ओतूरची सांदुरी पुरी

3
1162

पुण्याजवळील ओतूर हे माझे आजोळ. कपर्दिकेश्वराचे मंदिर व संत तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य यांची संजीवन समाधी ही गावाची श्रध्दास्थाने. या दोन्ही मंदिरांना वळसा घालून वाहणारी मांडवी नदी ही ओतूरची जीवनरेखा आहे. पूर्वी गावाला तटबंदी होती, त्याच्या खूणा असलेल्या नगर वेस, जुन्नर वेस व रोहोकडी वेस अशा तीन दिशांना तीन वेशी आहेत. पुणे-अहमदनगर ही ओतूरच्या सीमेवरची गावे. नगरला निजामशाही आणि पुण्यात मराठेशाही. त्यामुळे कायम चकमकी होत असत. संध्याकाळी ओतूरच्या वेशींची दारे लावली जात असे जुने लोक सांगतात.

         मराठे, ब्राह्मण आणि बारा बलुतेदार हे गावाचे रहिवासी. मुसलमानांची संख्याही लक्षणीय आहे. शेतांवर राखणीसाठी आलेले कातकरी, सुगीच्या वेळी येणारे आराधी, जोगती, भिल्ल, लमाण यांचाही भरणा असतो. गावाचे रूप असे बहुपेडी पण गुण्यागोविंदाने एकत्र नांदणारे आहे. सत्यशोधकी कार्याचे केंद्र असल्याने गावात साक्षरतेचे प्रमाण खास आहे. जवळपास सत्याहत्तर टक्के लोक साक्षर आहेत. लहानपणी दिवाळीत व मे महिन्याच्या सुटीत गावाला नेहमी जाणे व्हायचे. तो काळच मोठा आनंदाचा होता.

        उन्हाळ्याच्या सुटीच्या दिवसांत गावी हमखास नात्यात लग्नं असायची. ओतूर भागातील लग्नप्रथा लिहावी तर – महिनाभर आधीपासूनच घरात पाहुणे-रावळे येत. घर सारवून, सडा घालून छान सजवले जाई, चारपाच दिवस अगोदर अंगणात मांडव उभारला जाई. हळदीच्या दिवशी सकाळीच मानाच्या बैलगाड्यांतून आंबा, कडुनिंब, करंज यांचे डहाळे (फांद्या) येत. सुवासिनी गाडीवान, बैल यांच्या पायावर पाणी घालून त्यांना ओवाळत असत. मग हे डहाळे मांडवावर घातले जात. त्याला ‘मांडवडहाळे‘ म्हणत. मांडवडहाळे घालताना ताशा आणि सनई यांची जुगलबंदी चालत असे. मांडवडहाळे झाले की नवरदेवाला हळद लावण्याचा कार्यक्रम होई. मांडवात भोवती सूत गुंडाळलेले चार हंडे गरम पाण्याने भरलेले असत. मध्ये पाटावर नवरदेव. त्याच्या समोरही पाण्याचा हंडा आणि एक पाट. पाच सुवासिनी नवरदेवाच्या अंगावर एकेक तांब्या ओतून त्याला आंघोळ घालत. नवरदेवापुढे घरातल्या सगळ्यात धाकट्या मुलाचीही आंघोळ होई. अशी वाजतगाजत सचैल आंघोळ झाल्यानंतर नवरदेव कपडे बदलून येई. त्याला पाटावर बसवून हळद लावली जाई. कपाळपट्टी बांधली जाई. कपाळपट्टी म्हणजे रंगीत कागदाच्या झिरमिळ्या असलेले रुंदसर कागदी बाशिंगच असे. हळद लावून झाली की नवरदेव वाजतगाजत करवल्यांसह शेवया खायला निघे. तो एक खासच कार्यक्रम असे. जवळपासच्या, नात्यातल्या सगळ्या घरांमधून शेवया खाण्याचा कार्यक्रम असे. शेवया, दूध, गुळाचा खडा असे शिजवलेले गोड पक्वान्न नवरदेवाला खायला दिले जाई. नवरदेवाने एक घास घेतला न घेतला की बरोबरच्या करवल्या/करवलेच त्याचा चट्टामट्टा करत. यावेळी घरातल्या म्हाताऱ्या नवरदेवाच्या तोंडावरून हात फिरवून तोंडभरून आशीर्वाद देत. मग घरातून नवरदेवाला एक खोबऱ्याची वाटीही दिली जाई. मुख्य करवलीकडे ‘झोळणा’ असे. झोळणा म्हणजे काचा, कवड्या, मणी लावलेला रंगीत बटवाच ! त्या झोळण्यात करवली खोबऱ्याच्या वाट्या गोळा करत जाई. शेवया खाण्याचा हा कार्यक्रम चांगला दुपारपर्यंत चालत असे.

