Home वैभव गावांच्‍या अंतरंगात टिप्‍परघाई – वडांगळी गावचा शिमगा

टिप्‍परघाई – वडांगळी गावचा शिमगा

12
carasole

शिमग्याचे ‘कवित्व’ महाराष्ट्राला नवे नाही. मात्र सिन्नर तालुक्यातील वडांगळी या माझ्या गावात शिमगा साजरा केला जातो, तोच मुळी कवने गाऊन, टिप्परघाई खेळून. तेथे टिप्परघाई मौखिक परंपरेने चालत आलेले शिमग्याचे लोकगीत गात डफाच्या ठेक्यावर रंगते.वडांगळीतील सामुदायिक होळी मारुती मंदिरासमोर पेटते. ती गावातील प्रत्येक घरातून आलेल्या पाच-पाच गोवऱ्यांनी रचली जाते. ती होळी सर्वांत मोठी. गल्लोगल्लीतील इतर होळ्या त्या मोठ्या होळीतील जळत्या गोवऱ्या नेऊन पेटवतात. मारुतीच्या होळीवर दोन मोठमोठे दगडी गोटे आहेत. मिसरूड फुटलेली तरुण मुले, त्यांच्या शरीरातील रग अजमावण्यासाठी ते त्यांच्या खांद्यावर ‘दगडी गोटे’ पेलून होळीला पाच प्रदक्षिणा घालतात. अनेक तरुणांना ते साधारण प्रत्येकी क्विंटलभर वजनाचे दगडी गोटे उचलणे जमत नाही. तालमीत तयार झालेली तरुण मुलेदेखील त्यात कधी कधी फसतात. काही तरुण मात्र तब्येतीने ‘तोळामासा’ असतात, पण ती ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ ठरवून ते गोटे लीलया पेलतात. लहानगी मुले टिमक्या वाजवत पुरणपोळीचा नैवेद्य खातात, तोंडावर पालथा हात मारत एकमेकांच्या नावाने बोंबा मारत, होळीचा आनंद लुटतात.

होळीला रंग चढतो तो धुळवडीत. घरोघरी, देवघरातील ‘वीराचा टाक’ खोबऱ्याच्या वाटीत घालून, लाल आलवणाच्या कपड्यात गुंडाळून ‘वीरा’ची वेशभूषा केलेल्या मुलांच्या हाती दिला जातो. घराघरातून सैनिक पूर्वी लढाईसाठी जात असावेत. त्यांची आठवण म्हणून प्रत्येक घरात ‘वीरा’चा चांदीचा टाक असतो. शिमग्याच्या दिवशी, त्यालाच ‘वीराचा पाडवा’ असे म्हणतात. त्या वीरांचे पूजन करून, त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून गावातून डफाच्या तालावर चांदीचे टाक घेतलेल्या ‘बालवीरां’ना वाजतगाजत मिरवले जाते. सजवलेले ‘बालवीर, वीराचे पवित्रे घेत होळीभोवती फेर धरत नाचतात. ती मिरवणूक गावाच्या गल्ल्यागल्ल्यांतून मिरवत महादेवाच्या मंदिराशी येऊन विसावते. वीर महादेव मंदिराच्या उंच दगडी पायऱ्यांवर स्थानापन्न होतात आणि मग रंगते टिप्परघाई…

शेतकरी शेतीच्या कामातून शिमग्यात बऱ्यापैकी मोकळा झालेला असतो. त्याच्या उत्साहाला शिमग्याची टिंगळटवाळी उधाण आणते.

ग्रामस्थ हातात लाकडी टिपऱ्या घेऊन, फेर धरून उभे ठाकले, की दोन डफांवर ठेका धरला जातो अन् डफाच्या तालावर पाय हलू लागतात. टिप्परघाई हातातील टिपऱ्या एकमेकींना केवळ स्पर्श करत, तोंडाने स्स्सऽ ऽ स्स्सऽ ऽ असा आवाज करत सुरू होते. टिपऱ्यांचे पहिले आवर्तन संपले, की काही बुजूर्ग शिमग्याचे लोकप्रिय गीत सुरू करतात –

वरल्या रानी नऊ नांगराची जाळी
वरल्या रानी नऊ नांगराची जाळीऽ ऽ
नांगरून दुणून केलीया काळी
नांगरून दुणून केलीया काळीऽ ऽ
नांगरता नांगरता लागलं खुटवं
नांगरता नांगरता लागलं खुटवंऽ ऽ
अवघे नांगर मिळून येवाऽ ऽ
एवढं खुटवं काढून देयवाऽ ऽ
जायजाच्या पोराहो टिप्परघाई खेळा
जायजाच्या पोराहो टिप्परघाई खेळाऽ ऽ

