Home व्यक्ती उद्योजक गौरी चितळे : क्षमता आणि जिद्द यांचा समन्वय

उद्योजक गौरी चितळे : क्षमता आणि जिद्द यांचा समन्वय

carasole

गौरी चितळे माहेरच्या स्मिता लोंढे! त्यांचे शिक्षण दहावी पास, एवढेच. त्यांनी आईवडिलांना आर्थिक मदत म्हणून नर्सिंगचा कोर्स पूर्ण करून हॉस्पिटलमध्ये नोकरी स्वीकारली. त्यांचे गाव सुधागड तालुक्यात आहे. त्या खेडेगावातून खोपोली येथे नोकरीसाठी ये-जा करत असत. त्यांनी सज्ञान होण्याआधीच घराची थोडी जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यांच्या क्षमता आणि जिद्द दोन्ही गुणांत आत्मनिर्भरतेचे बीज आहे. त्‍या गुणांच्‍या बळावरच त्‍यांनी स्‍वतःच्‍या उद्योगाची सुरूवात केली.

स्मिता यांचे लग्न किशोर चितळे यांच्याशी २५ फेब्रुवारी २००६ रोजी झाले. त्यांचे सासर रोहा तालुक्यातील मेढे या गावी आहे. तेथे ती दोघे व सासू-सासरे असा संसार सुरू झाला. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी ठेवण्यात आले. किशोर चितळे हे घाटाव येथे एका कंपनीत इलेक्ट्रिशीयन म्हणून कार्यरत आहेत. ते शेतीही करतात. गौरी यांचा संसार वाढत गेला. गौरीने पुत्ररत्नास जन्म दिला. त्याचे नाव आर्यन असे ठेवण्यात आले. नातू आला म्हणून सासू-सासरेही खूश होते. खर्चाची बाजू वाढत होती. आई म्हणून अलौकिक आनंद होत असतानाच, गौरी यांच्या मनात वास्तवाचे भान जागृत होत होते. त्यांना नोकरी सोडावी लागली होते. त्यांच्या मनात कुक्कुटपालनाची (पोल्ट्रीची) कल्पना स्फुरली व त्यांनी ती साकारली.

गौरी यांच्या घरापासून पोल्ट्रीची जागा पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. ती जमीन डोंगराळ, वरकस असल्यामुळे त्यांना ती मनासारखी तयार करण्यासाठी मेहनत करावी लागली. त्या जागेच्या तिन्ही बाजूंला डोंगर आणि पुढे मोठा ओहळ (नाला) आहे. पोल्ट्रीचे बांधकाम करण्यासाठी सुरुवातीस जोते (पाया) बांधायचे, तर त्यासाठी त्यांच्या डोंगरावरील खडक (कातळ) फोडायचे नक्की झाले. सुरुंग लावला. दगड मिळाले, पण ते मोठे होते. त्या दगडांना मध्यम आकार देऊन नंतर त्यांच्या तोडी (जोत्यासाठीचे ठरावीक आकाराचे दगड) बनवणे जरूरीचे होते. किशोर, गौरी आणि एक गडी कामाला लागले. ते छिन्नी वगैरे घेऊन रोज आठ तास काम करत. पोल्ट्रीचे मोजमाप ८०×३० फूट होते. खूप तोडी लागल्या. दोन महिने तेच काम चालले होते. त्यांनी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’कडून कर्ज काढले. किशोर कंपनीत नोकरीस जायचा व शेतीचेही बघायचा. त्यामुळे पोल्ट्रीच्या निर्मितीची जबाबदारी गौरी यांच्यावर आली.

पोल्ट्रीच्या खालच्या अंगाला खडक होता. गौरी यांनी त्याचाही उपयोग करून घेऊन तेथे तळे खोदले. त्यात मत्स्यपालन सुरू केले. मत्स्यपालनासाठी साई प्रिन्स, मृगळ, कटले अशा निरनिराळ्या प्रकारचे मासे आणले; काही मासे खोपोलीहून तर काही पालीहून.

ध्येयाचा ध्यास धरला, की आणखी नव नव्या मनात कल्पना येतात. गौरी आणि किशोर यांनी पोल्ट्रीच्या परिसरात नारळ, आंबा, केळी, लिंब, पपई इत्यादी झाडे लावली. त्यासाठी पाणी हवे म्हणून ओहळाला बंधारा घातला. त्यांच्या आवारात ओहळाजवळच विहीर खणली. पंपाची सोय केली. तळ्यात मार्च-एप्रिलपर्यंत पाणी असते. विहीर मात्र जूनपर्यंत पाणी टिकवून असते. कृषी खात्याकडून सर्व रोपे आणली.

