फलटण तालुका संस्कृती महोत्सवात स्थानिक परिसरातील मुद्यांना स्पर्श करणाऱ्या बौद्धिक व अनुभवाधारित चर्चा चालू असताना, दुसऱ्या बाजूला वातावरण जत्रेचे, हलकेफुलके होते. माहोल अनौपचारिक गप्पांचा होता. येणारे पाहुणे आणि श्रोतेही प्रदर्शनातील मोजक्याच स्टॉलना भेटी देऊन विविध माहिती गोळा करत होते.
प्रदर्शनात आकर्षणे वेगवेगळी होती. त्यात फलटणचा दुष्काळी टापू जलमय कसा झाला येथपासून शहराच्या आजच्या समस्यांची विद्यार्थ्यांनी केलेली मांडणी होती, बचतगटाच्या महिलांनी उभे केलेले जग होते, फलटण तालुक्यातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक कार्यालयाने पुरवलेली मताधिकाराची विविध तऱ्हेची माहिती होती. कोणाही नागरिकाला एका क्लिकवर त्याच्या लोकशाही हक्कांची तब्येत तेथे जाणून घेता येत होती आणि फलटणचे नागरिकही या सोयीचा भरपूर लाभ घेत होते. हा महोत्सव ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेच्या सहकार्याने आयोजित केला होता.
अशा स्वरूपाचा तालुका स्तरावरील जीवनाचा-परंपरेचा व प्रगतीचा वेध घेणारा महोत्सव बहुधा प्रथम होत होता. त्यामुळे त्यात रामराजे नाईक निंबाळकर व त्यांचा परिवार औत्सुक्याने सामील झाले, त्याचबरोबर प्रगतीशील अध्यापक-प्राध्यापक माहिती व विचार यांच्या ओढीने तर उद्योजक व कलाकरमणूक प्रेमी त्यांना व्यक्त होण्याची संधी लाभते म्हणून महोत्सवात हजर झाले.
महाराष्ट्रातील सुमारे पंचेचाळीस हजार खेड्यांची विविध माहिती संकलित करण्याचा व ती ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलवर मांडण्याचा घाट ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ने दहा वर्षांपूर्वी घातला. काम धिम्या गतीने चालू होते, त्याहून अडचण होती ती म्हणजे राज्याच्या साडेतीनशेहून अधिक तालुक्यांना एकाच वेळी गवसणी घालणे जमत नव्हते. गोंदियात लक्ष घालावे तर देवरुख दुर्लक्षित होत होते आणि कोणताही एक तालुका समग्र माहितीनिशी उभा होऊ शकत नव्हता. म्हणून व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनने पाच तालुके निवडून त्यांचे माहितीसंपन्न ‘मॉडेल’ उभे करण्याचे ठरवले. अचलपूर, बदनापूर, शेवगाव, फलटण व दापोली असे वेगवेगळ्या प्रदेशांतील पाच तालुके माहिती संकलनासाठी पक्के केले. वर्षभराच्या या मोहिमेसाठी परिमल व प्रमोद चौधरी फाउंडेशनने अर्थसहाय्य दिले. मोहिमेमध्ये कर्तबगार व्यक्ती, उपक्रमशील संस्था आणि संस्कृतिसंचित अशा तीन प्रकारे माहिती संकलित केली जाते. संचितात तालुक्यातील मंदिरादी जुन्या वास्तू, जुनी घराणी, निसर्गवैशिष्ट्ये, नामवंत व्यक्ती, खाद्यपदार्थांपासून वस्त्रप्रावरणे आणि यात्रा-जत्रा-ऊरुस, मंदिर-मशीद, वास्तू, गड-किल्ले-वाडे… यांच्यापर्यंतचे स्थानिक प्रकार-उपप्रकार अशी मानवी जीवनासंबंधी सर्व तऱ्हेची माहिती संकलित व्हावी असा प्रयत्न आहे.
