Home वैभव घराघरांत शाळा – एमकेसीएल नॉलेज फाऊण्डेशनचा नवा उपक्रम (School’s on TV Screen...

घराघरांत शाळा – एमकेसीएल नॉलेज फाऊण्डेशनचा नवा उपक्रम (School’s on TV Screen – MKCLKF’S New Venture)

3

 

मुले सकाळी साडेसात ते साडेबारा या वेळात सहसा शाळेमध्ये असतात, परंतु कोरोनामुळे ती घराघरांत बंदिवान झाली आहेत. त्यांच्यासाठी त्यांच्या प्रत्येकाच्या घरी सह्याद्री वाहिनीने शाळा आणली आहे. पण ती शाळा दिलखुलास, हसरी, खेळकर आहे आणि मुले शाळेमध्ये मौजमजेत अभ्यास करत आहेत असे दृश्य पालकांना पाहण्यास मिळते. ती एक अफलातून शैक्षणिक मालिका सह्याद्री वाहिनीवर 20 जुलैपासून सुरू झाली आहे. त्या मालिकेचे नाव आहे टिलीमिली; ‘टिलीमिली’ अर्थात मुलेमुली. ती मालिका घडवली आहे एमकेसीएल नॉलेज फाऊण्डेशनने. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) ही पुण्याची संस्था संगणक शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. एमकेसीएलने एमएससीआयटी ह्या आयटीतील बेसिक कोर्सची निर्मिती केली. तो कोर्स म्हणजे कॉम्प्युटर कसा वापरावा, त्यातील मुख्य अॅप्लिकेशन्स मायक्रोसॉफ्ट वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल इत्यादीची माहिती असा आहे. त्या माध्यमातून ती संस्था महाराष्ट्रभर सर्वश्रुत झाली आहे. त्याचबरोबर संस्थेने शिक्षण, जलसंधारण अशा अनेक विधायक कार्यक्रमांत महत्त्वाचा वाटा उचलला आहे. त्यासाठी एमकेसीएल नॉलेज फाऊण्डेशनही संस्था निर्माण झाली आहे. दूरदर्शनवरील शिक्षण हे त्यांचे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने पुढील पाऊल आहे. त्याचा लाभ महाराष्ट्रातील दीड कोटी मराठी विद्यार्थ्यांना होईल असा फाऊण्डेशनचा अंदाज आहे. एमकेसीएलचे मुख्य उद्दिष्ट डिजिटल साक्षरतेतील तफावत दूर व्हावी हे आहे. त्याचबरोबर त्यातून लोकांचा वैयक्तिक व सामाजिक विकास साधला जावा आणि जागतिक दर्जाची शिक्षण प्रणाली व प्रशासन या भूमीमध्ये तयार होऊन त्यातून लोकांचे सबलीकरण साधावे हाही संस्थेचा हेतू आहे.
विवेक सावंत

महाराष्ट्र ज्ञान महामंडळचे (एमकेसीएल) संस्थापक व प्रमुख विवेक सावंत यांनी पुढाकार घेऊन ही मालिका तयार होईल व दूरदर्शनवर सादर होईल असे पाहिले. त्यांना सहाय्य शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांचे झाले आहे. सावंत हे केवळ तंत्रज्ञ नाहीत तर शिक्षण क्षेत्राचे विशेष अभ्यासकही आहेत. त्यांना विविध विषयांमध्ये रस आहे. त्यांचा लोकविज्ञान चळवळीत आणि सिडॅकच्या घडणीत मोठा वाटा होता. या मालिकेमध्ये रोज एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे साठ पाठ साठ दिवसांत साठ एपिसोडमधून सादर केले जातील. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार असे सहा दिवस हे एपिसोड सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येतील. त्यामुळे टिलीमिली मालिका सलग दहा आठवडे प्रसारित केली जाईल असे एमकेसीएल नॉलेज फाऊण्डेशन तर्फे सांगण्यात आले. मालिका 26 सप्टेंबर रोजी संपेल.

या कार्यक्रमाच्या शूटिंगमधील एक क्षण
टिलीमिली मालिका बालभारतीच्या पहिली ते आठवी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित आहे. त्यात व्याख्याने नसतील; मुलांना घरी व परिसरात करून बघता येतील अशा कृतिनिष्ठ उपक्रमांचा समावेश आहे. तो एक वेगळाच शैक्षणिक अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मालिकेतील नाट्य राखण्याच्या दृष्टीने, मुलांच्या भोवती छोट्या-छोट्या आव्हानांचे सातत्य राखले गेले आहे. स्वच्छ, मोकळे, आनंदी वातावरण व भावनिक सुरक्षितता हे मालिकेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मुले चुका करत स्वत:ची अर्थबांधणी स्वत:च करू शकतात. मुले हसत-खेळत स्वत:च स्वत:ची कशी शिकू शकतात हे मालिकेच्या प्रत्येक भागात बघण्यास मिळेल. अशी सहज, आनंददायक व ज्ञानरचनावादी प्रकिया उलगडत राहिल्याने मुलांना स्वत: शिकण्याची स्फूर्ती ही मालिका देईल असा दावा एमकेसीएल नॉलेज फाऊण्डेशनने केला आहे.
कोरोनामुळेशाळा बंद आहेत. मुलांचे शिक्षण स्थगित झाल्यासारखे वाटत आहे. अशावेळी घरोघरी मुले विविध छंदांत व घरकामात रमली आहेत हे खरे. ते चांगले वळण मुलांना लागत आहे. पण मुले मुख्य अभ्यासक्रमापासून वंचित राहत आहेत अशी पालकांना खंत आहे. ती उणीव या मालिकेमुळे भरून निघेल व मुलांना शिक्षणाचा लाभ होईल.
मालिकेला एक वेगळा पदर आहे तो अनौपचारिक शिक्षणव्यवस्थेचा. औपचारिक व्यवस्था थंडावतात तेव्हा समाजातील उत्साही कार्यकर्ते जागे होतात आणि ते त्या व्यवस्थेमध्ये विधायक अशी भर टाकतात असा समाजाचा अनुभव असतो. मालिकेमध्ये तसे कार्यकर्ते मावशी व काका यांच्या रूपाने साकार झाले आहेत. परिसरातील उत्साही व अभ्यासू मावशी व काका स्वयंस्फूर्तीने शिक्षण देण्यामध्ये कसा पुढाकार घेतात व त्यांच्या त्यांच्या कॉलनीतील, वाडीतील, वस्तीतील किंवा शेजारपाजारच्या घरांतील एकेक दोन-दोन मुलांच्या गटांना ज्ञानरचना करण्यास कशी मदत करू शकतात हेही टिलीमिली मालिका जाता जाता दाखवते.
घराघरात भरणारी ही एमकेसीएल नॉलेज फाऊण्डेशनची शाळा उद्याच्या शिक्षणाला कदाचित वेगळेच परिमाण देऊन जाईल.
नितेश शिंदे 9323343406

info@thinkmaharashtra.com

——————————————————————————————————

About Post Author

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version