हिंदस्वराज्य परिचर्चा

_gandhi_vicharancha_jagar_3

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि गांधी राष्ट्रीय स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीजींच्या ‘हिंदस्वराज्य’ या पुस्तकावर 26-27 ऑक्टोबर 2013 रोजी पुण्यात गांधीभवन येथे परिचर्चा झाली. गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी हे आजारी असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत परंतु निधीचे विश्वस्त अन्वर राजन आणि डॉ. उर्मिला सप्तर्षी, दोघे जण दोन्ही दिवस उपस्थित होती.

परिचर्चेबाबत संयोजनाच्या सुरुवातीपासून उत्सुकता होती आणि विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, विचारवंत स्वत: होऊन परिचर्चेविषयी विचारणा करत होते. प्रत्यक्ष परिचर्चेत दोन दिवसांत तब्बल एकशेपस्तीस जण सहभागी झाले; तरी जवळजवळ पस्तीस लोक, ज्यांनी येऊ म्हणून कळवले होते ते काही ना काही कारणाने उपस्थित राहू शकले नाहीत.

परिचर्चेच्या प्रारंभी ज्येष्ठ गांधीविचार अध्यासक आणि विचारवंत डॉ. सु.श्री. पांढरीपांडे यांनी बीज भाषण केले. स्वातंत्र्य आणि स्वराज्य यांमधील फरक स्पष्ट करून ते म्हणाले, की आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवले पण आर्थिक, आध्यात्मिक, नैतिक, सांस्कृतिक, भाषिक स्वातंत्र्याचे काय? स्वातंत्र्य हिंसेने मिळवणे शक्य आहे, पण स्वराज्य अहिंसेनेच मिळवावे आणि टिकवावे लागते. त्यासाठी स्वत: बरोबर इतरांच्या स्वातंत्र्याचाही विचार करावा लागतो; निसर्गाचा विचार करावा लागतो. गांधीजींनी निसर्गाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला. विज्ञान-तंत्रज्ञान आणि मानवी जीवन यांतील संबंध तटस्थ असू शकत नाही. मग तंत्रज्ञान आणि समाजव्यवस्था यांतील संबंध स्वराज्याला अनुकूल आहे, की नाही याचा विचार करून त्याचा स्वीकार करायला पाहिजे. गांधीजींनी शरीरश्रमाला महत्त्व दिले. त्यांना ज्यातून शरीरश्रम वगळले जातील असे तंत्रज्ञान मान्य नव्हते. त्यांनी सत्य, अहिंसा, स्वराज्य आणि स्वदेशी या चतु:सुत्रीतून स्वराज्यशास्त्र मांडले. मानवी जीवनात संघर्ष पावलोपावली आहे पण समन्वय कसा साधणार हा खरा प्रश्न आहे आणि गांधी विचार आपल्याला समन्वयाकडे नेतो असे ते म्हणाले.

डॉ. अभय बंग यांनी ते मॉडेल शोधग्राममध्ये ‘आरोग्य स्वराज्य’च्या संकल्पनेतून सिद्ध केले आहे. त्यांची सध्याच्या वैद्यकीय व्यवसायासंबंधीची निरीक्षणे डोळ्यांत अंजन घालणारी होती. ते म्हणाले, की सध्या वैद्यकीय उपचार सर्वसामान्य माणसांसाठी इतके महाग झाले आहेत, की उपचार घेतले नाही तर मृत्यू आणि घेतले तर आर्थिक मृत्यू अशी त्यांची अवस्था झाली आहे.