माहिती संकलन विविध मार्गांनी होत आले आहे. त्यांतील पुढील टप्पा होता – तालुका संस्कृती महोत्सवाचा. तसा पहिला महोत्सव फलटण येथे 16 व 17 जानेवारी रोजी पार पडला. त्याचे उद्घाटन रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. त्यांनी तरुणांना, विशेषत: राजकीय दृष्ट्या जागरूक होण्याचे आवाहन केले. त्या ओघात त्यांच्या भाषणात फलटणचा इतिहास व संस्कृती यांचे उल्लेख आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे लेखक-पत्रकार रविंद्र बेडकिहाळ हे होते. त्यांनी ‘थिंक महाराष्ट्र’चे वेबपोर्टल म्हणजे महादेवशास्त्री जोशी यांच्या संस्कृतिकोशाचे विस्तारित आधुनिक रूप आहे आणि ते काम त्या त्या ठिकाणची सुजाण जनताच करू शकेल असे सांगितले. बेडकिहाळ म्हणाले, की खरे तर, हे काम सरकारचे आहे व सरकारनेच त्यास पुष्टी दिली पाहिजे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ‘थिंक महाराष्ट्र’चे मुख्य संपादक दिनकर गांगल म्हणाले, की “‘फलटण तालुका संस्कृती महोत्सव’ ही महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासात अपूर्व अशी घटना घडत आहे. त्यामुळे तालुका पातळीवरील गावोगावच्या प्रथा-परंपरांचा वेध घेतला जाण्यास चालना मिळणार आहे. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या आणि जनजागृतीच्या दिशेने ते मोठे पाऊल ठरणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अशी घटना घडणे याला आगळेवेगळे महत्त्व आहे.”
महोत्सवाच्या दोन दिवसांत चार परिसंवाद झाले. पहिली चर्चा होती ‘युवा पिढी व लोकशाही मूल्ये’ या विषयावर. तिचे संचालन मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख दीपक पवार यांनी केले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे चर्चेत सहभागी झाले. स्थानिक ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी फलटणची संस्थानकाळापासून चालत आलेली लोकशाही परंपरा वर्णन करून सांगितली. तरुण वक्त्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते सत्यजीत गुरव, पत्रकार प्रगती जाधव पाटील व स्वप्नील शिंदे आणि फॉरेव्हर मिस इंडिया 2022 ची विजेती-अधिवक्ता सुस्मिता धुमाळ हे सहभागी होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून एका बाजूला सार्वजनिक जीवनाचे मीडियातून व्यक्त होणारे उघडेवाघडेपण भडकपणे समोर येत असताना… तरुण माणसे सामाजिक प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत आहेत असेही जाणवून दिलासा वाटत होता. सत्यजीत यांनी एकविसाव्या वर्षी ठरवून गावची सरपंचपदाची निवडणूक लढवली. राजकारणावर फक्त बोलून चालणार नाही तर त्यात उतरावे लागेल तेव्हाच बदल घडून येईल अशी त्यांची धारणा.
फलटणच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील तीन प्रमुख स्त्रियांनी ‘स्त्रीजीवनाचा वेध’ दुसऱ्या परिसंवादात घेतला. सुभद्राराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांच्या विविध सामाजिक कार्याचे वर्णन करत असताना शहरी व ग्रामीण भागांतील स्त्रीजीवनातील तफावत जाणवून दिली. दुसऱ्या वक्त्या मधुबाला भोसले या स्वत: उद्योजक, नगरसेविका व म्हणून राजकारणीदेखील. त्यांनी अल्पबचत गटांचे जाळे छान उभे केले आहे. त्यांच्या बोलण्यातून जाणवले, की ग्रामीण भागातील स्त्री स्वतंत्र होऊन उभी राहत आहे; तरीदेखील हा काळ अजून स्त्रीच्या कुचंबणेचाच आहे ! मंजिरी निंबकर यांनी डॉक्टरी व्यवसाय सोडून फलटणमध्ये कमला निंबकर बालभवन ही नमुनेदार शाळा चालवली आहे. त्यांनी स्त्री व पुरुष यांची विचार व भावना यांची क्षेत्रे वेगवेगळी आहेत. स्त्रीने स्वत:च्या ताकदीने स्वत: स्वतंत्रपणे उभे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा आशयाचे प्रतिपादन केले. पुण्याच्या कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी या चर्चेचे संचालन केले.
