Home वैभव गावांच्‍या अंतरंगात खुळ्यांच्या गावची अडाणी आळी!

खुळ्यांच्या गावची अडाणी आळी!

3

मला ‘तुम्ही खुळे का?’ हा प्रश्न कोणाही अनोळखी व्यक्तीशी परिचय करून घेताना किंवा देताना हमखास विचारला जातो! आमच्या वडांगळी गावात साधारणत: सत्तर टक्के कुळे ‘खुळे’ आडनावाची आहेत. त्यामुळे सर्वदूर ‘खुळ्यांचा गाव’ अशीच ओळख आमच्या गावाची निर्माण झाली आहे. कोणीही व्यक्ती वडांगळीची म्हटल्यावर ‘खुळे आडनावाची’ असणार असा कयास समोरच्याने बांधलेला असतो.

आम्ही मात्र अशा या खुळ्यांच्या गावात आहोत ‘अडाणी’! म्हणजे गावातील आमची गल्ली ‘अडाण्याची आळी’ म्हणून ओळखली जाते! गावातील सगळे ‘खुळे’ आम्हाला ‘अडाणी’ म्हणतात… समजतात! खरे तर, ते खुळे नाहीत अन् आम्हीही अडाणी नाही. सगळे शब्दांचे खेळ.

गावातील सगळ्यात मोठी गल्ली आमचीच. एस. टी. स्टॅण्डवर उतरले, की पहिली सरळसोट दिसते ती आमची गल्ली. गावात पूर्वेकडे प्रवेश करणारी. तोंडाशी विठ्ठलाचे मंदिर, विठोबाच्या पायी माथा टेकवून पुढे सरकणार्‍या त्या आळीत शंभरेक पावलांवर बहिरोबाचे देऊळ आहे. तेथून ती गल्ली उजवीकडे वळून, नदीवर जाण्यास निघते. पन्नासएक पावले आणखी पुढे चालत गेले, की माणूस शनी चौकात पोचतो. तेथे दोन सुंदर मंदिरे आहेत – सुरेख नक्षीकामाचे कळस असलेली. एक दत्ताचे अन् दुसरे शनीचे! दोन्ही मंदिरे चौकातच असली तरी दत्ताचे देऊळ आमच्या अडाणी गल्लीत उभे तर शनीखालची चिंच शनी मंदिराच्या पाठीशी!

गावाच्या जन्मापासून त्याची साथसंगत, पाठराखण करत असलेल्या, या भल्यामोठ्या आणि एकमेव चिंचेच्या झाडाला ओळख मिळाली ती शनीच्या मंदिरामुळे! गल्ली दत्ताच्या पायाशी झुकून पुढे देवनदीकडे सरकते… ती शनी मंदिराला वळसा घालून, चिंचेच्या पायाला हात लावून हसत हसत नदीच्या दिशेने चालू लागते. तिच्या शेवटच्या टोकाशी पुन्हा देवळेच देवळे! प्रथम कालिकेचे मंदिर, त्याच्या शेजारी घोड्यावर आरूढ झालेल्या खंडोबाचे छोटेखानी देऊळ! जवळच, गावात फार पूर्वी मरण पावलेल्या एका वानराची समाधी अन् मूर्ती! अन् अगदी शेवटी, मारुती राया! त्याचेही भलेमोठे मंदिर अन् त्याच्या पाठभिंतीशी मशीद… पांढरी शुभ्र!

गाव मुळात दुष्काळी! कैक पिढ्यांनी त्यांचे जीव दुष्काळाशी सामना करतच गमावलेले. गावात बहुतेक घरे धाब्याची-कडी-पाट अथवा किरळ-वासे यांच्यावर खार्‍या मातीचा पेंड टाकून बांधलेली. निम्मीअर्धी विटांची, काही मातीच्याच भेंड्यातील. जेथील पर्जन्यमान कमी त्या भागात धाब्यांची घरे आढळतात. मला तर ती दुष्काळाचे प्रतीक वाटतात. आमच्या आळीतही त्याच प्रकारची घरे होती. आख्ख्या गल्लीत एकच दुमजली कौलारू इमारत होती. शनिचौकाशी… भाऊ चिमणाजी यांची! गल्लीची अशी एकंदर स्थिती.

