महाराष्ट्र – भारताचे ‘चौदावे रत्न’ (Maharashtra State is Born – Atre Narrates the story)

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आचार्य अत्रे यांनी व्यक्तिश: आणि त्यांच्या नवयुगसाप्ताहिकाने व दैनिक मराठा यांनी अतुलनीय कामगिरी केली. अत्रे यांनी नवयुगमध्ये 1 मे 1960 रोजी लिहिलेला लेख.

अखेर महाराष्ट्र राज्य झाले ! मुंबई राजधानी असलेले, महाराष्ट्राचे, महाविदर्भाचे अन् मराठवाड्याचे संयुक्त महाराष्ट्र राज्य शेवटी आले ! आणि ज्यांनी ह्या महाराष्ट्र राज्याला जास्तीत जास्त विरोध केला आणि ज्यांनी गेली साडेचार वर्षे साडेतीन कोटी मराठी जनतेचा अनन्वित छळ केला, त्याच पंडित नेहरू यांना संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या कुरुक्षेत्रावर शिवाजी पार्कवर लाखो मराठी लोकांसमोर मराठी राज्य निर्माण झाल्याची द्वाही नाक मुठीत धरून पुकारणे भाग पडले.

मुंबईतील हजारो मराठी माणसांनी हातात मशाली घेऊन आधल्या मध्यरात्री एक विराट मिरवणूक काढली नि धारातीर्थावर जाऊन हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन केले आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करून महाराष्ट्र राज्याचे स्वागत केले.

महाराष्ट्राच्याच नव्हे, तर साऱ्या भारताच्या इतिहासात कधी निघाली नसेल, एवढी मोठी एक लाख लोकांची मशाल मिरवणूक’ ‘संयुक्त महाराष्ट्र समिती अभंग राहिली पाहिजे, हुतात्म्यांचा विजय असोअशा गर्जना करत जेव्हा धारातीर्थावर पोचली, तेव्हा आकाशातील देवांनी, संतांनी, वीरांनी आणि हुताम्यांनी त्यांच्या आनंदाश्रूंनी त्यांना न्हाऊन काढले.

या मिरवणुकीला चौपाटीवरील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून प्रारंभ झाला. मिरवणूक फाऊंटनकडे जेव्हा गेली तेव्हा तिचे जनसागरात रुपांतर झाले. हजारो मशालींनी सारे तसे रस्ते उजळून निघाले होते. मिरवणुकीचे नेतृत्व साथी एस.एम. जोशी यांच्याकडे सोपवण्यात आले होते. मी, दत्ता देशमुख, मधु दंडवते, भाई डांगे आदि आम्ही मंडळी त्यांच्या मागून चाललो होतो. मिरवणुकीत लाखांवर लोक होते. मध्यरात्रीची वेळ असतानाही पाच हजारांवर स्त्रिया अग्रभागी होत्या.

खास उभारलेल्या हुतात्मा स्मारक स्तंभाभोवती विजेचे दिवे लावण्यात आले होते. त्या स्तंभावर सर्व हुतात्म्यांची नावे लिहिण्यात आली होती. त्या समोरचे कारंजेही पाण्याचे स्फूर्तीदायक फवारे सोडत होते. पावसाने ओलेचिंब झालेला जनसंमर्द जणू स्नानाने शुचिर्भूत होऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आला होता. शिवाजी महाराज की जय, हुतात्म्यांचा विजय असो, समितीचा विजय असो, आचार्य अत्रे की जय आदि अनेक घोषणांनी वातावरण गजबजून गेले होते.

हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून या प्रसंगी केलेल्या भाषणात मी म्हणालो, महाराष्ट्र राज्यनिर्मितीचा आजचा परमभाग्याचा दिवस आणणाऱ्यांनी ही समिती टिकवली पाहिजे. समिती मोडण्याची भाषा करणारे लोक महाराष्ट्रद्रोही आहेत. जे द्विभाषिक राज्य नष्ट करण्यासाठी साडेतीन कोटी मराठी जनता गेली चार वर्षे लढत होती त्या द्विभाषिकांचे वीस मिनिटांपूर्वीच बारा वाजले. झालाच पाहिजे ह्या आपल्या रणगर्जनेला शिवाजी महाराजांच्या हर हर महादेव ह्या रणगर्जनेचे महत्त्व आले होते. झालाच पाहिजे ना?’ मग तो आज झाला आहे.