त्यांनी शोधग्राम येथे राबवलेली आरोग्य स्वराज्याची संकल्पना ही गांधीच्या हिंदस्वराज्य संकल्पनेचेच एक्स्टेन्शन किंवा अॅप्लिकेशन आहे असे सांगून ते म्हणाले, की विल्यम ब्लेक यांनी म्हटल्याप्रमाणे आख्खी पृथ्वी जशी वाळूच्या कणात बघता येते त्याप्रमाणे गांधीजींच्या आरोग्य विचारात त्यांच्या संपूर्ण विचारांचे सार दिसून येते. रिचर्ड अँटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटातील एका प्रसंगातून गांधींच्या आगळ्यावेगळ्या दृष्टीची अनुभूती येते. आश्रमात महत्त्वाची बैठक सुरू असताना अचानक गांधीजी उठून चालू लागले. पंडितजी त्यांना कुठे चाललात म्हणून विचारतात तेव्हा, “बकरी के टांगमें मोच आयी है, उस को सेंक देने का समय हुआ है ” असे उत्तर देतात. त्यांना भारताच्या स्वातंत्र्याइतकीच ‘बकरीकी टांग’ महत्त्वाची वाटत होती, हे विशेष आहे. म्हणूनच 1946 साली पुण्याजवळ उरळीकांचनमध्ये गांधीजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर गावात आरोग्यव्यवस्था कशी राहील याचे प्रयोग करत होते. ते स्वातंत्र्य आणि स्वराज्य या दोन्हीचे महत्त्व जाणत होते.

गांधीजींनी ‘स्वस्थ’ या शब्दाकडे नीटपणे पहायला शिकवले. जो ‘स्व’मध्ये स्थित आहे तो स्वस्थ, जो नाही तो अस्वस्थ. आपल्या राजकीय-आर्थिक संस्कृतीने आपल्याला खाण्याच्या बाबतीतही निवडीचे स्वातंत्र्य ठेवलेले नाही. आपल्याला वाटते, की खूप ‘चॉईस’ आहे पण ही संस्कृती तिच्या सोयीने आपल्याला खाऊ घालते. त्यामुळे येथे रोगाचे जणू पीक आले आहे. म्हणजे पूर्वीचे कुपोषण, बालमृत्यू, मलेरिया, हृदयरोग, स्ट्रोक, कॅन्सर, एचआयव्ही बाधा यांची दुसरी लाट आलेली आहे. वैद्यकीय भाषेत याला ‘डबल बर्डन ऑफ डिसिजेस’ असे म्हणतात.

गांधीजींनी ‘हिंद स्वराज्य’मध्ये जणू द्रष्टेपणाने ते सर्व जाणून वैद्यकीय व्यावसायिकांवर सात गंभीर आरोप केले आहेत. गांधीजी म्हणतात, की डॉक्टर आणि त्यांचे उपचार यांमुळे माणूस नैसर्गिक वागून त्याच्या शरीराचे रक्षण करण्याऐवजी आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांनी इस्पितळे हा पापाचा पाया आहेत असे शब्द वापरले आहेत, कारण तो व्यवसाय नीतिमत्तेच्या वागण्यापासून आम्हाला दूर नेतो. तो शोषक आणि लुटारू व्यवसाय आहे. त्यामुळेच आपल्याला ‘आरोग्य स्वराज्य’मध्ये उपचारांचा शोध घ्यायचा नाही तर उपचारांची गरज पडणार नाही अशा जीवनशैलीचा शोध घ्यायचा आहे.

माणसाची जीवनशैली जेवढी निसर्गाच्या जवळ असेल तितकी त्याची  एकटेपणाची भीती नष्ट होईल. तेथे केवळ ‘मी’चा विचार नाही. ‘तू’चा विचारही आहे. “ You think, therefore ….. you are ” ही संकल्पना ‘तू’ला जन्म देते. या ‘तू’चा विचार न करता जगण्याचा विचार हा आध्यात्मिक हृदयरोगाला निमंत्रण देतो. स्पर्धात्मक जीवनशैलीतून ‘मी’केंद्रित जीवनशैलीतून मुक्त होण्याची साधने शोधणे हाच त्या रोगातून मुक्त होण्याचा पर्याय आहे. पाश्चात्य शैली निव्वळ बाह्य उपचारांचा विचार करते. अमेरिकेत सतरा टक्के जीडीपी आरोग्यसेवेवर खर्च होतो आणि त्याच वेगाने वाढत गेला तर पुढच्या काही वर्षांत तो सत्तेचाळीस टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तेथे वैद्यकीय सेवेवर दर माणशी दर वर्षी तीन लाख साठ हजार रुपये खर्च होतात. आपल्याकडेही त्याचेच अनुकरण सुरू आहे. गांधींनी व्यक्तीच्या आणि समूहाच्या पातळीवर ती लढाई लढता येईल असे त्यांच्या key to health या पुस्तकात म्हटले आहे. त्यांचा आरोग्यविचार हा आहार + पंचमहाभूते + रामनाम यांभोवती फिरतो. पण त्यांचा राम म्हणजे दशरथपुत्र राम नाही, तर ते सत्याचा ध्यास घेण्याचे तत्त्व आहे.