आमच्या आळीतील बहुतेक मंदिरे माणसांच्या घरांसारखी… धाब्याची. बाहेरून घर कोणते अन् मंदिर कोणते हे लक्षात येऊ नये अशी. माणसांच्या गर्दीत देवही येऊन राहिलेले! आत डोकावल्यावर नजरेस पडणारी घंटा व मूर्ती यांवरून ते मंदिर असल्याचे लक्षात येई. सगळेच देव असे घरशेजारी बनून राहिलेले… सख्खे शेजारी. त्यांचे देवत्व विसरून माणसांशी एकरूप झालेले.

गावाची उपजीविका शेतीवर. आमची आळीही त्याला अपवाद नाही. पण अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षही! ती सगळी गावाच्या व्यवस्थेतील बलुतेदार मंडळी. गावगाड्यात त्यांचाही तितकाच मोठा सहभाग. मात्र त्यांचा पोशिंदा शेतकरी! उदरभरण ज्यातून होते, पोटाला अन्न मिळते त्या शेतात राबणारा, शेतीची कामे करणारा शेतकरी. त्याला अन्न पिकवण्याचे मूलभूत ज्ञान असल्याने तो खर्‍या अर्थाने ज्ञानी अन् बाकीची सारी प्रजा अडाणी असे त्याचे साधे सरळ तत्त्वज्ञान. त्या न्यायाने आम्ही अडाणी.

आमची आळी खेड्यात असूनही मातीपासून काहीशी तुटक… राहणीमानात चोखंदळपणा, घरांची रचना, साफसफाई, सडा-रांगोळी, घरगुती कामे करणार्‍या बायका, बर्‍यापैकी छानछोकीचे कपडे केलेली गडीमाणसे… मुले! शालेय शिक्षणाच्या बाबतीतही आमचीच आळी आघाडीवर! बरीचशी पांढरपेशी कुटूंबे त्या आळीत एकवटलेली. आमच्या मागच्या आळीत देखील साधारणत: आमच्याच आळीचे अनुकरण करणारी अन् त्या शेजारची पेठेची गल्ली.. तिच्यावरही अधिराज्य आमच्याच आळीचे असे. आजुबाजूच्या दहा-बारा खेड्यांतील लोक पेठेत खरेदीसाठी येत. प्रत्येक खेड्यात एक शहर असतेच वसलेले! गावात येणार्‍या नोकरदारांची घरे घेण्यासाठी पहिली पसंती आमच्या गल्लीला असे. आमच्या आळीने तिच्यात अनेक नोकरदारांची कुटुंबे सुखेनैव सामावून घेतली. बदली झाल्यावरही हे गाव, ही गल्ली सोडून जाणे अनेकांच्या जीवावर येई!

काहीशी मृदू भाषा, वागण्याबोलण्यात नम्रता, धार्मिक-सामाजिक उत्सवात समरसून सहभागी होणे, अडल्यानडल्याच्या मदतीला धावणे, संकटप्रसंगी मदतीचा हात देणे ही आळीची वैशिष्ट्ये! अर्थशास्त्रीय भाषेत ज्याला उत्पादक अन् अनुत्पादक क्षेत्र म्हणतात ती मला गावाचा विचार करताना दिसू लागतात. सगळ्यांचा पोशिंदा शेतकरीवर्ग एका बाजूला अन् त्याला लागणार्‍या सगळ्या सेवा पुरवणारी अठरा पगड जातीतील उतरंड एका बाजूला अशी विभागणी झालेली. आमची सगळी आळीच्या आळी सेवा उद्योगात! कोणी न्हावी, कोणी सुतार, कोणी शिंपी, कोणी सोनार, किराण्याच्या वाण सामानाचे दुकान घालून बसलेला वाणी… हर प्रकारच्या सेवेसाठी तत्पर असणारी ही मंडळी! मात्र पोशिंद्याबाबतीत तितकीच कृतज्ञ – त्याच्या सुखदु:खात रममाण झालेली!