द्विभाषिक हा महाराष्ट्राचा अपमान होता. अन्याय होता. आम्ही अन्याय, अपमान सहन करत नाही. हे आपण सिद्ध केले. हा विजयाचा क्षण आपल्या समितीच्या एकजुटीने आला. ती मोडण्याची भाषा बंद झाली पाहिजे. ज्या भवानी तलवारीने लढाई जिंकली ती तलवार मोडता येईल काय? सुपुत्राला जन्म दिल्यानंतर मातेची आता जरुरी नाही म्हणून तिला ठार मारता येईल काय? पैलतीराला पोचल्यानंतर होडी बुडवता येईल काय? शिडीवर चढून गेल्यानंतर ती शिडी मोडता येईल काय? नाही ! नाही!”

तलवार मोडता येणार नाही, आईला ठार मारता येणार नाही, शिडी मोडता येणार नाही; त्याच प्रमाणे साडेतीन कोटी मराठी जनतेला महाराष्ट्र राज्य मिळवून देणाऱ्या समितीचे विसर्जन करता येणार नाही. या क्षणी आकाशातून होणारा हा पर्जन्याचा अभिषेक नसून तो छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील एकशेपाच हुतात्मे ह्यांच्या डोळ्यांतून होत असलेल्या आनंदाश्रूंचा वर्षाव आहे. त्याच दिवशी मध्यरात्री राजभवनमध्ये वैदिक सूक्तांच्या उद्घोषात महाराष्ट्र राज्य – अनावरण समारंभास प्रारंभ झाला. वेदपठणानंतर लता मंगेशकर यांनी घन:श्याम सुंदराही भूपाळी व पसायदान म्हटले त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. श्रीप्रकाश यांनी हिंदी व इंग्रजी भाषांतून भाषण करून महाराष्ट्रात अन्य भाषिकांचे हितसंबंध सुरक्षित राहतील, मुंबईचे वैभव टिकेल व वाढेल असे आश्वासन दिले.

ते म्हणाले, “माझ्या सध्याच्या स्थानावर मला कायम ठेवल्याबद्दल मी व्यक्तिशः पंतप्रधानांचा ऋणी आहे. मी विनम्र भावे शपथ घेतो, की या राज्याच्या सेवेत मी माझी सर्व शक्ती वेचीन, महाराष्ट्र ही भारताची बलशाली भुजा होईल व भारताच्या उन्नतीसाठी आणि रक्षणासाठी तो आपले बल खर्च करील अशी अपेक्षा व्यक्त करतो.”

नंतर पंडितजींनी कळदाबून महाराष्ट्र राज्याचे उद्घाटन केले. त्याबरोबर नौबती झडल्या. मंगल वाद्ये वाजू लागली. शहरातील सर्व गिरण्यांचे भोंगे वाजले व अशा रीतीने महाराष्ट्र राज्याची द्वाही फिरली.

या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधानांचे आभार मानताना मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले, “भारत राहिला तरच महाराष्ट्र राहणार आहे. भारताचे प्रतीक सह्याद्री आहे. हिमालयावर संकट आले तर त्याच्या संरक्षणासाठी हा सह्याद्री काळ्या फत्तराची छाती पुढे करून पुढे येईल, याची मी पंतप्रधानांना खात्री देतो.”

खरे पाहता, श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या जयंतीच्या दिवशीच महाराष्ट्र राज्याचा जन्म व्हावा हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक महान योगायोग होता. ह्या दिवशी साडेतीन कोटी मराठी भाषिकांच्या हर्षाला नि आनंदाला जे उधान आले होते त्याचे यथार्थ वर्णन करावयाला मराठी माणसांजवळ शब्द नव्हते. महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत तर लोकांना अक्षरशः वेड लागायची पाळी आली होती. श्रीशिवरायांच्या आणि महाराष्ट्राच्या गर्जनेने सारी मुंबानगरी दणाणून गेली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी सुद्धा मुंबई नगरीने एवढा महोत्सव साजरा केला नसेल. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबई शहर आघाडीवर होते. कारण, भाषिक महाराष्ट्रात मुंबईचा समावेश होऊ नये, या एका गोष्टीवर काँग्रेसवाल्यांचा सर्वात जास्त कटाक्ष होता. म्हणून मुंबईमधल्या मराठी जनतेने तो आपल्या केवळ अब्रुचा नि प्रतिष्ठेचा प्रश्न केला आणि तळहातावर शिर घेऊन ती गेली साडेचार वर्षे लढली. एवढ्यासाठीच या विजयाचा महोत्सव मुंबई शहरात जास्त दणक्याने आणि अभिनिवेशाने साजरा केला जावा, हे साहजिकच होते.

