सुनंदाताई पटवर्धन – एक प्रेरणास्थान

1
256

सुनंदाताई पटवर्धन यांच्या दुःखद निधनाची (10 जानेवारी 2024) बातमी वाचली आणि हृदयाचा एक ठोका चुकला. सुनंदाताई आणि माझा संपर्क पंधरा वर्षांहून अधिक काळचा. मी रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बन आणि प्रभाकर फाऊंडेशन यांचा प्रतिनिधी म्हणून 2007 च्या सुमारास सुनंदाताई आणि त्यांच्या ‘प्रगती प्रतिष्ठान‘ संस्थेच्या संपर्कात आलो. सुरुवातीला जव्हार-मोखाडे भागात आदिवासी मुलांना सायकल वाटप, महिलांना घरघंटी वाटप अशा उपक्रमांतून सुनंदाताई यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर पहिला मोठा उपक्रम राबवला तो 2009 मध्ये भाटीपाड्याच्या सोलर उपक्रमाचा. भाटीपाड्याच्या तीसहून अधिक घरांना सोलर वीज आणली. दोनशेपेक्षा अधिक आदिवासींच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली. त्यातून उत्साहित होऊन मग तो उपक्रम आणखीन पाच-सहा पाड्यांमध्ये राबवला. साखळीपाड्यात सोलर ड्रिप इरिगेशन उपक्रम, नळ पाणी योजना असे आणखी काही उपक्रम पुढील दहा-बारा वर्षांत पार पाडले. सुनंदाताई यांनी दिशा दाखवावी आणि आम्ही त्या दिशेने वाटचाल करावी हा नियमच झाला !

सुनंदाताईंशी संपर्क गेल्या पाच-सहा वर्षात मात्र थोडा कमी झाला होता. सुनंदाताईंची शेवटची भेट झाली ती सहा महिन्यांपूर्वी, एका समारंभात. आम्ही तीन-चार वर्षांनंतर भेटत होतो. त्यांचा चेहरा थकलेला दिसत होता, पण डोळ्यांत तेज होते. मी पुढे होऊन त्यांना वाकून नमस्कार केला. “ओळखलं का?” मी त्यांच्याकडे आदराने बघत म्हणालो. “मी गिरीश घाटे”… सुनंदाताईंनी क्षणभरच विचार केला आणि त्यांचा चेहेरा फुलला. “अरे, कुठे आहेस तू? किती दिवसांत भेट नाही”… शेजारी ‘प्रगती प्रतिष्ठान’चा त्यांचा नवीन सहकारी उभा होता. सुनंदाताईंनी त्याला आम्ही केलेल्या उपक्रमांची खडान् खडा माहिती इतक्या वर्षांनंतरही दिली. ती त्यांची शेवटची भेट असेल असे स्वप्नातही वाटले नव्हते.

सुनंदाताईंचा जन्म 9 मार्च 1939 रोजी वाई येथे घोटवडेकर कुटुंबात झाला. सुनंदाताई यांचे माहेरचे नाव शशिकला. त्यांचा विवाह ठाण्याच्या वसंतराव पटवर्धन यांच्याशी 1956 मध्ये झाला. वसंतराव पटवर्धन हे आप्पासाहेब म्हणून समाजात ओळखले जात. अप्पासाहेबांचा कल समाजसेवेकडे पहिल्यापासून होता. ते राष्ट्रीय स्वयंवसेवक संघाचे सदस्य होते. त्यांनी 1963 मध्ये चालू नोकरी सोडून, ते संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले. सुनंदाताईंनी अप्पासाहेबांना घरात आणि त्यांच्या समाजकार्यात संपूर्ण साथ दिली. अप्पासाहेबांनी नोकरी सोडली असल्याने, घरात नियमित येणारा पैसे थांबला. सुनंदाताईंनी घरगुती उद्योगांच्या माध्यमातून घरखर्चासाठी पैसा उभा केला. त्यांनी एका आईची भूमिका देखील सार्थपणे निभावत त्यांच्या मुलांना प्रगल्भ संस्कार दिले. त्यांनी घरची जबाबदारी सांभाळून अप्पासाहेबांबरोबर समाजकार्यास वाहून घेतले.

