Home व्यक्ती उद्योजिकेचे सामाजिक भान – संजीवनी पाटील (Sanjeevani Patil: Her Industry And Social...

उद्योजिकेचे सामाजिक भान – संजीवनी पाटील (Sanjeevani Patil: Her Industry And Social Commitment)

4

 

संजीवनी पाटील नावाच्या मराठी महिलेने दुबईमध्ये मसाल्यांचा उद्योग करण्यासाठी ओम पीके (OMPK) ट्रेडिंग कंपनी स्थापन केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही शहरे, तालुके, खेडी यांतील महिलांच्या उद्यमशीलतेला वाव मिळण्याची शक्यता तयार झाली आहे. तशी संधी काही महिलांना उपलब्ध झालीदेखील. त्यातून महाराष्ट्रातील महिलांनी बनवलेली लोणची, मसाले, कोकणातील पदार्थ दुबईच्या दुकानांत दिसू लागले आहेत. संजीवनी पाटील सध्या नाशिक आणि अलिबाग येथील महिलांकडून मसाले घेत आहेत. त्यांनी मसाल्यांच्या दर्ज्याची खात्री करून घेतलेली असते. मसाले घरगुती पद्धतीने बनवलेले असतात. त्याचे पॅकिंग नीट करून ते परदेशांतील नागरिकांसमोर मांडले जातात. महाराष्ट्रीयन पदार्थांची चव दुबईत मिळू लागल्याने तेथील मराठी माणसेही खूश झाली आहेत.
संजीवनी पाटील या मूळ मुंबईतील गिरगावच्या. त्यांचे शालेय शिक्षण डीजीटी हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी सोफिया कॉलेजमधून पदवी घेतली, पुढे पॅथॉलॉजीचे शिक्षण घेतले. त्यांनी जसलोक हॉस्पिटलमध्ये नोकरीही केली. मग स्वतःची साई पॅथॉलॉजी लॅबबोरीवली येथे स्थापन केली. संजीवनी यांना पतीच्या नोकरीमुळे आणि मुलांच्या शिक्षणासाठी दुबई व कॅनडा या देशांमध्ये राहण्याची व तेथील, विशेषत: मराठी लोकांचे जीवनमान अभ्यासण्याची संधी मिळाली. त्यांनी दुबईत गेल्या गेल्या तेथील महाराष्ट्र मंडळाशी संबंध जोडले. त्यामुळे त्यांचे तेथील मराठी समाजाच्या अडचणींकडे लक्ष वेधले गेले. त्यांच्यातील नेतृत्व गुणामुळे अल्पावधीत त्या सदस्य, सचिव अशी पदे भूषवत अध्यक्ष झाल्या. त्या ग्रँट रोड येथील शिवसेनेचे नगरसेवक गजाजन वर्तक यांच्या कन्या. त्यामुळे त्यांना नेतृत्व गुणाचा व समाजसेवेचा वारसा मिळाला होताच. दुबई महाराष्ट्र मंडळाच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत. त्यांची कारकीर्द लक्षवेधी ठरली. त्या दुबईत मार्च 2010 मध्ये झालेल्या विश्व साहित्य परिषदेच्या निमंत्रक होत्या. आता, तेथे त्या ट्रस्टी म्हणून कार्यरत आहेत.

         

