भारताच्या सात लाख खेडेगावांमध्ये महादेवाचे मंदिर नाही असे गाव नसेल ! महादेवाच्या त्या मंदिरांतील भगवंताचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातील महादेवाला वेगवेगळे नाव आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे महाराष्ट्राच्या पोलिस खात्याचे घोषवाक्य आहे. कोळबांद्रे गावातील डिगेश्वरही नेमके तेच काम करतो. गावात कोणी गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल माणसाला त्रास दिला तर ‘आता डिगेश्वराला नारळ देईन’ एवढे वाक्य जरी त्या गरीब माणसाने उच्चारले तरी तो दुष्ट घाबरून जातो…
हिंदुस्तानच्या सात लाख खेडेगावांमध्ये महादेवाचे मंदिर नाही असे कोठले गाव नसेल ! महादेवाच्या त्या मंदिरांतील भगवंताचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातील महादेव भगवानाला वेगवेगळे नाव आहे ! महाराष्ट्रातीलच काही उदाहरणे द्यायची झाली तर आमच्या कोळबांद्रे गावातील डिगेश्वर, माझ्या आईच्या पंचनदी गावातील सप्तेश्वर, कोळथरे येथील कोळेश्वर, गुहागरचा व्याडेश्वर, नाशिकचा त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, वेळणेश्वरचा वेळणेश्वर, धामणसे येथील रत्नेश्वर, वेरूळचा घृष्णेश्वर आणि अशी लाखो नावे ! विष्णूचे जसे दहा अवतार म्हणतात तसे, हिंदुस्तानात सर्व गावांचे मिळून या प्रलयंकारी शंकर महादेवाचे सात लाख अवतार असतील !
आमच्या कोळबांद्रे गावात सर्वात लांब असणारी बेजा वाडी सोडली तर गावच्या साऱ्या वाड्या डिगेश्वराच्या मंदिरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहेत. मुंबई–पुण्याचा चाकरमानी गावात आला तर तो डिगेश्वराला हाक मारून, देवळामध्ये दोन क्षण बसून नंतरच परत जातो. तसा अलिखित नियम ठरून गेलेला आहे. गावामध्ये कोणाचा जन्म होऊ दे, कोणाचे लग्न असू दे, कोणाच्या घरी कसलाही समारंभ असू दे- डिगेश्वराला ती वार्ता पहिली सांगितली जाते ! गावात कोणाचेही लग्न झाले, की नवरानवरी पहिले आशीर्वाद डिगेश्वराचे घेतात ! कोणते संकट येऊ दे- डिगेश्वराला संकट निवारणार्थ नारळ दिला जातो आणि संकट दूर झाले तर डिगेश्वराची सेवा भक्तिभावाने केली जाते. डिगेश्वर हा सर्व जनांचा मोठा आधार आहे. गावकऱ्याची मान एसटीतून येताना आणि एसटीतून जाताना डिगेश्वराच्या देवळाकडे आपोआप वळते आणि हात जोडले जातात! प्रत्येक गावकरी डिगेश्वर महादेवाची वर्षाकाठी काहीना काही सेवा करतो.
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे महाराष्ट्राच्या पोलिस खात्याचे घोषवाक्य आहे. नेमके तेच काम गावा-गावातील हे शंकर महादेव करत असतात. गावात कोणी दुष्ट, मुजोर माणसाने कोणा गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल माणसाला त्रास दिला तर ‘आता डिगेश्वराला नारळ देईन’ एवढे वाक्य जरी त्या गरीब माणसाने उच्चारले तरी तो दुष्ट घाबरून जातो. त्याचे वागणे एकदम सरळ होते. कोणी कोणाला फसवले तर ज्याला फसवले त्या मनुष्याने केवळ, ‘आता डिगेश्वराला नारळ देतो’ एवढे म्हटले रे म्हटले तरी फसवणारा तो मनुष्य एक तर त्याची चूक कबूल करतो किंवा जी काही फसवणूक झालेली आहे त्याची कळतनकळत त्या पीडित माणसाला भरपाई करतो ! कारण त्याला माहीत असते, की असे केले नाही तर डिगेश्वर भगवान त्याचा विनाश निश्चितपणे करणार ! डिगेश्वराचा असा गावातील गोरगरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा आधार आहे. त्या दृष्टीने पाहता असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये, की येथे सरकारच्या कायद्याची, कोर्टकचेऱ्या करण्याची सहसा आवश्यकता पडत नाही. येथे कायदा चालतो तो डिगेश्वराचा ! मला आठवते- आम्ही जेव्हा लहानपणी शाळेत जायचो तेव्हा मधल्या सुट्टीमध्ये बहुतेक मुले डिगेश्वराच्या देवळात जाऊन बसायची, खेळायची. घराबाहेर खेळणाऱ्या मुलांवर जसे त्यांच्या आई-वडिलांचे लक्ष असते, तसेच डिगेश्वर शाळेत शिकणाऱ्या आणि समोरच्या मैदानात खेळणाऱ्या मुलांकडे लक्ष ठेवून आहे की काय असे मला तेव्हा वाटे.
