रवी आणि विद्या जोशी
अमेरिकेत 1969 साली स्थापन झालेलं ‘शिकागो महाराष्ट्र मंडळ‘ हे नॉर्थ अमेरिकेतील पहिले महाराष्ट्र मंडळ होय. ऑक्टोबर, 2019 मध्ये त्या मंडळाच्या कार्यकारिणीने गोल्डन जुबिलीचा तीन दिवसीय कार्यक्रम आखला होता. अमेरिकेतील शिकागो महाराष्ट्र मंडळाचा सुवर्ण महोत्सव थाटात साजरा व्हावा ही इच्छा महाराष्ट्र मंडळाच्या कमिटीने व्यक्त केली. महाराष्ट्र मंडळाच्या 2019च्या अध्यक्ष वैशाली राजे आणि त्यांची समिती यांनी, मंडळाचे विश्वस्त रवी जोशी यांची त्या संमेलनाचे संयोजक म्हणून निवड केली आणि मग आयोजनाची शिस्तशीर आखणी सुरू झाली. शिकागो महाराष्ट्र मंडळ हे नॉर्थ अमेरिकेतील पहिलेवहिले महाराष्ट्र मंडळ. बी एम एम म्हणजे, सर्व महाराष्ट्र मंडळांची कार्यकारिणी. ‘बृहन महाराष्ट्र मंडळा‘ची स्थापनाही तेथेच झाली आणि बी एम एम चे पहिले कन्वेन्शनही (संमेलन) तेथेच झाले. शिकागो महाराष्ट्र मंडळाने 2014 साली मराठी शाळा सुरू केली. तिची प्रगती उत्तम आहे. दोन बॅचेस सुरू होऊन विद्यार्थ्यांची संख्या एकशेचाळीस आहे. त्या शाळेच्या कॉर्डिनेटर विद्या जोशी या रवी जोशी यांच्या पत्नी होत. म्हणजे रवी व विद्या पतिपत्नी शिकागोतील महाराष्ट्र समाजाचे मोठे आधार होत! विद्या जोशी यांनी प्रयत्न करून शिकागो मराठी शाळेसाठी मान्यताही मिळवली आहे. बीएमएमच्या छत्राखाली असलेल्या गावोगावच्या अनेक शाळांनी तशी मान्यता मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
‘एम एम सी गोल्डन जुबिली‘ (2019) बद्दल रवी जोशी सांगत होते, “आम्ही ध्येय शिकागो स्टेटमधील मराठी जनांना मराठी भाषेच्या धाग्याने एकत्र बांधणे आणि मराठी संस्कृती जतन करणे हे ठेवले होते. सर्व महाराष्ट्रीयन लोकांचे आराध्य दैवत गणपती आणि आदरस्थान म्हणजे शिवाजी महाराज यांची प्रतिकृती उभारून, मग संमेलन मंडप सजवला. आठशे प्रेक्षकांची सोय होईल अशा भव्य हेमेन कल्चरल सेंटरची योजना कार्यक्रमासाठी केली होती. पन्नास वर्षांतील सुंदर उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी एक प्रदर्शन आयोजित केले होते. त्या घटनांचे कायमस्वरूपी शब्दांकन असावे यासाठी ‘सुवर्ण स्मृती‘ नावाची स्मरणिकाही प्रसिद्ध केली.“
सर्व माजी अध्यक्ष |
प्रमुख पाहुणे, प्रसिद्ध लेखक-वक्ते अविनाश धर्माधिकारी हे होते. त्यांच्या हस्ते पन्नास वर्षांतील उपस्थित सर्व अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. त्या सर्वांचा अमेरिकेत मराठी संस्कृती रुजवण्यात मोलाचा वाटा होता. सत्कार झालेल्या अध्यक्षांपैकी जया हुपरीकर या 1969 मध्ये पहिल्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या उपस्थितीचा आनंद सर्वांना होत होता. अविनाश धर्माधिकारी यांनी त्यांच्या भाषणात म्हटले, की सर्व मराठीजनांना