गौरी आजींसोबत पाटील पती-पत्नी

दुबईतील मराठी जनांच्या सान्निध्यात तेथील लोकांच्या गरजा पाटील यांच्या लक्षात येऊ लागल्या. जीवन केवळ पैशाने संपन्न होत नाही; माणसाला त्याची राहणी, संस्कृती आणि खाण्याच्या सवयी या गोष्टीही जपायच्या असतात. दुबईतील मराठी माणसाला स्वयंपाकासाठी अनेक गोष्टींची गरज भासते. त्यांनी मराठी चवीचा स्वयंपाक बनवण्यासाठी योग्य ते मसाले, धान्य, डाळी, सणासुदीला सजावटीचे सामान अशी गरजांची यादी केली. मग संजीवनी यांना कल्पना सुचली, की भारतातील गृहिणी घरी मसाल्यांचे उत्पादन जे सहज करतात तेच दुबईत आणून विकले, तर भारतातील खेड्यापाड्यांतील, तालुक्यांतील गृहिणींना ती एक बाजारपेठ उपलब्ध होईल आणि दुबईतील मराठी माणसांनाही मराठी चवीचा स्वयंपाक करता येऊ शकेल. त्यांनी ओम पीके ट्रेडिंग कंपनी स्थापन केली. तिच्यातर्फे मसाल्यांचा उद्योग सुरू केला. दुबईतील मराठी माणसांना हवे असलेले अनेक पदार्थ – लोणची, चितळ्यांची बाकरवडी, मांसाहाराचे खास मसाले, कोकणी खाद्यपदार्थ, पणशीकरांची उत्पादने, दिवाळीचा फराळ, केप्र-कुबल-खातू यांचे खास मसाले दुबईतच उपलब्ध करून दिले. पण संजीवनी पाटील यांच्या खाद्यपदार्थांत खासीयत राहिली ती त्यांच्या गौरीआजीच्या हातच्या गोड्या मसाल्याची. गौरीआजीने गोडा मसाला बनवला होता. तो दुबईत सर्वांना आवडला. तेव्हा संजीवनी यांनी गौरीआजीची रेसिपी घेऊन त्याचे उत्पादन सुरू केले. तो मसाला गौरीआजीच्याच नावाने विकला. गौरीआजीचा आटा तर तेथे लोकप्रिय आहे. त्या आट्याची पोळी अत्यंत मऊ आणि खायला चांगल्या चवीची लागते. त्यांनी त्या सर्व वस्तूंसाठी दुबईत एक सुपरमार्केटच उभारले आहे. त्यांनी त्या उद्योगात अनेक स्थानिक; तसेच, भारतातील महिलांना सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे त्या महिलांना उद्योगाची आणि स्वावलंबनाची नवी दिशा लाभली आहे.

