Home संस्था कस्तुरबा ट्रस्टच्या ग्रामसेविकांचे त्यागमय जग (Kasturba Trust’s Platinum Year)

कस्तुरबा ट्रस्टच्या ग्रामसेविकांचे त्यागमय जग (Kasturba Trust’s Platinum Year)

 

‘कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टत्यांचा अमृत महोत्सव 2020 साली साजरा करत आहे. महात्मा गांधींनी कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टया संस्थेची स्थापना 1945 साली केली. जनतेने स्वयंस्फूर्तीने कस्तुरबांच्या स्मरणार्थ निधी गोळा करून, तो गांधीजींना अर्पण केला. त्यातून तो ट्रस्ट निर्माण झाला. कस्तुरबा गांधी ट्रस्टचे सेवाकार्य ग्रामीण स्त्रिया व मुले यांच्यासाठी गेली पंच्याहत्तर वर्षें अखंड ग्रामीण भागात सुरू आहे. कस्तुरबांचा जन्म पोरबंदर (गुजराथ) येथे 1869 साली झाला. त्यांचा विवाह गांधी यांच्याशी 1882 मध्ये विवाह झाला. कस्तुरबांनी गांधींच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या चळवळींमध्ये भाग घेतला. त्यांची गणना इतिहासात जगातील प्रथम अहिंसक सत्याग्रहीम्हणून केली गेली आहे. कस्तुरबांनी 1942च्या चले जावआंदोलनात उडी घेतली. त्यांना अटक करण्यात आली व पुणे येथील आगाखान पॅलेसच्या कारागृहात बंदी म्हणून ठेवण्यात आले. तेथेच त्यांचा अंत 22 फेब्रुवारी 1944 या दिवशी झाला.
कस्तुरबा गांधी ट्रस्टचे कार्य भारतात बावीस राज्यांत पसरले आहे. ते साडेचारशे केंद्रांच्या मार्फत सातत्याने सुरू आहे. त्यातील काही केंद्रे दुर्गम आदिवासी भागांत व अविकसित वस्त्यांमध्ये वसली आहेत. कस्तुरबा ट्रस्टचे कार्य ग्रामसेविकांमार्फत चालते. त्या प्रशिक्षित सेविका असतात. त्यांच्या सेवेमुळे ट्रस्ट भक्कम पायावर उभा आहे. त्या आडगावातील केंद्रांमधे बालवाडी, अंगणवाडी, पाळणाघरे, आरोग्यकेंद्रे, शेती, दुग्धव्यवसायाचे मार्गदर्शन अशा नेहमीच्या योजनांबरोबर समाजपरिवर्तनाचे काम म्हणून समाजशिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती असे महत्त्वाचे उपक्रमही राबवतात. त्यांना ग्रामपंचायती, पतपेढ्या, बँका, सोसायट्या यांच्यासोबतही काम करावे लागते. अशा रीतीने त्या सर्व दृष्टींनी सक्षम असतात. त्यांना निःस्वार्थ, निरपेक्ष जीवन, साधी राहणी यांचीही उपासना करावी लागते. प्रत्येक सेविकेच्या मनामध्ये ग्रामस्वराज्याची ओढ बिंबवली जाते. गेल्या काही वर्षांमध्ये भूकंप, महापूर यांसारखी नैसर्गिक संकटे आली. अशा आपत्कालात ग्रामसेविकाअहिंसा व शांतता यांच्या जणू दूत बनून गेल्या होत्या! ट्रस्टचे ध्येय तेच आहे.
कस्तुरबा ट्रस्टचे प्रांतिक कार्यालय पुण्यापासून बत्तीस किलोमीटरवरील सासवड येथे आहे. तो परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. त्या भागातील प्रसिद्ध वटेश्वर मंदिराच्या बाजूलाच कस्तुरबा गांधी स्मारक ट्रस्टआहे. तेथे अनेक प्रकारचे विकासाभिमुख कार्यक्रम व योजना अमलात आणल्या जातात; तसेच, तेथे सर्व केंद्रांना मार्गदर्शन व प्रशिक्षणही दिले जाते. बालग्रामया चळवळीशी संलग्न असलेली तीन बालसदने, निराधार अनाथ मुलांची घरकुले तेथे आहेत.