दुसऱ्या दिवशी साऱ्या मुंबई शहराचा चेहरामोहरा आमूलाग्र बदलून गेला होता. वर्षातल्या साऱ्या सणांचा समन्वय त्या दिवशी साजरा करावयाचा जणू काही मुंबईकरांनी निर्धार केला होता. दिवाळी, रंगपंचमी आणि गणेशोत्सव ह्या सणांमध्ये मुंबई शहरात सामान्यतः जी दृश्ये दिसतात, ती सर्व त्याच दिवशी एकसमयावच्छेद करून मुंबईकरांना पाहवयास मिळाली.

मुंबई मिळाल्याचा आनंद जेवढा मोठा, त्यापेक्षाही महाराष्ट्र राज्यभारताच्या नकाशावर आले. हा आनंद सहस्त्रपटीने मोठा ! द्विभाषिक राज्य मोडून निर्माण होणाऱ्या मराठी भाषिकांच्या ह्या राज्याला जर समजा महाराष्ट्रहे नाव मिळाले नसते आणि त्यांचे मुंबईहे पहिलेच नाव जर कायम राहिले असते, तर शिवजयंतीच्या आणि राज्य जन्म महोत्सवाच्या आनंदावर सपशेल पाणी पडले असते. महाराष्ट्रह्या नावाने प्रचंड हलकल्लोळ उडवून दिला. लोक आनंदाने अक्षरशः बेहोष आणि बेभान झाले. भारताच्या नकाशात महाराष्ट्रहे नाव किंवा हा शब्द येऊ नये म्हणून काँग्रेसश्रेष्ठींची कोण धडपड चालली होती. शेवटी मुंबईच्या पुढे कंसात महाराष्ट्रहे नाव घालावे असा त्यांनी बूट काढला. पण महाराष्ट्रहा काय कंसात राहणारा देश होता काय? आजपर्यंत असे हजारो कंसह्या महाराष्ट्राने तोडले आहेत ! शेवटी महाराष्ट्रहे नाव दिले नाही, तर लोकांच्या संतापाला पारावार राहणार नाही. एवढेच नव्हे तर द्विभाषिक राज्य मोडण्याचा चांगुलपणा आपण जो दाखवला आहे, त्याचे सर्वसामान्य श्रेयदेखील आपल्याला कोणी देणार नाही, असे जेव्हा काँग्रेसवाल्यांना समजून आले, तेव्हा, ‘महाराष्ट्राला कंसात कोंडण्याचा नाद त्यांनी सोडून दिला.

मात्र महाराष्ट्र राज्य जन्ममहोत्सवाच्या आनंदाचा सोहळा जास्तीत जास्त धूमधडाक्याने साजरा करण्याची काँग्रेसवाल्यांनी पराकाष्ठा केली ! जणू काही महाराष्ट्र राज्यह्यांनीच मिळवले असे लोकांना वाटले. पण मुंबईचे लोक काही काँग्रेसवाल्यांच्या असल्या नाटकांनी फसून जाणार होते की काय? मुंबईच्या काँग्रेस हाऊसने आपल्या मस्तकावर जय महाराष्ट्रआणि महाराष्ट्राचा जन्म हा लोकशाहीचा विजयअशा दोन पाट्या लावलेल्या पाहून मराठी लोकांच्या हसताहसता मुरकुंड्या वळल्या. म्हणजे यावच्चंद्रदिवाकरौ मुंबई निघत होत्या आणि महाराष्ट्र राज्य निर्माण होऊ नये म्हणून ज्या काँग्रेस हाऊसमध्ये तोपर्यंत कारस्थाने शिजली जात होती त्याच काँग्रेस हाऊसने महाराष्ट्राचा जन्म हा लोकशाहीचा विजय आहेअशा गर्जना करण्याच्या कामी पुढाकार घ्यावा, ह्यापेक्षा अधिक निलाजऱ्या विनोदाचे उदाहरण कोणी दाखवू शकेल काय?

