हिंगोली जिल्हा-तालुक्यातील कयाधू नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘उगम ग्रामीण विकास संस्था’ व तिचे संस्थापक जयाजी पाईकराव यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. हिंगोली जिल्ह्यात पैनगंगा, पूर्णा व कयाधू या तीन नद्या आहेत. पैनगंगा नदी व पूर्णा नदी हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहतात. त्या नदीतील निम्मे पाणी हिंगोली जिल्ह्यात तर निम्मे पाणी शेजारील जिल्ह्यांत वापरले जाते. कयाधू नदी जिल्ह्याच्या मध्यातून वाहते, म्हणून त्या नदीला जिल्ह्याची ‘जीवनवाहिनी’ मानले जाते. नदीचा उगम वाशीम जिल्ह्यातील अगरवाडी ह्या गावी होतो, तर तिचा संगम, म्हणजे कयाधू म्हणून तिच्या अस्तित्वाचा शेवट नांदेड जिल्ह्यातील चिंचोली या गावी होतो. ती तेथे पैनगंगा नदीला मिळते. कयाधू नदीची लांबी नव्व्याण्णव किलोमीटर आहे. नदी तीव्र उताराची असल्याने व पाणलोट क्षेत्रविकासाची रचनात्मक कामे झालेली नसल्याने नदी केवळ जून ते ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत वाहते. कयाधू नदी पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत बारमाही वाहत होती. गावातील मुले उन्हाळ्यामध्ये पोहण्यास नदीवर जात, तर पालक आजोबा नदीमध्ये बरू व अंबाडी पिकांचे अवशेष भिजण्यासाठी ठेवत असत. त्यांपासून पुढे ताग काढला जाई. ताग दोरी बनवण्यासाठी अंबाडी व बरू, झोपडी बनवण्यासाठी वापरत असत. परंतु वाळू उपसा, पाणी उपसा, पाण्याचे सुनियोजन झाले नाही, लोकस्तरावरून पुनर्भरणासाठी प्रयत्न केव्हाच केले गेले नाहीत, वृक्षतोड सतत चालू होती. हे सारे प्रमाण जसे वाढत गेले तसतसा नदीचा प्रवाह आटत गेला. प्रवाह इतका कमी झाला, की आता फक्त पावसाळ्यात नदी वाहताना दिसते.
कयाधू नदीचे मूळ नाव कायाधू असे होते. कयाधू ही हिरण्यकश्यपू यांची पत्नी तर भक्त प्रल्हाद याची आई होती. एका देवाची वक्र नजर तिच्यावर पडल्याने तिने त्या नदीमध्ये काया (शरीर) धुतली म्हणून त्या नदीला कायाधू असे म्हटले जाते. कायाधूचा अपभ्रंश कयाधू. कयाधू नदी सेनगाव, नर्सी, हिंगोली, कंजारा, सालेगाव, सापळी मार्गे वाहते. लोक अस्थी विसर्जनासाठी नर्सी नामदेव येथे दुरून येतात. कारण, तेथे अस्थीचे पाणी काही वेळातच होते असा समज आहे.
