ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांची ‘गझल’ या विषयावर कार्यशाळा अलिबागला ‘साहित्यसंपदा ग्रूप’तर्फे योजली होती. मी अलिबागला जाण्यासाठी कल्याणहून पनवेलला बसने पोचलो. पनवेलच्या बसस्टॉपवर शेखसर साक्षात भेटले. ते अलिबागलाच निघाले होते. आमच्या दोघांचे अलिबागला जाणे एकाच बसने, सोबत झाले. त्यामुळे माझी गझलची कार्यशाळा पनवेलपासूनच सुरू झाली! मी त्यांना माझ्या काही गझला दाखवल्या. त्यांनी त्यांतील मात्रांच्या चुका लगेच लक्षात आणून दिल्या. मग मला त्यांना पुढील गझला दाखवण्याची हिंमत झाली नाही. मी ठरवले, की आता मागील सर्व पाटी कोरी समजावी व नव्याने गझल लिहिण्यास सुरुवात करावी. मी तसा गझललेखन, कवितालेखन गेली काही वर्षें करत आहे. मी कार्यशाळेस त्यात अधिक गती प्राप्त व्हावी या उद्देशाने निघालो होतो. पण आता, मुळारंभच करावा लागणार असे दिसत होते. शेखसरांचे त्यासाठी मार्गदर्शन घेणे बसमध्येच सुरू केले.
शेखसर मध्येच, बोलण्यातून वेळ मिळाला, की एखादे हिंदी गाणे गुणगुणताना ऐकू यायचे. ते गाणेही बहुधा गझल असायची. शेखसरांची ‘गझल एके गझल’ नावाची एक पुस्तिका माझ्याकडे आहे. त्यावरून मी मात्रा, वृत्त वगैरे बद्दलच्या प्राथमिक गोष्टी शिकलो आहे. मी काही गझलाही लिहिल्या… पण जोपर्यंत त्या कोणा दुसर्या्ला वाचण्यास देत नाही तोपर्यंत त्यांतील चुका कशा समजणार? येथे तर प्रत्यक्ष ए.के. शेखसर यांनीच मला चुका काढून दाखवल्या होत्या.
अलिबागला पोचलो. कार्यशाळेतील आरंभीचा सत्कार-समारंभ वगैरे औपचारिकता झाल्यानंतर, शेखसरांनी माईक हाती घेतला. अन् सुरू झाले वर्गातील प्रशिक्षण.
“गझलसदृश्य कविता वगैरे काही नसतेच. एकतर गझल असते नाही तर गझल नसतेच!
“कवी लांबलचक, मुक्तछंद कविता कशाला लिहित असावेत? त्यापेक्षा त्या प्रकारच्या चार-पाच कविता लिहाव्यात! आणि त्या मोठ्या कविता वाचण्यास अन् ऐकण्यासही कंटाळा येतो.
“गझल मात्रांत असल्याने गुणगुणण्यास सोपी असते. आणि हो, गझल लिहिताना ओढूनताणून शब्द आणू नकाच, उकार-वेलांटी चुकवायची नाही, शब्दांची तोडफोड करायची नाही; जसे, शब्द आहेत तसेच ठेवावे. जर समर्पक शब्द सापडत नसेल तर प्रयत्न करत राहवे आणि त्या आनंदात मजा येत असते – तो आनंद उपभोगावा!
“शब्दकोडे सोडवताना नवनवीन शब्द मिळत जातात… अगदी तसेच…गझलचा मतला मिळाला तर पुढील शेर लिहिताना शब्द शोधण्याची मजा घ्या…”
मी गझलबद्दल अनेकांची निवेदने/भाष्ये यापूर्वी ऐकली आहेत, पण कोणी गझलेबद्दल असे अगदी सोपे, साध्या भाषेत सांगितल्याचे आठवत नाही. गझलचा अरबीतून मराठीतील प्रवास सांगत, गझलरचनेतील व ती
ते वृत्ताची माहिती देताना त्या वृत्तातील गझल मध्ये मध्ये गाऊनच दाखवत. ते गझल अस्खलित मराठीत गेल्या चाळीस वर्षांपासून लिहितात. एकही विनावृत्त… विनाछंद नाही. सुरेश भट यांची गीते वा गझला तशाच असतात. भट यांचे काही शिष्य म्हणवून घेणारे ‘वृत्ता’त सवलत घेऊन गझला लिहीत आहेत. ते भट यांनी त्यांना तसे सांगितले असल्याचे समर्थनही करत असतात, मात्र शेखसरांसारखे काही एकांडे शिलेदार आहेत. मला त्यांचे नवल वाटले आणि मी त्यापुढे ‘गझल’ ही गझलरूपातच लिहिण्याचा निर्धार केला आहे. एक गझल काय करू शकत नाही? शेखसर पहिल्या संग्रहासाठी शांता शेळके यांच्याकडून प्रस्तावना घेण्यास गेले होते, तर शांताबार्इंकडून चार-पाच पानांची प्रस्तावना त्यांना मिळालीच… आणि त्यांच्या रचनेला गझल असल्याची पावतीही!
