Home साहित्य पुस्‍तक परिचय वृद्धाश्रमी… – स्वाभाविक, अपरिहार्य जीवनावस्था

वृद्धाश्रमी… – स्वाभाविक, अपरिहार्य जीवनावस्था

0

माणसे वृद्धत्वाकडे सरकू लागतात तेव्हा त्यांना अनेक धक्के बसू लागतात. आयुष्याच्या संध्याकाळी अधिक भय वाटते ते मृत्यूचे आणि परावलंबित्वाचे. वार्धक्य म्हणजे दुसरे बालपण. शरीराच्या अवयवांची शक्ती मंदावत जाते, रिकामपण खाण्यास उठते. त्यातून नैराश्य येऊ लागते. व्यक्तीचे सामाजिक व कौटुंबिक जीवन हेदेखील सामूहिक न राहता वैयक्तिक बनले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य दीनवाणे झाले आहे. पण वृद्धत्व हे स्वाभाविक आणि अपरिहार्य आहे. त्यामुळे ते तशाच पूर्वतयारीने स्वीकारले पाहिजे. ही तयारी मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर असते. शारीरिक हालचाली मंदावत जात असतात. त्यासाठी आवश्यक तो व्यायाम, आहार आणि औषधे घ्यावी लागतात; तर मानसिक पातळीवर वृद्धांना सहवास आणि प्रेम यांची गरज असते.

लेखिका सुव्रता साठे यांच्या ‘वृद्धाश्रमी’ या पुस्तकात बारा कथा आहेत. लेखिका स्वत: स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मल्या. त्यांनी मानसशास्त्र विषयात पदवी घेतली. तसेच, त्यांनी होमिओपॅथी असोसिएशनमधून शिक्षण घेऊन धर्मार्थ दवाखाना उघडला होता. तेथे त्यांनी रुग्णांना मोफत उपचार अनेक वर्षे दिले. ती त्यांची आवड आहे. मात्र त्यांच्या घरातील वातावरण फौजी आहे. जवळचे सारे नातेवाईक फौजी असल्याने त्यांच्याकडे बारीकसारीक गोष्टींत शिस्त पाळली जाते.

लेखिकेची वृद्धाश्रमातील वृद्धांवर औषधोपचार करताना त्यांच्याशी मैत्री घडून आली. त्यातून त्यांना अनेक गोष्टी समजून आल्या. संग्रहातील कथा त्यांवर आधारित आहेत. त्यामुळे कथांना प्रत्यक्षाचे परिमाण लाभले आहे. अनेकांकरता उर्वरित आयुष्य आनंदाने जगण्यासाठी वृद्धाश्रम ही एकच जागा असते – तेथे कोणी त्यांच्या मृत्यूची वाट पाहत नाही तर वृद्धाने अधिकात अधिक निकोपपणे जगावे ही आश्रमवासीयांची मनोकामना असते. लेखिका तेथील वृद्धांना भेटे. त्यांची सुखदु:खे समजून घेई. त्यांची धर्मार्थ होमिओपॅथीची पेटी हे त्यासाठी जणू एक माध्यम झाले. त्यातून माणसे जोडली गेली. वृद्धांच्या अंतरंगात दडलेल्या वेदना बाहेर पडू लागल्या. त्या सांगताना वृद्धांचे दु:ख कमी होई. त्या श्रवणोपचारानेही वृद्धांच्या अश्रूंची फुले झाली ! त्यांच्या अनुभवकथांनी लेखिकेचे भावविश्व समृद्ध झाले. त्यांना व्यक्तीने वृद्धावस्थेत काय निर्णय घ्यावेत, जगावे कसे याचे वस्तुपाठ त्या रुग्णांकडून मिळत गेले. वृद्धाश्रमाला पर्याय नसेल, पण प्रेम हा त्यावर विनापर्यायी उपाय आहे हा लेखिकेचा निष्कर्ष आहे. या साऱ्या कथा माणसांच्या असल्याने त्या वाचकाला ओळखीच्या वाटतील – त्याच्या आसपासच्या वाटतील, कदाचित स्वत:च्या-देखील वाटू शकतील. व्यक्तीचा भूतकाळ जर वर्तमानाला आशीर्वाद देत असेल आणि तिचे वर्तमान भविष्याचे स्वागत आनंदाने करत असेल तर व्यक्तीचे आयुष्य परिपूर्ण होईल हे यातील कथांचे सार आहे.

