Home कला अभिवाचन नव्या प्रबोधनाचे साक्षीदार (Witness the New Enlightenment)

नव्या प्रबोधनाचे साक्षीदार (Witness the New Enlightenment)

0

डोंबिवली ग्रंथ संग्रहालय गेल्या काही वर्षांत पुन्हा चैतन्यमय झाले; तेथे अनेक उपक्रम होऊ लागले, वाचकांची वर्दळ वाढली. सुधीर बडे यांच्या नेतृत्वाखाली काही ज्येष्ठ नागरिकांनी या वाचनालयास आकार प्राप्त करून दिला. एका छोट्या खोलीपुरते उरलेले वाचनालय इमारतीच्या पूर्ण मजल्यावर पसरले. वाचकांची वर्दळ वाढली. महाराष्ट्रात ग्रंथालयांची दीडशे वर्षांची परंपरा आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या आणि महत्त्वाच्या तालुक्याच्या ठिकाणी वाचनालयाची जुनी, मोठी इमारत असते. तेथे परंपरानिष्ठ नित्यनियमाने पुस्तके बदलून नेत असतात. गावातील काही मोकळे लोक वर्तमानपत्रे चाळत बसलेले असतात. सेवकवर्ग या वाचकांना नियमावलीप्रमाणे सेवा पुरवून उत्साहाने रजिस्टरे भरत असतो आणि पदाधिकारी त्यांच्यावर आलेली जबाबदारी कार्यनिष्ठेने पार पाडत असतात. त्यातून वार्षिक व्याख्यानमाला घडत असतात. स्मरणदिवस ‘साजरे’ होतात. सरस्वती पूजनादी परंपरा सांभाळल्या जातात, परंतु गावातली एकेकाळची गजबजलेली ही ठिकाणे उदास भासतात, बृद्ध जाणवतात. तेथे चैतन्य नसते, तारुण्याची सळसळ जाणवत नाही.

दादरचे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय. मराठीतील जवळजवळ प्रत्येक पुस्तक तेथे पाहायला मिळते. संदर्भ विभाग चोख आहे. सेवक तत्पर आहेत. पदाधिकारी वातावरणात साज आणायच्या प्रयत्नात असतात. परंतु संग्रहालयाचा कट्टा म्हणून एकेकाळी असलेली या वास्तूची महती केव्हाच हरपली आहे ! ‘काही नाही तर कट्ट्यावर चल’ ही वृत्ती लोप पावली आहे. या कट्ट्यावरच नारायण सुर्वे मोठे झाले. त्यांची प्रागतिक लेखक सभा उदयास आली व तिचे संवर्धन झाले.

राजा राममोहन रॉय प्रतिष्ठान व सरकार यांच्या देणग्यांमधून ग्रंथालयांना सुगीचे दिवस आले आहेत. जागा जुन्या असल्यामुळे ‘रिअल इस्टेट’चा भाव वधारला आहे, परंतु तेथील उपक्रमशीलता लोपली आहे. गावच्या सांस्कृतिक जगाचे व्यासपीठ म्हणून असलेला त्यांचा लौकिक नाहीसा झाला आहे. गावच्या संस्कृतीचे हे केंद्र नागरिक व वाचक तिकडे ओढला जात नसल्याने ‘बाजूला’ पडले आहे.

डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यकर्त्यांनी हे वातावरण बदलण्याचा चंग बांधला. त्यांनी व ‘ग्रंथाली’ यांनी मिळून गावोगाव ग्रंथालय मित्र मंडळे निर्माण व्हावी असा प्रयत्न सुरू केला. त्यातून महाराष्ट्रव्यापी बैठक झाली. तिला स्वखर्चाने, दिवसभराची फी देऊन सव्वाशेहून अधिक ग्रंथालयप्रेमी आले. तेथे ध्यास व्यक्त झाला. तो ग्रंथालयांच्या आधुनिकीकरणाचा. तसे तर अनेक ग्रंथालयांत संगणकादी आधुनिक साधने असतात; पुस्तकांची रजिस्टरे, आवकजावक नोंद अत्याधुनिक पद्धतीची असते. कार्यकर्ते अधिकाधिक अनुदान मिळवण्याच्या व त्यातून पारंपरिक उपक्रम निष्ठेने चालवण्याच्या प्रयत्नात दिसतात. पण मग गाडे बिघडते कुठे? नागरिक या वास्तूकडे का पाठ फिरवतात? याबाबत बैठकीत विचार झाला. त्याआधारे बडे यांनी एक ‘व्हिज्युअल प्रेझेंटेशन’ तयार केले आहे. प्रत्येक गावचे ग्रंथालय लोकाभिमुख करण्याचा, तेथील नागरिकांना संपन्नतेचे धडे देण्याचा एकच एक मार्ग असणार नाही, तथापि या ‘गावोगाव ग्रंथालय मित्रमंडळा’च्या कल्पनेतच ती वैशिष्टयपूर्णता व प्रत्येक गावचे वेगळेपण जपले जाते. ग्रंथालय मित्रमंडळाच्या प्रयत्नांमधून त्या गावच्या ग्रंथालयात मूलत: बदल घडून यावा अशी कल्पना आहे. त्यामुळे लोकांना ग्रंथालये म्हणजे केवळ पुस्तके साठवण्याची जागा असे न वाटता सीडी-ड़ीव्हीडी-व्हीसीडी-इंटरनेट अशी आधुनिक मनोरंजनाची व ज्ञानजिज्ञासेची साधने उपलब्ध होतील. बालके-स्त्रिया-पुरुष यांच्या वेगवेगळ्या गरजा जाणून त्यानुसार त-हत-हेचे उपक्रम, छंदवर्ग, अभ्यासवर्ग आखले जातील. ग्रंथालय म्हणजे गावचे संस्कृति केंद्र बनेल.

भारतीय परंपरेत मंदिरे ही मूलत: त्या गावची ज्ञानकेंद्रे होती असे सांगतात. कालौघात त्यांना मूर्तिपूजेची ठिकाणे, भाविकता व्यक्त करण्याच्या जागा एवढेच स्थान प्राप्त झाले आणि त्यामधील ज्ञानजिज्ञासेचा अंश संपून गेला. ग्रंथालयांचे बदललेल्या परिस्थितीत तसे होऊ नये हा ग्रंथालय मित्रमंडळाचा ध्यास असणार आहे.

हा खटाटोप कशासाठी? असे कोणाच्या मनात आले तर त्याचे उत्तर गेल्या चाळीस वर्षांच्या बदलामध्ये आढळेल. सभोवताली शांतपणे पाहिले तर या चार दशकांत दुनिया उलटीपालटी झाल्याचे जाणवेल. मुळात, मराठीपुरते बोलायचे तर पुस्तकांचा शोध दोनशे वर्षांपूर्वीचा. पहिले मराठी वर्तमानपत्र, बाळशास्त्री जांभेकरांचे ‘दर्पण’ तर एकशेऎंशी वर्षांपूर्वी निघाले. पेशवाईचा पाडाव झाल्यानंतर फक्त बारा वर्षांनी! पण चमत्कार असा जाणवतो, की पेशवाई ही आपल्याला इतिहासकालीन ज्ञानेश्वर-शिवाजी यांच्याशी जोडलेली गोष्ट वाटते आणि जांभेकरांची ज्ञानसाधना फुले-टिळक-आगरकर-आंबेडकर यांच्याशी आधुनिक काळाशी. हा प्रभाव ज्ञानप्रकाशाचा आहे. तो गेल्या शतक-दीड शतकात घडून आला, म्हणून त्याला प्रबोधनकाळ म्हणतात, याच काळात मानव नव्या जाणिवांनी संपन्न झाला. सर्वांत महत्त्वाचे असे स्वातंत्र्याचे मूल्य त्याला कळून आले!