कयाधू नदीची एकूण लांबी नव्याण्णव किलोमीटर आहे, तर कयाधू नदीला एकशेचोपन्न गावांचा पाणलोट आहे. कयाधू नदीला येऊन मिळणारे त्या गावांतील एक हजार एकशेपंचवीस किलोमीटर अंतराचे ओढे, नाले व ओघळ आहेत. त्या नाल्यांतील दोनशेचोवीस किलोमीटर अंतरावर खोलीकरणाचे काम झालेले आहे, तर नवीन कामातून दोनशेपस्तीस किलोमीटर अंतरावर काम होण्यास वाव आहे. कयाधू नदीला येऊन मिळणाऱ्या एकशेचोपन्न गावांमध्ये पाणलोट क्षेत्रविकासाची रचनात्मक कामे झालेली दिसून आलेली आहेत व त्यांच्यातील सध्याचा जलसाठा व भविष्यकालीन जलसाठा ह्याच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. त्या गावात जुने सिमेंट नाला बांध पाचशेसत्याहत्तर, गेटचे बंधारे शहात्तर, दुरुस्तीलायक बंधारे सेहेचाळीस, गाळाने उथळ झालेले बंधारे चारशेसत्तावीस, शासनामार्फत गाळ काढण्यात आलेले बंधारे सत्याऐंशी आहेत. तसेच, माती नाला बांध चारशेअठ्ठावन्न- त्यातील तुटलेले एकतीस व गाळ काढण्यायोग्य तीनशेसहासष्ट बंधारे असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
एकशेचोपन्न गावांमध्ये कयाधू नदीला जिवंत ठेवण्यासाठी किंवा तिचा प्रत्येक थेंब गावात मुरवण्यासाठी पाणलोट क्षेत्राची माथा ते पायथा ह्या संकल्पनेतून कामे झाली पाहिजेत. म्हणजे डोंगरावरून पळणाऱ्या पाण्याला चालायला लावणे, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावणे व थांबलेल्या पाण्याला मुरायला लावणे… जमीन ही जनमाणसांची बँक आहे. जेवढा पाऊस बँकेत (जमिनीत) जमा करू तेवढाच नियोजनबद्ध वापरल्यास दुष्काळावर मात करता येऊ शकते. म्हणून ‘उगम ग्रामीण विकास संस्थे’ने तांत्रिक तज्ज्ञांकडून एकशेचोपन्न गावांमध्ये नवीन सलग समतल चर एक हजार एकशेएकोणचाळीस हेक्टरवर होऊ शकतात तर नवीन लूज बोल्डर तेरा हजार पाचशेसत्तर, गॅबियन एक हजार तीनशेपंच्याहत्तर, पाईप बंधारे एकशेसत्तेचाळीस, अर्थन मॉडेल तीन हजार सहाशेपंचावन्न, नवीन सिमेंट नाला बांध बासष्ट, डोह मॉडेल एक हजार दोनशे, रिचार्ज शाँफ्ट व विहीर आणि बोअरवेल रिचार्ज सात हजार सातशे ही प्रस्तावित कामे तांत्रिक टीमकडून गावनिहाय संकलित केली आहेत.
‘उगम’ संस्थेकडून प्रत्येक गावात नकाशे तयार केले असून, त्या नकाशावर गावात झालेली कामे व प्रस्तावित कामे ह्या नोंदी करण्यात आल्या आहेत. तसेच, अस्तिवात असलेली व प्रस्तावित रचनात्मक कामे नकाशावर सर्वे नंबरसहित नोंदवली आहेत. अस्तिवात असलेल्या व प्रस्तावित बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा किती राहू शकतो त्याचे मोजमाप करण्यात आलेले आहे. सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. कयाधू नदी जिवंत करण्यासाठी ही कामे लोकसहभागातून किंवा शासकीय मदतीतून होणे गरजेचे आहे. त्यातून हिंगोली जिल्हा दुष्काळप्रवण क्षेत्रातून बाहेर येण्यास मदत होऊ शकते. प्रत्यक्ष अठ्ठेचाळीस हजार तीनशेबत्तीस कुटुंबे ही पाणीदार गावांची मानकरी असतील, त्यांत दोन लाख बेचाळीस हजार पाचशेबारा एवढी लोकसंख्या आहे. त्या गावांचे एक लक्ष तेरा हजार एकशे इतके क्षेत्रफळ आहे तर नव्याण्णव हजार एकसष्ट इतके क्षेत्रफळ पाण्याखाली येईल, तर अप्रत्यक्ष कुटुंबांची संख्या अत्यंत लक्षणीय असेल. तसेच वन्यप्राणी, वनस्पती, मधमाश्या, फुलपाखरे, मासे, झिंगे, पक्षी, कीटक यांचे अधिवास वाढण्यास मदत होईल. हिंगोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक हा कमी आहे. आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी कयाधू नदीला पुनरुज्जीवित करणे गरजेचे आहे व त्याकरता लोकचळवळ उभी करण्यासाठी पाईकराव यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. कयाधू नदी जिवंत
नदीपात्राच्या जवळील गावांत सकाळी व संध्याकाळी जाणीवजागृतीचा कार्यक्रम घेऊन लोकांना पाण्याबद्दल संवेदनशील करण्यात येत होते; तसेच, नदी हंगामी होण्याची कारणे व उपाय चर्चेतून समजावून लोकांची पाणी चळवळीबद्दल समज विकसित करण्यात आली. तांत्रिक टीमकडून करण्यात आलेल्या कामाची मांडणी गावकऱ्यांसमोर केली गेली. पडलेला पाऊस पाणी वाहून जाण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले व त्यासोबत मातीसुद्धा वाहून जाऊ लागली. मातीचा एक इंच स्तर तयार होण्यासाठी तीनशे ते पाचशे वर्षें लागतात. परंतु एका पावसाळ्यात पाच इंचापर्यंत माती वाहून जाते.
