राणेखानची ऐतिहासिक समाधी नाशिकच्या सिन्नर तालुक्यात देवपूर गावी उभी आहे. त्यास महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रसिद्ध पानिपतच्या लढाईचा संदर्भ आहे. त्या समाधिस्थळास ‘बडाबाग’ असेही नाव आहे. मात्र स्थानिक पातळीवर ते स्थळ ‘राणेखानचा वाडा’ या नावाने ओळखले जाते.
देवपूर गावाची महती तीन नावांनी प्रसिद्ध आहे. गावाला राजकीय दृष्टिकोनातून नाना गडाखांचे देवपूर असे म्हटले जाते. धार्मिक दृष्टीने, ‘बाबा भागवतांचे देवपूर’ असा उल्लेख केला जातो. तर ऐतिहासिक दृष्टीने ते गाव ‘राणेखानचे देवपूर’ म्हणून ओळखले जाते. राणेखानचे वंशज देवपूर येथे राहत नाहीत. मात्र राणेखानबद्दलची संक्षिप्त माहिती गावातील कबरीच्या दर्शनी भिंतीवर कोरलेली आहे.
पानिपतची तिसरी लढाई मराठे व अहमदशहा अब्दाली यांच्यात जानेवारी 1761 मध्ये झाली. लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांचे सेनापती महादजी शिंदे जबर जखमी झाले. त्यांना राणेखान याने पाणक्याचा वेश धारण करून सुरक्षित ठिकाणी हलवले व त्यांच्यावर उपचार करून त्यांचा जीव वाचवला. महादजी शिंदे यांनी राणेखानच्या धाडसाचे कौतुक पेशवे दरबारात केले. त्या उपकारांची परतफेड म्हणून त्याला पैसा, जडजवाहिर, हत्ती, घोडे व निमगाव, देवपूर आणि जामगाव पास्ते या गावांची जहागिरी दिली. राणेखानने देवपूर गावात अनेक वाडे व हवेल्या बांधल्या. तसेच, त्याने संत श्री बाबा भागवत महाराजांच्या संस्थानाजवळ एक मशीद व मंदिर बांधून, हिंदू-मुस्लिम ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला. राणेखानने बंधारे बांधून देवपूर परिसर समृद्ध केल्याचे दाखले आहेत. राणेखानचे निधन 22 डिसेंबर 1791 रोजी झाले.
राणेखानने देवपूर गावातून वाहणा-या देवनदीच्या पश्चिम किनाऱ्यालगत निसर्गरम्य जागेत ‘बडाबाग’ हे शाही कब्रस्तान बांधले होते. कबरीचे आवार सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील देवपूर फाटयापासून साधारण तीनशे मीटर अंतरावर सुरू होते. त्या आवाराच्या पश्चिमेकडील पुरुषभर उंच तटबंदी, घडीव दगडातील दरवाज्याची कमान व अन्य अवशेष यांमधून जाणवणाऱ्या गूढ वातावरणाच्या सान्निध्यात, राणेखानच्या समाधिस्थळाचा सौंदर्यानुभव अधिक आकर्षक वाटतो. राणेखानच्या समाधीजवळ आणखी दोन समाधी आहेत. त्यांपैकी एक त्याच्या आई-वडिलांसाठी व दुसरी एका नर्तकीसाठी बांधण्यात आली होती. त्या आवारात समाधीसारख्या दिसणाऱ्या इतर वास्तू व चबुतरे यांचे अवशेष आहेत. आवारातील सर्व जागा दगडी पायवाटेने एकमेकांस जोडल्या गेलेल्या आहेत. काटकोनातील मोकळ्या जागेत कारंज्यांनी सजवलेले हौद व निरनिराळी झाडे यांमुळे ती जागा त्या काळी अधिक शोभिवंत दिसत असावी. परिसरात पेरु, चिंच व डाळिंब यांच्या बागा असल्याने शेकडो मोर वास्तव्यास आहेत. राणेखानने त्याचे मरणोत्तर जीवन प्रसन्न, शांत व सर्वांगसुंदर स्थळी जावे म्हणून त्या जागेचा आराखडा व त्यातील वास्तू, स्थापत्यकलानिपुण, कला-संवेदनशील कलाकाराकडून बनवून घेतल्या असाव्यात याचा प्रत्यय ते स्थळ पाहताना पावलोपावली येतो.
राणेखानने स्वत:च्या वास्तव्यासाठी देवपूरची निवड केली होती. त्याने तेथे बांधलेली चार मजली हवेली अवशेषरूपात उरली आहे. त्या वाडयात, दहाएक वर्षांपूर्वी विड्या वळण्याचे काम होत असे व काही वर्षांपूर्वी त्या जागेचा उपयोग गोदामासाठी केल्याचे कानावर आले. देवपूर गावाच्या संरक्षणासाठी बांधलेल्या वेशीचे चिरे ढासळले आहेत, तर वेशीचे जीर्ण दरवाजे लेचापेच्या आधारावर उभे आहेत.
राणेखानचे समाधिस्थळ, ज्या काळात बांधले होते ते जसेच्या तसेच आहे! काही घडीव चिरे ढासळले आहेत, पण त्यांचे प्रमाण कमी आहे.
– चंद्रशेखर बुरांडे
(छायाचित्र – चंद्रशेखर बुरांडे)
Last updated on 11 Nov 2017
राणेखान पुढच्या काळात
राणेखान पुढच्या काळात महादजींबरोबर अनेक लढायांत सहभागी झाले. 1778च्या.
It is quite heartening to
It is quite heartening to have such in depth knowledge about Maratha Empire. Pity that we do not preserve such monuments in good condition like European Countries ans Australia, where even structures more than 150 years old are presented to tourist in an immaculate condition, with detailed documentation.
छान माहिती
छान माहिती
Good information sir
Keep it…
Good information sir
Keep it up
Comments are closed.