अप्पासाहेबांनी ‘प्रगती प्रतिष्ठान’ची स्थापना 1972 साली केली. ‘प्रगती प्रतिष्ठान’मार्फत जव्हार-मोखाडे भागातील आदिवासी समाजासाठी कार्य सुरू झाले. अप्पासाहेबांच्या कल्पनेतून सुरू झालेली ती संस्था दोघांनी एक विचाराने आणि एक मताने मोठी केली. आदिवासी मुलांना त्यांच्या गावात शिक्षणाची सोय नव्हती. त्यांना शिक्षणासाठी जव्हारला यावे लागे. ‘प्रगती प्रतिष्ठान’ने आदिवासी मुलांसाठी जव्हारमध्ये वसतिगृह चालू केले. जव्हारमध्ये कर्णबधिर मुलांसाठी वसतिगृह आणि शाळा सुरू केली. शिक्षणाला वंचित असलेल्या आदिवासी मुलामुलींच्या शिक्षणाची सोय झाली. त्याचबरोबर पटवर्धन दाम्पत्याने जव्हार-मोखाडे भागात कार्यकर्त्यांची साखळी निर्माण केली. अप्पासाहेबांचे निधन 2006 साली झाले. परंतु सुनंदाताई खचल्या नाहीत. त्यांनी स्वत:च्या खांद्यावर ‘प्रगती प्रतिष्ठान’ची धुरा घेतली.

सुनंदाताई जव्हारमध्ये आदिवासी समाजाच्या शिक्षणाची सोय करून थांबल्या नाहीत. त्यांनी आसपासच्या पाड्यांत फिरून आदिवासी समाजाच्या खडतर जीवनमानाचा अभ्यास केला. त्या समाजाला शिक्षणाची आवश्यकता होतीच, परंतु त्यांचे दैनंदिन जीवन सुखकर होणे गरजेचे होते. तरुणांचा मुंबई-पुण्याकडे जाणारा ओघ थांबवून त्यांना त्यांच्याच भागात उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्यासाठी सर्वप्रथम समाजाला एकत्रित करण्याची निकड होती. त्यांच्या मनात आशा निर्माण करणे जरुरीचे होते.

सुनंदाताईंनी सर्वप्रथम आदिवासी महिलांना एकत्र करणे आरंभले. त्यांनी पाड्यापाड्यांतून बचतगट स्थापन केले, अंगणवाड्या सुरू केल्या, महिलांना एकत्र करून उपजीविकेसाठी हस्तकलेवर आधारित आणि इतर कुटिरोद्योग सुरू केले. त्यांनी निर्माण केलेल्या बचतगटांचे जाळे काम करू लागले. सुनंदाताईंचे कार्य पाड्यापाड्यांत आणि घराघरांत पोचू लागले. गावातील तरुण मुले शहराची वाट न धरता गावातच निवारा घेण्याचा विचार करू लागली. गावचे आदिवासी सुनंदाताईंना ‘वहिनी’ म्हणून आपुलकीने संबोधू लागले.

दुसऱ्या बाजूला हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी निधीची आवश्यकता होती. सुनंदाताईंनी खाजगी कंपन्या, ठाणे-मुबईतील रोटरी क्लब आणि त्यासारख्या संस्था यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दात्यांनी दिलेला निधी योग्य ठिकाणी वापरला जात आहे हा विश्वास दात्यांमध्ये निर्माण केला. सुनंदाताईंची खुबी अशी, की त्या जितक्या आत्मीयतेने आदिवासी समाजात मिसळत तितक्याच सहजतेने त्या दात्यांबरोबर वावरत. परंतु तसे करत असताना त्यांनी त्यांची साधी राहणी कधी सोडली नाही.

नळ-पाणी योजना हा ‘प्रतिष्ठान’चा परिणामकारक असा उपक्रम. जव्हार-मोखाडे हा अतिशय दुर्गम आणि डोंगराळ प्रदेश. चार महिने पावसाळ्यात एवढा पाऊस असतो, की झोपड्यांतून बाहेर पडण्याची सोय नाही. परंतु पाऊस थांबला की सारे पाणी त्या डोंगराळ भागातून वाहून जाई आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याची भ्रांत होई. रहिवाशांना वर्षातील सहा ते आठ महिने दोन-तीन किलोमीटर अंतरावरून दऱ्याखोऱ्यांतून पिण्याचे पाणी आणावे लागे. दऱ्याखोऱ्यांतून डोक्यावर हांडे वाहणाऱ्या आदिवासी महिला पाहून सुनंदाताईंचे मन क्लेशीत झाले. त्यांनी नळ-पाण्याची योजना पुढे आणली. ती योजना म्हणजे दरीतून पाण्याच्या साठ्यावर पंप बसवायचा. पाणी उचलून पाड्यात आणायचे. पाड्यात पाण्याची टाकी बसवायची आणि तेथून नळाद्वारे पाणी घराघरात पोचवायचे. पाहता पाहता, तो प्रकल्प पाड्यापाड्यांत पोचला. एकशेचाळीसहून अधिक पाड्यांमध्ये पन्नास हजार कुटुंबांना त्या योजनेचा लाभ मिळू लागला.

