अदिती देवधर
पुण्याच्याअदिती देवधर यांनी ‘ब्राऊन लीफ’ हे आगळेवेगळे व्यासपीठ 2016 मध्ये सुरू केले. चार हजार लोक त्यात जोडले गेले आहेत. तो तंत्रज्ञानाचा अद्भुत आविष्कार आहे. सत्प्रवृत्त माणसे एकत्र येऊन काम करू शकतात याचे ‘ब्राऊन लीफ’ हे उदाहरण आहे! त्यांनी वाळलेली पाने पन्नास हजार पोती जाळली जाण्यापासून तीन वर्षांत वाचवली! ते एक मोठे काम ‘ब्राऊन लीफ’ चळवळीकडून पर्यावरणासाठी घडून आले! घराच्या भोवती भरपूर झाडे असणे ही गोष्ट आल्हाददायक! मात्र वाळलेल्या पानांचा पालापाचोळा केवढा मोठा! त्यांची विल्हेवाट हा मोठाच प्रश्न असतो. ती पाने जाळावी तर धुरामुळे प्रदूषण निर्माण होते. शिवाय त्या पानांमधील अन्नद्रव्ये फुकट जातात. म्हणूनच ‘ब्राऊन लीफ’चे ध्येय एकही वाळलेले पान जाळले जाऊ नये हे आहे.
अदिती देवधर यांचे शिक्षण गणित विषयातील. त्यांनी सहा वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कामही केले आणि नंतर त्याच विषयातील सल्लागार म्हणून एका सामाजिक संस्थेत तीन वर्षे काम केले. अदिती यांनी प्रकाश गोळे यांच्या ‘इकॉलॉजिकल सोसायटी’ संस्थेतून नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनासंबंधीचा पदविका अभ्यासक्रम 2012-13 मध्ये पूर्ण केला, तेव्हा त्यांना निसर्ग संरक्षणाविषयीच्या अनेक बाबी दिसू लागल्या; काही गोष्टी खुपू लागल्या. त्यांनी शहरातील नद्यांची स्थिती आणि वाळलेली पाने ठिकठिकाणी जाळली गेल्यामुळे होणारे प्रदूषण या दोन प्रश्नांत लक्ष घातले. त्यांतून एका कामासाठी उभी राहिली ‘ब्राऊन लीफ’ ही संस्था. त्यांचे दुसरे काम आहे ते नदीस्वच्छतेचे. त्यासाठी त्या स्वतःच पुण्यातील ‘जीवितनदी’ या मोठ्या चळवळीत सहभागी झाल्या आहेत. ‘ब्राऊन लीफ’ हे वाळलेल्या पानांचे सोने बनवण्याचे काम आहे असे त्या म्हणतात. गच्चीवर बाग करणाऱ्यांना मातीची कमतरता भासत असते, त्यांना वाळलेल्या पानांचा चांगला उपयोग करून घेता येतो. अदिती यांचे ते काम पूर्णत: नेटवर्किंगच्या आधुनिक तंत्राने उभे राहिले आहे.
नीला पंचपोर यांच्या गार्डनमध्ये प्रात्यक्षिक दाखवताना |
मिलेनियम स्कूलच्या किचन गार्डनमधील मल्चिंग |
अदिती यांनी साठलेली-वाळलेली पाने दुसऱ्यांना देणे त्या पानांपासून स्वत:च खत बनवणे आणि जमिनीत ओलावा राहवा यासाठी त्यावर वाळलेल्या पानांचा थर पसरवून ‘मल्चिंग’ करणे या तीन गोष्टींबद्दल लोकांमध्ये जनजागृती चालवली आहे. त्यासाठी त्यांनी मार्गदर्शनात्मक ‘गाइड’ तयार केले आहे. ते ‘पीडीएफ’ स्वरूपात मोफत उपलब्ध आहे. त्याच संबंधातील एक व्हिडीओ मालिकाही उपलब्ध आहे. कचऱ्यापासून खत करताना पिंजऱ्यासारखी रचना वापरण्याचा उपयुक्त पर्याय त्या गाइडमुळे लोकांना कळून आला. पर्यावरणपूरक बागकामाची नुकतीच सुरुवात केलेल्या लोकांना प्राथमिक स्वरूपात पावले टाकताना या मोफत साहित्याचा उपयोग होतो.
सोसायटीमधील नागरिकांना माहिती देताना |
अदिती उपक्रमाबद्दल व्याख्याने, वेबिनार्स आणि स्वतंत्र मार्गदर्शन अशा तऱ्हांनी चळवळीत सर्वत्र दिसत असतात. अदिती सशुल्क अभ्यासक्रमही घेतात. अदिती ती संकल्पना इतर शहरांमध्येही राबवली जावी यासाठी प्रयत्नशील आहेत. ‘ब्राऊन लीफ’चे तीन व्हॉटस् अॅप ग्रूप सुरू आहेत. पुण्यात त्या व्यासपीठाद्वारे साडेसहाशे सदस्य एकमेकांच्या संपर्कात असतात, तर फेसबुकवर साडेतीन हजार!
संपर्क – अदिती देवधर 7350000385
‘ब्राऊन लीफ’, पुणे
ईमेल – pune.brownleaf@gmail.com
– (मूळ माहितीस्रोत – संपदा सोवनी यांचा ‘लोकसत्ते’तील लेख)
———————————————————————————————————–
ब्राऊन लीफ कम्युनिटी प्रात्यक्षिक पाहताना |
——————————————————————————————————————————
हा प्रयोग आम्ही वासिंद च्या घराजवळ केला त्याचे सुंदर परिणाम दिसू लागले,पक्षी प्राण्यांचा वावर सुरू झाला तर पर्यावरण संतुलित आहे याचे संकेत असतात ,या सुंदर कार्यप्राणाली ला सलाम