या जागृतीचे माध्यम होते छापील शब्दांचे. तो वर्तमानपत्रांच्या-नियतकालिकांच्या आणि ग्रंथांच्या रूपाने येऊन लोकांना भिडला. छापील शब्द निर्माण झाला गुटेनबर्गने पाचशे वर्षांपूर्वी जर्मनीत शोधलेल्या छपाईयंत्रातून. त्याआधी तर केवळ श्रवणमाध्यम होते. कथा-कीर्तने-प्रवचने हेच विचारप्रसारणाचे साधन होते. त्यांना रूढीबद्धता आली होती. त्यातून संस्कृतींचे साचलेपण व्यक्त होई. संस्कृतीचा मुख्य आधार धर्म होता. त्याचे ठेकेदार होते. असे सांगतात, की युरोपात पाचशे वर्षांपूर्वी प्रथम बायबल छापले गेले व ते आम लोकांना मूळ स्वरूपात उपलब्ध झाले, ती क्रांती ठरली! धर्मपंडितांच्या सहाय्याविना आपण आपले बायबल समजून घेऊ शकतो हा साक्षात्कार किती मोलाचा असेल?

आपल्याकडे धर्मांची चाकोरी अशी घट्ट आहे, की पोथ्यापुराणे छापली गेली तरी जनता धर्माच्या अंधश्रद्धांतून बाहेर पडली नाही. उलट, ते पिळवणुकीचे आणखी एक हत्यार ठरले. गेल्या शतकारंभी नभोवाणी नावाचे नवे माध्यम हाती आले, 1972 साली टेलिव्हिजनचा पडदा अवतरला आणि त्यानंतर माध्यम उपलब्धतेची घोडदौड सुरू झाली. गेल्या चाळीस वर्षांत आपल्यासमोर अक्षरश: अवघे विश्व उलगडले गेले. ‘गीते’मध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूपदर्शन घडवले असा दाखला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे हर जिज्ञासू माणसाला तसे दर्शन घडवले व त्यातून माणसाला नवे शहाणपण आले आहे. श्रवण माध्यम कानांतून मेंदूला भिडते तर वाचन डोळ्यांतून. पण आता पडद्याच्या आधारे, आपल्यासमोर येऊन ठाकलेली संगणक-इंटरनेट-मोबाईल-चित्रपट-व्हिडीओ अशी माध्यमे आहेत ती एकाच वेळी अनेक ज्ञानेंद्रियांना हाक घालतात. ते त्यांचे वैशिष्टय आहे. हल्लीची मुले जास्त स्मार्ट असतात असे म्हणतात, त्या मागचे रहस्य हे आहे. आजची दुनिया बहुमाध्यमांची आहे त्या प्रत्येक माध्यमाची एक ताकद आहे. ती जाणून घेऊन मानवी मेंदूला खाद्य पुरवत जायचे आहे. मानवी ज्ञानजिज्ञासेने मोठी झेप घेतली आहे. तंत्रविज्ञानाने क्रांती झाली. दळणवळणाची साधने वाढली, जग हे एक खेडे बनले, सारे जुने प्रश्न, मुद्दे, विचारप्रवाह कालबाह्य व संदर्भहीन जाणवू लागले आणि संस्कृतीचे नवेच प्रश्न निर्माण झाले. तसे ते यापुढे होत राहणार आहेत. मुद्दा असा आहे, की या नव्या साधनांच्या साहाय्याने जाणीवजागृतीचे कार्य चालूच ठेवावे लागणार आहे. माणसांच्या विचारकक्षा व भावकक्षा बदलल्या आहेत; बदलत राहणार आहेत याचे भान ठेवून ज्ञानजिज्ञासेचे काम करायचे आहे, ते एवढ्या थोरल्या माध्यमसाधनांनी त्यामुळे चळवळीचे जुने मार्ग कदाचित अपुरे, कदाचित कालबाह्यही ठरतील . त्यांच्या या मर्यादा मान्य करुन बहुमाध्यमांनी आधुनिक युगाला कवटाळायचे आहे. असे म्हणत असताना, आधुनिकता हे स्वतंत्र महत्त्वाचे मूल्य आहे आणि त्याचा अंगिकार हाच मानवी समाजाला व आपल्यापुरते बोलायचे झाले तर मराठी समाजाला सद्यकाळाचे भान देणार आहे आणि त्याचे आव्हान स्वीकारण्याची ताकद पुरवणार आहे. बहुमाध्यमांचे हे जग समजून घेत त्याला सामोरे जाणे हे सांस्कृतिक आव्हान आहे. गावोगावी ग्रंथालय मित्र मंडळामार्फत हे साध्य होऊ शकते.