        संध्याकाळी नवरदेव तयार होऊन ‘मिरवायला’ निघे. लग्न झाल्यानंतर असते ती वरात, लग्न करायला (परणायला) नवरदेव निघे; ती ‘मिरवणूक’ यावेळी कपाळपट्टी सोडून बाशिंग बांधले जाई. (शांताबाई शेळके यांनी ‘एकपानी’ मध्ये बोलीभाषेतल्या संस्कृतविषयी लिहिताना म्हटले आहे, की ‘परणायला’ हा शब्द ‘परिणय’ शब्दावरून आला आहे.) इकडे मांडवात उत्साह नुसता ओसंडून वाहत असे. एका बाजूला ताशा, सनई वाजवत बसलेले वाजंत्री. फेटेवाले. कोऱ्या नऊवारी साड्यांमधल्या बायकांची लगबग. पोरासोरांचा धिंगाणा. घर, आंगण, मांडव भरून वाहणारा आनंद. वाजतगाजत येणारी तालेवार पाहुणेमंडळी. मानपान. रुसवेफुगवे. पुकारले जाणारे आहेर. या गडबडीत सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा घटक म्हणजे लग्नातील रुखवत. नवरीकडच्या मांडवात बोहल्याशेजारी मांडलेली रुखवताची ताटं, त्यात रंगीबेरंगी कुर्डया, पापड्या, वडे (सांडगे), शेवया, लाह्यांचे मोठमोठे लाडू, कणकेपासून तयार केलेली फतकल मारून बसलेली तळलेली ‘वरमाई’ (अगदी गळ्यातली काळी पोत, हिरव्या बांगड्यांसकट !) कोऱ्या पाटीला (टोपली) झिरमिळ्या चिकटवून उभारलेल्या काड्यांवर बसलेल्या कणकेच्या चिमण्या, त्यांचे लालकाळ्या गुंजांचे डोळे, कणकेचेच छोटे छोटे प्राणी असा सगळा अजायबखाना असे !

        लग्न लागले की वरमायांची रुखवत भरायची घाई. पण नवरीकडच्या करवल्या हुशार ! रुखवतावर ‘झाकायला’ काय दिलंय, त्यावरून गमतीचे टोमणे मारत. रुखवत ‘झाकायचा’ म्हणजे रुखवत केल्याबद्दल नवरीकडच्या करवल्यांना काहीतरी भेट द्यायची.  आठवणीत असलेल्या अशा काही ओव्या:

  1. आला आला रुखवत, रुखवतावर होता ससा I
    विहीणबाई म्हणतात, हा रुखवत एवढासा कसा II
  1. आला आला रुखवत, रुखवतावर मेथीची भाजी I
    विहीणबाईंनी घातलेली, नथ आहे माझी II
  1. मांडवाच्या दारी आलं आलं राखंचं I
    हळूच बसा विहीणबाई, लुगंड नेसलंय लोकांचं II
  1. आला आला रुखवत, रुखवतावर कट्यार I
    आमचा नवरदेव मागतो, मारुती मोटार II
  1. आला आला रुखवत, रुखवतावर होते मीठ I
    दिली असती मोटार पण, तुमचा रस्ता कुठे नीट II
  1. आला आला रुखवत, रुखवतावर होता चाकू I
    देऊन तर बघा मोटार, आम्ही नांगरटीतून हाकू II
  1. आला आला रुखवत, रुखवतावर होती परात I
    लई वेळ झाला आता, नवरानवरी जाऊ द्या घरात II
  1. आला आला रुखवत, रुखवतावर होत खायचं I
    नवरी म्हणते, वऱ्हाड कधी जायाचं, अन वेगळं कधी रहायचं II