साडेचार वर्षांपर्यंत महाराष्ट्राचे नाव उच्चारण्याचीसुद्धा लाज वाटत होती. त्यांच्या अंगात महाराष्ट्रप्रेमाचा असा काही विलक्षण संचार झालेला पाहून सहारा वाळवंटाला महापूर आला की कायअसा सर्वांना भास झाला. महाराष्ट्रप्रेमाचे काँग्रेसवाल्यांचे हे नाटक कित्येक ठिकाणी तर इतके हास्यास्पद झाले, की लोकांनी लाजेने माना खाली घातल्या. शिवाजी पार्कवर काँग्रेसने जो सांस्कृतिक कार्यक्रम केला, त्यात महाराष्ट्र दर्शनाचा एक भाग होता. त्यात मराठी लोकांच्या चालीरीती आणि सोहळे ह्यांचे एक निदर्शन होते. त्यात लग्नाच्या वेळी पुढील उखाणा घेण्यात आला. संयुक्त महाराष्ट्रासाठी लावल्या पणत्या साठ, यशवंतरावांच्या नावाने सोडते मी आता गाठ !काँग्रेसवाल्यांच्या कोडगेपणाचा हा अगदी कळस होता, असे म्हटले पाहिजे. बाकी, ‘महाराष्ट्र राज्यमिळवून दिल्याचे श्रेय जे लोकसत्ताआणि नवशक्तीकारांसारख्या जाणत्या पत्रकारांनी जेथे यशवंतरावांना दिले, तेथे काँग्रेसच्या सांस्कृतिक कार्यक्रमातल्या पोटभरू कलावंतांना दोष देण्यात काय अर्थ आहे?

त्या सायंकाळी महाराष्ट्र राज्याच्या जन्मोत्सवाचा सोहळा‘ – ‘कुरुक्षेत्रावरशिवाजी पार्कवर पार पडला. शिवाजी पार्क लाखो माणसांनी फुलून गेले होते. शिवाजी पार्कच्या उत्तर प्रवेशद्वारावर लिलीच्या नि मोगरीच्या फुलांची कमान उभारण्यात आली होती. या कमानीच्या शिरावर सुवासिक फुलांच्या कोंदणात शिवछत्रपतींची प्रतिमा झळकत होती. षट्कोणी व्यासपीठाच्या चार कोपऱ्यांवर नंदादीप तेवत होते. पार्श्वभागी नीलरंगी पडद्यावर मोगरी नि झेंडूच्या माळा सोडल्या होत्या. नि त्याच्या मध्यभागी महाराष्ट्र राज्याची राजमुद्रा झळकत होती. व्यासपीठापुढील खास पाहुण्यांचा मोकळ्या दालनात प्रचंड नंदादीप आणि दोन मंगल कलश ठेवले होते. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जय महाराष्ट्र असा फलक उभारण्यात आला होता.

दुपारी एक वाजल्यापासून लोक सभेसाठी जमा होऊ लागले आणि साडेचारपर्यंत सारे मैदान लक्षावधी स्त्री-पुरुष-बालकांनी अक्षरशः फुलून गेले. आजुबाजूच्या घरांच्या शिखरांवर नि झाडांच्या फांद्यांवरही लोक बसले होते. सेहेचाळीस साली ब्रिटिशांच्या तुरुंगातून सुटून आल्यानंतर किंग जॉर्ज हायस्कूलच्या मैदानात पंडित जवाहरलाल नेहरूंचे जे स्वागत झाले किंवा 3 जून 1957 रोजी पंतप्रधानांच्या चौपाटी सभेला प्रतिस्पर्धी सभा म्हणून याच शिवाजी पार्कवर समितीची सभा झाली, त्या सभांशीच त्या सभेची तुलना करता येईल. सभास्थानी सनईचे सुस्वर वातावरणातील पावित्र्यात भर टाकीत होते. तर उन्हाने तापलेल्या जनतेला कंटाळा येऊ नये म्हणून, ‘शिकागो रेडियोचे नानक मोटवाणी हे त्यांच्या विदुषी चाळ्यांनी नि हास्यास्पद भाषणांनी जनतेचे मनोविनोदन नेहमीप्रमाणे करीत होते.