आरोग्य स्वराज्याची विशेषता ही आहे, की ते इतरांनी करण्याची जगभर येण्याची वाट बघावी लागत नाही. ती एक व्यक्तिगत पातळीवरील क्रांती आहे, जी वैश्विकतेकडे नेते. मोठ्या परिवर्तनाची सुरुवात त्या छोट्याशा चावीने करण्याचा मंत्रच गांधीजींनी दिला आहे असे डॉ. अभय बंग म्हणाले.

त्यानंतर छत्तीसगडमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा गावच्या ग्रामस्वराज्य प्रयोगाचे संकल्पक मोहन हिराबाई हिरालाल यांनी गांधींचे ग्रामस्वराज्य, विनोबांचे स्वराज्यशास्त्र आणि जयप्रकाश नारायणांचे लोकस्वराज्य या अभ्यासपूर्ण भूमिकेचा विचार मांडला. मेंढालेखाचा प्रयोग लोकनिर्णय आणि लोकशक्ती यांच्या माध्यमातून सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. गांधी, विनोबा आणि जयप्रकाश या तिघांनी दुबळी जनता आणि राज्य मात्र कल्याणकारी अशी भूमिका घेणाऱ्यांना विरोध केला होता असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, की आज राज्यव्यवस्था ही जणू कुणी बलाढ्य पुरुष आणि जनता ही एखाद्या अबला स्त्रीप्रमाणे सर्व दृष्टींनी त्यावर अवलंबून आहे. अशा व्यवस्थेला हिंदस्वराज्य धक्का देते. दंडशक्ती ही खरी शक्ती नसून लोकशक्ती ही खरी शक्ती आहे आणि तिनेच जागृत होऊन स्वयंनिर्भर होऊन निर्णय घेतला पाहिजे. गुलामीत सुख मानण्याची मानसिकता सोडली पाहिजे.

‘ग्रामस्वराज्य’च्या संकल्पनेत खेडे हा पायाभूत घटक मानून व्यक्ती नाही तर समूहाच्या अंगाने विचार व्हायला हवा असे सांगून मोहन म्हणाले, की समुहात श्रम आणि त्याचा मोबदला याची व्यवस्था लावताना, मी एवढे एवढे काम केले – त्याचा एवढा मोबदला मिळण्यावर माझा हक्क आहे ही व्यवस्था चुकीची आहे. विनोबा म्हणतात, की क्षमतेएवढे काम आणि आवश्यकते एवढा मोबदला मिळाला पाहिजे. श्रम करणे शक्य असून श्रम न करणे हा गुन्हा आहे आणि आवश्यकतेएवढा मोबदला न मिळणे यात विषमतेची मुळे आहेत. गडचिरोलीमध्ये पासष्ट गावांत आदिवासी भागात अभ्यास करून लोकनिर्णयाने ग्रामदानाचे आणि सामूहिक वनसंपत्तीचे पाऊल उचलले गेले. सर्व संपत्ती गावाची, सर्व जमीन गावाची असा निर्णय शंभर टक्के होईपर्यंत चर्चा करण्यात आली. आमच्या गावात आम्हीच सरकार असे शहरात, गल्लीत, मोहल्ल्यातही होऊ शकते, यावर विचार झाला पाहिजे असे मत त्यांनी मांडले. लोकशक्ती जागृत झाली तर मेंढालेखासारखे मॉडेल विकसित होऊ शकते ही बाब या निमित्ताने अधोरेखित झाली. त्या प्रयोगावर पुस्तक लिहिणारे प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे संचालक (MKCL) डॉ. विवेक सावंत यांनी तंत्रज्ञानाच्या अंगाने मांडणी केली. ते म्हणाले, की गांधींना सरसकट यंत्रविरोधी ठरवणे योग्य नाही. ते यंत्रांना नाही तर यंत्रांचे गुलाम बनवणाऱ्या एका विकृत ‘सभ्यते’ला विरोध करत होते.