शेतकरी पावसाळ्याचे चार महिने कामात गुंतला, की केवळ काम एके काम. मग बाजारपेठ थंडावायची. ते चार महिने अडाण्याच्या आळीवर मंदीचे मळभ दाटे. पावसाळ्यात अनेक कुटुंबांची आर्थिक ओढाताण होई. त्यासाठी हंगामाच्या, सुगीच्या दिवसांतच धान्यधुन्य, डाळीसाळी, तिखटमिठाची तजवीज करून ठेवण्याकडे कल असायचा. मंदीच्या काळात एरवी सदैव उत्साही असणारी ती आळी तिचे हातपाय आखडून घेई. घरोघरी मग हरीविजय, भक्तिविजय, नवनाथ अशा पोथ्या सुरू होत. श्रावणी सोमवार, शनिवारी साठा उत्तराच्या सुफळ संपूर्ण कहाण्या घरोघरी वाचल्या जात. उपासतापास, व्रतवैकल्ये यांत स्वत:ला बुडवून घेत मंदीच्या झळा सोसण्याचा प्रयत्न होई.

मनुबाबा अन् भागुबाई, सोपानकाका अन् भिमाबाई, यादवबाबा अन् धुरपदाबाई अशी शेतकरी कुटुंबे होती आमच्या आळीत, पण आळीचे सगळे वाण अन् गुण त्यांच्या अंगी भिनलेले. कोठलीही सत्ता हाती नसताना गावाचे सांस्कृतिक नेतृत्व करून गावाच्या कारभाराची आर्थिक घडी बसवणारे लक्ष्मणतात्या, सोनारकी करता करता गावकर्‍यांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांनी त्यांचे दातृत्व अन् दूरदृष्टीने गावाच्या शैक्षणिक विकासाचा पाया रचला, अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार घडवून आणले, त्यांच्या डागडुजीची तरतूद केली. ते सगळे करूनही, ते त्यापासून अलिप्त असे ‘सोनेरी’ आयुष्य जगून आमच्या आळीला सुवर्ण झळाळी देणारे! विठ्ठलाची पूजा करत आयुष्य वेचलेले अन् कमालीच्या दारिद्र्यगर्तेतून त्यांच्या कुटुंबाला आकार देणारे कांताकाका कासार, विठोबाच्या देवळात काकडारतीची मुहूर्तमेढ रोवणारा, संसारापेक्षाही भजन-कीर्तनात अधिक रंगलेला काशिनाथ रंगारी, चेहर्‍याला रंग लावून रंगभूमी गाजवणारा दगू न्हावी अशा पूर्वजांनी त्या आळीला रंगरूप दिले.

गावात दोन भाग… एक खालचा वाडा अन् एक वरचा वाडा. भौगोलिक दृष्टया म्हणण्यापेक्षा व्यवहाराच्या सोयीने पडलेले भाग. गाव तसे एकोप्याचे. वरचा वाडा आख्खा आणि केवळ गावातील खुळे कुळांसोबतच इतर कुळे अन् इतर सगळ्या अठरापगड जातींचा समावेश खालच्या वाड्यात. वाड्यातील हा फरक लक्षात येई तो पोळ्याच्या बैलांच्या मिरवणुकीवेळी. तेथे वरच्या वाड्याचा मान पहिला. ती मिरवणूक आटोपल्यानंतर खालच्या वाड्याचे बैल मिरवण्यास निघत. आमची आळी अर्थातच खालच्या वाड्यात.

पोळ्याच्या मिरवणुकीत बैल मिरवण्यातही मोठी मर्दुमकी वाटायची. आमच्या गल्लीतील एकाद्याच कुटुंबाकडे स्वत:चे बैल असत. आळीतील आम्हा पोरांमध्ये पोळ्याला मनुबाबाचे बैल मिरवणुकीत धरण्यासाठी चढाओढ लागायची. प्रत्येकाच्या हातात आळीपाळीने कासरा येई. एका बैलामागे दोन-दोन, तीन-तीन जणांची रेटारेटी बैलांचा ताबा घेण्यासाठी सुरू असायची. सकाळपासूनच, आम्ही त्या बैलांच्या आगेमागे करत असू. त्यांची शिंगे साळणे, शेप कातरणे, शिंगांना हिंगूळ देणे. त्यांच्या अंगावर गेरूचे, निरनिराळ्या रंगांचे छाप वठवणे अशी बैल सजवण्याची कितीतरी कामे आमच्या घोळक्यातच होत.

