ही चीज ! जणू बिहागच्या मुकुटातील ते एक रत्नच !
‘मारु बिहाग’ म्हणजे मूर्तिमंत शृंगार ! प्रभा अत्रे यांनी गायलेल्या मारु बिहागच्या रेकॉर्डमार्फत ओळख झाली. सौंदर्यपूर्ण रीतीने गाऊन सिद्ध केलेला असा प्रभाताईंचा मारु बिहाग ! ‘कल नाही आए’ आणि ‘जागू मैं सारी रैना’ या त्यांच्या रचना इतक्या गाजल्या आहेत की त्यांना पारंपरिक बंदिशींचा दर्जा प्राप्त झाला आहे. प्रचारात असलेला मारु बिहाग हा बिहागचे आरोह-अवरोह वापरतो; पण त्यात तीव्र-मध्यम-प्रमुख असून शुद्ध मध्यम अल्प प्रमाणात वापरला जातो. तसेच ऋषभाला त्यात दीर्घत्व आहे. मी एक छोटी चीज ऐकवतो. ‘रसिया हो न जाओ’ हा यातील पारंपरिक प्रसिद्ध ख्याल हिराबाई बडोदेकर, भीमसेन जोशी, जसराज आणि कुमार गंधर्व यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी गाऊन सिद्ध केला आहे. असे म्हणतात की ही बंदिश मूलतः जयपूर घराण्याची असून जयपूर घराण्यात गायले जाणारे मारु बिहागचे स्वरूप वेगळे आहे. जयपूर घराण्यात मारु बिहाग या रागाला मारु आणि बिहाग या दोन रागांचा जोड राग मानले गेले आहे. राग मारु म्हणजे काय; तर पंचम वर्जित यमन ! यमन रागातून पंचम हा स्वर पूर्ण वर्ज्य केला; तर राग मारुचे सूर मिळतात. तो राग मारु आणि राग बिहाग यांचा जोड करून मारु बिहाग सादर केला जातो. साहजिकच, ‘रसिया हो न जाओ’चे स्वरूपही त्यानुसार बदलते. केसरबाई केरकर, किशोरी आमोणकर आणि अरुण द्रविड यांनी त्या पद्धतीचा मारु बिहाग गायला आहे आणि त्याचे व्यक्तिमत्त्वही वेगळे आहे.
विरह, शृंगार आणि प्रियकर भेटल्याचा आनंद हे मारु बिहागचे स्थायिभाव ! भीमसेन जोशी यांच्यासह अनेकांनी गाऊन लोकप्रिय केलेली ‘तरपत रैन दिन’ ही रामपूर सहस्वान घराण्याच्या इनायत पिया यांची बंदिश सगळे ओळखतात ! त्या व्यतिरिक्त इतर अनेक सुंदर चिजा त्यात आहेत. वीणा सहस्रबुद्धे गायच्या ती ‘बेगी तुम आवो’, जसराज यांची ‘माई मीठे हरी जू के बोलना’, पटियाला घराण्याचे अजय चक्रवर्ती गातात ती ‘तरपतरप बीती जात रैना’ आणि ‘रतिया किनी भोर’; तर रामाश्रय झा यांची ‘आज रे बधाई बाजे’ या काही खास चिजा ! अश्विनी भिडे-देशपांडे यांनी साडेनऊ मात्रांच्या सुनंद तालात बांधलेली ‘तुम ना जाओ पिया’, तसेच सावनी शेंडे-साठ्ये यांच्या अध्धा तीन तालातील ‘जाओ सजना’ हा द्रुत ख्याल ही भावाभिव्यक्तीला फार साजेशी माध्यमे ठरतात. कुमार गंधर्वांच्या ‘सुनो सखी सैंया’चाही डौल वेगळा आहे.
बिहागचा परिवार मोठा आहे. बिहाग आणि मारु बिहाग याव्यतिरिक्त बिहागडा, सावनी, खोकर, नटबिहाग, शंकरा बिहाग, नंद हेमबिहाग यांसारखे अनेक सदस्य बिहाग कुटुंबाचा भाग आहेत. पौर्णिमा धुमाळे यांच्याकडून मंजिरी बिहाग हा अनवट, पण अत्यंत मधुर राग ऐकला. त्याचबरोबर मालती बिहाग हाही आहे.
बिहागमधील गाजलेली गाणी म्हणजे ‘तेरे सूर और मेरे गीत’ किंवा ‘मम आत्मा गमला’ हे नाट्यपद किंवा संत तुकाराम चित्रपटातील सालोमालो या पात्राच्या तोंडी असलेला ‘पांडुरंग ध्यानी’ हा अभंग मारु बिहागात तर अजून विपुल संख्येने गाणी आढळतील. ‘सजणा का धरिला परदेस’ हे नाट्यपद, ‘तुजसाठी शंकरा’ हे गाणे; तर ‘पायलवाली देखना’ हे किशोरकुमार यांनी गायलेले गाणे जणू मारु बिहागच्या बंदिशींसारखे आहे. ‘तुम तो प्यार हो’, ते अगदी अलिकडच्या ‘रमा- माधव’ चित्रपटातील ‘लूट लियो मोहे श्याम सांवरे’ हे गाणे मारु बिहागची झलक दाखवते. उपशास्त्रीय संगीतातही ‘नजरिया लागे नहीं कहीं और’ हा दादरा किंवा गिरिजादेवी यांनी गायलेला ‘शाम तोहे नजरिया लग जाएगी’ हा दादरा अशा अनेक रचना बिहाग परिवाराची शोभा सदैव वाढवत राहतील.
– सौमित्र कुलकर्णी 9833318384 saumitrapk94@gmail.com