स्मरण, यशवंतांच्या महाराष्ट्र गीताचे (Lyric Yashwanta’s Dedicated Poetry to the State of Maharashtra)

कोरोनाच्याया प्रदीर्घ काळात वातावरण चिंताग्रस्त आहे. आजारपणाच्या बातम्या सतत येत असतात आणि मनात भेटण्याची ओढ वाटत असूनही कोरोनाच्या विचित्र परिस्थितीमुळे कोणी कोणाला भेटण्यास जात नाही. सारेच चिंताव्यग्र, काहींना घरच्या लोकांची काळजी तर काहींना मित्र, स्नेहीसोबती,आप्तस्वकीय यांची. त्यातच काही जिवलग स्नेह्यांचा अचानक झालेला वियोग मन व्यथित करून जातो. ते दु:ख कोण कोणाशी व्यक्त करणार? कोणाचे सांत्वनही करण्यास जाता येत नाही ! अशी मनाची विकल अवस्था!

          अशा वेळी मदतीला आले ते काही चांगले अभिजात वाचन. कोरोनाच्या बेचैन अवस्थेत अभिजात साहित्य हा मोठा दिलासा ठरला. समर्थांच्या दासबोधाची मनस्वास्थ्य टिकायला, टिकवायला मदत झाली. संग्रहातील जुनी पुस्तकेअधूनमधून पुनःपुन्हा वाचत असतो. पुनर्वाचनाचा आनंद काही वेगळाच असतो; तसेच, त्यामुळे मन वर्तमानकाळात फार गुंतून राहत नाही आणि भूतकाळाचा संदर्भ काही मर्यादेपर्यंत वर्तमानाशी जोडण्यास असे जुने वाचन उपयोगी पडले व पडत आहे.

          मी असाच कवी यशवंत यांच्या आईकवितेला शंभर वर्षे झाली, म्हणून माझ्या पुस्तक संग्रहातील त्यांचा कवितासंग्रह काढला व त्यात गुंतून गेलो! रविकिरण मंडळाने प्रकाशित केलेला कवी यशवंत यांचा हा छोटासा संग्रह. त्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन 1930 साली व दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन जुलै 1963 मध्ये झाले. पंचावन्न पृष्ठांचा तो काव्यसंग्रह. किंमत आहे एक रुपया. प्रकाशक आहेत कॉण्टिनेण्टल प्रकाशन, पुणे. तोच संग्रह माझ्याकडे आहे. त्या संग्रहातील अनेक कविता आवडीने वाचल्या- पुनःपुन्हा वाचल्या. पण एका कवितेत मात्र मी पुरता अडकून गेलो. ती कविता लिहिल्याची तारीख दिली गेली आहे 4 मे 1929. त्या कवितेत कवी यशवंत यांनी महाराष्ट्राचा गौरव केला आहे आणि त्याबरोबरच, महाराष्ट्राच्या तुमच्या-आमच्यावरील ऋणांचाही उल्लेख केला आहे. वाटले, ह्या कवितेने जसा मला आनंद दिला, तसा तो इतरांनाही मिळावा यासाठी मला मिळालेला तो आनंद मुक्तपणे वाटण्यास हवा. ती कविता माझ्या या वाङ्मयीन खजिन्यात बंदिस्त नको राहायला आणि ठेवायलाही! तीच ही कविता- महाराष्ट्र गौरवाची गाथा… कवी यशवंतांची…

          कविता छंदोबद्ध आहे. भाषा त्या वेळची आहे. संदर्भाशी खेळत खेळत जर त्या कवितेचा आस्वाद घेतला तर वेगळाच आनंद मिळतो.

       महाराष्ट्र गीत- कवी यशवंत, काव्यसंग्रह- भावमंथन, वृत्तः स्त्रग्विणी

          प्रकाशकः रविकिरण मंडळ तारीखः 4 मे 1929

महाराष्ट्र गीत

वन्दितो हे महाराष्ट्र माते! तुला

तूझिया गायनीं स्फूर्ति दे या मुला.

जागती दैवतें, गाजती गोपुरें,

व्योम-चुम्बी उभी भव्य ही मन्दिरे;

कीर्तने चालती, नर्तने रङ्गती

आणि दिण्डय़ा पताका किती डोलती

छेडिती भक्तिने एकतारी कुणी,

गाति जा त्यावरी गोड ओव्या कुणी;

सारखी भक्तिची लाट हे लावते;

भासतो हा महाराष्ट्र वैकुण्ठ ते.

कोयना, वारणा आणि इंद्रायणी

तेंवि कृष्णादि या मूर्त मन्दाकिनी

वाहुनी नेति की वाहुनी पातके

तो महाराष्ट्र हा पुण्य जेथे पिकें

नान्दले जेथ सौमित्र, सीता-प्रभु

दण्डकारण्य हें ही महाराष्ट्रभू.

तिष्ठला कष्टला रुक्मिणीचा पती

धन्य तेणें महाराष्ट्र हा भारतीं

.

खोळले सिन्धुसे, धावले न्याघ्रसे

शत्रू-धूकाप्रती जाहले सूर्यसे,

नाममात्रिंहि जे बागुलासारखे,

कौस्तुभाची धुती ज्यांपुढें ना टिके,

वैनतेयापरी जिंकुनी पीयुषा

दास्यमुक्तीसवें साधिती सद्यशा

अंजनीबाळसे राष्ट्रकार्यात जे

वीर ऐसे महाराष्ट्र-माते! तुझे

रामदासी गिरा दिव्य संजीवनी,

वेद आले रहाया अभंगातुनी

देव दैत्यापरी काळ सिन्धूप्रती

मन्थुनी काढिती दिव्य रत्ने किती

कालही आजही पुत्र ऐसे तुझे

ज्यामुळे मेरूमान्दार होती खुजे

संकलन – राम देशपांडे 86001 45353

——————————————————————————————————————————————————-

About Post Author

2 COMMENTS

  1. कवी यशवंताचे ” महाराष्ट्र गीत ” वाचले.तुम्ही आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त या गीताच्या महन्मंगल,शुर विरतेच्या,पावन सरितांच्या,गिरीकंदराच्या अलौकिक स्मृती जागविल्या.कवी यशवंताचा दिव्य प्रतिभेला विनम्र अभिवादन! महाराष्ट्र दिन चिरायू होवो!© प्रा.पुरुषोत्तम पटेल

  2. कवी यशवंतांचे ' वंदितो हे महाराष्ट्र माते…' गीत आवडले. ����

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here