स्मिता पाटील – मूड आणि स्विंग्स !

2
317

स्मिता पाटील हिला केवळ एकतीस वर्षांचे आयुष्य लाभले होते; त्यात तिची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द जेमतेम अकरा वर्षांची. परंतु त्या काळात तिने निर्माण केलेले अभिनयविश्व व त्यापलीकडे जाऊन तयार केलेले माणसांचे भावबंध विलक्षण आहेत. तिचे व्यक्तिमत्त्व तिच्या भावविश्वात आलेल्या व्यक्तींच्या अंतरंगात मिसळून जात असे, त्या व्यक्तीच्याही नकळत. त्याला वयाचे, नावाचे, हुद्याचे, प्रतिष्ठेचे बंधन नसे. स्मिता पाटील हिच्या संपर्कात प्रथम पत्रकार म्हणून आलेली व नंतर तिची जिवलग मैत्रीण झालेली अशीच एक पत्रकार म्हणजे ललिता ताम्हणे.

खरे तर, ललिता ताम्हणे स्मिता पाटील हिच्या आत्मचरित्राचे शब्दांकन करणार होत्या, ती कथन करेल तसे लिहिणार होत्या. ते काम स्मिताच्या अकाली मृत्यूमुळे पुरे होऊ शकले नाही. तरीही त्यांना वाटले, की स्मितासारख्या जगविख्यात अभिनेत्रीवर लिखित स्वरूपात व तेही मराठीत काही असणे आवश्यक आहे. स्मिता ऐंशीच्या दशकातील अभिनेत्री असली, तरी तिने साकारलेल्या व्यक्तिरेखांचा प्रभाव नंतरच्या दोन-तीन दशकांतील तरुण अभिनेत्यांवर व अभिनेत्रींवर आहे. त्या व्यक्तिरेखांच्या भावमुद्रांपलीकडील स्मिता पाटील हिचा भावस्पर्शी चेहरा, चित्रपटातील प्रत्येक ‘फ्रेम’मधील घटना व्यापून टाकणारे अस्तित्व आणि त्यातून ‘आपलं’ वाटत जाणारे तिचे व्यक्तिमत्त्व याबद्दल अनेकांना कुतूहलमिश्रित गूढ व प्रेम वाटत आलेले आहे. ललिता ताम्हणे यांनी लिहिलेले आणि प्रसाद महाडकर यांच्या ‘जीवनगाणी’ने प्रसिद्ध केलेले ‘स्मिता, स्मितं आणि मी’ हे पुस्तक सर्व संवेदनशील मनातील तशा विचारांना बऱ्याचशा प्रमाणात वाट मोकळी करून देऊ शकेल.

‘स्मिता, स्मितं आणि मी’ हे ललिता ताम्हणे यांनी स्मिता पाटील हिच्यावर लिहिलेल्या लेखांचे आणि मुलाखतींचे संकलन आहे. खुद्द लेखिकेने म्हटल्याप्रमाणे, त्या दोघींचे सुरुवातीला औपचारिक असलेले नाते एकेरीवर कधी आले, ते दोघींनाही समजले नाही. त्यामुळे भावनिक न होता, त्या मैत्रीतून बाहेर पडून व्यक्तीकडे बघत, तिच्या अंतरंगात शिरणे आणि तरीही ते बघणे कोरडे होऊ न देता, त्यात माणूसपणाची संवेदना कायम ठेवणे ही कसरत कठीण होती. ललिता ताम्हणे त्यात बव्हंशी यशस्वी झालेल्या आहेत. स्मिता पाटील यांचे विविध ‘मूड्स’ टिपणारी छायाचित्रे, तिच्या चित्रपटांतील प्रसंगांचे फोटो व त्या अनुषंगाने येणाऱ्या लेख-मुलाखती आणि स्मिताच्या आयुष्यात घडत गेलेल्या घटना असे पुस्तक उलगडत जाते. प्रसाद महाडकर यांनी हातचे जराही न राखता पुस्तकाची उत्तम निर्मिती केलेली आहे. शिवाय, पुस्तकाचे संपूर्ण स्वरूप ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ असल्याने गतकाळाची व त्यातील व्यक्तिमत्त्वांची एक सुप्त जाणीव वाचकाला होत राहते; ‘स्मिता’ नावाच्या सावळ्याशा व्यक्तिमत्त्वालासुद्धा पूरक अशीच !

अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील हिने अल्पकाळात मिळवलेले यश अलौकिक होते. कॉस्टा गॅव्हरासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्दर्शकाने भरवलेला स्मिताच्या चित्रपटांचा महोत्सव, मॉण्ट्रियल येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून काम करण्याचा तिला मिळालेला बहुमान, भारत सरकारने दिलेली ‘पद्मश्री’ ही फक्त त्याची झलक आहे. शिवाय, हिंदीत मंथन, भूमिका, शक्ती आणि मराठीत ‘जैत रे जैत’ या चित्रपटांतील तिचा अभिनय चिरस्मरणीय ठरला. ‘उंबरठा’ या चित्रपटामधील तिची ‘सुलभा महाजन’ ही भूमिका अजरामर झालेली आहे. स्मिता पाटील त्या सर्वांबद्दल, तिच्या आयुष्याकडे व चित्रपटांकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल, व्यक्तिगत नातेसंबंधाबद्दल व होणाऱ्या मानसिक कोंडीबद्दल, एकटेपणाबद्दल ललिता ताम्हणे यांच्याकडे मनमोकळेपणाने व काहीशा तत्त्वचिंतनाच्या अंगानेसुद्धा बोलली आहे. त्यामुळे स्मिता ही कधी अभिनेत्री म्हणून, तर कधी व्यक्ती म्हणून ताम्हणे यांना कशी दिसत गेली, भासत गेली असे मनोगतरूपी, चिंतनाकडे झुकणारे तर कधी पत्रकार म्हणून तटस्थपणे बघणारे लेखनाचे स्वरूप आहे. त्यात भावनिकता आहेच, परंतु व्यक्ती म्हणून वेगाने बदलत जाणाऱ्या स्मिताला दु:खात टाकणारा तिच्या आयुष्यक्रमात झालेला बदल एक मैत्रीण म्हणून स्वीकारतानाची वेदनामय असहायतासुद्धा आहे. अर्थातच, त्या ‘असहायते’चे जगासमोर आलेले ‘वास्तव’ वादग्रस्त होते; विशेषत: शबाना आझमी या तिच्या समकालीन अभिनेत्रीबरोबरचे तिचे (बिघडलेले) संबंध आणि राज बब्बरशी लग्न करण्याचा तिने घेतलेला निर्णय; परंतु हे संवेदनशील विषय ताम्हणे यांनी चांगले हाताळले आहेत, त्यातील स्मिता पाटील या व्यक्तीचा मान ठेवून आणि ‘नैतिकते’चे प्रस्थापित व चाकोरीबद्ध निकष न लावता ! त्यांनी शबाना आझमी यांची या पुस्तकाच्या निमित्ताने मुलाखतसुद्धा घेतलेली आहे. परंतु पुस्तकातील वैशिष्ट्यपूर्ण भाग मात्र स्मिता पाटील हिची रेखा या अभिनेत्रीशी न झालेली मैत्री हा आहे. खुद्द स्मिता पाटील हिला रेखाशी ‘मैत्री’ करण्याची तीव्र इच्छा होती, परंतु रेखाने स्मिताला आयुष्यभर ठरावीक मर्यादेपलीकडे मैत्री करू दिली नाही. स्मिताच्या मृत्यूनंतर मात्र त्याच रेखाला दु:खावेग अनावर झाला होता. रेखा तिच्या संबंधाबद्दल म्हणते, की “मी हिला जास्त जवळ येऊ दिलं, तर मी नकळत हिच्यात इनव्हॉल्व्ह होईन; हिच्यात दुसऱ्याला खेचून घेण्याची शक्ती आहे.” विशेषत: सध्याच्या ‘पेज थ्री’च्या जमान्यात नायक-नायिकांना मादाम तुसाचे मेणाचे पुतळे बनवून त्यांच्या तथाकथित व्यक्तिगत आयुष्याचा बाजार मांडणाऱ्या पत्रकारितेत, हे पुस्तक रुपेरी पडद्यामागील ‘माणसांना’ वाचकांसमोर उभे करण्याचे काम करते आणि ते आताच्या काळासाठी महत्त्वाचे आहे.

तरीही पुस्तक वाचून झाल्यावर काहीसे अपूर्णत्वाचे भान उरतेच, स्मिता पाटील म्हणजे काय, हा प्रश्न वाचकाला भेडसावत राहतो. दूरदर्शनवर बातम्या सांगणारी वृत्तनिवेदिका ते जगविख्यात अभिनेत्री हा तिचा प्रवास ‘कसा’ घडत गेला असावा याचे स्मिताच्या व्यक्तिमत्त्वातील उत्तर वाचकालाच शोधावे लागते. स्मिताचे वडील राजकारणी होते, आई प्रथम गृहिणी व नंतर नर्स. घरात समाजवादाचा, जेपींचा प्रभाव होता. विचार पुरोगामी होते आणि अर्थातच, ‘स्मिता’च्या मनाचा एक कोपरा त्यातून घडत गेला. परिस्थिती व नवऱ्याने केलेल्या अन्यायाविरुद्ध घर सोडून जाणारी ‘उंबरठा’मधील ‘सुलभा महाजन’ त्यातूनच साकार झाली. स्मिता स्त्री चळवळींशी जोडली गेल्याने, तिच्या आयुष्यातील ‘क्रांति’कारक निर्णय ‘स्वत:च’, काही वेळा, कुटुंबाशी फारकत घेतल्याने, समांतर चित्रपटांतील भूमिका असल्याने तीच ‘खरी’ स्मिता असावी असा जगाचा समज झाला; परंतु प्रत्यक्षात तिला तसे होण्यास आवडले असते. तिला माणसांचा सोस होता आणि ती माणसांबरोबरच्या नात्यांतून मिळणाऱ्या ‘प्रेमा’च्या शोधात असावी ! प्रेमातून विरक्ती येते आणि विरक्तीतून अध्यात्म, म्हणूनच कदाचित जीवनातील ती तिच्या सर्वात सुंदर निर्मितीचा, प्रतीकचा जन्म झाल्यानंतर, मृत्यूपूर्वी सलग पंधरा दिवस आजारी अवस्थेत व मनाने संपूर्ण खचल्यावरही ‘मोगरा फुलला’ ही ज्ञानेश्वरांची ओवी त्याच्यासाठी गुणगुणत असे. जीवनाचे अंतिम ध्येयच साध्य झाल्यासारखे ! त्या अर्थाने स्मिताला ‘ध्येय’ नव्हते. तिला ‘मूड स्विंगस्’ होते आणि त्यातील अनिर्णयातून येणारे ‘बोअरडम’, तिला तिचे सर्वस्व दिल्यानंतरही झालेली अपूर्णत्वाची जाणीव, हीच तिची ‘उणीव’ असावी असे बहुधा वाटले असावे. ते समीकरण कायमचे सोडवण्यासाठी तिने बहुधा ‘राज’शी लग्न केले, परंतु मुळातच गणित चुकले होते !

चिन्मय बोरकर 9820881861 chinmay.borkar@gmail.com

——————————————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here