एकत्र बांधून ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात एखादे संमेलन आयोजित करणे जेवढे सोपे असते तसे सोपे ते अमेरिकेत नसते. एखादी मीटिंग आयोजित करायची झाली तरी शनिवार-रविवार ठरवावा लागतो. कोपऱ्यावर जाऊन चहा आणायला जवळ कोणी पोऱ्या नसतो. साधा हवामानाचाही विचार करावा लागतो. वेळ आणि जागा, तीही विचारात घ्यावी लागते, कारण लोक खूप दूरदुरून ड्राईव्ह करून येत असतात. अमेरिकेत एखादे व्यावसायिक नाटक बोलावायचे म्हटले तर कलाकारांच्या व्हिसाचा प्रश्न, राहण्याचा प्रश्न असतोच. अशा प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करावा लागतो. अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळे त्यासाठी आनंदाने सहकार्य करतात. महाराष्ट्रात संपर्क करताना, अमेरिकाआणि भारत यांच्या वेळेतील फरक आणि दोन्हीकडच्या कामाच्या वेळा पाहून संभाषण करावे लागते. त्याशिवाय, पूर्वी संपर्काची साधने फार मर्यादित व महाग होती. इंटरनॅशनल कॉलवर अवलंबून राहवे लागत होते. महाराष्ट्र मंडळाचे लोक स्वतःची नोकरी आणि व्यवसाय सांभाळून निःशुल्क सेवा देत असतात. तेथील कार्यकर्त्यांना बळ मिळते ते केवळ मराठी भाषेच्या प्रेमामुळे.
शिकागो महाराष्ट्र मंडळाने गोल्डन जुबिलीसाठी ‘सही रे सही‘ हे नाटकमागवले होते. मात्र विमानाने सेट येऊ शकणार नव्हता. त्यामुळे तो शिकागोच्या कलाकार मंडळींनी मेहनतीने तयार केला! मराठी माणूस साता समुद्रापलीकडे गेला तरी नाटकाचा वेडा आहे याचे ते उत्तम उदाहरण असेल! नाटक झाल्यावर अभिनेते भरत जाधव यांनी संस्थेच्या व्यवस्थेबद्दल प्रशंसोद्गार काढले, “सेट सोयीचा होता. त्यामुळे नाटकात कैक वेळा असलेले पोषाख बदलणे आणि अभिनय करणेही सोयीचे झाले. नाटक खूप रंगले.”
संमेलनात मराठी चित्रपटसृष्टीचा पन्नास वर्षांचा मागोवा घेणारा ‘सूरप्रवास २’ हा मराठी कार्यक्रमही खूप रंगला. शिकागो महाराष्ट्र मंडळाने सुवर्ण महोत्सवासाठी तो खास तयार केला होता. तो कार्यक्रम अतिशय दिमाखात पार पडला. त्यात लोकप्रिय गाणीही ठेवली होती. सभासदांनी त्यावर नृत्ये बसवली होती. शिकागोतील सुमारे ऐंशी हरहुन्नरी कलाकार ‘सूरप्रवासा’त मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. शिकागोमधील मंडळींना नाटकाचे वेड आहेच. नाटकाचे आयोजन किंवा नाट्यसंगीताचा कार्यक्रम महाराष्ट्र मंडळ दरवर्षी करत असते. ते नाटक हे त्यांच्या संस्कृति संवर्धन प्रयत्नांतील एक उपक्रम आहे असे समजतात. शिकागो महाराष्ट्र मंडळाने सुवर्ण महोत्सवासाठी रत्नाकर मतकरी यांचे ‘अश्वमेध‘ हे नाटक बसवले. ते श्रीधर जोशी यांनी दिग्दर्शित केले. नाटक ‘बेसमेंट थिएटर‘तर्फे शिकागोमधील नाट्यकलावंतांनी सादर केले. आदित्य ओक आणि सत्यजित प्रभू यांचा ‘जादूची पेटी‘ हा कार्यक्रमही गाजला.
