नाटककार-संपादक विद्याधर गोखले

1
296

विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीचे 2024 हे वर्ष आहे. 1960 ते 1980 ही दोन दशके मराठी संगीत नाटक म्हणजे विद्याधर गोखले असे जणू समीकरणच होते. मराठी संगीत नाटक ही मराठी संस्कृतीलाच नव्हे तर जागतिक रंगभूमीला असलेली देणगी आहे. विष्णुदास भावे आणि अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी सुरू केलेला हा वारसा 1960 सालच्या सुमारास मरगळीला आला होता. त्यात विद्याधर गोखले यांनी त्यांच्या ‘पंडितराज जगन्नाथ’ नाटकाने उभारी आणली आणि पुढील दोन दशके विद्याधर गोखले यांनी मराठी रंगभूमी गाजवली.

विद्याधर गोखले यांचा जन्म 4 जानेवारी 1924 रोजी विदर्भातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील संभाजीराव गोखले हे ब्रिटिश आधिपत्याखालील भारताच्या ‘मध्य प्रांता’च्या काँग्रेस मंत्रिमंडळात मजूर मंत्री होते. विद्याधर गोखले यांचे शालेय शिक्षण आणि त्यानंतरचे पदवीपर्यंतचे शिक्षण अमरावती येथे झाले. विद्याधर गोखले यांनी संस्कृत आणि मराठी या दोन विषयांत एम ए पदवी मिळवली. संभाजीरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांचा विद्याधर गोखले यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्याचबरोबर अमरावतीमधील नाटककार आणि स्वातंत्र्यसैनिक वीर वामनराव जोशी यांच्या लेखनाचाही विद्याधर गोखले यांच्यावर प्रभाव होता. वीर वामनराव जोशी आणि अमरावतीतील इतर दिग्गजांच्या सहवासात विद्याधर गोखले यांनी वक्तृत्वकलेवरही प्रभुत्व मिळवले. त्याच काळात त्यांनी उर्दूचादेखील अभ्यास केला. त्यांना पुढील काळात संस्कृत, उर्दू आणि मराठी या भाषांवरील प्रभुत्व अतिशय उपयोगी झाले.

गोखले पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर, 1944 मध्ये मुंबई येथे आले. त्यांनी मुंबईतील जनरल एज्युकेशन सोसायटीच्या कुर्ला येथील शाळेत इंग्रजी, मराठी आणि संस्कृत विषयाचे अध्यापन काही वर्षे केले. त्यांची शिकवण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यासोबतचे प्रेम यामुळे ते अल्पावधीतच विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले. 

पुढे शिक्षकी पेशाचा त्याग करून गोखले यांनी ‘दैनिक लोकसत्ता’मध्ये नोकरी पत्करली. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे ‘लोकसत्ता’मध्ये काम करून पत्रकारितेमधील कारकीर्द गाजवली. त्यांनी ‘लोकसत्ता’मध्ये संपादक म्हणूनही जवळजवळ पाच वर्षे काम केले. त्यांनी चालवलेली ‘रविवार लोकसत्ता’ पुरवणी खूपच गाजली. लोक रविवार लोकसत्ता पुरवणीची आतुरतेने वाट बघत. त्या काळात ‘लोकसत्ता’मध्ये झालेला कामगार संप गोखले यांनी अतिशय शिताफीने हाताळला आणि वर्तमानपत्र पूर्वपदावर आणले. पत्रकारिता कौशल्यात; तसेच, वक्तृत्व कौशल्यवृद्धीत आपण प्र.के. अत्रे यांच्याकडून बरेच काही शिकलो असे गोखले आवर्जून सांगत.

विद्याधर गोखले ऊर्फ ‘अण्णा’ यांची समाजाला खरी ओळख त्यांच्या नाट्य लेखनातून झाली. अण्णांनी पत्रकारिता करत असताना नाट्यलेखनाला सुरुवात केली. अण्णांनी मरगळ आलेल्या मराठी रंगभूमीला नवीन संजीवनी देण्याचे अतुलनीय काम केले. अण्णांनी 1960 ते 1983 या काळात अठरा नाटके आणि सहासष्ट नाट्यगीते लिहिली. त्यांची ऐतिहासिक,  पौराणिक,  सामाजिक अशा अनेक विषयांवर लिहिलेली नाटके प्रचंड गाजली. त्यांची संगीत नाटके आणि त्यातील नाट्यपदे यांची मोहिनी मराठी मनावर तरळत आहे. 

