Home वैभव गावांच्‍या अंतरंगात बावन्नावे मराठी साहित्य संमेलन (Fifty Second Marathi Literary Meet 1977)

बावन्नावे मराठी साहित्य संमेलन (Fifty Second Marathi Literary Meet 1977)

पुणे येथे 1977 साली झालेल्या बावन्नाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते पुरुषोत्तम भास्कर भावे. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1910 रोजी धुळे येथे झाला. भावे हे मराठी नवकथेचे एक जनक मानले जातात. त्यांच्या नावावर सतरा कादंबऱ्या, सव्वीस कथासंग्रह, बारा लेखसंग्रह, आठ नाटके असे साहित्य आहे. त्यांनी इतर साहित्यिक कृतीही लिहिल्या व त्या एकूण साहित्यातून मराठी साहित्य समृद्ध केले आहे. भावे यांना संपन्न घराण्यात जन्मास येऊनही जीवनातील खडतर अनुभव घ्यावे लागले. भावे यांचे संस्कारक्षम बालपण विदर्भात गेले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण विकास नागपूरला झाला. त्यांना वाचनाचे विलक्षण वेड होते. वाचनामुळेच त्यांच्यातील वाङ्मयाभिरूचीचे पोषण झाले. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी ‘ओम् फस’ ही कथा लिहिली आणि लेखनतपस्येचा श्रीगणेशा केला.

त्यांची ‘फुकट’ ही कथा ‘किर्लोस्कर खबर’मध्ये जुलै 1931 मध्ये प्रकशित झाली. तथापि त्यांच्या लेखणीचे व प्रतिभेचे सामर्थ्य प्रगट झाले ते त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनामुळे. त्यांचे लेख हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचा पुरस्कार करणार्‍या नागपूरच्या ‘सावधान’ या साप्ताहिकातून प्रसिद्ध होताच (1936) त्यांतील भाषासौंदर्याने व तेजस्वीपणाने वाचक मुग्ध होऊन गेले. भावे यांनी त्यांच्या स्वतःच्या ‘आदेश’ (1941-48) या साप्ताहिकातूनही अनेक चित्तवेधक लेख लिहिले. त्यांचा ‘रक्त आणि अश्रू’ (1942) हा लेखसंग्रह केवळ त्यांच्याच नव्हे, तर एकूण मराठी निबंधवाङ्मयातही अद्वितीय असा मानला जातो. त्यांचे लेखन परखड परंतु तर्कशुद्ध, चिंतनात्मक तरीही भावना उचंबळून सोडणारे असे आहे. त्यांचे वाघनखे (1961), विठ्ठला पांडुरंगा (1973), अमरवेल (1974), रांगोळी (1976) असे चौदा लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचे मुद्रा, झुंबर आणि स्मरणी (1974) हे संग्रहही उल्लेखनीय आहेत.

भावे सनातन भारतीय संस्कृतीचे व जीवनमूल्यांचे उपासक असले, तरी कर्मठ नव्हते, प्रतिगामी नव्हते. पण गंमत अशी, की त्याच मुद्द्यावर, वेगळ्या संदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखालील संमेलन शेवटच्या, तिसऱ्या दिवशी उधळले गेले ! ते जीवनातील दिव्यत्व, पौरुष, सौंदर्य यांचे पूजक होते. ते स्वातंत्र्याचा पुरस्कार करत असताना स्वैराचारावर टीका करत. त्यांना जीवनव्यवहारातील दांभिकतेचा व ढोंगीपणाचा विलक्षण तिटकारा होता. ते भारतीय संस्कृतीतील केवळ सत्त्वांशच ग्राह्य मानत आणि हिंदुसमाजाच्या ऐक्याला विघातक अशा जातिभेदादी गोष्टींवर टीका करत. त्यांचे ‘प्रथम पुरुष एकवचनी’ हे आत्मचरित्र विशेष उल्लेखनीय आहे. ते आत्मचरित्र म्हणजे केवळ लेखकाच्या आयुष्याची कथा नसून त्यातून त्या काळातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्थितीचे प्रतिबिंब उमटले आहे. ते लेखन प्रामाणिक, चिकित्सक आणि प्रभावी आहे. त्यात भावे यांच्या आयुष्यातील संघर्ष, साहित्यविषयक भूमिका, वैयक्तिक जीवनातील गुंतागुंत आणि स्पष्टवक्तेपणा दिसून येतो.

त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात म्हटले आहे, “साहित्यिक, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ हे केवळ माणसांच्या जगात उत्पन्न होतात. मनुष्य आणि पशू यांच्यातील तो मुख्य भेद आहे. माणूस एखाद्या स्वप्नासाठी, एखाद्या ध्येयासाठी, कल्पनेसाठी वेडा होऊन जातो! तसे गाढवाचे होत नाही! नवतेच्या नावावर कलाहीन आणि दुर्बोध पंथ बनवण्याचा अनेकांचा खटाटोप आहे. माझे मागणे शुद्ध भाषेविषयी आहे. ब्रिटिश राज्यात झाली नसेल अशी मराठीची उपेक्षा व विटंबना चालू आहे. शुद्धाशुद्धतेचा आम्हाला विसर पडला आहे. इंग्लिश शब्दांनी आमची भाषा आम्ही जागोजाग डागळतो आहोत. अनेक सुंदर म्हणींनी भरलेले रसाळ, स्वच्छ मराठी आमच्या शिकलेल्या बायकांना बोलत येत नाही! मुळातच आमची भाषा बिघडत आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेकांनी भाषादूषणाविषयी जो अट्टहास केला, तो जसा काही व्यर्थच गेला! ही स्थिती भयंकर आहे.”

अशा या प्रतिभासंपन्न लेखकाचे निधन 13 ऑगस्ट 1980 रोजी डोंबिवलीत झाले.

– संकलित नितेश शिंदे 

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version