नारो आप्पाजी खिरे (तुळशीबागवाले) Naro Appaji Khire (Tulshibagwale)

-naro-appa-khare

पेशवाईतील गोष्ट! साताऱ्याजवळच्या पाडळी गावात आप्पाजी खिरे नावाचे गृहस्थ राहत. ते त्या गावचे वतनदार होते. त्यांच्याकडे पाडळी गावच्या कुलकर्णीपणाची जबाबदारी होती. अप्पाजींना नारायण नावाचा धाकटा मुलगा होता. त्याचा जन्म साधारण 1700 च्या दरम्यानचा! नारायण हा हट्टी होता. त्यामुळे आई-वडिलांना त्याच्या भविष्याबद्दल चिंता वाटत होती. एकदा, आई त्याला काहीतरी बोलली म्हणून तो नऊ-दहा वर्षांचा मुलगा घरातून बाहेर पडला आणि पुण्यात आला. पुण्यात रामेश्वराच्या मंदिरात त्याची भेट गोविंदराव खासगीवाले यांच्याशी झाली. गोविंदरावांनी त्यास शागिर्दांमध्ये नोकरीस ठेवले. ते त्याला ‘नारो’ म्हणत. तेच नाव त्याचे म्हणून रूढ झाले. खासगीवाल्यांनी त्याला रोजच्या पूजाअर्चेसाठी तुळशी, बेल, दुर्वा, फुले आणण्याचे काम दिले. ते साहित्य तुळशीबागेतून आणावे लागे. तुळशीची बाग पुण्याच्या बाहेर होती. ती खासगीवाल्यांची स्वतःच्या मालकीची होती. त्यांनी तेथे विविध फुले वगैरे वाढवली होती. परंतु तुळस तेथे जास्त प्रमाणात होती. म्हणून तिचे नाव ‘तुळशीबाग’ असे पडले.

खासगीवाल्यांनी नारोची कामातील निष्ठा पाहून त्याला पेशव्यांच्या खासगीतील हिशोब वगैरे करण्यासाठी चाकरीत सामावून घेतले. नानासाहेब पेशव्यांनी त्याला कोठी खात्याच्या कारकून पदावर नेमले. खासगीवाल्यांनी पुढे त्याला छत्रपतींच्या दरबारी साताऱ्यास जमाखर्च लिहिण्यासाठी पाठवून दिले. तेथे त्याने छत्रपतींची मर्जी संपादन केली. त्याला छत्रपतींनी इंदापूर प्रांताचा मुकादम केले. पेशव्यांनी त्याला पुणे दरबारी पुन्हा बोलावून घेतले (1747). पेशव्यांनी नारो आप्पाजीस पुणे सुभ्याची दिवाणगिरीची जबाबदारी सोपवली. त्याचसोबत, पेशव्यांच्या कोठी खात्याचे कारभारीपददेखील त्यास दिले.

हे ही लेख वाचा –
पुणे येथील तुळशीबाग श्रीराम मंदिर
तुळशीबागेशिवाय पुणे उणे !
तुळशीबाग – ऐतिहासिक, आधुनिक, स्मार्ट!

पेशव्यांनी नारो आप्पाजीस त्यांची काम करण्याची पद्धत, मुत्सद्दीपणा वगैरे गुण पाहून पुण्याचे सरसुभेदार 1750 साली केले. नारो आप्पाजींनी पुणे शहराचे मुख्य रचनाकार या नात्याने नानासाहेब पेशव्यांच्या स्वप्नातील पुणे शहर निर्माण केले. नारो आप्पाजींची श्रीमंती वाढली. ते वेळप्रसंगी पेशव्यांसाठी स्वतःच्या तिजोरीतून पैसा पुरवत. नानासाहेबांनी नारो अप्पाजींना पालखीची नेमणूक 1757 साली करून दिली.

