माझी आई सिंधुताई सपकाळ हिच्या तोंडी ऐकलेला एक शेर, जो बोलताना मला तिच्या आवाजात कापरा स्वर प्रत्येक वेळी जाणवतो, चीड जाणवते आणि उद्विग्नताही दाटलेली भासते- तो जीवघेणा शेर आहे श्रीकृष्ण राऊत यांचा –
सौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे;
कोण्यातरी मढ्याचा तोही गुलाल होता!
मी आईला खूप वेळा विचारले, की ते कोण आहेत? कोठे असतात? तू त्यांना कधी भेटली आहेस का? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळूनही माझी मात्र त्या नावाविषयीची उत्सुकता कमी होण्यास तयार नव्हती आणि अचानक, ‘फेसबूक’च्या माध्यमातून आमची ओळख झाली! पण एकदा ओळख झाल्यावर मी राऊतसरांशी इतकी वर्षें साठून राहिलेले किती आणि काय काय बोलले ते मला आठवतदेखील नाही.
गझलेचा परिचय मला मी डोळ्यांनी वाचलेल्या अक्षरांपेक्षा आईच्या तोंडून ऐकलेल्या शब्दांमधून आधी झाला. तिचे संपूर्ण आयुष्य किती खडतर आणि किती संकटांतून गेले! त्या प्रत्येक क्षणी तिला गझलेच्या शब्दांनीच बळ दिले. जणू तिचे स्वत:चे प्रतिबिंब समोर दिसावे आणि अचानक तिच्या एकटेपणात कोणीतरी भागीदार म्हणून यावे, तसे काहीतरी घडले असावे गझलेमुळे तिच्या बाबतीत.
सुरेश भट यांनी लिहिले आहे, ‘घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला…पोळलेला प्राण माझा बोलण्या अधिक गेला’ किंवा ‘जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी.’ हे आणि असे कित्येक शेर तिला उभारी देत गेले. ते शब्द तिला ‘तू एकटी नाहीस.. हे काय आम्ही आहोत ना तुझ्या सोबतीला.. तुझे दु:ख कोणाला कळो वा न कळो.. आम्ही ते तंतोतंत व्यक्त करतो ना…’ असा विश्वास देत गेले आणि ती अधिकाधिक सबळ होत गेली. मी गुलाम अली यांची मुलाखत ऐकत होते. त्यात त्यांना प्रश्न विचारला गेला होता, गझल म्हणजे नेमके काय? गुलाम अली यांनी उत्तर दिले, “एकदा एका हरणाची शिकार होते. बाण त्याच्या कंठात रुतलेला असतो. ज्याने शिकार केली तो शिकारी समोर उभा आणि जीव जाण्याच्या सीमारेषेवरील ते हरीण, उरलेले शेवटचे काही आचके देत आहे! त्याचे प्राण त्याच्या डोळ्यांत गोळा झाले आहेत. अन् शेवटचा एक आचका देताना त्याच्या तोंडून जी ‘आह..’ बाहेर पडते आणि त्याचा जीव सुटतो, ती शेवटची आह म्हणजे गझल. गझलच्या व्याख्या अनेक असतील; पण आईला ती गझल तिची वाटते.. तिची सोबत वाटते.. तेव्हा गझलेचा तो अर्थ आणि तिचे स्वत:चे आयुष्य यांत काही साधर्म्य जाणवत असेल का तिला? तिला स्वत:चे पीठ नियतीच्या जात्यात करून घेत असताना तसेच काही जीवघेणे क्षण आले
आई आणि गझल हा असाच योग माझ्या आयुष्यात आजवर आलेला आहे. व.पुं.नी आईची मुलाखत 1985 साली ‘माहेर’ दिवाळी अंकात घेतली आहे. जेवढा म्हणून तिचा प्रवास मांडता येईल तो सारा व.पुं.च्या लेखणीतून सुंदर पद्धतीने रेखाटला गेला आहे. त्या मुलाखतीतसुद्धा आईच्या तोंडी श्रीकृष्ण राऊत यांची गझल आहे. ती म्हणजे ‘माझी भकास शिल्पे’. त्या गोष्टीला पंचवीस वर्षें उलटून गेली आहेत. ‘मी, सिंधुताई सपकाळ’ सिनेमा प्रदर्शित झाला. त्यातसुद्धा सिनेमाचे निर्माता आणि दिग्दर्शक यांना तिचे सोसणे-भोगणे जसेच्या तसे मांडणाऱ्या गझलांना घेण्यावाचून राहवले नाही. लेखनाचा शेवट करताना मला पुन्हा राऊतसरांचीच गझल आठवते –
माझी भकास शिल्पे शोधीत काल होता;
कोण्यातरी व्यथेचा ऐने महाल होता…
ठेवून काळजाला शिंक्यावरी घरी अन्
मग सांत्वनास माझ्या आला रुमाल होता…
– ममता सिंधुताई सपकाळ 9370003132
mamata.riyaj@gmail.com
(‘गझलकार’ ब्लॉगवरून उदृत संपादित-संस्करीत)