वृद्धावस्था व वृद्धाश्रम हे कटू सत्य आहे हे मान्य करून निरामय, आरोग्यसंपन्न जीवनासाठी शारीरिक व आर्थिक नियोजन वृद्धत्व आधीपासूनच करण्यास हवे. रितेपण घालवण्यासाठी छंद-आवड जोपासून व्यक्तीचा अनुभव आणि ज्ञान यांचा उपयोग गरजवंतांसाठी करणे, अध्यात्मातून मन:शांती मिळवणे अशा गोष्टी सहजशक्य आहेत. वाचकांना या संग्रहातील कथांमधील पात्रांनी जे काही निर्णय घेतले त्यातून स्वत:साठी काही गोष्टी ठरवता येतील. कदाचित ते कठोर वाटतील किंवा अनिवार्य, पण ते वास्तवाला धरून आहेत. त्यामुळे आधार मिळू शकतो. वानगीदाखल सांगायचे झाले तर आजारी व्यक्तींना पाहण्यास कोणी नसेल किंवा घरी मनुष्यबळ कमी पडत असेल तर त्यांना वृद्धाश्रमात ठेवणे सोयीस्कर होय. काही वृद्धांनी मुलांच्या संसारात अडचण नको म्हणून स्वत:हून वृद्धाश्रम जवळ केला आहे किंवा गावी राहून अन्य वृद्धांसाठी सोयी निर्माण केल्या आहेत. काहींनी एक जोडीदार गेल्यानंतर एकटे राहण्यापेक्षा वृद्धाश्रमात राहून अनेकांबरोबर त्यांच्या संगतीत राहणे स्वीकारले, तर काहींनी स्वत:हून, त्यांचे कुंटुंब मोठे झाल्यामुळे वृद्धाश्रमात जाणे आनंदाने पत्करले. वृद्धाश्रमही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. स्वत:ची स्थावर जागा भाड्याने देऊन वृद्धाश्रमात मानाने जाणारे वृद्धही काही कथांत भेटतात.

सखुबाई आणि इंदिराकाकू या दोघींना त्यांच्या स्वत:च्या घरात जी वागणूक मिळाली त्यापेक्षा त्यांना वृद्धाश्रम अनेक पटींनी बरा वाटला. सॅमच्या मुलांनी त्याला जिवंतपणी बेदखल केले. त्याला फसवून वृद्धाश्रमात ठेवले, पण तेथील लोकांनी त्याला नवे आयुष्य दिले ! माधवरावांना त्यांच्या मुलाने फसवून, त्यांची प्रॉपर्टी विकून तो बायकोसह अमेरिकेला पळून गेला, पण माधवरावांनी स्वत: आयुष्य वृद्धाश्रमात पुन्हा नव्याने उभे केले. मुलगा त्याचे आयुष्य हरला तेव्हा हरलेल्या मुलाला पुन्हा आधार दिला, पण अंतर ठेवून. काहींनी फॉर्म भरून नेत्रदान व अवयवदान केले. त्यांनी त्यांची संपत्ती मुलानातवंडांना आणि वृद्धाश्रमाला देऊन शरीरे दान केली, तर काहींनी स्वत:हून आर्थिक नियोजन व्यवस्थित करून, मुलांवर सारे सोपवून वृद्धाश्रम आनंदाने स्वीकारला. काही व्यक्तींनी काही प्रॉपर्टी मुलांना देऊन, काही स्वत:कडे ठेवून – ते खर्च आटोक्यात ठेवून, त्या व्यक्ती स्वत:सारख्या अनेकांना मदत करत वृद्धाश्रमात राहिल्या. त्यांनी स्वत:च्या उपचारासाठी पैसे ठेवले होते आणि देहदान केले असल्यामुळे त्यांना त्यांच्या स्वत:च्या अंतिम कार्याचेही दडपण नव्हते.

या पुस्तकातील कथांतून वार्धक्याच्या कथा आणि व्यथा; तसेच, दोन पिढ्यांतील अंतर मार्मिकपणे उलगडते. लेखिकेला भेटलेली कथांतील पात्रे ही मदत करणारी दिसतात, बारा कथांमधील बहुतेक साऱ्या कथा सकारात्मक आहेत. त्यातून जिवापाड प्रेम करणारी माणसे दिसतात. त्यामुळे माणुसकी अजून टिकून आहे ही कल्पना वाचकाच्या मनाला सुखावते आणि त्याचे मनोबल वाढवते. या कथा वाचकांना वृद्धावस्था आणि वृद्धाश्रम यांच्याकडे निराळ्या दृष्टीने पाहण्यास सांगणाऱ्या आहेत हे खचित.

सुव्रता साठे (हसबनीस) यांची ‘वृद्धाश्रमी’ या पुस्तकाशिवाय ‘पुन्हा जन्मेन मी’, ‘ऋणानुबंधाच्या गाठी’, तसेच; इंग्रजीमध्ये ‘गिव्हमी चान्स टू लिव्ह अगेन’ अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्या त्यांचे लेखन स्वतःच प्रकाशित करतात. त्यांचे पती लष्करात होते. त्या पुणे येथे अडतीस वर्षापासून होमिओपॅथी डॉक्टर म्हणून रूग्ण सेवा करत होत्या. त्या फक्त पन्नास रूपयांत रूग्णांवर इलाज करतात. गरिबांकडून तर तेवढेही घेत नाहीत. त्या आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि नॅचरोपॅथीची औषधे देतात. त्यांचा दवाखाना देवळाली कॅम्प येथील विद्याविनय सोसायटी, राम मंदिराजवळील एका खोलीमध्ये आहे. त्या तेथे शनिवार सोडून इतर दिवशी दुपारी दोन ते चार उपस्थित असतात.

वृद्धाश्रमी
लेखिका- सुव्रता साठे (हसबनीस) 8378016354
संपर्क- प्रकाशक- सुव्रता, देवळाली-नाशिक
किंमत –250 रुपये

हेमंत शेटये 9819621813 hemant24th@gmail.com

© www.thinkmaharashtra.com 2024. सदर लेख अथवा लेखातील कोठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. पुनर्मुद्रण करायचे झाल्यास ऋणनिर्देश करावा. उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version