विस्थापितांची मोठी संख्याही त्याच आळीत होती. पोरे शिकली-सवरली, की नोकरी-धंद्यानिमित्त बाहेर पडत, तिकडेच स्थिरावत. तशी अनेक कुटुंबे नंतर पोटापाण्यासाठी गाव सोडून गेली, परगावी बहुतेक मोठमोठ्या शहरांतून स्थिरावली. ती सगळी मंडळी सणावारी… विशेषत: सतीदेवीच्या यात्रेला गावी येतात. गल्ली आनंदाने मोहरून जाते. अनेकांची घरेही गल्लीत उरलेली नाहीत. पण आठवणींचे धागे मनाला ओढून आणतात अन् पावले घराची वाट चालू लागतात.

पोळ्याचा आठवडे बाजार वरच्या वेशीला, बसस्टॅण्डच्या परिसरात भरायचा. बैलांचे निरनिराळे रंग, आभूषणे हे त्या बाजाराचे खास वैशिष्टय! चवर, छंबी, गोंडे, कासरे, नाडे, गेरू, हिंगुळ, क्वचित झुली, घाट्या, घुंगरे असा साज असायचा. पूजेसाठी मातीचे बैल विक्रीला असायचे. मातीचे बैल मोठ्या आकाराचे घेण्यासाठी जीव तुटायचा, पण घरातून मात्र त्यास विरोध! मी लहानपणी एकदा हट्ट करत बैलांची जोडी घेतली तर घरी नेतानाच कोणाचा तरी धक्का लागून एका बैलाचा पाय मोडला. त्या वर्षी पोळ्याच्या सणाचा आनंदच घेऊ शकलो नाही. माझ्या बालवयातील आनंदाचाच पाय मोडला होता जणू!

आता, मुलांना मातीच्या बैलांमध्येही फारसा रस नाही. मी त्यांना गेल्या पोळ्याला जबरदस्तीने मातीच्या मोठ्या बैलांची जोडी विकत घेऊन दिली. खरे तर, मी हरवलेले, निसटून गेलेले बालपणातील सुख मिळवण्याचा मी केलेला तो केविलवाणा प्रयत्न असावा! बाजारात नवनाथसारखे काही मित्र दुकानदारांचे सामान वाहून देणे, बाजार ओटे साफ करणे अशी कामे करत. सुनील लोहारकर थरथरत्या डोक्यावरून भल्याथोरल्या तांब्याच्या हंड्याने पाणी वाहून भावाच्या मदतीने आख्ख्या बाजाराला चहा-पाणी पाजत असे.

– किरण भावसार

About Post Author

Previous articleस्वप्नील गावंडे देतो आहे अंधांना प्रकाशाची दिशा
Next articleसिंदखेड राजा (Sindkhed Raja)
किरण भावसार हे वडांगळी, ता. सिन्नर (नाशिक) येथील रहिवाशी असून सध्या नोकरीनिमित्त सिन्नर येथे स्थायिक आहेत. त्यांना कथा, कविता, ललित लिखाणाची आवड आहे. त्‍यांची ‘मुळांवरची माती सांभाळताना’ हा कवितासंग्रह, तसेच ‘आठवणींची भरता शाळा’ व ‘शनिखालची चिंच’ या दोन ललित लेखसंग्रहांची ईबुक्स प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या ‘मुळांवरची माती...’ या कवितासंग्रहाला कुसुमाग्रजांच्या पहिल्या कवितासंग्रहाच्या नावाने दिला जाणारा ‘विशाखा’ पुरस्कार, अहमदनगर येथील ‘इतिहास संशोधन मंडळा’च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘कवी अनंत फंदी’ पुरस्कार मिळाला आहे. लेखकाचा दूरध्वनी -7588833562

3 COMMENTS

  1. जुन्या दिवसांची ओढ निर्माण…
    जुन्या दिवसांची ओढ निर्माण झाली वाचून,छान वाटलं

  2. Kharch Khup chhan vatl Mazya…
    Kharch Khup chhan vatl Mazya gavacha etihas ani Tyachya Junya athavni, Sir ajunhi Don tin goshti rahiltyat tya Plz add kra. Nice lekg@@

  3. खुप छान वाटले वाचून. सर अजून…
    खुप छान वाटले वाचून. सर अजून जावयाची गाढवावरुन मिरवणूक ही परंपरा सुद्धा आपल्या गावाला वेगळेपण देते

Comments are closed.

Exit mobile version