गाण्याचे एक कडवे संपले, की डफाचा ठेका अन् टिप्परघाई पुन्हा सुरू होतात! लहानपणी ते दृश्य पाहताना मोठी मजा वाटायची. गाण्यातील शब्द मनाला भुरळ पाडायचे. त्याची चाल, डफाचा ठेका उपस्थित सर्वांना पायाचा ताल धरायला लावायचे. गाणे पुढे सुरू व्हायचे…

खुटवं काढता लागलं पाणी
खुटवं काढता लागलं पाणीऽ ऽ
अवघे ब्राह्मण मिळून येवा
एवढी संध्या करून द्येवा
संध्या करता डळमळं मासा
संध्या करता डळमळं मासाऽ ऽ
तोडीलं जानवं टाकीला फासा
तोडीलं जानवं टाकीला फासाऽ ऽ
नाऱ्या म्हणतो तळून खाईल
मासा म्हणतो पळून जाईल
जायजाच्या पोराहो टिप्परघाई खेळा
जायजाच्या पोराहो टिप्परघाई खेळाऽ ऽ

गाण्यातील ‘नाऱ्या म्हणतो तळून खाईल, मासा म्हणतो पळून जाईल’ या ओळींतील यमक आणि गमक त्या वयात कळत नव्हते. तरी आम्ही बच्चेकंपनी शिमग्यानंतर अनेक दिवस हातात टिपऱ्या घेऊन, तेवढ्या ओळी केवळ म्हणत असू.

त्या लोकगीताचा कर्ता कोण? ते म्हणण्याची प्रथा गावात कधी सुरू झाली? महाराष्ट्रात इतरत्र कोठे तसे गाणे म्हटले जाते का? असे काही प्रश्न नंतर समजदार झाल्यावर पडू लागले. एकदा कधी तरी नारायण आठवले यांच्या ‘चित्रलेखा’तील ‘महाराष्ट्र माझा’ सदरात त्या गाण्याशी साधर्म्य असलेल्या ओळी मला वाचण्यास मिळाल्या. म्हणजे कोकणात तशा प्रकारचे लोकगीत शिमग्यात म्हणत असावेत. मला कोकणापासून वडांगळीपर्यंत त्या गाण्याचा प्रवास कसा झाला असेल असा
नवीनच प्रश्न पडला. नाशिक जिल्ह्यात इतरत्र कोठेही ते गाणे आढळत नाही.मला शिमग्याचे रंग काळाबरोबर फिकटल्यासारखे वाटू लागले. गावातील पशुधन घटत चालले. पर्यायी इंधन उपलब्ध झाल्याने गोवऱ्या, सरपण यांचा जळणासाठीचा वापर कमी झाला. गोवऱ्या कमी झाल्याने व पर्यावरणविषयक जाणीव झाल्यानेही होळीचा आकार वर्षानुवर्षें कमी होऊ लागला.

शिमग्याच्या त्या लोकगीताबद्दलही तशीच अनास्था निर्माण होत असल्याचे मला जाणवले. ते गाणे वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या गावातील केवळ चार-पाच वृद्धांना मुखोद्गत होते, पण त्यांचे उच्चार स्पष्ट नव्हते. पुढच्या पिढीला त्यांच्या मागे म्हणताना दमछाक होत होती. बरे, वर्षातून एकदाच ते गाणे म्हणण्याची पाळी येत असल्याने इतर कोणाचे पाठही होत नव्हते. ते गाणे काळाच्या उदरात लुप्त होण्याचा धोका मला सतावू लागला.

मी शिमग्याचे गाणे म्हणणाऱ्या आनंदा खुळे, काशिनाथ कडवे, आबाजी खुळे, कारभारी खुळे, वसंत आप्पा खुळे आदींना त्यांच्या घरी जाऊन भेटलो. त्यांना जसे आठवेल त्याप्रमाणे एकेका कडव्यानुसार गाण्याच्या ओळी कागदावर उतरवून घेतल्या. ते लोकगीत कागदावर पहिल्यांदाच येत होते! गाणे त्यातील बोली भाषा, ग्रामीण शब्द, लय यांना धक्का न लागू देता तसेच्या तसे लिहून काढले. त्यातील पुढील कडवीही मजेदार आहेत –