अण्णांची अत्यंत गाजलेली नाटके म्हणजे संगीत सुवर्णतुला (1960), पंडित राज जगन्नाथ (1960), मंदार माला (1963), मदनाची मंजिरी (1965), जय जय गौरीशंकर (1966), स्वर सम्राज्ञी (1973) बावन्न खणी (1983), जावयाचे बंड, चमकला ध्रुवाचा तारा इत्यादी. अण्णांनी लिहिलेली अनेक नाट्यपदे अजरामर झाली आहेत. आजही ही नाट्यगीते पुन्हा पुन्हा गायली जातात आणि आवडीने ऐकली जातात. काही गाजलेल्या नाट्यपदांचा उल्लेख येथे आवर्जून करणे आवश्यक आहे- “जय गंगे भागीरथी”, “जय शंकरा गंगाधारा”, “जयोस्तुते हे उषा देवते”, “नयन तुझे जादुगार”, “नारायणा रामा रमणा”, “भरे मनात सुंदरा”, “मदनाची मंजिरी साजिरी”, “ऋतुराज आज वनी आला”. 

अण्णांमधील कलागुणांने आणि त्यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी अनेक मित्र आणि गुणी सहयोगी मिळवले. अण्णांना नाट्क्षेत्रात वसंत देसाई, छोटा गंधर्व, राम मराठे, प्रभाकर भालेराव, निळकंठ अभ्यंकर, यशवंत देव यांसारख्या दिग्गज संगीतकारांची साथ मिळाली. केशवराव दाते यांच्यासारखे गुरु मिळाले. अण्णांनी ‘रंगशारदा’ संस्थेची स्थापना केली आणि मराठी रंगभूमीची मनोभावे सेवा केली. अण्णांनी सातारा येथे 1993 मध्ये झालेल्या ‘मराठी साहित्यसंमेलना’चे अध्यक्षपद भूषवले.

अण्णांना लहानपणापासूनच वक्तृत्व कला अवगत होती. त्यात त्यांनी प्र.के. अत्रे यांच्या भाषणशैलीचा अभ्यास करून त्यावर प्रभुत्व मिळवले. विषयाचा गाभा न सोडता ओघवत्या वाणीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत. समोरचा श्रोतागण पाहून भाषणशैलीत बदल करणे ही त्यांची खासीयत होती. 

अण्णांनी मराठी रंगभूमीच्या यशस्वी वाटचालीनंतर राजकारणात देखील नाव संपादन केले. अण्णांचा पिंड हिंदू धर्म अभिमानी. ते अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. राजकारणात त्यांचे पदार्पण योगायोगाने झाले. 1989 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दादर मतदार संघासाठी योग्य उमेदवाराच्या शोधात होते. त्यांना अण्णा योग्य उमेदवार वाटले. त्यांनी अण्णांना बोलावून घेतले आणि त्यांचा मानस व्यक्त केला. अण्णांनी विनंती मान्य केली आणि दादर मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली. त्यात ते विजयीदेखील झाले आणि त्यांनी लोकसभेत शिवसेनेचे प्रतिनिधीत्व केले. अण्णांचे बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब देवरस, अटलबिहारी वाजपेयी इत्यादी मान्यवर व्यक्तींबरोबर सलोख्याचे संबंध होते.

निवडणुकीच्या खर्चासाठी शिवसेनेने अण्णांना निधी उपलब्ध करून दिला होता. निवडणूक संपल्यावर अण्णांनी बाळासाहेबांना सर्व पैसे परत केले. अण्णा म्हणाले, “मला काही खर्च आलाच नाही. तुमच्याच लोकांनी सर्व खर्च केला”हे ऐकून बाळासाहेब म्हणाले, “असा माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. लोक निवडणुकांच्या वेळी अधिकचे पैसे मागायला येतात. हे तर उलटेच !”. अण्णांना पैशांचे काही पडलेले नसायचे.

अशा या बहुआयामी व्यक्तीचे 26 सप्टेंबर 1996 रोजी निधन झाले. विद्याधर गोखले या ऐहिक जगातून गेले तरी त्यांच्या लेखणीने मराठी रंगभूमीवर आणि परिणामी मराठी संस्कृतीवर कायमचा ठसा उमटवून ठेवला आहे.

विद्याधर गोखले यांना चार मुले (दोन मुलगे व दोन मुली) – मृणालिनी दातार व शुभदा दादरकर या मुली आणि विजय गोखले तसेच संजय गोखले हे मुलगे. पुत्र विजय गोखले हे विनोदी नट आहेत. विजय यांचा मुलगा आशुतोष गोखले अभिनेता आहे. अण्णांचे नातू (शुभदा दादरकर यांचे मुलगे) ओंकार दादरकर हेदेखील एक नामवंत गायक तर अद्वैत दादरकर हे अभिनेते म्हणून प्रसिद्धीस आले आहेत. 

गिरीश घाटे 9820146432 ghategp@gmail.com

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here