तीन दिवस भरगच्च कार्यक्रम होते. कार्यक्रमांचे वैविध्य इतके होते, की शिकागोमध्ये आजुबाजूच्या गावांतून आलेल्या मंडळींना कार्यक्रम पाहण्यासाठी तीन दिवस मुक्काम करावा लागणार होता. शिवाय, अनेक सभासद कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात सहभागी होणार होते. बऱ्याच लोकांची लहान मुले होती. त्यांच्यासाठी बेबी सिटिंगची व्यवस्था करण्यात आली. काही सभासदांनी बेबी सिटिंग या विभागात वेळ दिला. नाटकात वा नृत्यात सहभागी असलेले कलाकार त्यांची मुले त्या विभागात विश्वासाने बिनधोक सोडून जाऊ शकत होते. मुलांचे मनोरंजन करण्यासाठी बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम करण्यासाठी रामदास पाध्ये यांना बोलावले होते.
मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘रामायण’ सादर केले. |
शिकागो मराठी शाळेचाही भव्य कार्यक्रम त्या संमेलनात आयोजित केला होता. मुलांनी दोन तास ‘रामायण‘ सादर केले. त्यातील प्रसंग हुबेहूब उभे करण्याचा प्रयत्न साधला. अगदी राक्षसांची लढाईसुद्धा! त्या नाटकासाठी पालकांनी अत्यंत मेहनत घेऊन सेट तयार केले होते, पोशाख तयार केले होते. ती तयारी करत असताना मुले आसपास असतच. त्यामुळे त्यांनाही आपोआप ती माहिती मिळे. संमेलनात सहभागी शालेय मुलांच्या कानावर इतरही कार्यक्रम पडत असल्याने त्यांचे मराठी भाषेचे ज्ञान वाढते. सुचेता कुलकर्णी-अकोलकर यांनी ‘रामायण‘ हा कार्यक्रम दिग्दर्शित केला होता. योगायोगाने, महोत्सवाच्या तारखांमध्ये 12 ऑक्टोबरला कोजागिरी होती. त्यानिमित्त लाईव्ह ऑर्केस्ट्रावर सर्वांनी गरबा नृत्याचा आनंद घेतला. शेवटचे आकर्षण म्हणजे सुबोध भावे यांची मुलाखत- ‘रूबरू‘. त्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या अनेक भूमिकांची झलक सादर केली.
अशा तऱ्हेने 11 ते 13 ऑक्टोबर (2019) मध्ये तो सुवर्ण महोत्सव पार पडला. कार्यक्रमाचे कन्व्हेनर म्हणून रवी जोशी यांच्यावर जबाबदारी होतीच, पण प्रत्येक व्यवस्था करण्यात त्यांची पत्नी विद्या जोशी यांनीही उत्साहाने सक्रिय सहभाग दिला. त्यांनी स्पॉन्सर्स मीटिंग, आर्थिक सहकार्य मिळवून देणे, कार्यक्रमाचे आयोजन, पाहुण्यांची देखरेख इत्यादी जबाबदाऱ्या हुशारीने व मेहनतीने पार पाडल्या. लग्नसमारंभाहून मोठा आवाका असलेल्या त्या संमेलनात शिकागोच्या सुमारे एकशेविसाहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. त्या सर्वांच्या सहभागाशिवाय हा महोत्सव यशस्वी होऊ शकला नसता असे मनोगत रवी जोशी यांनी मांडले. अमेरिकेसारख्या देशात मराठीचे रोप लावणे आणि त्याचा वटवृक्ष झालेला पाहणे याचा आनंद सारे आजी व माजी अध्यक्ष घेत होते, तसेच सभासदही!
– मेघना साने98695 63710 meghanasane@gmail.com
मेघना साने मुंबई विद्यापीठाच्या एम ए, एम फिल पदवीधारक असून, त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखा अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीवर ‘नाट्यसंपदा’च्या ‘तो मी नव्हेच‘ व ‘सुयोग’च्या ‘लेकुरे उदंड झाली‘ या नाटकांमधून पाच वर्षे भूमिका केल्यानंतर एकपात्री प्रयोगाची स्वतंत्र वाट चोखाळली आहे. त्यांनी ‘कोवळी उन्हे‘ या स्वलिखित एकपात्री प्रयोगाचे देशविदेशांत दौरे केले आहेत.
——————————————————————————————–————-
उद्घाटन करतानामाजी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे |
Really appreciate in such long distance also we could feel.our footprint
अपार रसिक श्रद्धा आणि संयोजनाचा ध्यास
मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अभीमान वाटतो.
Hats of to you !!