अमेरिकेतील ग्रंथालय मित्र मंडळे

वाचनालयाविषयी आदर असलेले सुजाण नागरिक म्हणजेच ग्रंथालय-मित्र. आपली कल्पनाशक्ती व अनुभव वापरून ते वाचनालयांचे कार्यक्षेत्र वाढवतात. समाजाच्या सर्व स्तरांतील व वयोगटांमधील नागरिकांसाठी ते विविध कार्यक्रम आखतात. यातून वाचनालयाला सामाजिक उपक्रमांचे केंद्र या स्वरूपात ते नावारूपास आणतात.

ग्रंथालयमित्रांच्या संस्था या नि:स्वार्थी संस्था असून ग्रंथालयांच्या शक्य त्या अडचणींचे निवारण करणे व सभासदसंख्या वाढवण्याचे कार्य करणे हा त्यांचा प्रमुख हेतू. ग्रंथालयप्रेमी विविध स्तोतांद्वारे ग्रंथालयांसाठी लागणारा निधी ही उपलब्ध करून देऊ शकतात.

अमेरिकेतील ग्रंथालय चळवळीला उर्जितावस्था प्राप्त झाली ती बरीचशी ग्रंथालय-मित्रांच्या प्रयत्नांमुळे! त्यांनी सार्वजनिक ग्रंथालयांना दानशूरांचा आर्थिक पाठिंबा मिळवून दिला; ग्रंथालयांसाठी अनेक उपक्रम योजले. या ग्रंथालय मित्रांच्या मानवतावादी दृष्टिकोनामुळे त्या देशांतील ग्रंथालयांचे चित्र बदलले आणि सर्वत्र ग्रंथालयांचे जाळे पसरले. आजही अमेरिकतील ग्रंथालय-मित्र विविध माध्यमांतून ग्रंथालयांचे महत्त्व लोकांना पटवून देऊन त्यांच्या मनात ग्रंथालयांबद्दल आपुलकी, आदर निर्माण करण्याचा, त्यांना आधार देण्याचा आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करत आहेत.

ग्रंथालय-मित्र संघटना ग्रंथालयाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या गरजा भागवण्यासाठी कार्य करतात, त्यामुळे ग्रंथालय सयोजक या संघटनांना त्यांच्या कार्यात सहकार्य करतात.

ग्रंथालय-मित्र संघटना त्यांच्या कार्याची रूपरेषा ग्रंथालय प्रमुखाशी विचारविनिमय करुनच ठरवतात. ती ठरवल्यानंतर मात्र ग्रंथालय प्रमुख ग्रंथालय-मित्र संघटनांच्या कार्यात हस्तक्षेप करत नाहीत. त्यामुळे ग्रंथालय-मित्रांना त्यांचे कार्य नीटपणे करता येते. ग्रंथालय चालक आणि ग्रंथालय-मित्र संघटना त्यांच्यामध्ये वितुष्ट होऊ नये, मतभेद निर्माण होऊ नयेत म्हणून या दोन्ही संस्था त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठका वेळोवेळी आयोजित करतात आणि दोघांमध्ये सहकार्य व सामंजस्य निर्माण करण्यांचे प्रयत्न करतात. आपल्या कार्यामुळे ग्रंथालय प्रमुखांच्या आणि तेथील कर्मचा-यांच्या कामात कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. याची दक्षता ग्रंथालय-मित्र घेतात.

