गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ विंदा करंदीकर (Vinda Karandikar)

0
423

मराठीतल्या मोजक्याच ज्ञानपीठ विजेत्यांपैकी असलेल्या विंदा करंदीकर यांचे साहित्यिक कर्तृत्व मोठे आहे. अमृतानुभवापासून ते नवकवितेपर्यंत त्यांची प्रतिभा आणि लेखणी लीलया फिरली आहे. त्यांनी कवितेच्या आशयामध्ये आणि रूपबंधांमध्ये अनेक प्रयोग केले. जबाबदारीच्या भावनेतून, मराठीच्या अभ्यासकांसाठी भाषांतरे केली.

अशा या चतुरस्त्र साहित्यिकाची 14 मार्च रोजी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने सोलापूर येथे राहाणाऱ्या, विंदांच्या साहित्याच्या अभ्यासक, डॉ. गीता जोशी यांनी विदांच्या साहित्याचा धावता आढावा घेतला आहे.  मराठी साहित्याच्या वाचकाला विंदांची ओळख करून देण्याची आवश्यकता नाही हे खरेच, तरीही या लेखातून त्यांना अधिकचे काही सापडेल अशी अपेक्षा आहे.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

– सुनंदा भोसेकर

गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ विंदा करंदीकर (23ऑगस्ट 1918 – 14 मार्च 2010)

‘मी’च्या वेलांटीचा सुटो सुटो फास; जीव कासावीस सत्यासाठी

तत्त्व आणि काव्य, तरलता आणि विचारवैभव यांचा मेळ म्हणजे करंदीकर ! ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले कुसुमाग्रज यांनी प्रवर्तित केलेल्या ‘जनस्थान पुरस्कारा’ने विंदा करंदीकर यांनाही सन्मानित करण्यात आले होते. त्या गोविंद विनायक करंदीकर म्हणजेच विंदा करंदीकर यांनाही पुढे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. आधीही, त्यांना अनेक मानसन्मान, राजमान्यता, लोकमान्यता मिळाली होती. त्यांच्या कवितांची इंग्रजीतून भाषांतरे झाली. सर्व अर्थाने कृतार्थ अशा करंदीकर यांना प्रश्न विचारला होता, की  ‘अजून काही मिळवायचं बाकी आहे असं वाटतं का? जे करावंसं वाटत होतं, पण करता आलं नाही असं तुमच्या काव्यजीवनात काही घडलेलं आहे का?’ करंदीकर यांनी दिलेलं उत्तर कलावंत, ज्ञानवंत, रसिकांपर्यंत पोचावे. शुद्ध, निखळ असे हे एका प्रज्ञावान प्रतिभावंताचे चिंतन आहे. यामध्ये तत्त्वचिंतक, प्रतिभावंतांना करंदीकर यांनी त्यांच्या कोकणी बाण्याने, हातचे काहीही न राखता केलेले आवाहनही आहे.

” ….म्हणजे माझ्या पराभवाचा कबुलीजबाब तुम्हाला पाहिजे तर. ठीक आहे, सांगतो. जातक या शीर्षकाच्या एक महाकाव्यप्राय दीर्घ रचनेचा संकल्प मी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी केला होता. बुद्धाशी संबंध असलेल्या जातककथांच्या वाचनाने मला तो संकल्प सुचला होता. बोधिसत्त्व हा अनेक पूर्वजन्मांतील अनुभवाने समृद्ध होत होत शेवटी बुद्ध या परिपक्व व अंतिम अवस्थेला पोचला अशी बौद्ध धर्मीयांची कल्पना आहे. पण माझी संकल्पना वेगळी होती. मानवी जीवन हे प्रथमपासूनच इतके विविध, व्यामिश्र व विकसनशील आहे, की बुद्ध ही अंतिम अवस्था असूच शकत नाही. खरे म्हणजे अंतिम अवस्था ही संकल्पनाच चुकीची आहे. (येथे त्यांच्या अभंगातील ओळी पहा: ‘गतीच्या अनंती स्थितीचा आभास/घटनेचा ऱ्हास क्षणोक्षणी.’)

