आनंदवाडी गाव लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक तेथे बिनविरोध पार पडते. गावातील मंदिरात ग्रामपंचायत सदस्यांची निवड होते. गावक-यांनी गावात अभेद्य युतीतून काही चांगले उपक्रम राबवले आहेत. गावाने समाजाला अवयवदानाचा वेगळा आदर्श घालून दिला आहे. आनंदवाडी गाव स्त्रीसक्षमीकरणातही आघाडीवर आहे. गाव तंटामुक्त आहे. गावात पंधरा वर्षांत पोलिस फिरकलेला नाही, कारण गावात गुन्हाच घडत नाही!
आनंदवाडी हे देशातील पहिले गाव ज्याने मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला आहे. आनंदवाडी ग्रामपंचायतीच्या एका ग्रामसभेत, ‘शरीर जळून जाण्यापेक्षा मरणोत्तर अवयवदान केले, तर कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश पसरवल्याचे समाधान मिळेल’ असा क्रांतिकारी विचार चर्चिला गेला. त्यानंतर आनंदवाडीचे ग्रामस्थ १४ ऑगस्ट २०१६ रोजी श्रमदानासाठी स्मशानभूमीत एकत्र जमले होते. त्या वेळी ग्रामसेवक दत्ता पुरी यांनी अवयवदानाची कल्पना लोकांसमोर पुन्हा मांडली. अवयवदान जागृती कार्यक्रम ३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०१६ या सप्ताहात हाती घेण्यात आला. त्याला प्रतिसाद देऊन, चारशेसात जणांनी मरणोत्तर अवयवदानाचा, तर तीन जणांनी देहदानाचा संकल्प केला. त्यानंतर संपूर्ण गाव त्यात सहभागी झाले. अवयवदान केल्यानंतर अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक असणा-या सुविधा लातूरमध्ये उपलब्ध नाहीत. अवयव द्यावे म्हटले तर सरकारी यंत्रणा प्रभावी नाही. प्रत्यारोपण होईपर्यंत अवयव सुरक्षितपणे साठवण्याची सोय नसल्याचे कारण देऊन गावात अवयव घेण्यासाठी येणे टाळले जाते, असे आनंदवाडीच्या सरपंच भाग्यश्री चामे यांचे पती ज्ञानोबा चामे यांनी सांगितले. सरकारने त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी गावक-यांची मागणी आहे.
आनंदवाडी ग्रामस्थांनी महिला सक्षमीकरणाचा वेगळा पायंडा पाडला आहे. महिला घरे सांभाळतात. कुटुंबासाठी आयुष्य खर्ची घालतात. काही कुटुंबांत कर्ता पुरुष व्यसनी असेल तर घरातील कुरबुरीवरून भांडण झाल्यास तो घरातून बाहेर काढेल अशी धास्ती महिलांना वाटते. ती असुरक्षितता त्यांच्या गावातील महिलांना वाटू नये, त्यांना त्यांचा समान हक्क मिळावा, यासाठी ग्रामसभेत महिलांच्या नावे घरे करून देण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला आहे. त्यानुसार, घरच्या कर्त्या पुरुषांच्या बरोबरीने घराघरांतील महिलांची नावे सातबारा व नमुना ८/अ या कागदपत्रांवर लावून अर्धी घरे व पन्नास टक्के शेती त्यांच्या नावे करण्यात आली आहे. तसेच, उपाययोजना केवळ कागदोपत्री न करता गावातील प्रत्येक घरावर कुटुंबातील महिलेच्या नावाची पाटी तिच्या मोबाईल नंबरसह लावण्यात आली आहे. गावात कोणाचे लग्न असेल तर पहिल्या पंक्तीला बसण्याचा मान महिलांना असतो. आनंदवाडीच्या सरपंच व तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष महिला आहेत. महिलांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी महिलांचे गट निर्माण करण्यात आले आहेत. महिलांचे आरोग्य राखले जावे यासाठी वेळोवेळी गावात महिलांची आरोग्य तपासणी केली जाते. एकूणच, गावच्या व्यवस्थापनाचा भार महिलांनी उचलला आहे.
आनंदवाडी गावाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नवा आदर्श उभा केला आहे. गणेशोत्सव ग्राम उत्सव म्हणून दहा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये आदर्श सासू, आदर्श सून, आदर्श शेतकरी, उत्कृष्ट गौरी, स्वच्छ घर सुंदर परिसर स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, उत्कृष्ट अभिनय स्पर्धा, ‘भविष्यातील माझा गाव’ निबंध स्पर्धा, गीतगायन स्पर्धा अशा स्पर्धा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतात. तसेच, उत्कृष्ट पशुपालक व हरवलेल्या वस्तू परत करणा-या व्यक्ती यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येते. विशेष म्हणजे मिरवणुकीवर एक रुपयादेखील खर्च केला जात नाही. आनंदवाडी गावाने घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचे नियोजन, वृक्षारोपण, कन्यादान योजना हे विशेष उपक्रम राबवले आहेत. त्याव्यतिरिक्त गावाने लोकसहभागातून ग्रामविकासाची पन्नास ते साठ लाखांची कामे केली आहेत.