अमेरिकेत ग्रंथालय-मित्र संघटनांची संख्या बरीच वाढली तेव्हा या संघटनांना एकत्र आणण्याच्या, त्यांच्या कार्यात एकसूत्रता आणून त्यांना राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी व मान्यता मिळवून देण्याच्या हेतूने या संघटनांनी एकत्र येऊन’ फ्रेंडस् ऑफ लायब्ररी’, ‘यू.एस.ए’ (फोलुसा) (Friend of Libraries, USA-FOLUSA) या राष्ट्रीय संघटनेची स्थापना केली. ही संघटना देशातील ग्रंथालय-मित्र संघटनांची वाढ करण्याचे आणि त्या अधिकाधिक कार्यक्षम करण्याचे प्रयत्न करत आहे.

अमेरिकेतील ग्रंथालय-मित्र केवळ ग्रंथालयासाठी निधी जमवणे, पुस्तकभेटी मिळवणे, सभासद-मोहीम आखणे, करमणुकीचे कार्यक्रम योजणे एवढेच कार्य करत नाहीत तर ते ग्रंथालयाची प्रतिमा समाजात उंचवण्यासाठी, त्यांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी आणि लोकांमध्ये ग्रंथप्रेम निर्माण होण्यासाठी विविध प्रकारच्या सांस्कृतिक, वाड्मयीन कार्यक्रमांचे आयोजन करतात.

ग्रंथालय-मित्र, साहित्यिक संस्थांच्या सहकार्याने लेखकभेटीसारखे उपक्रम वर्षभर वेळोवेळी आयोजित करतात. या उपक्रमात ते लोकप्रिय लेखकांना ग्रंथालयात निमंत्रित करतात आणि ग्रंथालयांच्या सभासदांना त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्याची संधी प्राप्त करुन देतात. त्याशिवाय ज्या साहित्यिकांना पारितोषिके मिळतात त्यांचे सत्कारसमारंभ घडवून आणतात. साहित्यिकांप्रमाणे विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींना, ग्रंथालय मित्र ग्रंथालयात पाचारण करतात आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी ग्रंथालयाच्या सभासदांना प्राप्त करून देतात. या उपक्रमांना वृत्तपत्रांतून प्रसिद्धी दिली जात असल्यामुळे ग्रंथालय समाजापर्यंत जाऊन पोचतात. त्यामुळे स्वाभाविकच ग्रंथालयांच्या सभासदसंख्येत वाढ होते.

लोकांमध्ये ग्रंथालयाबद्दल आदर निर्माण व्हावा. ग्रंथालयसाहित्याचा त्यांनी अधिक वापर करावा म्हणून ग्रंथालय-मित्र ‘ग्रंथालय सप्ताह’, ‘ग्रंथदिन’ यांसारखे विशेष कार्यक्रम आयोजित करत असतात. या कार्यक्रमांच्या निमित्ताने ‘ग्रंथजत्रा’,’ग्रंथ प्रदर्शने’ यासारखे उपक्रम आयोजित करतात आणि लोकांना ग्रंथांच्या सान्निध्यात आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे स्वाभाविकच, त्यांच्यामध्ये ग्रंथांबद्दल प्रेम व आदर निर्माण होतात व ग्रंथालयांचा अधिक वापर केला जातो. याशिवाय ग्रंथालय-मित्र बालवाचकांना ग्रंथांच्या सन्निध्यात आणून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड रुजवण्यासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करतात. ही मुलेच पुढे ग्रंथालय-मित्र बनतात. त्यांचे हे कार्य वाचनसंस्कृतीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.

सार्वजनिक ग्रंथालयांप्रमाणे शैक्षणिक ग्रंथालयांनाही ग्रंथालय-मित्रांच्या साहाय्याची गरज आहे. हे ओळखून अमेरिकेतील ग्रंथालय-मित्रांनी शैक्षणिक ग्रंथालयांच्या मित्र संघटना स्थापन केल्या आहेत.