ब्रिटिशांसारख्या एका बलाढ्य सत्तेविरुद्ध एक माणूस त्या विचारांच्या सहाय्याने ठाम लढा देऊ शकतो, किती प्रकारची आव्हाने निर्माण करू शकतो, हे जरी आपण आज मुलांना सांगू शकलो तरी ती खूप मोठी गोष्ट होईल असे विवेक सावंत म्हणाले.

ते म्हणाले, की तंत्रज्ञानाच्या संदर्भात झापडबंद विचार करता येणार नाहीत. तंत्रज्ञानाचे आविष्कार कसे होतील ही वेगळी गोष्ट आहे, पण गांधीजींच्या विचारांमागचे तत्त्व आपण निश्चितपणे घ्यायला हवे. शास्त्र ते असते जे आजच्या प्रश्नांची उत्तरे देते. आश्चर्य म्हणजे गांधीजींच्या विचारांमागचे तत्त्व योग्यपणे प्रत्यक्षात आणले आहे, कांगो नदीच्या खोऱ्यातल्या कोळीणींनी. सावंत यांनी त्या कोळिणींविषयी सांगितले, की या कोळिणी पूर्वी सकाळी उठून नदीवर जायच्या. मिळतील तेवढे मासे पकडायच्या आणि संध्याकाळपर्यंत विकायच्या. जसजसा दिवस वर जाईल तसतसे माशांचे भाव खाली उतरायचे. संध्याकाळी अक्षरश: कवडीमोलाने मासे विकून उरलेली मासळी फेकून देऊन त्या घरी परतायच्या. पण एकदा अचानक एका उद्योगपतीने त्यांना मोबाईल फोन्स भेट दिले. मोबाईल हातात आल्यावर त्यांनी स्वत:चे विक्रीचे नवे शास्त्र शोधून काढले. त्यांच्यापैकी काही जणी नदीवर जातात, मासे जाळ्यात पकडतात पण सारेच मासे किनाऱ्यावर न आणता पाण्यातच जिवंत ठेवतात. काही जणी मार्केटमध्ये बसतात आणि गिऱ्हाईकांकडून माशांची ऑर्डर घेतात आणि मोबाईलवर नोंदवतात. ऑर्डरप्रमाणे काही मुले सायकलवरून मासे मार्केटमध्ये पोचवतात. न विकलेली मासळी पुन्हा पाण्यात सोडतात. त्यामुळे होते काय की गिऱ्हाईकांना संध्याकाळपर्यंत ताजी फडफडीत मासळी मिळते, त्यामुळे बायकांना भाव जास्त मिळतो. शिवाय, आवश्यकतेपेक्षा जास्त मासे न काढल्याने पर्यावरणाची हानीही होत नाही. तंत्रज्ञानाचा इतका सुंदर उपयोग करून घेण्याची कल्पकता या अशिक्षित बायकांनी दाखवली.

तसेच इंटरनेट हे एनर्जी इंटरनेट म्हणूनही वापरले जात आहे. जसे माहितीचे वितरण तसे ऊर्जेचेही वितरण होऊ शकेल, अशी शक्यता आहे. त्याचा जीवनपद्धतीवर चांगला परिणाम होऊ शकेल. इंटरनेट कम्युनिटीजवर विचारांचे, भावनांचे शेअरिंग होत आहे, मुले एकमेकांचे सल्ले घेत आहेत. कझाकिस्तानचा एक मुलगा आणि भारतातील एक मुलगी यांच्यातील शेअरिंग हे त्याचे बोलके उदाहरण आहे. तो मुलगा तिला ‘अप्पी’ म्हणजे मोठी बहीण म्हणून संबोधतो आणि तिच्यामुळे त्याला ‘इमोशनल रिलीफ’ मिळतो असे सांगतो.