मात्र रुखवताच्या गाण्यांच्या धांदलीतही, साऱ्या पदार्थांमध्ये दर्दी लोकांचे लक्ष मात्र राळ्याचे सारण भरलेल्या पुऱ्यांवर असे. गावच्या भाषेत सांदुऱ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या इतक्या वैशिष्टयपूर्ण असत की त्यांचा मोह कोणालाच आवरायचा नाही. सोनपिवळ्या रंगाची देखणी अशी ‘सांदुऱ्याची पुरी’ एकदम ऐश्वर्यसंपन्न दिसते आणि चवीबद्दल तर बोलायलाच नको. रुखवतावर ठेवलेल्या या पुऱ्या हातोहात नाहीशा व्हायच्या. आता ‘राळे’ हे तृणधान्य फारसे काही परिचयाचे राहिलेले नाही. पण त्या धान्याला मोठी पूर्वपरंपरा आहे. केवळ भारतातच नव्हे तर चीन, कोरिया, जपान अशा देशांमधूनही राळ्याचा उपयोग होत असे. राळ्याचं आणखी एक नाव ‘कांगनी’. लोकजीवनातील गीतांतही राळ्यांचा उल्लेख आढळतो. म्हाळसा-बाणाईच्या भांडणाविषयीच्या ओवीत ‘सवतीसवतींचं भांडण, मधी बाई राळ्याचं कांडणं, दोघी नारी गं झुंजती न् ऐकून मल्हारी हांसती’ असा उल्लेख आहे. पण हे राळे सगळीकडेच होत नसत. एखादा हौशी शेतकरी, किंबहुना शेतकरीण राळे पेरत असे. कारण खसखशीएवढ्या आकाराचं धान्य. त्यांची उसाभरच फार ! पण गावच्या लक्षुम्या लेकराबाळांसाठी, नातवंडांसाठी निगुतीने सारे करत. माझे आजोबा, आजीसाठी शेताचा कोपराच राखून ठेवीत. त्यात ती कारली, दुधी, डांगरभोपळा, घोसाळी, दोडकी, श्रावणभेंडी, विविध प्रकारचे घेवडे यांचे वेल, झाडे लावीत, शिवाय थोडा राजगिरा, तीळ, हावऱ्या (तीळ), खुरासणी, हुलगे (कुळीथ) लावीत असत. तिच्या मडक्यांच्या उतरंडीमध्ये ही सगळी बियाणी राखुंडी लावून-साठवून ठेवलेली असत.

हे झाले राळे-विषयांतर. गंमती, चेष्टा सरत, विधी संपन्न होत. निरोपाची वेळ येई आणि साऱ्यांचेच डोळे पाणावत. “तिळा तांदळा भरली वाट, ज्याची होती त्यानं नेली ! केली माया वाया गेली, झुणझुण वाजंत्री वाजती । म्होर कळवातनी नाचती” नवरी सासरी जाई. रिकाम्या मांडवाच्या गळ्यात आवंढा दाटे !

ही आहे बहुजन समाजाच्या लग्नाची गोष्ट. फार पूर्वीची नाही फारतर दोन तीन दशकांपूर्वीची. भपकेबाजपणाला फाटा देऊन साधे पण हृद्य समारंभ असत. हल्ली गावातही दारात मांडव पडायच्या ऐवजी गावाबाहेरच्या लॉनवर लग्नं होतात. हिंदी सिनेमाच्या प्रभावामुळे मेहंदी, संगीत, प्रत्येक ‘इव्हेंट’ला वेगळे कपडे हे प्रकार आले आहेत पण लग्नातले रुखवत, मानपान आणि मुख्य म्हणजे रुसवेफुगवे मात्र कायम आहेत !

शैलजा शिवाजी औटी 9820795240 shailajaauty123@gmail.com
——————————————————————————————

About Post Author

3 COMMENTS

  1. शैला लेख खूप छान आहे. डोळ्यासमोर सारा लग्न सोहळा उभा केलास. तुझ मनापासून अभिनंदन 🙏

  2. ओतुरची सांदुरी पुरी वैशिष्ट्यपूर्ण. एका लग्नाच्या गोष्टीतून मांडलेला लोकसंसकृतीचा मौलिक परिचय. सुंदर. ओव्यांची सजवलेला रंजक लेख.

  3. छान 👌
    वरात आणि मिरवणूक यांच्यातला फरक, शेवया खायला जाणं, तळलेली वरमाई, नांगरटीतून मोटार हाकणारा नवरदेव आणि मग सांदुऱ्याची पुरी..अगदी वऱ्हाडाबरोबर महिनाभर लग्नसोहळा अनुभवायला मिळाला. आजकाल हे भाग्य लाभत नाही. सुरेख 👌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here