कयाधू नदीकाठावर स्थानिक जैवविविधता भरपूर आहे. त्यामध्ये गवत, फुलपाखरे, कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी इत्यादींचा समावेश आहे. जैवविविधता अभ्यासक व प्रस्तुत लेखक विकास कांबळे यांनी पाचशेपासष्ट लोकांच्या सहभागाने नदीकाठावर चाळीस प्रकारचे गवत संवर्धित केले आहे. त्या गवतामुळे वाहून जाणारी माती थांबली आहे.
– विकास कांबळे 7722048230
kamble358vikas@gmail.com
————————————————————————————————————————————————————————————————————————————————
जयाजी पुरभाजी पाईकराव ह्यांचा जन्म 15 जानेवारी 1954 रोजी हिंगोली जिल्ह्यातील कंजारा ह्या गावी झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण गावी तर माध्यमिक शिक्षण नांदेड येथे पूर्ण केले. MSW (Master of Arts in Scocial Work) च्या शहरी व ग्रामीण समुदाय विकास विशेषीकरणा अंतर्गत (1979-81) टाटा सामाजिक विज्ञान संस्था ( मुंबई ) येथून पूर्ण केले. त्यानंतर काही सामाजिक संस्थांमध्ये कामाचा अनुभव घेऊन त्यांनी 1996 साली ‘उगम ग्रामीण विकास संस्थे’ची स्थापन हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील उमरा गावाजवळ केली. शाश्वत ग्रामीण विकास हे संस्थेचे धोरण आहे. त्या अनुषंगाने संस्थेकडून दुष्काळ निवारण, उपजीविका प्रोत्साहन, जैवविविधता संवर्धन, सेंद्रिय शेती, पाणी संवर्धन, पाणलोट क्षेत्र विकास, महिला सक्षमीकरण, पत पुरवठा या विषयांवर कार्य सुरू आहे. त्याचबरोबर गरीब व गरजू कुटुंबाना घरदुरुस्ती, शौचालय बांधणी, पीक बियाणे वाटप यासाठी मदत केली आहे. त्यांचे हिंगोली, सेनगाव, कळमनुरी व औंढा (ना.) ह्या तालुक्यात कार्य सुरू आहे. तसेच, परभणी शहरात (परभणी जिल्हा) कौशल्य विकासासाठी महिलांना उपजीविकेची साधने वितरण केली आहेत. संस्थेबरोबर जलयुक्त शिवार, जिल्हा संशोधन समूह, शालेय हंगामी वसतिगृह, ग्रामीण विकास विषय समिती, मराठवाडा वैधानिक मंडळ समित्यांवर निवड झाली आहे. ते ‘नाम फाउंडेशन’चे जिल्हा समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत. वंचित समुदायाला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना शाश्वत उपजीविका मिळवून दिल्याबद्दल त्यांचा 14 ऑगस्ट 2015 साली ‘संत कबीर हिंगोली रत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. नांदेड मेडिकल फाउंडेशनकडून डॉ. मोहन भालेराव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
खूप छान उपक्रम आहे। आम्हाला…
खूप छान उपक्रम आहे. आम्हाला ह्या उपक्रमाचा भाग होण्यास नक्कीच आवडेल.
Comments are closed.