पाच वाजता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील दोन मैल लांबीची प्रचंड मिरवणूक सभास्थानी येऊ लागली. ही संपूर्ण मिरवणूक शिवाजी पार्कवर येण्यास सव्वा तास लागला. ठीक सहा वाजता पंतप्रधान नेहरू हे श्रीप्रकाश, काकासाहेब गाडगीळ, दादासाहेब पाटसकर, नि श्री.बि रामकृष्णराव या चार राज्यपालांसह नि इंदिरा गांधी यांच्यासह सभास्थानी आले. त्याबरोबर चौघडा धडधडू लागला. तुताऱ्या निनादू लागल्या आणि लक्षावधी जनतेच्या मुखातून संयुक्त महाराष्ट्राचा नि पंतप्रधानांचा जयजयकार उमटला. प्रवेशद्वारापाशी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे नि इतर पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना व्यासपीठावर आणले.

सभामिरवणूक समितीचे अध्यक्ष सिलम यांनी राजमुद्रा महाराष्ट्र राज्यमुद्रेचे बिल्ले त्यांच्या छातीवर लावले. यानंतर केशरी शेमला बांधलेले संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मंगलाचरणसुरू झाले. प्रथम कुमारी लता मंगेशकर यांनी यदा यदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतहा गीतामंत्र व माझा मराठाची बोलू कौतुके ज्ञानेश्वरीतील ओवी म्हटली. यानंतर लता-उषा नि मीना या मंगेशकर भगिनींनी बहु असोत सुंदर संपन्न की महा‘… हे महाराष्ट्र गीत म्हटले.

पंतप्रधानांचे स्वागत करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले, “महाराष्ट्राच्या जीवनात आजचा दिवस सोन्याचा आहे. नवीन महाराष्ट्राच्या जन्माचा मंगल कलश घेऊन भारताचे भाग्यविधाते आणि राष्ट्राचे लाडके पंतप्रधान जवाहरलालजी स्वतः येथे आले आहेत. महाराष्ट्राच्या जन्मावेळी त्याला आशीर्वाद देण्यासाठी केवळ पंतप्रधान म्हणूनच नव्हे तर, हिंदी स्वातंत्र्याचे आशियातील समाजवादी चळवळीचे नेते आणि जगात शांतता टिकवून मानवतेची सेवा करणारे थोर पुरुष म्हणून जवाहरलालजींना मी बोलावले आहे. कारण पंतप्रधानकीचे नाते राहील न राहील, पण ज्या मानवतेच्या मूल्यांनी ते आपले जीवन गुंफीत आहेत, त्या तत्त्वांचा तुमचा आशीर्वाद महाराष्ट्राला मिळणे उचित आहे. हा आशीर्वाद हृदयात ठेवून महाराष्ट्र भारताच्या सेवेला लागणार आहे. म्हणून त्यांची प्रकृती बरी नसतानाही त्यांना येथे येण्याचा आम्ही आग्रह केला.

पंतप्रधान नेहरू म्हणाले,आपण सारे आज आनंदोत्सव साजरा करत आहात. त्यात या सुंदर नगरीत येऊन प्रत्यक्ष सामील होण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे प्रसन्नता वाटत आहे. परंतु उत्सव साजरा करताना त्या पाठोपाठ येणाऱ्या जबाबदारीचा विसर पडू देऊ नका. कारण निश्चय नि कार्य यामुळेच देश वाढतो. संयुक्त महाराष्ट्राची आपण चर्चा करता, पण संयुक्त भारत कसा टिकवायचा, या विचाराने आमचे मन व्यग्र झाले आहे. कारण, आज देशावर चहूकडून हल्ले होत आहेत. आमच्यापुढे अनेक प्रश्न आहेत. गोव्याचा प्रश्न अजून सुटायचा आहेच पण मुख्य प्रश्न आज सीमेचा आहे. भारताचे सीमाभागा आज संकटात आहेत.