गावोगावी ग्रंथालय मित्रमंडळे : एक सामाजिक गरज

– ग्रंथालय हे एक सांस्कृतिक व माहिती केंद्र असावे, काळाची गरज आहे.

– काळाच्या गरजेनुसार ग्रंथालयामध्ये योग्य ते बदल व्हावेत.

– ग्रंथालयात संगणक, झेरॉक्स, इंटरनेट, शैक्षणिक सीडी यांचा समावेश असावा.

– विद्यार्थिवर्ग, स्त्रिया, नोकरवर्ग, सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध व योग्य असे कार्यक्रम राबवले जावेत.

या आवश्यक सामाजिक गरजा ग्रंथालयांकडून भागवल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच….

‘ग्रंथालय मित्रमंडळा’चे अस्तित्व आवश्यक ठऱते.

यास्तव समाविचारी, शक्यतो सेवानिवृत्त व सेवाभावी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन

गावोगावी ‘ग्रंथालय मित्र मंडळ’ स्थापन करावे.

मित्रमंडळ सभासदांनी आपापसात चर्चा करून उद्दिष्टे ठऱवावीत.

उदाहरणार्थ

  1. माहिती/सांस्कृतिक केंद्र निर्माण करणे.
  2. ग्रंथालयाची सर्वांगीँण वाढ साधणे.
  3. सांस्कृतिक/सामाजिक कार्यक्रम राबवणे.
  4. वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी योग्य ती पावले उचलणे.
  5. वरील माहिती उपलब्ध करण्यासाठी पत्रक वाटणे (संपर्क)

कृती आराखडा

–  ग्रंथालय मित्र मंडळाने कार्यक्रमांसाठी निधी उभारावा.

–  सभासद संख्या वाढवून सभासद निधी वाढवावा.

–  डॉक्टर, वास्तुविशारद, वकील, सीए अशा महत्त्वाच्या व्यक्तींशी आणि संस्था व शाळा,  तसेच महाविद्यालय यांच्या पदाधिका-यांशी संपर्क साधावा.

–  कार्यकर्ते सेवाभावी व सेवानिवृत्त असल्याने त्यांच्या आर्थिक अपेक्षा नसतात. म्हणून ग्रंथालयाचा आर्थिक भार कमी होऊ शकतो.

–  देणग्या या ठऱावीक कार्यासाठी मागाव्या. देणगीदारांचे जाहीर आभार मानावेत.

–  काही व्यावसायिक जाहिरातींबरोबर ग्रंथालयाची जाहिरात/प्रचार कमी खर्चात होऊ शकतो.

–  ग्रंथ, फर्निचर, आर्थिक बाबी या व्यतिरिक्त जागेविषयींदेखील गरजा असतात.

–  काही प्रकरणे ग्रामपंचायत नगरपालिका, जिल्हा परिषद आदि स्थानिक स्वराज्य संस्थांशी प्रलंबित असतात.

–  शासनातील अधिकारी व्यक्ती त्यांचे निर्णय घेण्यास मदत करू शकतात.

उदाहरणार्थ

–  Extra FSI, Terrace Use,

Approach Road
इ. मध्ये सहानुभूतीपूर्ण भूमिका घेऊ शकतात;

–  मान्यवर व्यक्ती ग्रंथालयातील सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी होण्यास सहाय्यभूत ठरतात.

–  पर्यायाने समाजाभिमुख व्यक्ती व ग्रंथालय यांचे जवळचे नाते निर्माण करण्यास मदत करतात.

– दिनंकर गांगल
Last Updated On 21st October 2019

About Post Author

Previous articleस्मृती.. मनस्वी कलावंताच्या.. (Memory .. of a Sensible artist ..)
Next articleदिनेश वैद्य – जुन्‍या पोथ्‍यांच्‍या जतनासाठी कार्यरत
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

Exit mobile version