सरकंडाचं कुड त्याला शेणियाचा लेवा
सरकंडाचं कुड त्याला शेणियाचा लेवाऽ ऽ
म्हातारा दादला नको देऊ देवा
म्हातारा दादला नको देऊ देवाऽ ऽ
नवतरण्याची करील सेवा
नवतरण्याची करील सेवाऽ ऽ
फेडील फडकं घालील वारा
फेडील फडकं घालील वाराऽ ऽ
तोडील मोती घालील चारा
तोडील मोती घालील चाराऽ ऽ
जायजाच्या पोराहो टिप्परघाई खेळा
जायजाच्या पोराहो टिप्परघाई खेळाऽ ऽ
पूर्वीच्या काळी सर्रास होणारे बालविवाह, विशेषत: अल्पवयीन मुलगी व वयस्कर नवरा, त्यातील मुलीच्या मनातील घालमेल, तिच्या अपेक्षा या गाण्यातून व्यक्त होताना दिसतात.
वाटावरल्या वडीयाची कवळी काया
वाटावरल्या वडीयाची कवळी कायाऽ ऽ
गवराई गेली तिथे शेण्या येचाया
गवराई गेली तिथे शेण्या येचायाऽ ऽ
येचिलं शेणवं रचिलं तिरडं
येचिलं शेणवं रचिलं तिरडंऽ ऽ
उचलाया गेली तिचं तुटलं बिरडं
उचलाया गेली तिचं तुटलं बिरडंऽ ऽ
शिंपी ये दादा रतन राया
शिंपी ये दादा रतन रायाऽ ऽ
चोळीचं बिरडं आण माझ्या ठाया
चोळीचं बिरडं आण माझ्या ठायाऽ ऽ
जायजाच्या पोराहो टिप्परघाई खेळा
जायजाच्या पोराहो टिप्परघाई खेळाऽ ऽ
रानात गोवऱ्या वेचताना सासुरवाशीणीची चोळी फाटते. द्रौपदीने कृष्णाचा धावा करावा तशी ती गावातील शिंपीदादाचा धावा करते अन् ‘माझ्यासाठी नवी चोळी घेऊन ये’ अशी विनवणी करते.
काळी भवर रे तिरमखी गंगा
काळी भवर रे तिरमखी गंगाऽ ऽ
दोन्ही संगमी नरसिंग उभा
दोन्ही संगमी नरसिंग उभाऽ ऽ
नरसिंग्या देवा तुझं देऊळ बकानाचं
नरसिंग्या देवा तुझं देऊळ बकानाचंऽ ऽ
दारी वृंदावन झाड तुळशीचं
दारी वृंदावन झाड तुळशीचंऽ ऽ
जायजाच्या पोराहो टिप्परघाई खेळा
जायजाच्या पोराहो टिप्परघाई खेळाऽ ऽ
ते एकूण चार कडव्यांचे गाणे म्हणजे वडांगळी गावचा सांस्कृतिक वारसा आहे. मला त्यावेळी वाटलेली भीती रास्त होती ते आता कळत आहे. ज्या वृद्धांना ते गाणे पाठ होते, ज्यांनी तो सांस्कृतिक ठेवा जतन करून ठेवला होता ते आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. गाणे लिखित स्वरूपात उपलब्ध असल्याने आमची ‘टिप्परघाई’ची परंपरा अबाधित राहणार आहे. नारायण कांदळकर, राजू सुके, रमेश खुळे आदी तरुण या खटाटोपांनंतर ती परंपरा नेटाने पुढे चालवणार आहेत.– किरण भावसार

Last Updated On – 24th August 2016

About Post Author

12 COMMENTS

  1. सुंदर लिखाण.

    सुंदर लिखाण.
    अनेक ठिकाणी जुन्या संस्कृती लोप पावत आहेत. अशा परिस्थितीत या संस्कृती टिकवण्याचे काम उल्लेखनीय आहे.

  2. भाऊ,

    भाऊ,
    अप्रतीम काम.महाराष्ट्राचा ग्रामिण लौकीक वाढविलास.खुप शुभेच्छा.

  3. काका खुप छान लेख लिहिला ।…
    काका खुप छान लेख लिहिला । वडांगळीची जुनी परंपरा जोपसली ।

  4. खूपच छान शेवटी जुनं ते सोनं।
    खूपच छान शेवटी जुनं ते सोनं।

  5. भावसार यांनी मोलाचे काम केले…
    भावसार यांनी मोलाचे काम केले आहे. आपण आपली संस्कृती घालवत आहोत हे अस्वस्थ करणारे आहे. बेचैन व्हायला होते. भावसारांना म्हणून धन्यवाद.

  6. शिमग्याची ही माहिती बरेच…
    शिमग्याची ही माहिती बरेच लोकांना माहिती नव्हती खास करून टिप्परघाई
    नविन मांणसाना खुप सहज माहिती उपलब्ध करून दिली
    खुप सुंदर काम
    आणि लिखाण
    किरण ग्रेट

  7. खुप छान लेख.किरण…
    खुप छान लेख.किरण भावसारांच्या वडांगळी गावातील हायस्कूलमध्ये मी काही दिवस नोकरी केली आहे.पुर्वीचे पुर्वजांचे लोकगीत जतन करून त्यांनी मोलाचे काम केले आहे.ते अतीशय हळवे आणि संवेदनशील कवी आहेत.किरण भावसार सिन्नरचे भूषण आहेत

  8. परंपरा आणि संस्कृती याचे…
    परंपरा आणि संस्कृती याचे समाज शांतता, आणि सण उत्सव या वरचा अप्रतिम लेख

  9. परंपरा आणि संस्कृती याचे…
    परंपरा आणि संस्कृती याचे समाज शांतता, आणि सण उत्सव या वरचा अप्रतिम लेख

Comments are closed.

Exit mobile version