ट्रस्टच्या सासवड येथील आवारातील प्रेमाश्रमाचा उल्लेख मुद्दाम करायला हवा. ट्रस्टतर्फे ग्रामीण भागातील स्त्रिया ग्रामसेविका म्हणून खेड्यापाड्यात काम करत आहेत. त्यांना स्त्रियांचे आरोग्य, स्वावलंबन, साक्षरता, गर्भावस्थेपासून मुलांचे भरण-पोषण, प्रसुती आणि ग्रामसेवेची इतर कामे करावी लागतात. ज्या ग्रामीण भगिनींनी अशा कार्यात उभी हयात खर्च केली, अशा त्यागी सेविकांना निवाराम्हणून प्रेमाश्रमाची संकल्पना विकसित झाली. त्यातून एक सुंदर भावशिल्प निर्माण झाले आहे. म्हटले तर ट्रस्टच्या निवृत्त सेविकांचा तो निवास आहे; पण सध्या त्या इमारतीत पाच निवृत्त सेविका तेथे राहतात आणि त्यांच्याबरोबर निराधार बालिकांचा समुदायही तेथे वास्तव्यास आहे. त्यांपैकी एक सुहासिनी आठलेकर. त्यांचा घटस्फोट तरुण वयातच झाला. त्या संस्थेत दाखल झाल्या. (तेथे येणाऱ्या बहुसंख्य स्त्रिया या परित्यक्ता, विधवा किंवा अविवाहित आहेत.) आणि मेळघाटातील धारणी या गावी ग्रामसेविका म्हणून त्यांची नेमणूक झाली. तो संपूर्ण भाग आदिवासी कोरकू व भिल्ल या जमातींचा असल्यामुळे तेथे गरिबी, अंधश्रद्धा व शिक्षणाचा अभाव; तसेच, मेळघाटातील बालमृत्यूचे प्रमाण व कुपोषित बालके या गंभीर समस्यांना त्यांना तोंड द्यायचे होते. सुहासिनी यांनी परिचारिकेचे जुजबी प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे आजारपणात त्या आदिवासींना औषध देत. पण आदिवासींचा विश्वास त्यांच्या भगतावर असल्यामुळे त्यांच्यात बदल घडवून आणण्यात त्यांना खूप कष्ट पडले. त्याकाळी तेथे डॉक्टर, नर्सेस नव्हत्या. सुहासिनी यांनी तेथे अनेक वर्षे काम केले. त्यांना गावातील भांडणतंटे सोडवणे, मुलांना शाळेत घेऊन येणे अशी कामेही करावी लागत. अशा ग्रामसेविकांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी आधारवड म्हणून प्रेमाश्रमाची स्थापना झाली आहे.

प्रेमाश्रम

सासवड येथील ट्रस्टचे व्यवस्थापन कस्तुरबा ट्रस्टच्या महाराष्ट्र केंद्राच्या प्रतिनिधी शेवंताबाई चव्हाण सांभाळतात. ट्रस्टच्या शाखा अमरावती, चंद्रपूर, कोल्हापूर, मालगुंड (जिल्हा रत्नागिरी) येथे आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट तालुक्यातील धारणी येथील केंद्राच्या वतीने मेळघाटातील कुपोषणावर उपाय म्हणून ट्रस्टने गावागावांतून तरुण मुलींना संघटित करून, त्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले व गावात पाडावर्करम्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे कोरकू व भिल्ल जमातींत जागृती निर्माण होऊन त्यांच्या जीवनमानात सकारात्मक सुधारणा घडत आहे.

सुरेश चव्हाण 9867492406 sureshkchavan@gmail.com
—————————————————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version