संजीवनी पाटील आणि सुजय पाटील
         संजीवनी पाटील यांनी ओम पीके ही कंपनी दुबईमध्ये 2010 साली सुरू केली. त्यांनी अल्पाधीतच उद्योगविस्तार करत दुबईत बस्तान बसवले आहे. भारतीय संस्कृतीतील सण-समारंभासाठी लागणारे काही खास पारंपरिक सामान – ज्वेलरी, कपडे, सिल्क साड्या, सजावटीच्या वस्तू, गणपतीच्या इको-फ्रेंडली मूर्ती इत्यादी वस्तूही ओम पीके मार्फत विकल्या जातात. त्यासाठी त्यांनी ओम पीके पूजा ट्रेडिंग सर्विसेस ही कंपनी स्थापन केली आहे. त्या कंपनीमार्फत पूजेसाठी सामान मिळते; तितकेच नव्हे, प्रशिक्षित भटजीही मिळवून देण्याची जबाबदारी घेतली जाते. त्याच दरम्यान संजीवनी यांच्या उद्योगात त्यांचे पती सुजय पाटील हेही सामील झाले. ते बँकर होते. तेवढेच नव्हे तर त्यांची कन्या हीदेखील त्यांच्या उद्योगात आली. मृण्मयी ही ओम पीके ची कॅनडामधील व्यवस्था पाहते. ती आर्किटेक्ट व चित्रकार आहे. ऑनलाइन ऑर्डर्स घेणे: तसेच, शॉपमधून पिठे मसाले पुरवणे सुरू आहे. कॅनडामध्ये माल भारतातून डायरेक्ट जातो. संजीवनी व सुजय पाटील हे दांपत्य उद्योजक म्हणून दुबईत व कॅनडात नावारूपाला आले आहे.
पाटील दाम्पत्याच्या मनात दुबईकॅनडा या दोन देशांत राहूनही मराठी संस्कृती आणि भाषा यांबद्दलचा आदर कायम राहिला आहे. तेथील महाराष्ट्र मंडळ व मराठी मंडळी मराठी कार्यक्रम करत आहेत, परंतु पुढील पिढीला मराठी भाषा आली नाही तर मराठी संस्कृती तेथे रूजणार नाही, म्हणून मराठी भाषा आणि संस्कृती पुढील पिढीला देण्यासाठी संजीवनी पाटील यांनी दुबईमध्ये भारतीय वकिलातीच्या (इंडियन कॉन्स्युलेट) सहकार्याने मराठी शाळा 2016 साली सुरू केली आहे. संस्कृतीशिवाय भाषेला अर्थ प्राप्त होत नाही या विचाराने संजीवनी यांनी त्या शाळेत भारतीय सण, श्लोकांचे पठण, योग अशा गोष्टीही अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत. तसेच, भारतीय मूल्ये व संस्कार यांचे जतन करण्यासाठी त्या दुबईत दासबोधाचे वर्ग चालवतात.     
          संजीवनी स्वतः संपन्न आयुष्य जगत आहेत. त्यांचा मुलगा मल्हार हा कमर्शियल पायलट आहे. पाटील दांपत्याचे घर ठाण्यातही आहे. त्यांचे वास्तव्य कधीकधी तेथे असते. संजीवनी पाटील यांची नवी योजना आहे. ती त्यांनी जानेवारी 2020 मध्ये अलिबागयेथे झालेल्या जागतिक मराठी परिषदेत जाहीर केली. ठाणे व रायगड जिल्ह्यांतील महिलांमध्ये जागृती करून त्यांचे काही मसाले व खाद्यपदार्थ जागतिक पातळीवर कसे उपलब्ध करून देता येतील यासाठी ती योजना आहे. त्या म्हणाल्या, की ज्या गृहिणींना काही व्यवसाय करायचा आहे किंवा कलाकौशल्याच्या वस्तू बाजारपेठेला पुरवायच्या आहेत, घरी मसाले तयार करून एक्सपोर्ट करायचे आहेत, अशा सर्वांनाच मी माझ्या व्यवसायात सहभागी करून घेईन व दुबईत त्यांचे बस्तानही बसवून देईन.” संजीवनी ठाण्यात राहण्यास येऊन तेथेही उद्योजिका फोरम निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. उद्योग अनुभव प्रतिष्ठानतर्फे त्यांना उद्योगदीप्ती एनआरआय या पुरस्काराने गौरवण्यात आले. संजीवनी पाटील, सुजय पाटील
आणि दुबईचे महाराष्ट्र मंडळयांनी एकत्रित काम करून लॉकडाउन काळात मदतकार्य चालवले आहे. ते विमाने सुरू नसल्याने दुबईत अनेकांची पंचाईत झाली होती त्यांना; तसेच अपंग किंवा अडलेल्या महिला, गर्भारशी यांना धान्य किंवा जरुरीची पिठे पोचवणे अशी कामे सातत्याने करत आहेत. त्यांनी ऑनलाइन ऑर्डर्स घेऊन नागरिकांनाही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.गरजूंना अन्नपदार्थ पोचवण्याचे मदतकार्य केल्याने आम्हालाही समाधान वाटले.” असे संजीवनी म्हणतात. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे काहींची तर खाण्याची सोय नव्हती. त्यांना शक्य तेवढी मदत केली असेही त्यांनी सांगितले.
मेघना साने 9892151344
meghanasane@gmail.com

 

मेघना साने मुंबई विद्यापीठाच्या एम ए, एम फिल पदवीधारक असून, त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीवर नाट्यसंपदाच्या तो मी नव्हेचसुयोगच्या लेकुरे उदंड झाली या नाटकांमधून पाच वर्षे भूमिका केल्यानंतर एकपात्री प्रयोगाची स्वतंत्र वाट चोखाळली आहे. त्यांनी कोवळी उन्हेया स्वलिखित एकपात्री प्रयोगाचे देशविदेशांत दौरे केले आहेत.
———————————————————————————————-

About Post Author

4 COMMENTS

  1. सौ.संजीवनी व सुजय पाटील तुम्ही दोघे खूपच चांगले काम करीत आहात. आम्हाला सुजयसारखा मित्र लाभल्याचा अभिमान वाटतो. तुमच्या कामासाठी खूप शुभेच्छा …

  2. सौ संजीवनी सुजय पाटील तुमचे कार्य महान आहे, हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हां दोघांना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version