Home व्यक्ती इतिहासजमा इमारती (Historical Buildings)

इतिहासजमा इमारती (Historical Buildings)

1

इतिहासजमा इमारती

प्रकाश पेठे हे बडोद्याचे आर्किटेक्ट बडे उपक्रमशील आणि हौशी आहेत. ते सतत कशाच्या तरी शोधात असतात. त्यांनी मुख्यतः आर्किटेक्चर या विषयासंदर्भात, त्याचे वेगवेगळे पैलू पकडून सहा पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे लेखन खूप हिंडूनफिरून होते व ते तसेच कागदावर उतरते. ते तितकेच फोटो काढतात. त्यांनी काढलेले जगभरचे उत्तम दोन-अडीच हजार फोटो त्यांच्या संगणकीय संग्रहात आहेत. त्यांनी त्यांच्या लग्नाला पन्नास वर्षे झाली तेव्हा एक खूळ डोक्यात घेतले, की त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी इंग्रजीतून फेसबुकवर लिहायच्या. आठवड्यातून दोनदा. प्रत्येक आठवण तीनशे शब्दांत. तशा शंभर आठवणी पाडव्याला पूर्ण झाल्या आणि त्याबरोबर त्यांना तत्काळ दाद देणाऱ्या, त्यांच्या लेखनावर बरे-वाईट म्हणणाऱ्या व ‘लाईक्स’ नोंदवणाऱ्या मंडळींचा समुदाय तयार झाला. सहा पुस्तके लिहून जे घडले नव्हते ते ‘फेसबुकमुळे घडले!

 

याचा अर्थ त्यांना पूर्वी प्रतिसाद नव्हता असे नाही, पण मराठी पुस्तकांचा वाचक जुन्या संचिताच्या पुढे येऊ पाहत नाही. आर्किटेक्चर म्हटले, की त्याच्या लेखी माधव आचवल यांची ‘किमया’. ते 1962 सालचे पुस्तक संदर्भांनी कालबाह्य झाले आहे. त्यातील सौंदर्यतत्त्वे पुढील पिढ्यांनी अंगीकारली व क्वचित नवी मांडणी नव्या धाटणीने केली आहे. पेठे हे त्यातील एक आहेत. त्यांच्या लेखनातील लालित्य अधिक भावनाभारलेले असते.

          त्यांचे लेखन आता फेसबुकवर आले असले तरी यापूर्वी, ते मंगेश नाबर यांनी त्यांच्या ‘मैत्री’ नावाच्या ‘ऑनलाइन’ नियतकालिकात संकलित केले होते व त्यावेळीही त्यांना उबदार प्रतिसाद मिळाला होता.

 

पेठे निवृत्‍तीनंतर बडोद्याच्या दोन-तीन कॉलेजांत ‘व्हिजिटिंग फॅकल्टी’ म्हणून शिकवत असतात. त्या ओघात त्यांनी बडोद्याच्या सर्व उत्तमोत्तम वास्तूंचा सचित्र इतिहास नोंदणे चालवले आहे. ते त्याचे सादरीकरणही करत असतात. बडोद्याच्या बऱ्याच वास्तू तेथील मूळशंकर दवे नावाच्या आर्किटेक्चर शिकलेल्या आद्य पुरुषाने बांधल्या आहेत. त्यांचा जन्म 1902 चा आणि ते वारले 1962 साली. बडोद्याच्या सयाजीराजे विद्यापीठाच्या उपकुलगुरू हंसा  मेहता यांनी दवे याना बडोद्यात वास्तुकला पदवी कोर्स सुरु करण्यास सांगितले. तो त्यांनी 1954 साली सुरु केला. तसेच, दवे यांनी स्वतःचे ऑफिस काढून बडोद्यात अनेक सुंदर इमारती बनवल्या.

         

मूळशंकर दवे

पेठे बडोद्याला नोकरीनिमित्त 1966 साली गेले. ते म्हणाले, की दवे ही रंगतदार व्यक्ती असणार. ते निझामाच्या विश्‍वासातील होते आणि निझामाने त्याच्या चार-चार बायकांना, दोन गट करून युरोप पाहण्यासाठी पाठवले, तेव्हा त्या दोन्ही वेळेस त्यांच्याबरोबर ‘एस्कॉर्ट’ म्हणून दवे यांच्यावर जबाबदारी सोपवली होती! त्यांनी 1949 साली बांधलेल्या सरदार भवनाचे उद्घाटन विनोबा भावे यांच्या हस्ते झाले.

          पेठे यांनी मूळशंकर यांची निर्मिती असलेल्या सर्व वास्तूंचा शोध चालवला आहे. ते मूळशंकर यांच्याशी संबंधित व्यक्तींना भेटतात. मूळशंकर यांचा मुलगा अमेरिकेत असतो. तो बडोद्यात आला असता पेठे यांनी त्याची भेट घेतली. पण त्याला त्याच्या पिताजींच्या कर्तबगारीबद्दल फार औत्सुक्य दिसले नाही. पेठे यांचे निरीक्षण मार्मिक आहे. ते म्हणाले, की आपल्या देशात हजारो इमारती/वास्तू आहेत, की ज्यांचे बांधकामसौंदर्य वैशिष्ट्यपूर्ण आहे; त्याबरोबर त्यांच्याभोवती इतिहास आहे. ते ऐतिहासिक महत्त्व कसे जपले जाणार? बदलत्या जगात त्याला काही महत्त्व आहे तरी का?
प्रकाश पेठे 9427786823 prakashpethe@gmail.com
दिनकर गांगल 9867118517
(
दिनकर गांगलहे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)

————————————————————————————————

मूळशंकर दवे यांनी स्वतःचे ऑफिस काढून बडोद्यात अनेक सुंदर इमारती बनवल्या.
गांधी नगर गृह

 

युनिव्हर्सिटी पॅव्हेलियन

 

प्रकाश पेठे कॉलेजमधील एका चर्चासत्रात

About Post Author

Previous articleआंबे कोकणातून निघाले ! (Aambe koknatun Nighale)
Next articleविद्यापीठ इमारती हव्यात कशाला? (Online classes)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version