सिन्नर तालुक्यातील डुबेरे हे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले. गाव छोटेसे आणि आडवळणी, पण ते आदर्श गाव बनावे यासाठी प्रयत्न करणारे प्रविण वामने.
प्रविण वामने हे पुणे येथील ‘यशदा’ संस्थेत सहाय्यक संशोधक पदावर कार्यरत होते. तेथे त्यांना पोपटराव पवार, अण्णा हजारे यांसारख्या व्यक्तींचा सहवास लाभला. त्यांना महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांतील ग्रामीण भागात कामानिमित्त जावे लागे. त्यांनी ज्या ज्या गावी काही चांगले बघितले, की ते ते त्यांच्या गावी असावे असे वाटायचे. त्यांचे मन त्यांच्या शिक्षणाचा फायदा त्यांच्या गावाला कसा करून देता येईल ह्या विचाराने अस्वस्थ होत असे. शेवटी त्यांना सूर गवसला. त्यांना स्वत:चे उद्दिष्ट मिळाले. त्यांनी ‘यशदा’मधील सहाय्यक संशोधकपदाचा राजीनामा दिला आणि गावाचा विकास घडवून आणण्याची सुवर्ण कल्पना गावक-यांच्या समोर आणली. ते आता चरितार्थासाठी शेती करतात.
त्यांनी प्रथमतः गावातील समविचारी तरुणांना एकत्रित आणले. त्यांच्यामध्ये ग्रामविकासाचे बीज पेरले. तेथून सुरू झाली ग्रामसुधारणेची वाटचाल. त्या वाटचालीतील पहिला टप्पा म्हणजे त्यांचा ‘शांतिवन’ हा उपक्रम. गावाच्या उत्तर बाजूस स्मशानभूमी आहे. तिचा वापर अंत्यविधी आणि प्रातर्विधी ह्या दोन्ही विधींसाठी केला जात असे. प्रविण आणि त्यांच्या टीमने स्मशानभूमीला नवे रूप दिले. त्यांनी समविचारी तरुणांच्या आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या मदतीने काशीद, करंज, कडुनिंब, चिंच, विलायती चिंच, वड अशा सुमारे बाराशे वृक्षांची लागवड तेथे केली. वृक्षारोपण उपक्रम तीन दिवस सुरू होता. स्मशानभूमी मोकळ्या जागेत असल्यामुळे गावातील जनावरांपासून वृक्षांचे संरक्षण व्हावे यासाठी श्रमदान व लोकवर्गणी या माध्यमांतून स्मशानभूमीच्या बाजूने तारेचे कुंपण घातले. स्मशानभूमीचे हरितभूमीत रूपांतर झाले, तेव्हा त्यांनी तिला ‘शांतिवन’ असे नाव दिले. त्यांच्या ह्या विकासकार्याला हातभार म्हणून गावातील गृहस्थ खंडू शिंदे यांनी त्या रोपांना पाणी पुरवण्याची व्यवस्था केली आहे. त्यांनी मैत्रिदिनानिमित्त तारेच्या कुंपणाभोवती शंभर काटेरी झुडपे लावली; त्यांच्याशी आपल्या मैत्रीचा संदेश प्रस्थापित केला!
श्रमतील हे हात,
झिजेल ही काया,
तरीही ग्रामोद्धाराच्या कल्पना,
अबाधित राहतील माझ्या
हा वामने यांचा संकल्प आहे.
– प्रविण वामने, 9689900962
– शैलेश पाटील
प्रेरणादायी माहिती आणि…
प्रेरणादायी माहिती आणि व्यक्तिमत्त्व
अतिशय सुंदर . समाजात राहून…
अतिशय सुंदर . समाजात राहून समाजासाठी काम करून जाग्रुती करण्या च काम आपण करत आहात . शुभेच्छा
Comments are closed.