“मानवी जीवनाच्या आणि विश्वाविषयीच्या स्वरूपाचा व त्याच्याशी निगडित असलेल्या मूल्यांचा शोध हा कधीही न संपणारा असा एक प्रवास आहे. ती एक अनंताची महायात्रा आहे. इतर अनेक शोधकांप्रमाणेच या यात्रेतील बुद्ध हाही एक दीपस्तंभच! ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रात मौलिक भर घालणारे सॉक्रेटिस, कांट, विड्गेस्टाईन यांच्यासारखे तत्त्वज्ञ किंवा डार्विन, आईन्स्टाईन, फ्रॉईड, मार्क्स यांच्यासारखे विचारवंत किंवा ख्रिस्त, महात्मा गांधी यांच्यासारखे महापुरुष किंवा व्यास, शेक्सपियर, टॉलस्टॉय यांच्यासारखे प्रतिभावंत हे सर्व या महायात्रेतील निरनिराळ्या टप्प्यांवर निरनिराळ्या प्रकारचा प्रकाश देणारे दीपस्तंभच आहेत. एका परीने हे सर्व बुद्धाने घेतलेले पुनर्जन्मच म्हणायला हवेत, आणि भविष्यकाळातही या अर्थाने त्यांचे पुनर्जन्म होतच राहणार. बौद्ध जातककथांमध्ये बुद्धाच्या पुनर्जन्मातील सुट्या सुट्या कथा येतात. मी संकल्प केलेल्या जातकात बुद्धाच्या या पुनर्जन्मांचे विकसनशील दर्शन घडायचे होते. नदीच्या एका तीरावर मी उभा आहे आणि पलीकडच्या तीरावर कालपुरुष उभा आहे, आणि तो हे सर्व निवेदन करतो आहे अशी सुरुवात होते. पण पाचसात पानांच्या पुढे संकल्प सरकतच नव्हता. हे जातकाचं भूत माझ्या मानेवर पंचवीस, तीस वर्ष बसलेलं होतं.

“या पराभवासंबंधात अनेक वेळा आत्मशोधन करण्याचा मी प्रयत्न केला, त्यात हाती लागलं ते एवढंच, की आवश्यक तो व्यासंग, करण्याची जिद्द त्यावेळी तरी होती, माझी प्रतिभा त्यातील भाववाहक व चिंतनात्मक आशयाला पेलू शकत होती. पण अशा प्रकारच्या महाकाव्य निर्मितीला आवश्यक असलेली निवेदनात्मक शैली माझ्याजवळ नव्हती. असं वाटतं की नवकाव्याच्या ध्यासात आम्ही काही कमावलं तसंच आम्ही काही गमावलंही. असो, अजूनही मला हा विषय एखाद्या समर्थ तत्त्वचिंतक प्रतिभावंतानं हाताळावा असं वाटतं. त्याबद्दलची रुखरुख किंवा सुखदुःख हे आता संपलंय. या अनुभवातून गेल्यानं थोडं आत्मज्ञान झालं, असं समजुया.”

विंदा करंदीकरांची स्वतःच्या पराभवाची अशी ही कबुली. विंदाच्या आत्मज्ञानातील काही कवडसे आपल्याला अनेक आततायी अभंगातून पडलेले दिसतात. ‘सदगुरूवाचोनी सापडेल सोय/तेव्हा जन्म होय धन्य धन्य…’ असे म्हणत कालचक्रातील प्रज्ञावंत प्रतिभेचेच गीत गातात.

“करितो आदरे सद्गुरु स्तवन / ज्याने सत्य ज्ञान वाढविले.
धन्य पायथागोरस धन्य तो न्यूटन / धन्य आईन्स्टीन ब्रम्हवेत्ता.
धन्य पाश्चर आणि धन्य मारी क्यूरी / थोर धन्वंतरी मृत्युंजय
धन्य फ्रॉईड आणि धन्य तो डार्विन / ज्यांनी आत्मज्ञान दिले आम्हा
धन्य धन्य मार्क्स दलितांचा त्राता / इतिहासाचा गुंता सोडवी जो
धन्य शेक्सपियर धन्य कालिदास / धन्य होमर व्यास भावद्रष्टे
फॅरेडे मार्कोनी वॅट राईट धन्य, / धन्य सारे अन्य स्वयंसिद्ध
धन्य धन्य सारे धन्य धन्य मीही / सामान्यांना काही अर्थ आहे
सद्गुरूच्यापाशी एक हे मागणे / भक्तिभाव नेणे ऐसे होवो
सद्गुरुनी द्यावे दासा एक दान / दासाचे दासपण नष्ट होवो
सद्गुरुवाचूनी सापडेल सोय / तेव्हा जन्म होय, धन्य! धन्य!’