गौरी यांना वाचनाची आवड आहे. त्यांनी ‘शेतकरी’ अंकातून शेतीविषयी निरनिराळी माहिती मिळवली. त्यांना श्रीपाद दाभोळकर यांच्या ‘प्रयोग परिवार’ पुस्तकामुळे मोलाचे मार्गदर्शन लाभले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे भाषणातील एक वाक्य त्यात आहे, ते वाक्य असे – ‘मन वैराण नसेल तर भूमीही वैराण राहणार नाही.’

पोल्ट्रीचा पाया बांधून झाल्यानंतर पुढील कामासाठी रेती, सिमेंट, विटा, पत्रे वगैरे साहित्य आणण्याचे काम चालू झाले. स्वत: गौरी आणि किशोर अंगमेहनत घेऊ लागले. पोल्ट्री टेकाडावर (उंचावर) बांधली जात असल्यामुळे सामानाची वाहतूक अडचणीची होती. पण काम जोरात चालू राहिले. पोल्ट्रीला भिंतींऐवजी तारेची जाळी वापरण्यात आली आहेत. त्यामुळे हवा खेळती राहते. मधे मधे सिमेंटचे तयार बीम (खांब) लावण्यात आले. छप्पर म्हणून सिमेंटचे पत्रे बसवण्यात आले. पन्नास बल्ब (२०० पॉवरचे); तसेच, हॅलोजनचीही व्यवस्था करण्यात आली; त्यांची गरज थंडीच्या मौसमात लागते. ऐंशी फूट लांब, तीस फूट रुंद पोल्ट्रीत कोंबडीची अडीच हजार पिल्ले (छोटे पक्षी) आणली. कोंबड्यांची अडीच हजारांची पहिली बॅच विक्रीसाठी बाहेर गेली. गौरी यांचे व्यवसायाचे स्वप्न प्रत्यक्षात आले!

कोंबड्यांना बसण्यासाठी जमिनीवर भाताचे तूस टाकलेले असते. त्यांत कोंबड्यांची जमा झालेली विष्ठा काढावी लागते. तिचा उपयोग गौरी झाडांसाठी खत म्हणून करतात. स्वत: गौरी पोल्ट्रीची जमीन झाडून नंतर शेणाने सारवण्याचे काम करतात. एका एप्रिल-मे महिन्यांत अडीच हजारांपैकी पाचशे कोंबड्या तापमानाच्या परिणामाने (हिटने) मृत्युमुखी पडल्या. मात्र गौरी डगमगल्या नाहीत. त्यांनी व्यवसाय पुढे चालू ठेवला. त्या म्हणतात, “संघर्षाशिवाय प्रगतीच्या यशाला तेज नाही.”

पाण्याचा पुरवठा नीट व कायम राहावा या दृष्टीने गौरी यांनी २०१५ मध्ये ‘बोअरिंग’ करून घेतले. पहिल्या पोल्ट्रीला लागूनच आणखी एक शेड वाढवली. ती नव्वद फूट लांब व तीस फूट रुंद आहे. त्या शेडमध्ये आणखी अडीच हजार कोंबड्या (पिल्ले) राहतात.

आर्यन प्राथमिक शाळेत जाऊ लागला. त्याच वर्षी त्यांच्या संसारात कन्यारत्न जन्मले. तिचे नाव पूर्वे.

लहान कोंबड्या विक्रीस लायक झाल्या.  त्याकरता समोरच्या ओहळावर स्लॅब टाकला गेला व पूल तयार झाला. त्यासाठी नव्वद हजार रुपये खर्च आला. लहान कोंबड्या ज्या कंपनीकडून आणल्या होत्या, त्यांनीच त्या विकत घेतल्या. त्या कंपनीचे नाव ‘प्रिमियर’ असे आहे. गौरी यांचा धंदा, व्यवसाय मार्गी लागला !

गौरी चितळे यांना ‘रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाउंडेशन’तर्फे ‘आदर्श महिला’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. गौरी यांना याबाबत विचारले असता त्या एवढेच म्हणाल्या –
मी एक मातीतले बी आहे; कर्तृत्वाच्या आकाशाला परि मज भिडायचे आहे.

गौरी इतर महिलांना व्यवसायाविषयी माहिती देतात. त्यांना महिलांनी संसाराव्यतिरिक्त वेगळे ध्येय बाळगावे असे वाटते. भविष्यात, वालाच्या शेंगांची ‘पोपटी’ पर्यटकांना चाखता यावी असा गौरी चितळे यांचा मानस आहे. तशी पावले त्या टाकत आहेत.

गौरी चितळे – 8554852931

 

– नारायण पराडकर

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.

Exit mobile version