सध्याचे युग हे उद्योग, व्यवसाय व व्यापार यांचे आहे. महोत्सवातील तिसऱ्या परिसंवादात ‘फलटणची उद्योगभरारी’ या विषयावर वक्ते बोलले. वक्ते होतेही मातब्बर- संजीवराजे नाईक-निंबाळकर हे ‘गोविंद’ या दुग्धव्यवसायातील ब्रँडचे प्रवर्तक, अनिल राजवंशी हे ‘निंबकर सीड्स’मधील पद्मश्री पुरस्कारप्राप्त संशोधक, दिलीपसिंह भोसले यांनी सहकाराचे जाळे विणलेले, तर चौथे सचिन यादव यांनी भाजीपाला व फळे यांच्या निर्यातीत फार मोठी कामगिरी बजावलेली… स्थानिक कॉलेजचे प्राध्यापक सतीश जंगम यांनी चर्चेचे संचालन केले. चौघाही वक्त्यांचा सर्वसाधारण सूर फलटणमध्ये उद्योगाच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत, त्या तरुणांनी वेळीच उचलाव्या. अन्यथा बाहेरचे लोक येऊन फलटणच्या अर्थोद्योग क्षेत्रातील ती उणीव भरून काढतील अशा आशयाचा होता.
महोत्सवातील समारोपाच्या गप्पागोष्टी ‘स्थानिक मनोरंजनाच्या ग्लोबल हाका’ या विषयावर होत्या. वसीमबारी मणेर या चित्रपट दिग्दर्शकाने तंत्रज्ञान किती झपाट्याने बदलत आहे ते विविध उदाहरणांनी दाखवून दिले आणि विद्यार्थी-तरुणांनी ते आव्हान स्वीकारण्याची तयारी ठेवावी असे बजावले. शिक्षणसंस्था चालक वैशाली शिंदे यांनी जागतिक वातावरणात स्थानिक गुणवान व्यक्तींना कशी संधी मिळू शकते हे सोदाहरण सांगितले. अशोक शिंदे यांनी नाट्यमाध्यमाची स्थिती व गती बदलत्या माहोलामध्ये कशी असेल याचे वर्णन केले तर नीलम देशमुख यांनी काही पारंपरिक कला सादर केल्या. चर्चेचे संचालन चटपटीत नितीन नाळे यांनी हसतखेळत, श्रोत्यांना विश्वासात घेत केले. त्यांनी स्वत: सादर केलेला महोत्सवाचा पोवाडा इतिहास व वर्तमान या दृष्टीने मर्मग्राही होता.
महोत्सवाची सांगता त्याचा मुख्य हेतू जो माहिती संकलनाचा, त्या बाबतीत व्यवस्था लावून करण्यात आली. अशोक शिंदे व सतीश जंगम या दोन प्राध्यापकांच्या सूत्रसंचालनाखाली ‘फलटण संस्कृतिशोध’ नावाचा गट निर्माण करण्यात आला – गिर्यारोहकांचे गट जसे वेगवेगळे सुळके व शिखरे शोधत फिरतात तसे हे संस्कृतिशोधक फलटण तालुक्याच्या वाटा-आड वाटा, डोंगर-पर्वत, संस्था-व्यक्ती यांचा शोध घेतील. तो एक वेगळा ध्यास होईल. भारतात पुराणकथा चिकार आहेत, परंतु ज्यातून मानवी जीवन घडल्याचा प्रत्यय येतो अशा प्रकारच्या अस्सल संस्कृतिकथा कोठे आहेत? या शोधातून भारताची खरी सनातन संस्कृती काय होती व आहे त्याचा तलास लागेल. म्हणून फलटणला जो महोत्सव झाला तो एका विशाल संस्कृतिशोध मोहिमेचा प्रारंभ होय असे म्हणता येईल !
– नितेश शिंदे 9892611767 info@thinkmaharashtra.com
सहाय्यक संपादक, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम
——————————