करंदीकर यांचे सारे तत्त्वज्ञान या एका अभंगातून उतरले आहे असे वाटते. एकूणच त्यांचे ‘आततायी अभंग’ हा त्यांनी केलेल्या तत्त्वचिंतनाचा आरसा आहे. करंदीकरांचे यश मोठे तसे त्यांच्या अपयशाचा सलही मोठा. करंदीकर म्हणत, ‘सराईत यशापेक्षा प्रायोगिक अपयश हे जास्त तेजस्वी असतं.’ त्यांनी तालचित्रे, सूक्ते, अभंग, ओवी, मुक्तसुनीते, विरूपिका, बालगीते असे काव्याचे अनेक पोत वेगवेगळ्या भावअभिव्यक्तीसाठी वापरून बघितले. सगळेच काही मान्यता पावले नाहीत. त्यांच्या अशा देदीप्यमान पराभवाची थोर कबुली देण्याचा प्रसंग श्री.ना. पेंडसेही सांगतात…. ‘शिकागोच्या त्याच्या वास्तव्यात त्याला कादंबरीची एक चांगली कल्पना सुचली. ‘एका शिंगाचा बैल’ या कादंबरीची बासष्ट पानं लिहून झाली. पण माणसं जिवंत होत नाहीत हे लक्षात येताच त्यानं लेखन थांबवलं. पत्रात त्याने मला कादंबरीचा आराखडा लिहिला. खास त्याच्या बाजातलं ते लेखन होतं. शेवटी लिहिलेलं…’ अखेरीस ज्ञान भेटले. खरा कादंबरीकार गोखलेवाडीत राहतो.’

गोखलेवाडीत राहणारे कादंबरीकार म्हणजेच श्री.ना. पेंडसे. पेंडसे पुढे म्हणतात, ‘वास्तविक विंदा करंदीकर कादंबरीकार व्हायला हवा होता. म्हणजे प्रादेशिक अनुभवाचे गाठोडे त्याच्याकडे आहे. पोंबुर्ल्यात लहानपणी वडिलांबरोबर तो शेतात राबलाय. कापणी, मळणी, सगळी शेतीची कामं त्यानं स्वतः केलेली आहेत. आंब्या-फणसावर चढलेला आहे. एवढंच काय सापसुद्धा मारलेत. रंगात आला की पोंबुर्ल्याच्या आठवणी सांगतो. तेथील भाषेत… ब्राह्मणांच्या, कुणब्यांच्या भाषेत. त्या नकला त्याला छान करता येतात. पोंबुर्ल्यातील खाडीकाठ, येथील रंग आमच्यापेक्षा वेगळे.’ अशा त्यांच्या आठवणी येतात.  

करंदीकरांचं जे कोकण आहे ते त्यांच्या कविता, लघुनिबंधांतून घर करून आहे. विशेषत: कोकणातले घर. त्यानंतर रत्नागिरी, कागल, बागलकोट, डोंबिवली, मुंबईतले त्यांचे बेडेकर सदन; अशा बिऱ्हाडांतून त्यांचे वास्तव्य झाले. तिथे राहताना एक घर सतत त्यांच्याबरोबर होते ते म्हणजे कोकणातले घर. ते अगदी त्यांच्या विरुपिकांपर्यंत येते. हन्नेरी हुन्नेरीचे तोरण, ब्रह्मदेवाची घाटी, आड्यातला बुरंबुळा खणून देणारा भांब्या गुरव, बुरंबुळा म्हणजे एक प्रकारचा कंद, जो खाण्यासाठी खणून काढावा लागतो… असे बरेच काही, ‘स्वेदगंगे’पासून ते ‘विरूपिके’पर्यंत ठाई ठाई डोकावते. लहान वयातल्या पछाडणाऱ्या आठवणी त्यांच्या ‘स्पर्शाची पालवी’, ‘आकाशाचा अर्थ’ यांसारख्या अनेक लघुनिबंधांतून डोकावतात. शेतकऱ्यांच्या अतोनात कष्टांचा, हरिजन आणि स्त्रिया यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा उद्गार त्यांच्या शब्दाशब्दांतून येतो.