“आपण संयुक्त महाराष्ट्र मिळाल्याच्या आनंदात आहात. चांगली गोष्ट आहे. परंतु हे विसरू नका, की आपल्याला संयुक्त भारताचे रक्षण करावयाचे आहे. भारतभूमीचे रक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर आहे. महाराष्ट्र नि भारत बलवान करण्यासाठी शेतकीचे नि औद्योगिक उत्पादन वाढविले पाहिजे. आपसातील भांडणे मिटवली पाहिजेत नि ज्ञानाची कास धरली पाहिजे.

महाराष्ट्र एक सुंदर प्रदेश बनला आहे. पहिल्यानेही तो सुंदर होताच. पण आज एक नवे रूप त्याने धारण केले आहे. महाराष्ट्रभर आज आनंदाचा सोहळा होत आहे. पण त्याचबरोबर त्याच्या एका भागात दुःख आहे, हे विसरू नका. हे दुःख सहानुभूतीपूर्वक दूर केले पाहिजे. मी विदर्भाची चर्चा करीत आहे. हा सुंदर भाग आज महाराष्ट्रात आला आहे. या विदर्भात थोर देशभक्त जन्माला आले आहेत. समृद्ध असा हा प्रदेश आहे. त्याचे दुःख पाहून मला यातना होत आहेत. का त्यांच्या मनात संदेह आहे? दुःख आहे? महाराष्ट्राचे कर्तव्य आहे, की आपण त्यांच्या मनातील शंकाकुशंका दूर करण्यासाठी झटले पाहिजे. महाराष्ट्रात राहण्यात त्यांचे हित आहे हे त्यांना पटवून दिले पाहिजे. विदर्भीयांनाही माझी प्रार्थना आहे, की संतापाच्या भरात त्यांनी काही भांडणतंडण केले असले तरी ते विसरून जावे. महाराष्ट्र आणि गुजरात हे आज अलग होत असले तरी अनेक वर्ष हे एकत्र आणले आहेत. भारतमातेच्या रत्नहारातील ती दोन रत्ने आहेत. पूर्वी काही झगडा झाला असला तरी तो विसरून त्यांनी चांगले शेजारी नि बंधू म्हणूनच यापुढे रहावे. खासकरून मुंबई नगरीत त्याची आवश्यकता आहे. मुंबापुरी ही महाराष्ट्राची राजधानी तर खरीच, पण ती भारतवर्षाची पश्चिमी राजधानी आहे. भारतातील अव्वल दर्जाचे शहर म्हणून समजले जाते, याबद्दल या नगरीला आणि येथील रहिवाशांना अभिमान वाटला पाहिजे. महाराष्ट्रात हे शहर असले तरी महाराष्ट्रीयांबरोबरच इतर भागातील लोकांनी येथे येऊन कष्ट केले आहेत. या नगरीचे वैभव आपण टिकविण्या-वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. “संयुक्त महाराष्ट्र आज झाला आहे, त्याची आपण सेवा करा. महाराष्ट्र नि भारतसेवा काही अलग नाही. आपण भारताला विसरू नका. कारण त्यात न भारताचे हित न महाराष्ट्राचे. जातीभेद, भाषाभेद आता सोडून सर्व शक्ती महाराष्ट्र आणि भारत यांना बलवान करण्यासाठी वेचा. आज रात्री एक वाजता संयुक्त महाराष्ट्राचे हे दर्शन घेऊन मी काही दिवसांसाठी भारताबाहेर जात आहे. आपला आनंद नि उत्साह पाहून माझी शक्ती वाढली आहे. महाराष्ट्राचा हाच मला आशीर्वाद आहे.” नेहरूंच्या या सर्व भाषणांमध्ये मराठी माणसाच्या हृदयाला सलणारी एक गोष्ट घडली. ती अनवधानाने घडली असेल असे वाटत नाही. ती ही, की भारताचे पंतप्रधान या नात्याने लाखो मराठी लोकांसमोर महाराष्ट्र राज्याची द्वाही पुकारताना त्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्र राज्याचे स्फूर्तीदैवत श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांचे नावसुद्धा उच्चारले नाही. नेहरूंची ही चूक अक्षम्य होती. महाराष्ट्र राज्याची घोषणा करावयाला आमच्या राजधानीत यावयाचे. पहिले भाषण शिवाजी पार्कवर करावयाचे. दुसरे भाषण चौपाटीवर लोकमान्यांच्या पुतळ्यासमोर द्यावयाचे आणि ह्या दोन्ही भाषणात पंडित नेहरूंनी आमच्या शिवरायांच्या किंवा लोकमान्यांच्या नावाचा नुसता उल्लेखही करावयाचा नाही, हा पंडित नेहरूंनी महाराष्ट्राचा जाणुनबुजून केलेला अपमान होता, याविषयी कोणाला काही शंका उरली होती की काय? श्रीछत्रपतींचे नाव घेतल्यावाचून या आमच्या महाराष्ट्रात कोणत्याही ऐतिहासिक गोष्टीला प्रारंभ होत नाही, हे पंडित नेहरूंना काही माहीत नव्हते? एका महान राजकीय संकल्पासाठी पंडित नेहरूंनी महाराष्ट्राच्या राजधानीत यावे आणि छत्रपतींच्या नावाचा त्यांच्या भाषणात उल्लेखसुद्धा करू नये या गोष्टीचा अर्थ काय? भारताच्या राजधानीत गेलेल्या कोणाही महत्त्वाच्या माणसांनी राजघाटावर जाऊन गांधींच्या समाधीवर फुले वाहिली पाहिजेत, अशी नेहरुंची अपेक्षा असते ना? त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आलेल्या कोणाही थोर पुरुषाने पहिला मुजरा श्रीछत्रपतींना केला पाहिजे, अशी प्रत्येक मराठी माणसाची सहाजिकच इच्छा असते. अहो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांनीदेखील जेथे छत्रपतींचे किंवा लोकमान्यांचे नाव त्यांच्या मुखामधून त्या दिवशीच्या भाषणात उच्चारले नाही, तेथे पंडित नेहरू आपण होऊन त्याचा उच्चार करतील अशी आशा बाळगण्यात काय अर्थ होता?