नवरात्रात देवळामध्ये घट बसतात. तो तर डिगेश्वराचा मोठा सोहळा ! पालखीमध्ये डिगेश्वर आणि बाकीच्या देवदेवता यांना पाहून मनाला जो आनंद होतो त्याचे वर्णन शब्दांमध्ये करता येणे शक्य नाही ! नवरात्रीचे नऊ दिवस गावातील गुरव मंडळी आणि ग्रामस्थ डिगेश्वराची सेवा उत्साहाने करतात. धुपाचा गंध, उदबत्तीचा सुवास, गावकर्यांची वर्दळ, फुलांच्या माळांची बरसात असे सारे वातावरण मोठे भक्तिभावपूर्ण असते आणि होळीच्या वेळी तर काही विचारूच नका ! शिमग्याच्या वेळी एकही घर असे नसेल जेथे चाकरमानी मुंबई-पुण्याहून गावात येत नाही ! फाल्गुन शुद्ध पंचमीपासून दहा दिवस होळी झाल्यानंतर, मुख्य होळीचा म्हणजे होमाचा दिवस येतो. होमाच्या रात्री पालखी सजवण्याची लगबग सुरू झाली, की उत्साहाला उधाण येते. रात्री बाराच्या सुमारास ढोल-ताशांचे विशिष्ट पद्धतीतील आवाज कानावर पडले, की अंगावर भक्तिभावाने रोमांच उभे राहतात.
मंदिरामध्ये जेव्हा पालखी सजवण्याचे काम सुरू असते तेव्हा ‘स्राणे’वर होम लावण्याची आणि डिगेश्वराच्या व गावदेवतांच्या पालखीच्या स्वागताची तयारी सुरू असते. स्राण काही अंतरावर आहे. स्राण म्हणजे होम लावण्याच्या स्थानापासून जवळच बांधलेले, पाच दिवस पालखी ठेवण्याचे आणि पालखीमधील देवदेवतांची पूजाअर्चा करण्याचे एक छोटेखानी व्यासपीठ मंदिर. ते शंकर महादेव आणि इतर देवता यांना पाच दिवस मुक्कामासाठी बांधलेली, भिंती नसलेली साधी अशी वास्तू असते. ती एरवीच्या काळी रिकामी असते. तर त्या मंदिराची सजावट केली जाते. मंडप उभारले जातात. गावकरी होमासाठी लाकडे वाड्यांवरून आणतात. जमिनीमध्ये मोठा खड्डा करून, त्यामध्ये मोठे लाकूड मध्यभागी उभे ठेवून त्याभोवती बाकीची लाकडे उंचीप्रमाणे रचली जातात. त्या लाकडांवर गवताचा थर लावला जातो. मंदिरामध्ये जेथे पालखी ठेवली जाते, त्याच्या बरोबर मागे, मंदिराच्या जरा बाहेर सुरमाड ध्वजस्तंभाप्रमाणे उभा केला जातो. सुरमाड नारळाच्या झाडासारखा काहीसा, ताडाच्या झाडासारखा काहीसा दिसतो. तो योग्य वृक्ष शोधून, तो तोडून वाजतगाजत गावात आणला जातो. भगवान शंकराला जंगल प्रिय असल्यामुळे त्याचे प्रतीक म्हणून कदाचित ते झाड तेथे रोवले जात असावे !