त्यांची भागू मावशी दहा वर्षांची असतानाच विधवा, विकेशा झाली. ते म्हणतात, ‘रात्री आई आणि मावशी बोलतानाचे शब्द, त्या वेळच्या त्या दहा वर्षाच्या झोपलेल्या मुलाच्या कानावर पडतात. ”शहाण्यासुरत्या पूर्वजांनी ठरवलं ते आमच्या हितासाठीच असणार गो. पण आंबे, पण हे काम त्यांनी आम्हाला बायकांनाच नको होतं का गं शिकवायला?” संवेदनशील जीवनदृष्टी देणाऱ्या अशा अनेक अनुभवांनी भारलेले करंदीकर म्हणतात, “असहाय्य दाहकतेने दाटलेले इतके शांत, समजूतदार शब्द मी पुन्हा कधीच ऐकले नाहीत. तिच्या बोलण्यात तक्रार नव्हती, फक्त एवढा विवेक तिला समाजाकडून हवा होता, की विद्रूपीकरण पुरुषांच्या हातून व्हायला नको  होतं.”

करंदीकर यांचे वडील… त्यांना दादा म्हणत, ते कडक सावरकरवादी आणि तत्त्वनिष्ठ. हा असला तत्त्वनिष्ठपणा करंदीकरांकडेसुद्धा वडिलांकडून वारशानेच आलेला दिसतो. अस्पृश्यांचा कैवार घेतला तेव्हा दादांच्या घरावर गावकऱ्यांची अवकृपा झाली. ग्रामण्य पडले. पण पडवीत शिरलेल्या वाघाला कोयत्याने मारणारे त्यांचे दादा… तितकेच सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ आणि दलितोद्धाराच्या व्रताशी एकनिष्ठ असणारे त्यांचे वडील माघार थोडीच घेणार?

करंदीकरांच्या व्यक्तित्वाशी, अस्तित्वाशी; त्यांच्या साहित्याचा मूलस्रोत उगम पावतो. त्यांचे साहित्य आणि आयुष्य पक्के पिळदार सुंभासारखे कणखर आहे. त्यांना जे पटले, जे लिहिण्यात त्यांना आनंद मिळाला तेवढेच त्यांनी लिहिले. ‘महाराचं रक्त’ नावाची कथा लिहिण्याचाही त्यांनी एक असफल प्रयत्न केला. पण कथा-कादंबरीकार हा प्राणी वेगळा असतो याची त्यांना जाणीव झाली. कथा किंवा कादंबरी लेखनात कलावंताला स्वतःपेक्षा वेगळ्या जगात, वेगळ्या व्यक्तिमत्त्वात शिरावे लागते. त्यातील  पात्रांच्या बुद्धीने, त्या पात्रांच्या डोळ्यांनी तिथले जग साकारावे लागते. त्या पात्रांचा स्वभाव-सवयींच्या आधीन व्हावे लागते. करंदीकर स्वतःपासून दूर जाऊन त्रयस्थपणे स्वतःकडे बघतीलही. स्वतःचे मूल्यमापनही परखड शब्दांत करतील. पण दुसऱ्याच ‘स्व’ मध्ये डेरेदाखल होणे करंदीकरांच्या व्यक्तिमत्त्वाला परकेपणाचे वाटले असावे. त्यांचा स्वभाव म्हणजे, ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’! अशा, स्वतःच्याच व्यक्तित्वाला अलवार स्पर्शाने सोलत करंदीकरांचे शब्द कधी कविता बनतात, तर कधी आणखी काही. एका मुक्त सुनीतात ते म्हणतात, ‘या निष्पर्ण वृक्षाची सावली जरी पडली माझ्या शरीरावर / तरी शरीराला फुटतील पाने फक्त फणसाची / याची नव्हती मला कल्पना / नव्हती कल्पना चावरा वारा बसेल सांगत मोहराच्याच बातम्या / किती कठीण परदेशात पोहोचणे… /’ परदेशात गेल्यानंतरच्या या त्यांच्या आठवणी आहेत. ‘उंबरठ्याला फुटलेली मथुरेची पायवाट असते न संपणारी / अटलांटिक ओलांडूनही.’

