Home व्यक्ती विद्यापीठ इमारती हव्यात कशाला? (Online classes)

विद्यापीठ इमारती हव्यात कशाला? (Online classes)

0
लॉकडाऊनमुळे प्रत्येक व्यक्ती ‘हाऊस अरेस्ट’मध्ये आहे. नैराश्य, हतबलता तर सर्वांनाच जाणवत आहे पण तरी आपल्या जगातल्या धीराच्या गोष्टी बऱ्याच चालू आहेत. त्या नोंदण्याचा हा धावता प्रयत्न. असेच काही सांगण्याची इच्छा असेल तर जरूर कळवा. ई-मेल –info@thinkmaharashtra.com

विद्यापीठ इमारती हव्यात कशाला? (Online classes)

 

जितेंद्र सांडू याचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनीयरिंग व फायनान्स मॅनेजमेंट या विषयांमधील, परंतु त्याने नोकऱ्या-व्यवसाय करून पाहिले. काही वर्षे मुलांची ऑनलाईन अॅप्टिट्यूड टेस्ट करण्याचा उद्योग चालवला. त्यासाठी ‘टॅलेंट मॅट’सारखी सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. त्यातून त्याला तरुणांना करिअर गायडन्स करण्याचे एक वेगळेच क्षेत्र गवसले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामुळे त्याचा शिक्षणक्षेत्राशी जवळचा संबंध आला. त्याच्याशी बोललो, की विद्यार्थ्यांच्या सद्यकाळातील गरजा आणि शिक्षणव्यवस्थेचा अपुरेपणा या गोष्टी प्रकर्षांने जाणवतात. सर्वसंचारी जितेंद्र लॉक डाऊनमध्ये घरी बसावे लागल्यामुळे जाम वैतागला आहे. तो म्हणाला, की दोनतीन प्रोजेक्टस् हाती घ्यायला हवी, तर हा काळ जाईल. नाहीतर एकवीस दिवस करायचे काय?

          मी त्याला म्हटले, ‘थिंक महाराष्ट्र’ची ताकद जाणून घे ना एकदा. तर तो म्हणाला, पाठवा बरे लिंक. त्यातून गप्पा सुरू झाल्या. 

तो म्हणाला, या कोरोनानंतर बघा, सारं जग बदलणार आहे. टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन ही काय पॉवर आहे ते लोकांना कळणार आहे. माझ्या लेकाचे बिट्स पिलानीचे ऑनलाइन क्लास सुरू झालेदेखील. येत्या पाचदहा वर्षांत जगातील पाचपंचवीस युनिव्हर्सिट्या बंद पडतील. म्हणजे त्यांच्या इमारती, त्यांच्या मोठमोठ्या जागा यांना अर्थ राहणार नाही; कामही राहणार नाही. छोट्या मोठ्या संस्था उगवतील, तरतऱ्हेचे शिक्षण देतील. त्यातून मुले त्यांची ती बरेच काही शिकतील. आपल्याला वाटतं, की ही पोरं मोबाइल, आयपॅड किंवा लॅपटॉपवर खेळत आहेत. ती खेळतातच, पण त्या ओघात ती काय निर्माण करून ठेवत आहेत हे त्यांचे त्यांनाही वगळाच, पण आपल्यालाही कळत नाहीये. टेक्नॉलॉजी माणसाला फार सामर्थ्य देत आहे. हे कोरोना संपू द्या, एक नवे जग नंतरच्या काही वर्षांत उदयाला येणार आहे.

          नोएल युवा हारारी यांचा ‘कोरोनानंतरचे जग’ नावाचा एक लेख सध्या सर्वत्र प्रसृत होत आहे. त्याचे मराठीकरणही दोघा जणांकडून झाले आहे. मला जितेंद्र त्यापुढचे व अधिक व्यवहार्य बोलत आहे असे वाटले. मी जितेंद्रला म्हटले, तू तुझे प्रतिपादन लिहून काढ. आशा आहे की तो ते करील.
जितेंद्र सांडू 9552537846, jitensandu@hotmail.com
          – दिनकर गांगल 9867118517
(दिनकर गांगलहे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)

———————————————————————————————-

About Post Author

Previous articleइतिहासजमा इमारती (Historical Buildings)
Next articleकलावस्तूचा ‘प्रॉडक्ट’ (Rakesh Bhadang)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version