महाराष्ट्र राज्य झाले म्हणून विदर्भाला दुःख झाले असेल, त्यांच्या मनातल्या शंकाकुशंका आपण दूर करून त्यांची समजूत घातली पाहिजे, मुंबईमधल्या गुजराती लोकांशी मराठी लोकांनी भ्रातृभावाने आणि शेजारधर्माने वागावेहे नेहरूंच्या भाषणातले उल्लेख जितके अनावश्यक नि आगंतुक होते, तितकेच ते त्यांच्या मनातल्या महाराष्ट्रद्वेषाचे निदर्शक होते. ह्या मंगल समारंभात असला अमंगळ घूत्कार करण्याचे नेहरूंना काही कारण होते का? अशा रीतीने महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या शुभप्रसंगी शिवाजी महाराज, लोकमान्यांची नावे कटाक्षाने वगळून अन् विदर्भ महाराष्ट्राच्या भांडणाची खपली मुद्दाम उकरून पंडित नेहरूंनी आपल्या महाराष्ट्र द्वेषाचे जे क्षुद्र नि हिडीस प्रदर्शन जाहीरपणे केले, ते बघून नेहरूंच्या मनात महाराष्ट्राबद्दल वैरभाव आहेहे चिंतामणराव देशमुख यांचे वचन किती खरे होते याबद्दल अनेकांची खात्री पटली !

पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी मात्र नव्या गुजरात राज्याचे अभिनंदन करताना भारताच्या मुकुटातले पंधरावे रत्नअसा तिकडे अहमदाबादला त्याचा गौरवपर उल्लेख केला. आतापर्यंत देशात तेरा भाषिक राज्ये होती. त्यात आता दोन यांची भर पडली. म्हणजे भारताच्या मुकुटात आता पंधरा रत्ने झाली. सहाजिकच महाराष्ट्रहे भारताचे चौदावे रत्न ठरले. पंतांनी अप्रत्यक्षपणे का होईना पण महाराष्ट्राला चौदावा रत्नठरवून त्याचा सार्थ सुंदर आणि समर्पक गौरव केला, याबद्दल त्यांचे अभिनंदन करावयास हवे.

खरोखरच, महाराष्ट्र हे भारताचे चौदावे रत्नआहे. कारण महाराष्ट्राने काँग्रेसला चौदावं रत्नदाखविले, म्हणूनच मुंबई राजधानी असलेले हे महाराष्ट्र राज्यअखेर निर्माण झाले.

———————————————————————————————-————————————————–**

About Post Author

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here