करंदीकरांचं स्वप्न म्हणजे ‘मानवाचे अंती एक गोत्र’… या चरम स्थितीला पोचण्यासाठी करंदीकर सावरकरांपासून ते पुढे साम्यवादापर्यंत प्रवास करतात. अनेक वादांना वळसे घालतात. तत्त्वज्ञानात तर ‘अहो ज्ञानेश्वर…’ म्हणून अमृतानुभवाचे अर्वाचीनीकरण करतात. अष्टदर्शनांमध्ये ओवी छंदातून पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या विचारसरणींचा  परिचय करून देतात. एवढे सगळे फिरल्यानंतर पुन्हा ते ‘क्रांती वगैरे’ यासारख्या मिताक्षरी विरूपिकेत  म्हणतात, ‘छत्री शिवण्याचा उपक्रम मी हाती घेतलेला / आणि तेवढ्यात घनघोर पावसातून भिजत आलेले / तीन विद्रोही / माझ्यापुढे दत्त! / मी त्यांना स्पष्ट सांगितलं / क्रांती वगैरे कशालाच माझी ना नाही / पण त्याआधी माझी छत्री मला शिवावीच लागेल.’ 

कोणतेही तत्त्वज्ञान किंवा कोणताही ईझम हे अंतिम उत्तर असू शकत नाही. काळ बदलत राहतो आणि त्या त्या काळातील प्रश्नांसोबत प्रत्येक वेळी नवे पर्याय हे ज्याचे त्यांनाच शोधावे लागतात. म्हणजेच ‘माझी छत्री मला शिवावीच लागेल.’ करंदीकरांचे विचार वेगळ्याच अभिव्यक्तीच्या माध्यमातून, विरूपिकेतून ते मांडतात. नेमक्या शब्दांतून, लक्षणा किंवा व्यंजना यासारख्या शब्दशक्तींच्या आधाराने शब्दांच्या पलीकडे जाणारे करंदीकर कोठल्याही तत्त्वज्ञानाचा आव न आणता सत्य मांडत जातात.

करंदीकरांच्या आवेशपूर्ण शब्दांतील साम्यवादाचा उद्गार रसिकांना स्फूरण देऊन गेला. ‘माझ्या मना बन दगड’ किंवा ‘जनता अमर आहे’ यांसारख्या कविता असतील. ‘धोंड्या न्हावी’, ‘सरोज नवानगरवाली’, ‘बकी’ सारखी वेश्या असेल, ‘मथुआते’ असेल- अशा अनेक व्यक्तिरेखांच्या दुःखाचे गारुड वाचकांचे डोळे विस्फारणारे ठरले. ‘माझी प्रेमकविता म्हणजे वासनाकाव्य आहे’ म्हणत त्यांच्या गझलरचना, सूक्तरचना अशा कवितांनी तरलता आणि तत्त्वज्ञान, दोन्ही पेलले. करंदीकरांचे व्यक्तिमत्त्व, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्या पुरस्कारांच्या रकमांचे करंदीकरांनी केलेले दान याबद्दलही बराच बोलबाला झाला. पण त्याही पलीकडे त्यांनी केलेली भाषांतरे हे मोठे काम आहे. ‘पोएटिक्स’चं केलेले ‘अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र’, ‘राजा लियर’ हे शेक्सपियरच्या किंग लियरचे शब्दशः केलेले भाषांतर, त्याला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना असेल किंवा ‘अहो ज्ञानेश्वर…’ म्हणत ज्ञानेश्वरांना लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून, त्यांनी अर्वाचीनीकरण केलेल्या ‘अमृतानुभवा’ची प्रस्तावना, हे दोन्ही तर उत्कृष्ट शोधनिबंध आहेत. यासाठीचा त्यांचा व्यासंग, त्यावेळी प्रत्येक विषयासाठी घेतलेले दोन दोन – तीन तीन वर्षांचे कष्ट… हे केवळ त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केलेले काम आहे. एवढेच नव्हे, इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांना ती स्वतःची जबाबदारी वाटत होती.

विंदांच्या एकेका कवितेवर एकेक लेख होईल इतकी त्यांची कविता संपृक्त आहे. कवितेविषयी आणि त्यांच्या इतर साहित्य सेवेविषयी लिहिण्यासारखे खूप आहे. एका लेखाच्या मर्यादेत धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. 14 मार्च रोजी येणाऱ्या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन!

संदर्भ: लेणे प्रतिभेचे – डॉ. गीता जोशी, 2. संवाद – डॉ. विजया राजाध्यक्ष

– डॉ. गीता जोशी 9423590013 Drgeetajoshi59@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here