नारो आप्पाजींच्या मनी पुण्यात रामाचे मंदिर असावे असे 1758 साली आले. त्यासाठी त्यांनी खासगीवाल्यांकडून एक एकरभर पसरलेली तुळशीबाग विकत घेतली. त्यास तटबंदी बांधली आणि पेशव्यांकडे राम मंदिर बांधण्याची परवानगी मागितली. नानासाहेबांनीही मागणी मंजूर केली. मंदिराच्या बांधकामास माघ महिन्यात सुरूवात झाली. ते तुळशीबागेचे मालक झाल्यामुळे लोक त्यांना ‘तुळशीबागवाले’ म्हणून संबोधू लागले आणि त्यांचे खिरे हे आडनाव लोप पावले. नानासाहेबांचा मृत्यू पानिपताच्या पराजयाने खचून जाऊन झाला. त्यामुळे मंदिराचे बांधकाम थांबले. थोरले माधवराव पेशवे झाले. त्यांनी राममंदिराचे बांधकाम १७६३ सालच्या अखेरीस पुन्हा सुरू करण्याची आज्ञा दिली. मंदिराच्या गाभाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले आणि विधिपूर्वक समारंभाने मंदिरास उंबरा बसवण्यात आला. मंदिराला एकशेचाळीस फूट उंच शिखर बांधण्यात आले होते. त्याला नारो आप्पाजींनी सोन्याचा कळस बसवला. ते काम पूर्ण झाल्यावर थोरल्या माधवरावांनी तुळशीबागवाल्यांना वढू हे गाव इनाम दिले. मंदिराच्या रोजच्या खर्चासाठी सरखेल आंग्रे यांनी कुलाबा गाव इनाम दिला. 

पुणे निजामाने उध्वस्त करू नये म्हणून तुळशीबागवाल्यांनी निजामाला दीड लाख रुपये खंडणी 1763 साली देऊ केली. पण तरीही निजामाने सूडाची भावना मनी घेऊन पुणे पूर्ण जाळले. ती घटना स्वारीवर असलेल्या थोरल्या माधवराव पेशव्यांना समजताच त्यांनी निजामाच्या राजधानीत घुसून निजामाची पळता भुई थोडी केली. पुण्यात परतल्यावर पेशव्यांना पुण्याची अवस्था पाहवली नाही. त्यांनी लगेच तुळशीबागवाले यांना -murti‘मुख्य नगर रचनाकार’ हे पद देऊन शहराच्या अवस्थेस सुधारण्याची आज्ञा दिली. तुळशीबागवाल्यांनी काही वर्षांतच पुणे शहर सुंदर रीतीने वसवले. त्यांचा थोरल्या माधवराव पेशव्यांवर विशेष जीव होता. त्यांचे थेऊर मुक्कामी निधन झाल्याने तुळशीबागवाले खचून गेले. तरी ते त्यांची सुभेदारी सांभाळत. त्यांनी नारायणरावांच्या वधानंतरही पुण्याची नाकाबंदी तात्काळ करून गारद्यांपासून पुणे वाचवले. शनिवारवाड्यावर खडे पहारे ठेवले. श्रीमंत नारायणरावांच्या पत्नी गंगाबाईसाहेब यांना पुरंदर किल्ल्यावर सुखरूप हलवले. तुळशीबागवाल्यांनी गंगाबार्इंच्या नावे पेशवाईचा कारभार सुरू झाल्यावर त्यांच्या नावाची द्वाही पूर्ण पुण्यात फिरवली. मार्च 1775 साली वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी नारो आप्पाजी खिरे ऊर्फ तुळशीबागवाले यांचे पुण्यात देहावसान झाले. राममंदिराचे बांधकाम त्यांच्या मृत्यूनंतरही तब्बल वीस वर्षें चालले. तसे, एका पोवाड्यात वर्णन आहे, श्रीरामाच्या मुर्ती तुळशीबागेमध्ये कशा रमल्या। ज्याला त्याला पावती श्रीमंतांच्या मनामध्ये भरल्या।।

नारो आप्पाजी खिरे यांचे वर्णन एका श्लोकात खुबीने केले गेले आहे….
जयाने स्वशौर्ये पुणें रक्षियेलें।
जयें पुण्यनगरी सह भूषविलें।
तशी मंदिरीं स्थापिलीं राममुर्ती।
अशी पंत नारो खिरे ख्यात किर्ती।।

– (संकलित)

About Post Author

2 COMMENTS

  1. Naro Appaji KHIRE. Great…
    Naro Appaji KHIRE. Great Peshava Sardar great RAM BHALGAT. THIS IS FIRST RAM MANDIR IN PUNE. AND SMLL MARKET ALSO THEAR.

Comments are closed.