समाज कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ नवरा, घरदार, सासुरवास, गर्भवती अशा अनेक संकटांत असताना, त्या आयुष्य संपवण्याच्या विचाराने टेकडीवर पोचल्या. त्या जीव दरीत झोकून देणार तेवढ्यात त्यांना बाजूच्या झुडुपाला एक कागद हवेने फडफडताना दिसला. सिंधुतार्इंना वाचनाची आवड असल्याने त्यांनी मरता मरता शेवटचे काही तरी वाचून मरावे म्हणून, तो कागद हाती घेतला. सकारात्मक असे काही तरी त्यात होते. सिंधुतार्इंचा निर्णय बदलला. त्यांनी आता जगायचे तर समाजासाठी असा निर्धार केला. त्या हजारोंच्या आई झाल्या! त्या कागदावरील गझल होती, ए.के. शेख यांची!
भीमराव पांचाळे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही गझलचे कार्यक्रम करत असतात. ते कार्यक्रमाचा शेवट एका गझलेनेच करतात. ‘गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय? काळी काय’ ही ती गझल. ती आहे ए.के. शेख यांची! ए.के. शेख गझलेत असे खोलवर रुतले आहेत, पण त्यांना मराठी गझलकारांत अग्रस्थान आहे असे जाणवत मात्र नाही इतके ते लीन, सरळसाधे, गझलेचा ध्यास घेतलेले जीवन जगतात.
– ए.के. शेख +919869202650
– श्रीकांत पेटकर 9769213913
shrikantpetkar@yahoo.com
———————————————————————————————————————————————————————————————————————————————–
…आणि गझल खामोश झाली
चांगल्या गझलेत फक्त शब्दांचे सांगाडे नसतात. त्यांच्या पलीकडून येणारी आर्तता आणि सखोलता असते. गाणारे तिला ‘गहराई’ म्हणतात. अशी ‘गहराई’ मलिका पुखराजच्या गझलेत होती. म्हणूनच तिचे नाव जरी उच्चारले तरी जखमी उसासे टाकणारे श्रोते भेटतात. तिच्या गझलेची एका बैठकीत चार-चार पारायण करणारे दिवाने होते. त्यातील विराम आणि शब्द यांना ताकद देणारे स्वरोच्चार ऐकून शरच्चंद्र आरोलकर यांच्यासारखा खानदानी गवय्याही जवळपास दिलखुलासपणे दाद देई. कारण संगीतातील सौंदर्यतत्त्वाचा सहज आविष्कार त्यातून दिसायचा.
भारतात बेगम अख्तरचे जे स्थान होते तेच पाकिस्तानात मलिकाचे. तशा दोघी समकालीन आणि हिंदुस्तानी. त्यांच्या दोस्तीची कहाणी रंगवून सांगितली जाते. एकदा मालिका अचानक लाहोरहून लखनऊला आली आणि तिने बेगम अख्तर हिचा दरवाजा ठोठावला. साक्षात मलिका दारात पाहून आनंदातिशयाने बेगम अख्तर अवाक् झाली. गळाभेट झाल्यावर बेगम अख्तरने गाण्याचा विषय काढला. त्याबरोबर मलिका म्हणाली, ‘ते जाऊ दे चुलीत! मी तुझ्या हातची भजी खाण्यासाठी येथे आली आहे. कलावंताच्या मनस्वीपणाचा हा एक नमुना. मनाचा ठाव घेणारा हा गहिरा आवाज.
(आधार – अमरेंद्र धनेश्वर)