ग्रामस्थांनी स्वत: ग्रामपंचायतीची दुमजली इमारत श्रमदानातून बांधली. गावक-यांनी ‘यशवंत ग्राम समृद्धी योजने’तून पाणंदीच्या जागी पक्के रस्ते तयार केले. घराघरांत नळ योजना पोचली आहे. ग्रामपंचायत व रोटरी क्लब यांच्या साहाय्याने रस्त्याच्या दुतर्फा पाचशे झाडांची लागवड करण्यात आली आहे. ‘भारत निर्माण योजने’अंतर्गत लोकसहभागातून चाळीस लाखांचे सांस्कृतिक सभागृह बांधण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांसाठी अल्पसे भाडे आकारून उपलब्ध करून दिले जाते. गावातील एकोपा जपण्यासाठी गणेशोत्सव, रक्षाबंधन यांसारखे सण-समारंभ एकत्रित साजरे केले जातात. वनभोजनाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो. त्या गावाने तंटामुक्ती गावाचा पुरस्कारही २००८ मध्ये पटकावला आहे.
आनंदवाडी गावात लग्नसोहळ्याचा खर्च वाचवण्यासाठी सामूहिक विवाहसोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला गेला. त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी लोकवर्गणीतून भांडी किंवा पैसे या रूपात मदत केली जाते. गावातील युवकांकडून हुंडा न घेण्याची शपथ घेतली गेली आहे. मुलींनी हुंडा घेणा-या मुलाशी लग्न करू नये यासाठी जागृती करण्यात येत आहे.
आनंदवाडी गाव मुलींच्या शिक्षणाबाबत आग्रही आहे. प्राथमिक शिक्षणाची सोय गावात आहे. पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. गावातील पन्नास टक्के मुली उच्चशिक्षित आहेत, तर काही मुली मेडिकल, इंजिनीयरिंग कॉलेजांनादेखील गेल्या आहेत. गावातर्फे उच्च शिक्षित मुलींच्या पालकांचा सन्मान करण्यात येतो. गावात साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे अंधश्रद्धेला थारा नाही. मुलांच्या सर्जनशीलतेला, कला-कौशल्यांना वाव मिळावा यासाठी गावात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
आनंदवाडी गावाचे हे क्रांतिकारी कार्य लक्षात घेऊन ‘रोटरी क्लब ऑफ लातूर सिटी’ने ते गाव तीन वर्षांसाठी दत्तक घेतले आहे; गावातील शाळेत ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
आनंदवाडी गाव मांजरा नदीच्या काठावर वसले आहे. त्या गावाची लोकसंख्या एक हजार पस्तीस असून गावात एकशेबारा घरे आहेत. नदीजवळील बोअरवेलला बारमाही पाणी असते. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही. मात्र, गावात नव्वद टक्के शेती हंगामी केली जाते. त्यामध्ये सोयाबीन, हरभरा, भुईमूग, तूर, कापूस, मूग, गहू, ज्वारी ही पिके मुख्य घेतली जातात. बागायती शेतीमध्ये ऊस व भाजीपाला मुख्यत्वे केला जातो. तसेच, ठिंबक सिंचनाद्वारे सामूहिक शेतीदेखील केली जाते. गावातील तेवीस जणांचा ग्रूप करून शेतीला आवश्यक सिंचनसामग्री खरेदी केली. त्यामुळे ती वीस टक्के कमी दरात उपलब्ध झाल्याचे ग्रामस्थ ज्ञानोबा चामे सांगतात.
आनंदवाडी गावात भविष्यात सोलार ऊर्जेद्वारे मोफत वीज मिळावी, यासाठी गावक-यांकडून प्रयत्न सुरू आहेत. सोलार ऊर्जेवर चालणारे पाणीशुद्धिकरण यंत्र शाळेत बसवले जाणार आहे. विजेची बचत व्हावी यासाठी घरोघरी एलईडी बल्बच्या वापरावर भर देण्यात आला आहे. एकमेकांना साहाय्य करण्याची लोकांची मानसिकता हे आनंदवाडी गावचे संचित आहे.
– ज्ञानोबा चामे, 9665108666
– राम चवरे, 9970111941
– वृंदा राकेश परब