सुनंदाताई केवळ नळ-पाणी योजना राबवून स्वस्थ बसल्या नाहीत. आदिवासींना पिण्याचे पाणी मिळणे ही प्राथमिक सुविधा अत्यावश्यक आहे, परंतु त्याचबरोबर पाण्याची बारा महिने उपलब्धता निर्माण करणे हेही तेवढेच महत्त्वाचे होते. मग ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ योजनेचा पाठपुरावा सुनंदाताईंनी केला. त्यातून ‘प्रगती प्रतिष्ठान’ने पन्नासहून अधिक पक्के बंधारे आणि अडीचशेपेक्षा अधिक वनराई बंधारे जव्हार-मोखाडे भागात बांधले. अठ्ठेचाळीस गावांना शेती व्यवसायासाठी त्याचा फायदा झाला.

सुनंदाताईंचा आणखी एक स्तुत्य उपक्रम म्हणजे सोलर वीज योजना. मुंबईसारख्या प्रगत शहरापासून जेमतेम दीडशे किलोमीटरवर असलेल्या जव्हार-मोखाडे आदिवासी प्रदेशात वीज नव्हती. दिवसभर राबून आलेला आदिवासी संध्याकाळी अंधारात त्याच्या त्याच्या झोपड्यात पडून असे. सुनंदाताईंनी त्यांच्या जीवनात प्रकाश आणला. सोलर ऊर्जेवर चालणारे दिवे घराघरात लावण्याचा उपक्रम सुनंदाताईंनी हाती घेतला. घराघरांत दिवे आले. रस्त्यावर विजेचे खांब लागले. आदिवासी पाडे उजळून निघाले. सव्वादोनशे पाड्यांमध्ये सोलर वीज आली. एकशेत्र्याण्णव पथदीप लागले आणि सहा हजारांहून अधिक घरांतून प्रकाश उजळला.

‘प्रगती प्रतिष्ठान’ने अन्य अनेक लोकोपयोगी उपक्रम गेल्या पन्नास वर्षांत राबवले. ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या पुढाकाराने अनेक महिला बचत गटात कार्यरत आहेत; पाड्यापाड्यांतील अंगणवाड्यांतून पोषक आहार मोहीम राबवली- तीनशेहून अधिक बालकांना त्याचा लाभ मिळाला; शेतीमालाला बाजारपेठ मिळावी यासाठी शेतकऱ्यांचे बचत गट उभारले- त्यात तीन हजाराहून अधिक शेतकरी सामील झाले. वर्षातून जेमतेम एक पीक घेणारा शेतकरी दोन किंवा तीन पिके घेऊ लागला.

सुनंदाताईंनी त्यांचे स्वत:चे सारे आयुष्य ‘प्रगती प्रतिष्ठान’ला अर्पण केले. सुनंदाताई आणखी एक महत्त्वाची गोष्ट करून गेल्या. ती म्हणजे ‘प्रगती प्रतिष्ठान’चे कार्य त्यांच्या मागे चालू राहवे यासाठी त्यांनी सक्षम कार्यकर्त्यांचा एक गट निर्माण केला. ‘प्रगती प्रतिष्ठान’ने गेल्या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण केली. सुनंदाताईंनी निस्पृह भावनेने संस्थेची धुरा संस्थेच्या नवीन पिढीकडे सोपवली. सुनंदाताई आज हयात नाहीत. परंतु त्या ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या तेवत राहणाऱ्या ज्योतीच्या रूपाने समाजात अजरामर झाल्या आहेत.

(जयश्री कुलकर्णी यांच्या लेखाआधारे आणि वीरेंद्र चंपानेरकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार)

– गिरीश घाटे 9820146432 ghategp@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. नमस्कार.

    खूप प्रेरणादायी काम व लेख. ऐकून असलेल्या व्यक्तींबद्दल प्रत्यक्ष लेखातून अधिक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत. धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here