जुवेकर मंडळी कोळबांद्रे मध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी राहण्यास आली. काही जुवेकर एका छोट्या टेकडीवर घरे बांधून राहिले आणि काही त्या टेकडीच्या पायथ्याशी घरे बांधून राहिले. टेकडीवर राहणाऱ्या जुवेकरांना ‘वरचे जुवेकर’ आणि पायथ्याशी राहणाऱ्या जुवेकरांना ‘खालचे जुवेकर’ अशा संज्ञा मिळाल्या. आम्ही आमच्या मूळ ‘वरच्या’ घरातून बाळुकाका जुवेकर यांच्या ‘खालच्या’ घरात 1982 साली राहण्यास आलो. आमची आई पालखीची प्रथम पूजा तेव्हापासून, गेली चाळीस वर्षे करत आहे. ढोल-ताशा सूर, सनई यांचा आवाज देवळापासून सुरू होतो आणि मोठ्या दिमाखात गावकरी व चाकरमानी डिगेश्वर महाराजांची पालखी प्रेमाने, भक्तीने आणि उत्साहाने वाजतगाजत जेव्हा गावच्या स्राणेकडे आणू लागतात तेव्हा ते जसजसे जवळ येतात तसा तो भक्ती आणि शक्ती यांचा, ढोल-ताशांतील आवाज मोठा होत जातो. तो आवाज कानावर आला की आम्ही सारे आईच्या मागून आमच्या घराजवळील साकवापाशी जातो. तो सुपारीच्या झाडाच्या पटट्यांनी बनवलेला छोटा तात्पुरता पूल आहे. रात्रीच्या काळोखामध्ये सुद्धा डिगेश्वराचा तेजस्वी मुखडा लख्ख दिसतो ! महादेवाच्या दर्शनाने अंगावर रोमांच उभे राहतात आणि डोळे आनंदाश्रूंनी ओले होतात ! ‘डिगेश्वरा, गेले वर्षभर आमचा सांभाळ केलास आणि म्हणूनच आज आम्ही येथे येऊ शकलो !’ हीच भावना प्रत्येक गावकऱ्याच्या आणि चाकरमान्याच्या मनात असावी ! आमची आई ती पूजा पूर्ण करण्यास बऱ्याच वेळा वेळ लावायची. तोपर्यंत पालखी खांद्यावर घेतलेले गावकरी भक्त शांतपणे उभे असायचे. मी एकदा आईला चिडून म्हणालो, की “अगं आई, तू किती वेळ लावतेस पूजा करायला? त्या दोन माणसांना पालखी किती जड होत असेल !” तेव्हा आई म्हणाली, “अरे मुला, गावकऱ्यांना डिगेश्वराचं का कधी ओझं होतं? डिगेश्वरच आपल्या सगळ्यांचं ओझं वाहतो!” मला आईला तो प्रश्न विचारल्याबद्दल अपराधी वाटू लागले !
पालखी मार्गक्रमण करत करत स्राणेवर जाऊन मोठ्या दिमाखात विराजमान होते ! ठरलेल्या मुहूर्तावर होम लागतो. सारे गावकरी आणि मानकरी होमाला बऱ्याच प्रदक्षिणा घालून गीत गातात. ते गीत संपले की होम पेटवला जातो. गावकरी हातांमध्ये काठ्या घेऊन होमाभोवती उलट आणि सुलट प्रदक्षिणा घालतात. त्या प्रदक्षिणा संपल्या, की त्यात त्या वर्षी लग्न झालेले नवरदेव नटूनथटून, डोक्यात टोपी वगैरे घालून आणि हातात नारळ घेऊन होमाला जोरात धावत प्रदक्षिणा घालतात. एक प्रकारे, कोणाच्यात किती दम आहे हे पाहिले जाते ! गावकरी त्यांना ओरडून स्फूर्ती देतात. जो नवरदेव दमतो तो होमात नारळ टाकून बाजूला होतो. जो शेवटपर्यंत स्पर्धेमध्ये शिल्लक राहतो तो सगळ्यात मजबूत गडी ! अशी ही जरा गंमत चालते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच प्रकारे गावात नवीन लग्न होऊन आलेल्या सासुरवाशिणी स्त्रियासुद्धा होमाला प्रदक्षिणा घालतात. अर्थात नवरदेवांसारख्या त्या जोरात धावत नाहीत, तर स्त्रीसुलभ मार्दवाने संथगतीने प्रदक्षिणा घालतात.