आज शहरे बकाल आणि खेडी उध्वस्त झाली आहेत. त्या दोन्हींच्यामध्ये जी शिवारे आहेत तेथे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य वातावरण तयार करता येईल का? गांधी विचारांचा उपयोग करून तशा प्रकारच्या शिवार-वस्त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी धोरणे आखता येतील का? त्यासाठी कोणती यंत्रे लागतील? पर्यावरणासाठी इतर पर्याय कसे निर्माण करता येतील याचा विचार केला पाहिजे. गांधीजी तंत्रज्ञानालाच नाकारत होते असा ओरडा करण्यापेक्षा आजच्या परिस्थितीत पर्यावरण कसे वाचवता येईल याचा विचार करण्यासाठी गांधी विचारांचा उपयोग करता येईल. ‘Local solutions from local resources’ हा गांधीजींचा विचार त्यासाठी किती उपयोगाचा आहे हे लक्षात घेतले तर गांधीजी काळाच्या पुढे किती होते याचा प्रत्यय येईल.

त्या चौघांच्या मांडणीनंतर प्रश्नोत्तरांचे आणि चर्चेचे सत्र झाले त्यात अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. डॉ. अ.पां. देशपांडे यांनी सांगितले, की अमेरिका हा संधींचा देश आहे, पण भारत हा कल्पकतेचा देश आहे. गांधीजींच्या विचारातील कालबाह्य जे ते कमी करत गेले पाहिजे असे सांगितले.

सदा डुंबरे यांनी सांगितले, की इतिहासात अडकवून टाकलेल्या गांधींना विवेक सावंत यांनी वर्तमानात आणले. या चर्चेमधून ‘हिंदस्वराज्य’चे पुनर्वाचन आपण करत आहोत, ते करता करता ‘हिंदस्वराज्य’चे जर पुनर्लेखन केले तर आपण ‘विश्व स्वराज्य’ या संकल्पनेपर्यंत पोचू शकू. इतरही अनेकांनी प्रश्न विचारले.

डॉ. विवेक सावंत उत्तर देताना म्हणाले, की आजच्या काळात आपण Independence कडून Interdependence कडे जाता येईल का? याचा विचार करायला हवा. गांधीजी ही संपूर्ण जगाची विचारसंपत्ती आहे आणि त्यांचा relevance हा बहुआयामी आहे. ‘Production by masses with new technology’ हा जगाचा नवा ट्रेंड आहे. प्रत्येक व्यक्ती तिच्या पातळीवर ज्ञानाचा उपयोग करत जीवन स्वावलंबी आणि स्वायत्त करू शकेल. त्यासाठी तशी तंत्रे शोधावी लागतील. नवी बिझिनेल मॉडेल्स शोधावी लागतील. गांधींनी त्या काळात खादी हे सर्वांत मोठे बिझिनेल मॉडेल शोधले होते. रोजगाराचे मोठे तत्त्व गांधी विचारात सापडते. तो सांस्कृतिक लढा गांधींनी सांगितला आहे. तंत्रज्ञानाचा आशय काय असावा हे तज्ज्ञ ठरवणार नाहीत, आज सर्वसामान्य माणसेच त्यात काय content असणार ते ठरवणार आहेत, हे महत्त्वाचे आहे. असे सावंत यांनी प्रतिपादन केले.

डॉ. अभय बंग म्हणाले, की ‘Beauty of life is in slowness of life and prosperity of it.’ ते म्हणाले, की interdependence या शब्दापेक्षा cooperation + independence असं हवं. एकाच वेळी ग्लोबल आणि लोकल, रिअल आणि व्हर्च्युअल कसे जगायचे आणि तरीही त्यातील sanity कशी टिकवून ठेवायची हे आव्हान आहे.

पत्रकार अरुण खोरे यांनी मुलांपर्यंत हे सारे पोचवायला पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत गांधी विचारांचे सत्त्व पोचवायला पाहिजे असे सांगितले तर बाळासाहेब वाघ यांनी ते सारे policy makers पर्यंत पोचवायला पाहिजे असे प्रतिपादन केले. ज्येष्ठ संपादक, प्रकाशक रामदास भटकळ म्हणाले, की ‘नई तालीम’ सारख्या गांधीजींच्या शिक्षणाच्या प्रयोगाचे वेगळेपण आपण लक्षात घेतले पाहिजे. कॅनडामधील वैद्यकीय विद्यापीठाने तेथील अभ्यासक्रमात जाणीवपूर्वक बदल केल्याची माहितीही त्यांनी दिली.