संबंधित लेख – कोळबांद्र्याच्या डिगेश्वराचा जन्म
होम जेव्हा प्रज्वलित होतो आणि आगीच्या ज्वाळा आकाशाकडे झेपावतात तेव्हा त्या अग्नितेजाला आणि प्रकाशाला पाहून असे वाटते, की ती ऊर्जा गावकऱ्यांना आणि चाकरमान्यांना पुढील वर्षभर पुरेल ! माझ्या सभोवताली उभे असलेले आणि भक्तिरसात न्हाऊन निघालेले कोळबांद्रेकर वेळेची तमा न बाळगता पालखीचे स्वागत करण्यास उत्सुक असतात. डिगेश्वर महाराजांचे दोन नर्तक होमापासून पालखीपर्यंत नृत्य आणि गायन करत गावकऱ्यांच्या साथीने मंदगतीने पोचतात. तेथे पोचल्यानंतर पुन्हा एकदा महादेवाचा गजर होतो आणि मग सुरू होतो तो डिगेश्वराचा एकच आनंदोत्सव ! पालखी खांद्यावरून बाहेर आणली जाते आणि गावकरी धुंद होऊन परमेश्वराला अंगाखांद्यावर घेऊन नाचतात. असे वाटते, की रात्र संपू नये आणि ईश्वराचे तांडव नृत्य अखंड चालू राहावे! गर्दी प्रचंड असते. उत्साह त्याहून अधिक असतो. प्रत्येकाला स्वतःच्या खांद्यावर परमेश्वराला घेण्याची तीव्र इच्छा असते. पालखीचे भोई दर एक दोन मिनिटांला बदलत असतात. तो बदल इतक्या सहज होतो की पाहणार्याला कळतही नाही की पालखीचे भोई बदलले गेले आहेत. आत बसलेल्या परमेश्वराला जराही धक्का बसू नये ही त्या मागील भावना असते ! डिगेश्वर महाराजांचा आणि ग्रामदेवतांचा तो उत्सव पाच दिवस चालतो. डिगेश्वराचे हे पाच दिवसांचे स्थान आमच्या घरासमोर आहे. आम्हाला वाटते, की जणू काही डिगेश्वर आमच्या घरीच आले आहेत !
स्राणेवर गावकर्यांची वर्दळ सुरू राहते. विविध वाड्यांमधील लोक आळीपाळीने परमेश्वराची सोबत करतात. होमाच्या कडेला झाडांचा छोटा मंडप उभारला जातो आणि कडेला शेकोटी सुद्धा पेटवली जाते.
पहिल्या दिवशी स्राणा भरतात. स्राणा भरणे म्हणजे सर्व गावकऱ्यांनी स्राणेवर येऊन, परमेश्वराचे दर्शन घेऊन त्याच्यासमोर हात जोडणे, गुडघे टेकणे ! त्यांचे नवस फेडले जातात. गावचे मानकरी एका जागी बसून प्रसादाचे वाटप करतात. कोणी पेढे, कोणी बर्फी, कोणी साखर आणतो ! कोणी नारळ, वस्त्रे, कोणी उदबत्ती, कोणी फुले, कोणी फळे, कोणी परमेश्वराला आर्थिक स्वरूपातही नजराणा आणतात ! सारे काही डिगेश्वरासाठी ! पालखी पुन्हा एकदा नाचवली जाते. त्यात गावकरी, चाकरमानी सारख्याच उत्साहाने सहभागी होतात. पालखी पुढील पाचही दिवस गावातील विविध वाड्यांमध्ये जाऊन भक्तांना दर्शन देते.
आणि मग एक दिवस असा येतो जो कधी येऊच नये असे वाटते ! डिगेश्वर महाराज भक्तांना खुश करून परत त्यांच्या घरी जाण्यास निघतात. वातावरण गंभीर होते, कंठ दाटून येतो, डोळ्यांत पाणी हे ठरलेलेच ! पालखी जातानासुद्धा ढोल, ताशे, सूर, सनई वाजत राहतात. तो आवाज तसाच असतो. पण यावेळी तो जरा दुःखी वाटतो. डिगेश्वर महाराज परत चालले की गावकऱ्यांच्या आणि चाकरमान्यांच्या चाली मंदावतात, पाय उठत नाही. जणू काही घरातीलच माणूस परत मुंबई-पुण्याला निघालाय !
मला रंगपंचमीचा तो दिवस अजिबात आवडत नाही. तो उत्सवाचा शेवटचा दिवस. मी शक्यतो तो दिवस टाळतो. ढोलताशांचे सूर हळूहळू कमी कमी होत जातात आणि मला कळते, की पालखी मूळ मंदिराकडे जाण्यासाठी निघाली आहे. मन खिन्न होते. लहानपणी तर मी अशा वेळी चक्क रडायचो. तेव्हा मला आई सांगायची, “अरे, आपण जसे वरच्या घरून खालच्या घरी राहण्यास आलो तसेच डिगेश्वर महाराज वरच्या घरून त्यांच्या खालच्या घरी म्हणजे तळीवरील देवळात राहण्यास गेले. ते कोठेही जाणार नाहीत. ते तेथेच आहेत ! तेव्हा कोठे मग मला जरा बरे वाटायचे आणि मी पुढील होळीची वाट पाहत झोपी जायचो !
– दादासाहेब दापोलीकर (सुमंत जुवेकर) 9967840005 sumantjuvekar@gmail.com
———————————————————————————————————————————–
खूप छान काका