डॉ. अभय बंग यांनी समारोपात सांगितले, की आपल्या जीवनात alienation आले आहे. साध्या आपल्या अन्ननिर्मिती प्रक्रियेवरही आपले नियंत्रण नाही. कशावरच नाही. कॉर्पोरेट सेक्टर म्हणतो, “आम्ही आहोत ना, तू विचार करू नको, तुला काय हवंय, ते मी बघतो.” शासनही तेच आणि प्रशासनही तेच म्हणते. याला ‘नाही’ म्हणणे, स्वत:पासून सुरुवात करणे हाच मार्ग आहे.

परिचर्चेत डॉ. अशोक चौसाळकर, ज्ञानदा देशपांडे, मंगेश कुळकर्णी, छाया दातार, अनिल शिदोरे, डॉ. स्वाती गाडगीळ, प्रदीप दीक्षित, यश वेलणकर, सुभाष आठल्ये, अन्वर राजन, उर्मिला सप्तर्षी यांनी भाग घेतला.

परिचर्चेचे प्रास्ताविक अन्वर राजन व अंजली कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन दिनकर गांगल यांनी केले.

परिचर्चेनंतर तीन-चार दिवसांत आलेले अनुभव पाहता सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना परिचर्चा महत्त्वपूर्ण वाटली असे जाणवले. बाकी वीस-तीस टक्के लोकांना परिचर्चेत भक्तिभाव, गांधी तत्त्वज्ञानाप्रती एकनिष्ठा व म्हणून भाबडेपणा वाटला. त्यांपैकी काहीजण रविवारी, दुसऱ्या दिवशी गांधीभवनकडे फिरकले नाहीत. परिचर्चेचे उद्दिष्ट व अपेक्षा या बाबतीत वेगवेगळी मते असल्याने असे घडणे स्वाभाविक होते.

‘दोन दिवसांत दुसऱ्याचे ऐकता ऐकता स्वत:शी खूप विचार करता आला. मन प्रगल्भ झाल्यासारखे वाटले. मुख्य म्हणजे धैर्यभावना ही जीवनात किती महत्त्वाची आहे, याची प्रकर्षाने जाणीव झाली. हे घडण्याला ‘हिंदस्वराज्य’ हे पुस्तक आणि त्यावरील विचारमंथन कारणीभूत झाले. मी कृतज्ञ आहे.’ ही प्रतिक्रिया प्रातिनिधिक म्हणून सांगता येईल.

सद्यकाळात समकालीन विषयांवर अशा गंभीरपणे विचारचर्चा घडत नाहीत. त्यामुळे इतर लोक काय विचार करतात, त्यांच्या मनात कोणती आंदोलने सुरू आहेत, हे जाणून घेण्याचे साधन नाही. समाजातील समविचारी व संवेदनशील व्यक्तींना त्यांची मते मांडण्यासाठी व आदानप्रदान करण्यासाठी सर्वसमावेशक असे व्यासपीठ सध्या उपलब्ध नाही, ते निर्माण होणे गरजेचे आहे, याची जाणीव सर्वांनाच प्रकर्षाने झाली. मोहन हिराबाई हिरालाल यांनी ‘थिंक महाराष्ट्र’ने असा पुढाकार घ्यावा असे सुचवले.

अंजली कुलकर्णी,
3, विघ्नहर अपार्टमेंट, जयवर्धमान सोसायटी,
बिबवेवाडी रोड, पुणे ४११ ०३७
९९२२०७२१५८
anjalikulkarni1810@gmail.com

Last Updated On 22nd Sep 2018

About Post Author

1 COMMENT

  1. परिचर्चा खूप छान, गांधीजींना…
    परिचर्चा खूप छान, गांधीजींना समजणें सोपे नाही, त्यासाठी अश्या परिचर्च्या खूप झाल्या पाहिजे, आपण चालविलेल्या कार्याचा कौतुक वाटते, आणि अश्या प्रकारच्या परिचर्च्यांचा भाग होणे आवडेल.

Comments are closed.